(हीरो आणि व्हिलन यांच्यातला नेहमीचा शाब्दिक खणाखणीचा सीन...)
एकाम्बरम : एकाम्बरम हे नावा घेतलं की अद्याप आईच्या पोटातून बाहेर न आलेलं मूलही तोंड बंद करतं...
अलेक्स पांडियन : आणि त्याच गर्भस्थ मुलासमोर अलेक्स पांडियन हे नाव घेतलं की ते मूल स्वत:बरोबरच स्वत:च्या हातांनी आपल्या आईचंही तोंड बंद करतं...
चित्रपट : मुंद्रू मुघम
अलेक्स पांडियनच्या भूमिकेत : रजनीकांत या सिनेमात रजनीकांतने आणखी दोन भूमिका केल्या होत्या... ट्रिपल रोल. वीसेक वर्षांपूर्वीचा हा सिनेमा आजही तामिळनाडू हाऊसफुल्ल जातो. रजनीकांत व्हिलनला कसा वाजवतो. ते `ऐकायला' पब्लिक वारंवार जात थेटरात.
रजनीकांतचा सिनेमा म्हणजे असला पंचलाइनवाला डायलॉग पाहिजेच पाहिजे.
``मी जे बोलतो, ते करतो... जे बोलत नाही, तेही करतो...''
``कळपानं फिरतात ती डुकरं... सिंह नेहमी एकटाच येतो...''
तामिळी कडकट्टी आघातांनी या फिल्मी पंचलाइन्समध्ये ठासून बारुद भरला जातो. त्यांना, सिगरेट फेकून ओठात झेलून पेटवणं, बंदुकीची गोळी हातानं अडवून रिबाऊंड करणं वगैरे रजनीकांती करामतींची जोड मिळते आणि रजनीकांत जेव्हा जेव्हा पडद्यावर येतो, तेव्हा तेव्हा थिएटरांमध्ये प्रचंड स्फोट होतो... टाळयांचा, शिटय़ांचा...
सत्यजित राय यांनी फार परखडपणे लिहून ठेवलंय की भारतीय सिनेमाच्या प्रेक्षकांना सिनेमाच्या पडद्यावर सर्कस पाहायची असते. त्यांना तीन तासांत ऍक्शन, इमोशन, कॉमेडी, सेक्स, देशप्रेम, सत्याचा असत्यावर विजय वगैरे सगळं सगळं ठासून भरलेलं हवं असतं...
रजनीकांत हा या `द ग्रेट इंडियन सिनेमा सर्कस' मधला या घटकेचा सर्वात लोकप्रिय डोंबारी आहे. अतिशय भावनाशील आणि कमालीच्या सिनेमावेडय़ा दक्षिण भारतावर या `थलाईगार'चं राज्य आहे... आणि हे साम्राज्य झपाटय़ानं विस्तारतंय. `शिवाजी द बॉस' या त्याच्या सिनेमात तामिळमधला `त'ही ठाऊक नसणाऱयांना भारतभर कसं वेड लावलंय ते पाहा. म्हणजे त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल. `अंधा कानून' या त्याच्या पहिल्या हिंदी सिनेमात, हिंदीचे प्रेक्षक हा काळा, राकट हिरो कसा स्विकारतील, या सार्थ भयानं त्याला सुपस्टार अमिताभ बच्चनची (अर्धा सिनेमाभर पसरलेल्या `गेस्ट अपीअरन्स'ची) कुबडी घ्यावी लागली होती. आज त्याच अमिताभच्या आणि हिंदीतल्या सुपरस्टार्सच्या पाच- दहापट पैसे तो एका सिनेमासाठी घेतोय आणि असली शहेनशहा कोण, अमिताभ की रजनीकांत, अशा खमंग चर्चा मीडियामध्ये रंगल्या आहेत.
