शेकड्यांनी हिंदी सिनेमा बघितलेल्या माणसाचा खरंतर चमत्कारावर विश्वास असायला हवा. पण, अशा माणसालाही अविश्वसनीय वाटावेत, असे चमत्कार आज आजूबाजूला घडताहेत. हिंदी सिनेमांचं, बराच काळ साचलेलं डबकं बनलेलं, संकुचित जग एकदम अचानक बांध फुटल्यासारखं वाहायला लागलंय... आपल्याच कोशात राहणारी ही इंडस्ट्री एकदम विस्फोट झाल्यासारखी विस्तारायला लागलीये... नवनवे दिग्दर्शक, पटकथाकार, कलावंत, निर्माते येतात; नव्या जाणिवा, नव्या शैली आणतात; सिनेमाला दोन पावलं पुढे घेऊन जातात... हे दर पिढीत घडतं... मग आता घडतंय ते काय आक्रित आहे?... एकदम अचानक महाटॅलेंटेड माणसांची पिढी निपजली की काय इंडस्ट्रीत? की वेगळं काही घडलं?...
मोठे फॉर्म्युलेबाज बिनडोक सिनेमे कोसळताहेत... (यातले काही चालताहेत म्हणा; पण, 'सुपरहिट'चा सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच जन्माला येण्याचे दिवस सरले आहेत)... चार गाणी, दोन सीन एवढ्यात 'भागवल्या' जाणाऱ्या नायिकांना, त्यांच्याभोवती फिरणारे सिनेमे मिळताहेत... (याआधी हा मान टॉपच्या गिन्याचुन्या नायिकांना लाभायचा, तोही अवसेपुनवेला; आता एखादी अमिषा पटेल पदार्पण करते, तेच हिरोइतक्याच महत्त्वाच्या रोलमधून)... ज्या विषयांवर सिनेमा बनू शकतो, अशी कल्पनाही कधी कुणी केली नसेल, त्या विषयांवर नुसते सिनेमेच बनत नाहीयेत, तर विद्यमान सुपरस्टारही वेळात वेळ काढून अशा सिनेमांमध्ये आवर्जून काम करताहेत; तो चालेल की पडेल याची आणि त्याचा आपल्या बाजारभावावर काय परिणाम होईल याची फिकीर न करता...
... क्रांती क्रांती म्हणतात ती हीच की काय?
... आणि ती घडली तरी कशी?
ती घडली कशी, याचा थोडाबहुत शोध घेता येऊ शकतो... आणि ती क्रांती केवळ गुणवंत कलावंतांनी घडवलेली नाही... परिस्थितीच्या रेट्याचा त्यात मोठा वाटा आहे, हेही लक्षात येत जातं...
एरवी हिंदी सिनेमाच्या जगात टॅलेंटची कमतरता कधीच नव्हती. आपल्याला नाकं मुरडणं फार सोपं असतं; प्रत्यक्ष सिनेमा बनताना जो पाहतो, त्यातल्या खाचाखोचांमधून जो जातो, त्याच्या हे लक्षात येतं की गुणवत्ता आणि/ किंवा प्रचंड मेहनतीची तयारी याशिवाय इथे कोणीही यशस्वी होऊ शकत नाही, टिकू शकत नाही. त्यातही फॉर्म्युल्यापलीकडे विचार करणारी मंडळी सिनेमात प्रारंभापासून होती, आहेत. बाँबे टॉकीज, प्रभात या निमिर्तीसंस्था; गुरुदत्त, बिमल रॉय, (काही मोजक्या सिनेमांच्या संदर्भात) राज कपूर यांसारखे दिग्दर्शक आणि दिलीपकुमारसारखे अभिनेते यांनी वेळोवेळी व्यावसायिक फॉर्म्युलापटांच्या गणितातही वेगळी समीकरणं मांडून दाखवली, त्यांची यशस्वी उकल केली.
