Monday, March 14, 2011

`शूल' रामेश्वरी, टोचणी सोमेश्वरी

`शूल' पाहण्याचा अनुभव अस्वस्थ करणारा आहे.
पण, तो लेखक-दिग्दर्शकाला अपेक्षित अर्थाने प्रेक्षकाला अस्वस्थ करतो का? या प्रश्नाचं उत्तर `नाही' असं आहे.... अधिक अस्वस्थ करणारं.
लेखक-दिग्दर्शकाला अपेक्षित काय आहे, हे `शूल'मध्ये थेटच समजतं. `इन्स्पेक्टर समर प्रताप सिंगसारख्या (हा सिनेमाचा नायक) अधिकाऱयांमुळे पोलिस दलाची प्रतिमा आजही धवल आहे, `छाप मजकूर श्रेयनामावलीआधीच झळकतो. साहजिकच, लेखक-दिग्दर्शकांना नायकाबद्दल आदरयुक्त प्रेम आहे आणि तेच प्रेक्षकांनाही वाटावं, अशी अपेक्षा आहे.
समर (मनोज बाजपेयी) आहे पोलिस दलाचा एक अधिकारी, बिहारमधल्या एका खेडय़ात-मोतिहारीमध्ये त्याची बदली होते. समर प्रताप तरुण, कोपिष्ट आणि कायद्याच्या पुस्तकातल्या प्रत्येक कलमाचं पालन करणार नेक अधिकारी आहे. पत्नी मंजिरी (रवीना टंडन) आणि मुलगी (बेबी अवी) यांच्यासमवेत तो मोतिहारीमध्ये येतो. इन्स्पेक्टर हुसैन (गणेश यादव) आणि इन्स्पेक्टर तिवारी (विनीत कुमार) हे त्याचे इथले सहकारी. बिहारच्या `गुंडाराज'मध्ये रुळलेले, परिस्थितीशी जुळवून घेणारे.
बच्चू यादव (सयाजी शिंदे) या स्थानिक नेता- कम- माफिया गुंडाच्या `पोरां'ना समर मारामारीच्या केसमध्ये अटक करतो, तिथून सिनेमातला संघर्ष सुरू होतो. पैसा आणि दहशतीच्या बळावर मोतिहारीवर राज्य करणारा बच्चू यादव हा कायद्यापुढे एक य:कश्चित माणूस आहे, खुनी गुंड आहे. ही समरची धारणा त्याच्या `व्यवहारी' सहकाऱयांना पटत नाही. बच्चू यादवला सामान्य गुन्हेगारासाखा फरपटावा, त्याची तंगडी मोडून हातात द्यावी आणि तो किती फडतूस आहे, त्याची तथाकथित ताकद कशी फसवी आहे, हे जगाला दाखवून द्यावं, अशी समरची जिद्द आहे. ती अर्थातच त्याच्या अंगाशी येते.
पकडलेले गुंड पुराव्याअभावी निर्दोष सुटणं, खुनी हल्ल्यात मुलीचा मृत्यू, खुनाचा आळ अशा क्रमानं समरचं आयुष्य उद्ध्वस्त होत जातं. त्याचे वडील बच्चू यादवपुढेच पदर पसरून त्याची सुटका करवून घेतात, तेव्हा त्यानं आयुष्यभर जपलेल्या तत्त्वांनाही सुरुंग लागतो. एखाद्या कुसळासारखं खुपणारं त्याचं आयुष्य सेप्टिक झालेल्या जखमेसारखं चिघळतं, ते मंजिरीची सोबत संपल्यावर. आता हे कुसळ उपसून काढण्याचा एकच मार्ग असतो... बच्चू यादवचा नाश आणि पर्यायानं आत्मनाश.
रामगोपाल वर्माचा सहाय्यक असलेल्या तरुण दिग्दर्शक ई. निवासचा हा पहिलाच सिनेमा. कथा-पटकथा ई. निवास आणि रामगोपाल वर्मा यांची. तिचं मूळ सापडतं `जंजीर'मध्ये. भ्रष्ट व्यवस्थेमध्ये नियमांचं पालन करू पाहणारा आणि भरडला जाणारा त्याच व्यवस्थेचा घटक, हा सिनेमातला एक रूढ रूपबंध आहे. `जंजीर'चा इन्स्पेक्टर विजय आजच्या काळात, मध्यममार्गी सिनेमात कसा दिसला-वागला असता आणि त्याचं काय झालं असतं, याचं उत्तर `शूल'मध्ये शोधता येतं. (समांतर सिनेमानं दशकभरापूर्वीच `अर्धसत्य'च्या रूपानं एक उत्तर देऊन ठेवलंय.)
`शूल'ची मांडणी मध्यममार्गी अशासाठी की, त्यात `जंजीर'चा फिल्मीपणा नाही. `अर्धसत्य'चं भगभगीत वास्तवदर्शनही नाही. दोहोंचा मेळ घालण्याचा प्रयत्न आहे. इथे फिल्मी गोडव्यानं वावरणारी नायकाची मुलगी आहे. त्याच्या सुखी संसाराचं चित्रण करणारं `मेरे पापा को गुस्सा जब आता है,' हे गाणं आहे. खलनायकाच्या मनोरंजनासाठी सादर होणारं `मैं आयी हूँ यू. पी., बिहार लूटने' हे नौटंकीछाप `कडक' गाणं (शिल्पा शेट्टीच्या मादक `स्पेशल अपीयरन्स'सह) आहे. या तडजोडी नजरेआड करता येतात; कारण, `शूल'मध्ये या तडजोडी मूळ कथानकावरून लक्ष विचलित करणाऱया नाहीत.
