विशेष
सूचना : हा लेख रजनीकांतने पक्ष स्थापन करून तो गुंडाळण्याच्या आधीच्या काळात
लिहिलेला आहे. त्यामुळे त्यात काही संदर्भ जुनाट वाटू शकतात.
नान एप्पो वरुवेन एप्पडी वरुवेन यारुक्कुम तेरुयादु. आणा वर वेण्डिय नेरत्तिले नान करेक्टा वरुवेन.
(मी कधी येणार, कसा येणार, हे कोणालाही माहिती नसतं.
मात्र, योग्य वेळी मी नक्कीच येतो.)
त्याने त्याच्या खास मिष्कील शैलीत हे आश्वासन दिलं
होतं, त्यालाही आता
बावीस वर्षं उलटून गेली... तरीही अख्खा तामीळनाडू
त्याच्यावर विश्वासून त्याची वाट पाहतोय...
जवळपास दर वर्षी दबक्या आवाजात काही चर्चा होतात, लोक
एकमेकांना अगदी खात्रीने सांगतात, यंदा नक्की. आता तो येणार
म्हणजे येणारच. तोही काही
सूचक हालचाली करतो. कधी पक्षाच्या ध्वजाची चर्चा सुरू होते, कधी नावाची. कधी
दिल्लीतल्या काही हुशार मंडळींना वाटायला लागतं की आपल्या पक्षाचा झेंडा आता तोच
खांद्यावर घेणार तामीळनाडूमध्ये. लोक तयारीला लागतात. सगळ्या प्रस्थापितांची
धाबी दणाणतात. पण, ऐनवेळी
काहीतरी वेगळीच चक्रं फिरतात आणि तामीळनाडूच्या भाग्यावकाशातला सुपरमेगामहानायक
रजनीकांतचा उदय पुन्हा एकदा लांबणीवर पडतो... आपल्या
लाडक्या थलैवाला मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत पाहण्याची तामीळनाडूच्या जनतेची इच्छा
अधुरीच राहते... पडद्यावर
जनतेच्या सगळ्या सगळ्या समस्यांचा चुटकीसरशी निकाल लावणारा हा महामानव वास्तवातही
तोच चमत्कार घडवेल आणि एका रात्रीत, अगदी त्याच्या सिनेमातल्यासारखा
सुखी, आनंदी, समस्यामुक्त
तामीळनाडू उभा करेल, याची खात्री असलेल्या त्याच्या कोट्यवधी चाहत्यांचा पुन्हा
एकदा हिरमोड होतो...
खरंतर रजनीकांतच्या ‘मुथ्थू’ या १९९५
सालच्या सुपरहिट सिनेमातला हा संवाद... निव्वळ एक टाळ्याखेचक पल्लेदार
डायलॉग... त्यातून एवढा
मोठा अर्थ का काढायचा? पण, तामीळ सिनेमा इतक्या सोप्या
पद्धतीने चालत नाही... रजनीकांतचा सिनेमा तर नाहीच नाही... तामीळनाडूत
सिनेमा हे मनोरंजनाचं माध्यम नाही, जीवन आहे... आपल्या रितेश
देशमुखच्या भाषेत सांगायचं तर तामीळ जनता भारी, तिचं
सिनेमाप्रेम भारी, राज्याचं वास्तवही फिल्मी बनवून घेण्याची तिची हौस भारी आणि
सिनेमातून सगळ्या अवघड प्रश्नांची सोपी उत्तरं देणारी मंडळी प्रत्यक्षातही आपल्या
राज्याचे तारणहार बनतील, हा तिचा दुर्दम्य आशावाद तर लय
भारी... सिनेमाच्या
कचकड्याच्या जगाकडून त्यांनी केवढ्या मोठ्या अपेक्षा किती काळापासून बाळगल्या आहेत... दरवेळी त्या
जगाने त्यांचा आधीपेक्षा मोठा अपेक्षाभंग केला, तरी त्यांची ‘भक्ती’ काही ढळत
नाही... उर्वरित
भारतात अगदी अलीकडेपर्यंत अशी निस्सीम भक्ती पाहायला मिळत नव्हती... कदाचित इतका ‘फिल्मी’ महानेता अगदी
अलीकडेपर्यंत उदयाला आला नव्हता, हे त्याचं कारण असेल...
तामीळनाडूमध्ये मात्र ही ‘भक्ती’परंपरा किमान
साठ-सत्तर
वर्षांपासून बरकरार आहे...
‘पराशक्ती’ ते ‘पराशक्ती
हीरो’ असा तामीळ
जनतेच्या चिकाटीचा अद्भुत प्रवास आहे...
पराशक्ती हा १९५२ साली आलेला तामीळमधला क्रांतिकारक
सिनेमा...