स्वातंत्र्योत्तर काळात सामाजिक भान नावाचा भाग सिनेमातून वजा होत सिनेमा म्हणजे 'निखळ मनोरंजन' अशी सिनेमाची स्वस्त व्याख्या झाली आणि सिनेमानं काश्मीरच्या खोऱ्यांत झाडांभोवती पिंगा घालत गुलुगुलू प्रेमगोष्टींचा चोथा चघळण्याचा वसा घेतला... नंतर संतप्त सामाजिक बंडखोरीच्या नावाखाली रॉबिनहुडी अँटिहिरोंची सद्दी सुरू झाली... त्यांनी समाजात काही क्रांती घडवली नाही, पण हिंदी सिनेमातली गोड गाणी वजा केली किंवा रद्दड केली, कॉमेडियनांचे मुडदे पाडले आणि विद्युतवेगाने संतप्त सिनेमांचाही फॉर्म्युला बनवून टाकला...
याच काळात काही विचारी, चळवळ्या मंडळींचाही सिनेमात वावर होता... त्यांनी आशयसंपन्न, वेगळ्या जातकुळीच्या कसदार समांतर सिनेमांची चळवळ मोठ्या पडद्यावरच चालवली... एकीकडे अमिताभ बच्चनचा अतिमानवी नायक फॉर्मात असताना त्याच्या व्यक्तिरेखेच्या बरोब्बर विरुद्ध टोकाला असलेला आपल्यातुपल्यातला अमोल पालेकरही चालत होता... अगदी अमिताभच्या शेजारी बंगला घेण्याइतपत व्यवस्थित चालत होता... त्यापाठोपाठ अमिताभयुगाच्या अस्ताला मुख्य व्यावसायिक सिनेमा भोवऱ्यात भिरभिरत असताना शबाना आझमी, स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, (सुरुवातीच्या काळातला) महेश भट यांसारख्या हस्तींनी बजेटात छोट्या पण आशयात, परिणामात, कलात्मकतेत मोठ्या सिनेमांचा ध्वज उंच धरला होता...
टेलिव्हिजनच्या खोकड्यात संध्याकाळच्या चार-सहा तासांपुरती येणारी धुगधुगी दिवसभर टिकायला लागली, तशी समांतर सिनेमाची सगळीच्या सगळी चळवळ एकदम त्या खोक्यात शिरली... सगळे समांतर दिग्दर्शक, त्यांचे कलाकार तिकडे खोकाबंद झाले आणि सिनेमाचा मोठा पडदा मोठ्या आणि पोकळ सिनेमांना पुन्हा मोकळा झाला... (हा काळ दूरदर्शन मालिकांचा होता. नंतर इतर वाहिन्या सुरू झाल्या, लोकप्रिय झाल्या, त्यांचे कार्यक्रम टीआरपीच्या भाषेत फार वरचढ झाले; पण, त्यांच्यावरची कोणतीही मालिका दर्जाच्या बाबतीत दूरदर्शनच्या सुवर्णकाळातल्या एकाही मालिकेच्या पासंगालाही पुरणारी नव्हती; अजूनही नाही.)
आता समांतर सिनेमा इतिहासजमा झाला, विचार करायला लावणाऱ्या सिनेमाची चळवळ कायमची संपली; कारण टीव्हीचं भूत या देशाच्या मानगुटीवर पक्कं बसलं आहे, अशी हळहळ व्यक्त करणाऱ्या जाहीर शोकसभा होऊन गेल्या आणि एकदम तिरडीवरचा इसम उठून बसावा तसं झालं काहीसं...
... हे काही अचानक नाही झालं.
... एकीकडे फॉर्म्युलेबाज हिंदी सिनेमा पडद्यावर रंग उधळत असताना, त्या वर्तुळातली आणि बाहेरचीही विचारी मंडळी अस्वस्थ होती. काहीतरी वेगळं करायला त्यांचे हात शिवशिवत होते. काहींनी तसे प्रयत्नही केले (आमिर खानचा 'राख', शाहरुखचा 'ओ डार्लिंग ये है इंडिया', 'माया मेमसाब') आणि हात पोळून घेतले... खरंतर वेगळी वाट चोखाळू पाहणाऱ्या सिनेमांना प्रेक्षकच नव्हता, असं कधीच नव्हतं... पण, व्यावसायिक हिंदी सिनेमाचं व्यावसायिक गणित हा मोठा गहन विषय तोवर सोपा झाला नव्हता...