एक भाषिक अभिनेता असलेला रजनीकांतची लोकप्रियता जपानमध्येही कळसाला भिडलीये. त्याचा `मुथ्थू' जपानमध्ये सुपरहिट होता. `शिवाजी...'ला ब्रिटन आणि अमेरिकेत पहिला आठवडा हाऊसफुल्ल करणारं बुकिंग मिळालंय. भारतीय मसालापटांना नाकं मुरडणारे गोरे आता हाच मसाला भुरकून भुरकून ओरपताहेत.
रजनीकांतचा सिनेमा हा आता जवळपास लुप्त होऊ पाहणाऱया भारतीय मसालापटांचा सर्वात स्ट्राँग अर्क आहे.
साठीचा हा हीरो म्हणजे लोकप्रियतेचं एक अजब रसायन आहे. देवांनाही हेवा वाटावा इतकी अफाट लोकप्रियता मिळाल्यानंतरही तो कमालीचा साधा आहे. व्यक्तिगत जीवनात तो टक्कल आणि काळ्यातले पांढरे केस न लपवता वावरतो. आपल्या कुटुंबाचं खासगी आयुष्य प्राणापलीकडे जपतो.
सार्वजनिक शोबाजीसाठी कुख्यात असलेल्या दक्षिण भारतात तो कुठल्याही समारंभात चमच्यांची फौज घेऊन जात नाही. शक्य तेथे स्वत: गाडी ड्राइव्ह करत जातो. सेटवरही त्याचे नखरे नसतात. झोप आली, तर एसी व्हॅनमध्ये न जाता तो सेटवरच एखाद्या कोपऱयात डोळ्यांवर थंड पाण्याची घडी ठेवून आडवा होतो.
याच साध्या माणसाचं कॅमेऱयासमोर मात्र कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन होतं. मेकपची कमाल त्याला ऍक्चुअली तिशीचा बनवते. डोळ्यांत (के. बालचंदरनी 32 वर्षांपूर्वी पहिली भूमिका देताना पाहिलेला) अंगार फुलतो. जिभेवर सरस्वती नाचू लागते आणि अंगात ऍक्रोबॅट संचारतो... तो पडद्यावर बहुतेक वेळा ऍक्रोबॅटिक्सच करत असतो.
त्याच्या सिनेमाला `चीप' म्हणून हिणवणं सोपं आहे... पण, त्याचा सिनेमा बनवणं सोपं नाही. त्यात त्याच्यासारखं काम करणं तर त्याहून अवघड आहे. तो पैसे घेतो ते पडद्यावरच्या सगळ्या अविश्वसनीय करामती कमालीच्या `कन्विन्सिंग' करण्याचे.
त्याच्या या अदेनंच आज पिटातल्या पब्लिकबरोबर क्लासेसनाही जोडून घेतलंय. त्याचा सिनेमा मल्टिप्लेक्सला धो धो चालतोच, पण त्याहून ओसंडून वाहतात ती सिंगल स्क्रीन थिएटर्स. मसाला सिनेमांचा तो शेवटचा (?) `थलाईगार' आहे... थलाईगार म्हणजे लीडर... पुढारी.
दक्षिणेतले त्याचे चाहते मात्र वाट पाहताहेत ती त्यांचा प्राणप्रिय थलाईगार सिनेमाच्या चौकटीतून बाहेर पडून तामिळनाडूची राजकीय सूत्रं कधी हाती घेतोय याची. चो रामस्वामींसारख्या जाणत्या पत्रकारालाही रजनीनं राजकारणात यावं असं वाटतं. त्यांना त्याच्यात साधेपणा आणि सच्चेपणा यांच दुर्मीळ मिश्रण दिसतं...
... स्वत: रजनीकांत मात्र फिल्मी अंदाजमध्ये उत्तर देतो, ``काल मी बस कंडक्टर होतो, आज नट आहे, देवाच्या कृपेनं उद्या काही वेगळाच होऊ शकतो!''
...त्याची ही पंचलाइनही नेहमीप्रमाणे सुपरहिट आहे.(महाराष्ट्र टाइम्स)