पराशक्ती हीरो म्हणजे थलैवा द ग्रेट रजनीकांत.
मूळ पराशक्तीमधून शिवाजी गणेशन या तामीळ पडद्यावरच्या
एका महानायकाचं पदार्पण झालं होतं... त्या पराशक्तीचा म्हणजे ‘द्रविड
अस्मितेच्या देवी’चा आशीर्वाद लाभलेला दुसरा शिवाजी म्हणजे रजनीकांत... शिवाजीराव
रामोजीराव गायकवाड.
तो स्वत:ची ‘नान पराशक्ती
हीरो’ (हा लेखी नान
उच्चारी नाँ असा काहीतरी असतो...) अशी अभिमानाने ओळख करून देतो. (आपल्याकडे
व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या जमान्यात, रजनीकांत स्वत:ची ‘नान मराठी
हीरो’ किंवा ‘नान
महाराष्ट्रीय हीरो’ अशी ओळख करून देतो, अशा आशयाचे मराठी
अस्मिताबाज फॉरवर्ड फिरत असतात आणि ‘ठोका लाइक’ची भीक
मागतात... ते तद्दन
खोटे आहेत. तामीळनाडूत
मराठी अस्मिता सांगायला तो काही वेडा नाही.)
‘पराशक्ती’ हा दक्षिणेतल्या द्रविड चळवळीतला
एक महत्वाचा अध्याय. नंतर तामीळनाडूचे मुख्यमंत्री बनलेले एम. करुणानिधी हे
या सिनेमाचे लेखक होते आणि त्यांच्या लेखणीतून उतरलेले फुलोरेबाज संवाद हे या
सिनेमाचं एक प्रमुख आकर्षण होतं. मुळात दक्षिणेतला, मल्याळी
जनतेचा काहीसा अपवाद वगळता, एकंदर प्रेक्षकवर्ग भयंकर
भावनाशील. त्यात
धुंडिराज गोविंद फाळके या भारतीय सिनेमाच्या जन्मदात्यानेही इंग्रजीतल्या
चित्रपटांमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार पाहून हिंदू देवदेवतांची हलती चित्रं
आपल्या धार्मिक जनतेच्या मनात ठसवण्याच्या उदात्त हेतूनेच ही कला आत्मसात केली
होती. त्यांच्या
चित्रपटांपासून भारतातल्या जवळपास प्रत्येक भाषेतल्या प्रारंभिक सिनेमांमध्ये
ट्रिकसीनयुक्त पौराणिकपटांचा भरणा दिसतो, तो या अलिखित हेतूमुळेच. सिनेमाचा
पडदा मोठा, तंत्र नवीन, अंधारात
उमटणाऱ्या भव्य प्रतिमांनी एक वेगळीच सृष्टी उभी केली आणि तेव्हाचा भाबडा
प्रेक्षकवर्ग त्या सृष्टीत हरवून गेला. एरवी नाटकात देवाची भूमिका
करणारा केस वाढवलेला देखणा नट किंवा कलावंतीणीच्या कुळातूनच आलेली नटी हे
नाटकाबाहेर कुचेष्टेचे, हलक्या नजरेने पाहण्याचे विषय
होते. सिनेमातल्या
देवांच्या भूमिका करणाऱ्या नटांना मात्र त्या माध्यमाच्या जादूमुळे आपसूक देवत्व
लाभायला लागलं... भावनाशील
दक्षिणेत तर प्रतिमा आणि प्रत्यक्षाची अद्भुत सरमिसळ झाली आणि देवांच्या भूमिका
साकारणारे नट देवासमान मानले जाऊ लागले... ‘पराशक्ती’ने तर सगळे
आयामच बदलून टाकले... तत्कालीन राजकीय-सामाजिक नॅरेटिव्ह थेट
सिनेमावाल्यांच्या हातात आलं आणि तत्कालीन सगळ्या चळवळी जणू सिनेमातून व्हायला
लागल्या... करुणानिधी
आणि मंडळींचे सगळे सिनेमे काही अनुबोधपट किंवा प्रचारपट नव्हते. मात्र, दाक्षिणात्यांच्या
आवडीचा कौटुंबिक, सामाजिक आशय मनोरंजनाच्या भडक मालमसाल्यामध्ये घोळवून
त्यांनी चटकदार सिनेमे तयार केले आणि त्यांच्यातून आपल्या विचारांचा अगदी
व्यवस्थित प्रचार केला... या सिनेमाच्या राजकारणातूनच
द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हे आजचे दोन प्रमुख पक्ष
उदयाला आले. करुणानिधी
आणि एम. जी. रामचंद्रन, जयललिता
यांच्या राजवटीही सिनेमाच्या ‘पराशक्ती’मधूनच
निर्माण झाल्या. सिनेमातला
कोणताही नायक, सक्रिय
राजकारणात असो नसो, ‘राजकारणा’त नव्हता, असं कधीच
नव्हतं. इथे
पडद्यावरून सिनेमांच्या रूपानेही राजकारण आणि समाजकारणच चालतं.