... काय होतं (किंवा असतं) हे गणित?
... हे गणित फिरतं थिएटरभोवती... सिनेमाची कला नावाच्या गोष्टीचा अतोनात ऊहापोह होतो आपल्याकडे... सगळीकडे सदोदित तोच काथ्याकूट... पण, सिनेमा नावाची कला जिवंत ठेवायला सिनेमा नावाचा धंदा जिवंत राहायला लागतो... ही बेसिकली धंदेवाईक कला आहे... तिचं दुकान म्हणजे थिएटर... इथे सजवून धजवून मांडलेला माल विकत घेणारा कुणी आलाच नाही, तर कसली डोंबलाची कला शिल्लक राहणार?
प्रॉब्लेम होता आणि आहे, तो याच दुकानात. ग्राहकांच्या मानसिकतेतही तो आहेच; पण, तो दुय्यम स्वरूपाचा. कळीचा मुद्दा होता, तो थिएटरांचा आकार. मोठ्या किंवा आजच्या प्रगत भाषेत 'सिंगल स्क्रीन' थिएटरात किमान 400 ते कमाल 700 प्रेक्षक एकावेळी बसून सिनेमा पाहतात. एका दिवसात सिनेमाचे तीन खेळ होतात. त्यासाठी काहीएक भाडं थिएटरमालकाला द्यावं लागतं. थिएटरचा आकार मोठा, देखभालीचा खर्च मोठा, स्टाफ मोठा, त्यांच्यावरचा खर्च मोठा; साहजिकच थिएटरचं भाडं मोठं... एवढं भाडं देऊन फायद्यात राहायचं, तर थिएटर सरासरी 60-65 टक्क्यांपेक्षा अधिक भरलेलं असणं मस्ट. आता 400 कपॅसिटीच्या थेटरात दिवसाला 750 माणसं जमा करणं, हे काय खायचं काम आहे काय? त्यात हा हिंदी सिनेमा... तो एकाच वेळी मुंबईत लावायचा, पुण्यातही लावायचा, गडचिरोलीतही लावायचा, बिहार, यूपी, एमपी, दिल्ली, पंजाब, दक्षिणेत किमान हैदराबादपर्यंत तोच सिनेमा त्याच आकाराच्या थिएटरांमध्ये रिलीझ होणार... प्रत्येक ठिकाणी तेवढी माणसं दिवसाला आली पाहिजेत... या सगळ्या प्रांतांचा पोत वेगळा, भाषा, संस्कृती वेगळी, आवडीनिवडी वेगळ्या, अकलेत फरक, अभिरुचीत फरक... मग त्या सर्वांना अपील होईल, असं काहीतरी आणायचा अट्टहास... त्यातलं काही चालतंय म्हटलं की त्याच्या कॉप्या निघणार, फॉर्म्युला तयार होणार...
शिवाय सिनेमा हे तांत्रिकदृष्ट्या खचिर्क माध्यम. त्यात इतक्या असुरक्षित, बेभरवशी धंद्यात यशस्वी होणाऱ्या मंडळींचे मेहनताने अर्थातच आकाशाला टेकलेले... म्हणजे निमिर्तीचा खर्चच प्रचंड... तो वसूल करायचा, तर फॉर्म्युल्यापलीकडे कसला विचार करणार?
फॉर्म्युल्यापलीकडच्या सिनेमाला प्रेक्षक होताच. 'मला नको सगळा गाव, माझिया जातीचा मज (प्रेक्षक) मिळो कोणी,' अशी भूमिका असणारे दिग्दर्शक होते. पण, अख्ख्या जगात कोणत्याही भाषेत (अगदी अतिप्रगत, दृक्साक्षर वगैरे गणल्या जाणाऱ्या हॉलिवुडातही) अर्थपूर्ण सिनेमाला मोजक्याच प्रेक्षकांचा प्रतिसाद असतो; हिंदीत तो त्याहून कमीच असणार आणि प्रांताप्रांतातलं त्यांचं प्रमाण हा एक मुद्दा आहेच. अर्थपूर्ण सिनेमा काढायचा, तर त्याला रोजच्या रोज एवढी टाळकी गोळा कशी करायची, हा प्रश्ान् होता. मग सिनेमा मॅटिनीला, एका खेळापुरता चालवून, पुढे प्रतिसाद वाढल्यास रेग्युलरला आणण्याची स्ट्रॅटेजी आखली गेली. (याच स्ट्रॅटेजीचा गैरफायदा घेत काही मराठी सिनेमांनी मॅटिनीला ज्युबिल्या साजऱ्या केल्या.) पण, ही योजनाही सार्वकालिक उपयोगाची नव्हती; कारण ती यशस्वी होईल अशा जाणत्यांची बिझनेस सेंटर्स कमी. मग, ज्याला हिंदीत काही
वेगळं करायचं आहे, त्याला
डोकं आपटण्याची किंवा धोपटमार्ग धरण्याचीच पाळी.