अव्वाच्या सव्वा पैसे मागणाऱया हमालाला दटावण्याच्या प्रवेश प्रसंगापासूनच नायक समर प्रतापचं स्वभावदर्शन स्पष्टपणे घडतं. तत्पूर्वी, एका प्रतिस्पर्ध्यांचा नृशंसपणे काटा काढणारा बच्चू यादव आपली गुणसंपदा पडद्यावर उधळून गेलेला असतो. पुढे सिनेमात एकमेकांना छेदून जाणारे हे दोन परस्परविरुद्ध ताणबिंदू पहिल्या रिळातच ठळक होतात. कथा-पटकथाकार वास्तवदर्शी भासणाऱया प्रसंगांमधून तो ताण वाढवत नेतात. या दोघातल्या संघर्षाची नांदीही जिवाचा थरकाप उडवते आणि एकाकी लढणाऱया समरची घुसमट प्रेक्षकाचाही जीव घुसमटवते.
कथा-पटकथाकारांनी ही परिणामकारकता मिळवण्यासाठी बिहारची पार्श्वभूमी अचूक निवडली आहे. पात्रांना `लार्जर दॅन लाइफ' न बनवण्याचं, वास्तवात संभवनीयच प्रसंगी निवडण्याचं चातुर्य दाखवलं आहे. समरनं पकडलेल्या बच्चूच्या पोरांची सुटका, बच्चूच्या जलशामध्ये समरनं कायद्याचा बडगा दाखवून घडवलेला रसभंग, बच्चूनं समरच्या घरात घुसून सोनूशी लाडेलाडे खेळत-बोलत दिलेली गर्भित धमकी, समर आणि डीएसपी यांच्यात उडणारा खटका, समरचे हुसेन-तिवारी यांच्याशी होणारे वाद या सगळय़ा प्रसंगामध्ये नाटय़ आहे; पण ते अतिरंजित नाही. लाउडनेस डोकावू लागतो सोनूच्या मृत्यूनंतर. हलवायाच्या दुकानात बच्चूचे गुंड समरची टेर खेचतात. तेव्हा झालेल्या हाणामारीत एक
फटाका सोनूच्या वर्मी बसतो. मूर्च्छित सोनूला भररस्त्यावर ठेवून पाहण्यासाठी, डॉक्टरसाठी भिरभिरणारा (आणि `मशाल'च्या सुप्रसिद्ध प्रसंगाची आठवण करून देणारा) समर आणि निष्क्रिय बघ्यांचा जमाव, हे चित्रण अतिरंजित वाटतं.
समरची कर्तव्यनिष्ठा उज्ज्वल करण्यासाठी त्याच्यावर एकाकीपणा  लादला गेलाय की काय, अशी शंका इथे येते. अगदी बिहार झाला म्हणून तिथे इतकी संवेदनशून्य माणसं आहेत? समोर एक अश्राप पोर मरणोन्मुखी पडलेली असताना, कुणी पाणीही आणणार नाही? हेच प्रश्न उत्तरार्धात मोठय़ा प्रमाणावर भेडसावू लागतात. बच्चूच्या साम्राज्याला समर हादरा देणार असेल, तर त्यात कोणा ना कोणाचा स्वार्थ असेलच. ही माणसं, स्वार्थापोटी का होईना, समरच्या बाजूनं उभी का राहात नाहीत? वृत्तपत्रादी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तर सिनेमात औषधालाही दिसत नाहीत. समरच्या झुंजीला किमान `बातमी'चं तरी मोल आहेच ना?
आपल्यावर उपकार केलेल्या बच्चूला समर घरातच अपमानित करतो, तेव्हा आगामी उत्पातांची चाहूल कुणालाच लागत नाही, हेही अनाकलनीय आहे. तो मंजिरीला आई-वडिलांबरोबर पाठवत नाही आणि तेही सुनेच्या सुरक्षिततेचा विचार करत नाहीत, हे बेतीव वाटतं. मंजिरीलाही गमावल्याखेरीज समरला कायदा उल्लंघायचं प्रबळ कारण मिळणार नाही, या या गणिताचं अस्तित्व जाणवत राहतं... खुपतंही.