या काळात टीव्हीच्या डबड्यानं दोन महत्त्वाची कामं केली. परदेशी वाहिन्यांनी प्रेक्षकाला नकळत दृक्साक्षर बनवण्याचा विडाच उचलला. परदेशी चित्रपटांच्या वाहिन्यांनी जगात किती विषयांवर किती प्रकारचे सिनेमे बनतात याची जाणीव करून दिली. देशी वाहिन्यांनी बिनडोक मनोरंजनाचे दिवसाला 24 तास रतीब घालून त्याचं अजीर्ण निर्माण केलं. त्यासाठी वाट वाकडी करून आणि पदरमोड करून थिएटरात जायचं कशाला, अशी भावना निर्माण केली. चहूबाजूंनी टाइट फिल्डिंग लागली होती.
याच काळात फिल्म सोसायट्यांचे महोत्सव वाढू लागले. त्यांत देशी-विदेशी सिनेमे पाहणाऱ्या, त्यातून सिनेमाची जाण प्रगल्भ करत जाणाऱ्या प्रेक्षकांच्या हे लक्षात येत होतं की फेस्टिवलांचे काही खेळ जिथे होतात, त्या छोट्या प्रिव्ह्यू थिएटरांमध्ये (सिनेमा तयार झाला की नटांसाठी, वितरकांसाठी आणि पत्रकारांसाठी त्याचे प्रदर्शनपूर्व शो या थिएटरांमध्ये केले जातात) जर असा सिनेमा नेहमीसारखा रिलीझ होऊ शकला, तर बऱ्यापैकी चालेल. खरंतर ठिकठिकाणच्या राज्य सरकारांनी पुढाकार घेऊन प्रमुख शहरांमध्ये अशी थिएटर संकुलं उभारायला हवी होती. पण, तशी मागणी कुणी केली नाही. आपणहून कुणाला काही सुचण्याची सरकारांमध्ये मोठी परंपरा नाही. दिल्लीचं सिरीफोर्ट ऑडिटोरियम आणि कोलकात्यातलं 'नंदन' कॉम्प्लेक्स वगळता अशा प्रकारचं संकुल कुठेही उभं राहिलं नाही...
ही कोंडी फुटली, ती 'हैदराबाद ब्लूज'च्या निमित्तानं. अमेरिकेत केमिकल इंजिनीयर असलेला नागेश कुकनूर सिनेमाच्या वेडापायी चांगली नोकरी सोडून भारतात परतला. तिकडे कमावलेले तुटपुंजे पैसे घालून त्यानं इथे, आपल्याच अनुभवांवर आधारलेला हा खुसखुशीत सिनेमा बनवला. स्वत:च त्यात नायकाचं कामही केलं. हा सिनेमा मुंबईच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मामि महोत्सव) धडपड्या पहिलटकर दिग्दर्शकांच्या सेक्शनमध्ये दाखवला गेला. तंत्रदृष्ट्या घरगुती व्हीडिओच्याच पातळीवरचा हा सिनेमा फ्रेश आशयामुळे फेस्टिवलच्या पब्लिकला जाम आवडला. त्याचा बोलबाला झाल्यामुळे त्याचे खास डिमांड शो करावे लागले. या सिनेमाची कहाणी शृंगार फिल्म्सच्या श्याम श्रॉफ यांच्या कानावर गेली. तोवर बडे हिंदी सिनेमेच प्रदशिर्त करणाऱ्या श्रॉफ यांनी हा सिनेमा वितरणाला घेतला.
मुंबईत वांद्याच्या गॅलेक्सी-गेईटी जोडथिएटरांच्या इमारतीतच छोटं प्रिव्ह्यू थिएटर आहे. तिथे तो रात्रीच्या एका खेळापुरता 'प्रदशिर्त' करण्याचा 'प्रयोग' करण्यात आला. सुरुवातीला फुकट पासातल्या आमंत्रितांना बोलावूनच आठ दिवस हाऊसफुल्लचा बोर्ड लावण्याची युक्ती योजली गेली. त्या बोर्डानं आपलं काम केलं. सगळ्यांना या छोट्या सिनेमाच्या यशाचं कौतुक वाटू लागलं. त्याच्याबद्दलची उत्सुकता वाढली. हळूहळू तो आपोआप हाऊसफुल्ल होऊ लागला. मोठ्या थिएटरापर्यंत पोहोचला, इतर शहरांपर्यंत पोहोचला... डबक्याला पहिली, अगदी छोटी चीर गेली.
पुढे मल्टिप्लेक्सेसचं लोण आलं. एका जागेत चारशेपासून पन्नासपर्यंत वेगवेगळ्या कपॅसिटीची थिएटरं बांधली गेली. सिनेमा पाहायला गेलेल्याला भरपूर चॉइस. सिनेमा रिलीज करणाऱ्यालाही तेवढाच चॉइस. इथे पैसे जास्त पडतात; पण, 'सिनेमा पाहणे' नावाच्या अनुभवाचा मान राखला जातो. प्रशस्त ऐसपैस आरामदायी खुर्च्या, लोकांची डोकी मध्ये न आणणारी रचना, उत्कृष्ट प्रोजेक्शन, अत्याधुनिक ध्वनीयंत्रणा, ही मल्टिप्लेक्सेसची वैशिष्ट्यं सिनेमाकलेचा आदर करणारी आहेत. त्यांच्या आगमनानं हिंदी सिनेमात जो हलकल्लोळ झाला, त्याची झलक सोबत दिलेल्या चौकटींमधून येईल.
' हैदराबाद ब्लूज' प्रदशिर्त झाला, 1998 साली. त्या सालापासून आतापर्यंतच्या सात वर्षांत आलेल्या लक्षवेधी सिनेमांची ही प्रातिनिधिक यादी आहे. ती पूर्ण आणि परिपूर्ण नाही. यात अनेक सिनेमे फॉर्म्युलापटच आहेत; पण, त्यातही वेगळं काहीतरी देऊ पाहणारे. काही हॉलिवुडपटांच्या नकला मारणारे; पण, त्यात वेगळ्या विषयाची वेगळी हाताळणी करणारे. काही निव्वळ चूष म्हणून वेगळेपणा निर्माण करणारे. काही नुसतेच सनसनाटी... देहप्रदर्शन आणि चुंबनांतून प्रेक्षक खेचणारे. काही खरोखरच वेगळे. बरेचसे फसलेले... कलात्मकदृष्ट्या आणि व्यावसायिकदृष्ट्याही. फार थोडे जमून गेलेले. त्यातून फार फार थोडे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेले. पण, प्रत्येक सिनेमात काही ना काही वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न दिसतो.
या यादीवर धावती नजर टाकली, तरी हे लक्षात येतं की एकतर अशा सिनेमांमध्ये काम करायला आता 'स्टार' कचरत नाहीत. दुसरं म्हणजे, वेगळ्या वाटेच्या सिनेमांना व्यावसायिक यश मिळण्याचं प्रमाणही वाढत चाललंय. शिवाय याआधी असा सिनेमा काढला की कारकीदीर्चा पूर्णविराम आलाच, असं व्हायचं. आता एखाद्या तगड्या पण गल्लापेटीवर उपड्या पडलेल्या सिनेमाचे कर्तेही दुसऱ्या सिनेमाची स्वप्नं पाहू शकतात. त्यांच्या टॅलेंटवर पैसे लावणाऱ्यांची कमतरता उरलेली नाही.