``शूल'मध्ये सर्वाधिक निराशा होती ती `क्लायमॅक्सला. कायद्याच्या पालनासाठी सर्वस्व गमावणारा समर शेवटी असहाय्यपणे कायदा हातात घेतो, तेव्हा त्याच्याबद्दल आदर बाळगण्यासारखं काही उतरत नाही. आजतागायत अनेक फिल्मी हिरोंनी फिल्मी संघर्षांचा असा फिल्मी शेवट केला आहे. त्यांना जास्तीत जास्त निर्भय म्हणता येईल, धाडसी म्हणता येईल; पण आदर्श कसं म्हणायचं? एकदा कायदा ही समाजाच्या स्थितीगतीची न्याय्य चौकट मानल्यावर, कितीही उदात्त हेतूंनी का होईना, ती उल्लंघणारा माणूस हा गुन्हेगारच आहे. विशेषत: त्याच कायद्याला सर्वस्व वाहिलेला माणूस जेव्हा हे करतो, तेव्हा तो कायदाविहीन समाजाचा (लॉलेस सोसायटी) आदर्श समाजासमोर ठेवतो. हा `आदर्श' समाजाला परवडणारा नाही. या चाकोरीबद्धपणाचा कळस होतो कळसाध्यायाला.
समर सगळा `वेगळेपणा' उतरवून सुडानं पेटलेला रूढ नायक बनून थेट विधानसभेत शिरून बच्चूला गाठतो आणि अध्यक्षांच्या माईकवरून भयभीत सभागृहाला उद्देशून भाषणच ठोकतो.
 (आठवा, नाना पाटेकरांचे समस्त उद्रेकपट). इथे तो `बच्चूसारखा गुंड, नालायक, नृशंस माणूस तुमच्यात बसू कसा शकता?' हा सवाल करतो, तेव्हा तो आणि लेखक पोरकट वाटून जातात. जणू बिहारच्या विधानसभेत एक बच्चूच गुंड आहे, बाकी सगळे सज्जनशिरोमणी. लेखकांचं हे राजकीय-सामाजिक अज्ञान निखळ हास्यास्पद आहे. उत्तरार्धात ढासळलेला `शूल' इथे पार रसातळाला पोहोंचतो.
तरीही `शूल'मध्ये पाहण्यासारखं काही ना काही आहेच. एकतर ई. निवासनं सफाईदार तांत्रिक कामगिरी केली आहे. संपूर्ण सिनेमाला व्यापून राहिलेली अस्वस्थता, समरची मानसिक अस्थिरता त्यानं `स्टेडीकॅम'नं चित्रित केलेल्या, कॅमेऱयाच्या सुबक हालचाली धुडकावणाऱया दृष्यांमधून चपखल व्यक्त केली आहे. मात्र, अकारण कॅमेऱयाचे तिरपे-तारपे कोन लावण्याचा अतिउत्साहही अध्येमध्ये जाणवतो. कृष्णा यांचं कलादिगदर्शन, शितू यांची वेशभूषा, सुरेश यांची रंगभूषा, हरी नायर यांचं वास्तवाभासी छायालेखन आणि अनुराग कश्यपनं लिहिलेले मर्मग्राही संवाद यांच्या साहय़ानं ई. निवासनं `शूल'च्या आशयाला साजेसं राकट दृष्यरूप बहाल केलंय.
सर्व कलावंतांची कामगिरी, ही `शूल'ची सर्वात उल्लेखनीय बाजू. मुख्य मानकरी अर्थात मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे. समरचा सगळा उद्वेग, सगळा त्वेष, सगळी घुसमट आणि असहाय उद्रेक मनोजनं अतिशय प्रत्ययकारी साकारले आहेत. मनोजची `वेगळय़ा नावा'चीच ओळख ठाऊक असणाऱया प्रेक्षकांना ती अजरामर भूमिका विसरायला लावेल, अशी अव्वल दर्जाची कामगिरी त्यानं केली आहे,  
सयाजीकडे खरंतर रूढ खलनायकाची धट्टीकट्टी शरीरयष्टी नाही आणि आवाजही नाही; पण त्यानं हा मदांध खालनायक रंगवताना मानवी स्वभावाच्या अनेक छटांची जोड दिली आह. त्याच वेळी कौतुक सयाजीचं वाटावं; पण बच्चूचा मात्र तिरस्कारच वाटावा, ही कसरत त्यानं अफलातून साधली आहे. अशीच खणखणीत कामगिरी गणेश यादवनं केली आहे. बच्चूच्या जिवावर उडय़ा मारणाऱया बेडर मेव्हण्याच्या भूमिकेतला नंदू माधव आणि मंद गुंडाच्या भूमिकेतला नागेश भोसलेही लक्षवेधी कामगिरी करून जातात. एरवी मटक-मटक मटकरणाऱया रविना टंडनचं या सिनामातलं ग्लॅमरविरहित दर्शन आश्वासक आहे. ती फार मोठी अभिनेत्री नाही; पण, शोभेची बाहुलीही नाही. हे `शूल' सिद्ध करतो.
एकूणात, चुकीच्या जागी टोचणी लावणारा `शूल' या उत्तम सांघिक कामगिरीमुळेच सुसहय़ झाला आहे.

(महाराष्ट्र टाइम्स)

1 comment:

  1. अतिशय योग्य शब्दांतलं परिक्षण... जबरी

    ReplyDelete