ही यादी भारतीय प्रेक्षकाची वाढलेली भूकही दाखवते आणि अभिरुचीत पडत चाललेला फरकही. आता पब्लिकला उल्लू बनवता येत नाही, पब्लिक भौत शाणी हो गयी है, असं हिंदीतले निर्माते-दिग्दर्शक (काहीशा खंतावलेल्या सुरात) सांगतात. समांतर सिनेमांच्या न्यू वेव्ह चळवळीतही काही नुसतेच अंधारी, निरर्थक सिनेमे आले होते. तोच प्रकार इथेही आहे. पण, कोणत्याही मंथनातून बाहेर पडणाऱ्या रत्नांपेक्षा गदळाचं प्रमाण अधिक असतं; महत्त्व, मंथन होतंय याला आहे.
याचबरोबर गेल्या काही वर्षांत परदेशस्थ भारतीय प्रेक्षक आणि बॉलीवुडच्या अस्तित्वाची दखल घेऊ लागलेले परदेशी प्रेक्षक हा एक वेगळाच प्रेक्षकवर्ग भारतीय सिनेमाला लाभला आहे. परदेशी प्रदर्शनाचे हक्क कधी नव्हेत इतके महत्त्वाचे ठरले आहेत. या देशात फ्लॉप झालेला सिनेमा परदेशात मोजक्या ठिकाणी बरा व्यवसाय करूनही फायद्यात राहू शकतो. हे वरदान तर आहेच; पण शापही. कारण, या देशातली सेन्सिबिलिटी दुर्लक्षित करून परदेशात 'बॉलिवुड' विकण्याचा एक नवा धंदा सुरू झाला आहे. चोप्रा, जोहर वगैरे मंडळी यात आघाडीवर. कधीकाळी सत्यजित राय यांच्यावर, परदेशांत भारताचं दैन्य विकल्याचा आरोप करणारे फिल्मी 'महाजन' आता पंजाबी लग्नं, करवा चौथ, डिझायनर कपडे, आलिशान घरं, तकलादू व्यक्तिरेखांचे तकलादू संघर्ष, निरर्थक नाचगाण्यांचा गदारोळ आणि तद्दन बालिश हाताळणी या सगळ्याची मजबूत विक्री करताहेत, 'बॉलिवुड मसाला'च्या नावाखाली. आणि हीच भारताची सिनेसंस्कृती आहे, असं भासवत.
या सगळ्या मंथनातून अमृत बाहेर पडणार की हलाहल? खरेतर 'दोन्हीही' हेच या प्रश्ानचं उत्तर आहे. पण, अगदी अलीकडच्या 'इक्बाल'चं उदाहरण पाहिलं, तर अमृताचा पक्ष सुदैवानं बलवत्तर वाटतो. हाही सिनेमा नागेश कुकनूरचाच असावा, हा विलक्षण योगायोग. फँटसी वाटावी अशी ही कथा. एका गरीब, मूकबधिर मुलाच्या क्रिकेटपटू बनण्याच्या स्वप्नाची, त्याच्या पूतीर्ची. (काही वाचनप्रेमींना या कथानकात पावलो कोएलोच्या जगप्रसिद्ध 'अल्केमिस्ट' कादंबरीच्या छटा दिसतात.) कथेच्या प्रवासाच्या आणि परिणतीच्या दृष्टीने ही एक परीकथाच आहे. पण, तो प्रवास विलक्षण वेधक, ताजा, ऊबदार आणि छान छान आहे... स्वत:बद्दल, आपल्या देशाबद्दल, आपल्या परिसराबद्दल आपुलकीची, आदराची भावना निर्माण करणारा. अगदी छोटासा जीव असलेल्या या सिनेमाचं जे भरभरून स्वागत झालं, जेवढा प्रचंड प्रतिसाद प्रेक्षकांच्या तोंडी प्रचारातून निर्माण झाला, तो पाहता हिंदी सिनेमातले समस्त 'इक्बाल' सुखावले असतील...
... त्यांचीही 'रामपूर एक्स्प्रेस' कधी ना कधी पूर्ण वेगात दौडू लागेल, असं स्वप्न पाहायला आता हरकत नाही...
..............................................................................
पूर्वी माझ्याकडे निर्माता यायचा आणि सांगायचा, ''सॉलिड रोल आहे तुझ्यासाठी!''
मी उत्साहाने विचारायचे, ''काय आहे तरी काय असं या रोलमध्ये?''
'' अरे एकदम सॉलिड!'' निर्माता तेवढ्याच उत्साहाने सांगायचा, ''तो अमका ढमका (इथे एखाद्या ए ग्रेड स्टारचं नाव) हीरो आहे. तुला पाच गाणी आहेत, पाच!''...
... आज माझ्याकडे निर्माता येतो, तेव्हा त्याच्या हातात नीट बाइंडिंग केलेलं पूर्ण स्क्रिप्ट असतं आणि त्या स्क्रिप्टमध्ये मला नाचगाण्यांच्याशिवायही करण्यासारखं बरंच काही असतं.
- प्रीती झिंटा (बीबीसी न्यूजवरील कॉलममध्ये)
......................................................................
ग्रेटेस्ट शोमन म्हणून गाजावाजा झालेल्या सुभाष घईंनी आपल्या या बिरुदाला साजेशा प्रकृतीचे (भलीमोठी स्टारकास्ट, प्रचंड श्रीमंती निमिर्तीमूल्यं, श्रवणीय संगीत, गाण्यांचं खास घई स्टाइल टेकिंग) 'यादें' आणि 'किस्ना' हे सिनेमे अलीकडच्या काळात काढले. ते दोन्ही आपटले, चांगले सडकून आपटले. त्याआधीचा याच पठडीतला 'ताल' त्यांना रेमटून रेमटून चालवावा लागला होता...
... सुभाष घईंच्याच 'मुक्ता आर्ट्स'च्या बॅनरखाली 'इक्बाल' हा नागेश कुकनूरदिग्दर्शित सिनेमा तयार झाला... घईंच्या नॉर्मल सिनेमाच्या बहुधा एक दशांश वगैरे खर्चात. 'मैने प्यार क्यूँ किया', 'नो एन्ट्री' वगैरे बडे सिनेमे धो धो चालत असताना आणि 'मंगल पांडे' हा महासिनेमा कोसळत असताना या छोट्याशा 'इक्बाल'नं चांगलाच जीव धरलाय... घईंच्या प्रॉडक्शनचा अलीकडच्या काळातला सगळ्यात यशस्वी सिनेमा ठरू शकेल तो.
..........................................................................
दारुडा मुलगा, अनौरस मुलगा, समाजातल्या विषमतेमुळे स्मगलर झालेला अँग्री यंग मॅन, गमत्या नमकहलाल नोकर, गमत्या चारसोबीस अँथनी, एक स्मगलर-एक पोलिस, एक स्मगलर-एक गाँव का छोरा असे डबल रोल, एक नेक पोलिस अधिकारी... अमिताभ बच्चन या सुपरस्टारनं आपल्या कारकीदीर्च्या ऐन बहरात साकारलेल्या प्रमुख व्यक्तिरेखा...
... अंधमूकबधिर विद्याथिर्नीचा मनस्वी शिक्षक, बिड्या ओढणारा शिवराळ हरयाणवी पोलिस अधिकारी, मुलांपासून तुटत गेलेला बाप, मुलांना तोडणारा बाप, मुलीच्या प्रेमप्रकरणाला आक्षेप घेणारा शिस्तप्रेमी बाप, एक तडाखेबंद डीसीपी, एक कर्तव्यकठोर पोलिस अधिकारी, वादात निवाडा करणारा हुशार मेंढपाळ, स्टायलिश माफिया डॉन, सैन्यातला उच्चाधिकारी, समांतर सरकारच बनलेला लोकनेतावजा माफिया डॉन... चरित्र अभिनेता बनल्यानंतर अमिताभने साकारलेल्या काही प्रमुख व्यक्तिरेखा...
........................................................................
1998
हैदराबाद ब्लूज, चायना गेट, बडा दिन, दरमियाँ, 1947 द अर्थ, सत्या, वजूद, युगपुरुष, जख्म, दिल से, दुश्मन, गुलाम, करीब, समर
....................................
1999
चलो अमेरिका, हुतूतू, भोपाल एक्स्प्रेस, जहाँ तुम ले चलो, कौन, शहीद ए मोहब्बत, तक्षक, वास्तव, गॉडमदर, कच्चे धागे, संघर्ष, सफारी, शूल, सरफरोश, सिर्फ तुम
....................................
2000
अस्तित्व, बवंडर, दिल पे मत ले यार, फिजा, डॉ. आंबेडकर, गजगामिनी, घात, हेराफेरी, हे राम, जंगल, क्या कहना, मिशन कश्मीर, रॉकफर्ड, बिच्छू, जोश, पुकार, राजूचाचा, रेफ्युजी, शिकारी
....................................
2001
अक्स, अमेरिकन देसी, अशोका, चांदनी बार, कंपनी, दमन, दिल चाहता है, ग्रहण, काँटे, लगान, लज्जा, मोक्ष, मॉन्सून वेडिंग, मुझे कुछ कहना है, प्यार तूने क्या किया, रहना है तेरे दिल में, तेरा मेरा साथ रहे, ये तेरा घर ये मेरा घर, झुबेदा
....................................
2002
16 डिसेंबर, आँखे, अग्निवर्षा, आवारा पागल दीवाना, बॉलीवुड हॉलीवुड, छल, पिता, देवदास, दिल विल प्यार व्यार, एक छोटी सी लव्ह स्टोरी, एन्काऊंटर द किलिंग, फुटबॉल शुटबॉल हाय रब्बा (बेंड इट लाइक बेखम), घाव, हमराज, मँगो सुफ्ले, प्राण जाए पर शान न जाए, रोड, साथिया, शरारत, सूर, द लिजंड ऑफ भगतसिंग, ये क्या हो रहा है
....................................
2003
भूत, बूम, कॅलकटा मेल, डरना मना है, धूप, फंटुश, हंगामा, ज जंतरम म मंतरम, गंगाजल, जिस्म, जॉगर्स पार्क, कगार, खाकी, कोई मिल गया, मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ, मकबूल, माकेर्ट, मुंबई मॅटिनी, मुंबई से आया मेरा दोस्त, मुन्नाभाई एमबीबीएस, ऊप्स, आउट ऑफ कंट्रोल, पैसा वसूल, पिंजर, रुल्स, समय, सत्ता, तीन दीवारें तहजीब, वैसा भी होता है, राँग नंबर
....................................
2004
88, अँटॉप हिल, , 99.9 एफ एम, आन, आँच, अब तक छप्पन, अग्निपंख, ऐतबार, ऐतराज, अरमान, बस यूँही, चमेली, चाँद बुझ गया, चोखेर बाली, चोट, डान्स लाइक अ मॅन, दीवार दीवानगी, देव, धूम, एक हसीना थी, फिदा, फिलहाल, फ्लेवर्स, गर्लफ्रेंड, हवा, हम कौन है,हम तुम,हैदराबाद ब्लूज 2,जागो, जिस्म, झंकार बीट्स, काँटे, खामोश पानी, ख्वाहिश, किंग ऑफ बॉलीवुड, रेनकोट, मर्डर, लक्ष्य, मकडी, मीनाक्षी, नाच, वन डॉलर करी, फिर मिलेंगे, प्रारंभ,रघु रोमिओ, रक्त, स्टॉप, स्टंप्ड, सुपारी, मित्र माय फ्रेंड, स्वदेस, टारझन द वंडर कार, तौबा तौबा, वादा, व्हाइट नॉइज, श्वेतांबरा, युवा
....................................
2005
परिणीता, क्या कूल है हम, साढेसात फेरे, अमु, बल्ले बल्ले अमृतसर टू एल ए (ब्राइड अँड प्रेज्युडाइस), भागमती, ब्लॅक, बोस द फरगॉटन हिरो, बंटी और बबली, चॉकलेट, डी, दंश, दस, हजारो ख्वाहिशें ऐसी, जेम्स, सलाम नमस्ते, सिसकियाँ, मै, पत्नी और वो, मंगल पांडे द रायझिंग, मैने गांधी को नहीं मारा, इक्बाल, यहाँ
(महाराष्ट्र टाइम्स)
No comments:
Post a Comment