त्यामुळेच, आता ‘पराशक्ती
हीरो’
रजनीकांत केव्हा सक्रिय राजकारणात पाऊल टाकतो, याकडे तामीळ जनता डोळे लावून बसली आहे... एम. जी.
रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतरच्या नाट्यमय घडामोडींनंतर
जयललिता यांनी अण्णाद्रमुकवर पकड बसवली आणि त्या १९९१ साली सत्तेत आल्या... त्या राजकीय उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर सत्तेवर आलेल्या जयललिता यांचा लहरी
हैदरासारखा कारभार रजनीकांतच्या फारसा पसंतीला उतरला नसावा... त्यांना सत्तेची नशा चढली आणि त्या तारेत त्या बेताल झाल्या. त्यांच्या
विरोधात जो असंतोष उसळला
त्याला रजनीकांतने पडद्यावरून वाट करून दिली.
आता सिनेमा ही सांघिक कला आहे आणि त्यात खरंतर संघ‘नायक’
असतो दिग्दर्शक. पण, रजनीकांतसारख्या सगळ्याच सुपरस्टार मंडळींच्या सिनेमांमध्ये त्यांचा स्वत:चा हस्तक्षेप खूप असतो. सिनेमाच्या निवडीपासून ते
अंतिम सोपस्कारांपर्यंत रजनीकांतचं बारीक लक्ष असतं. शिवाय
त्या त्या काळातले लेखक, खासकरून तामीळनाडूसारख्या
सिनेमातच जगणाऱ्या राज्यामधले सिनेमालेखक समकालीन परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या कथाच
सांगू पाहात असतात. त्यात रजनीकांतसारखा जनमानसावर अचाट पकड
असलेला नायक हाताशी असला, तर फुटाफुटाला तडतडणाऱ्या
लाह्यांसारखे संवाद फुटत जातात. त्या सगळ्यात, खासकरून संवाद आणि गीतांमध्ये रजनीकांतचा सक्रिय सहभाग असतोच. म्हणून तर १९९१ साली जयललिता सत्तेत आल्यानंतर आणि वर्षभरात त्यांचे गुण
दिसल्यानंतर १९९२
साली रजनीकांतच्या ‘मन्नन’
या सिनेमात नायकाचा संघर्ष होतो तो एका गर्वोन्नत महिलेशी. हा योगायोग नसतो. त्याच वर्षी
‘अण्णामलै’ या सिनेमात नायक
रजनीकांत एका मंत्र्याला जनतेने दिलेली सत्ता जनतेसाठी
वापरण्याचा सल्ला देताना दिसला होता, तो योगायोग नव्हता. हा जयललितांना दिलेला इशाराच होता. या सिनेमात सायकलवर
बसलेल्या रजनीकांतची छबी लोकप्रिय झाली होती. सायकल
हे तामीळ मनिला काँग्रेसचं निवडणूक चिन्ह. त्यांची
द्रमुकबरोबर युती होती. त्यामुळे, रजनीकांतच्या या रूपाचा वापर कोणी कसा केला असेल, हे
सांगायला नकोच.
१९९५च्या मुथ्थूमध्ये राजकीय अर्थ भरलेल्या संवादांच्या
फैरीच्या फैरी झाडल्यानंतर रजनीकांतने १९९६ साली जयललिता यांना एकाच विधानाने पायउतार करून दाखवलं. जयललिता
पुन्हा सत्तेवर आल्या तर देवही तामीळनाडूला वाचवू शकणार नाही, असं ते विधान होतं. हा सिनेमातला संवाद नव्हता, थेट विधान होतं. त्यावर द्रमुकने झडप घातली नसती, तरच नवल.
द्रमुकची सत्ता आल्यानंतरही रजनीकांतचा जयललितांवरचा ‘लोभ’
कायम असावा. म्हणूनच १९९९च्या ‘पडैयप्पा’मध्येही मन्ननप्रमाणेच खलभूमिकेत एक स्त्री आहे. त्यामुळे, तो टिपिकल दक्षिणी नायकांप्रमाणे सिनेमाभर स्त्रियांवर तोंडसुख घेताना दिसतो. ‘पोंबळ
पोंबळेया इरुक्कनुम’ म्हणजे
बाईने बाईसारखं राहावं, असा परंपरावादी पुरुषांच्या टाळ्याशिट्या घेणारा संवाद म्हणजे जयललितांशी
त्याने घेतलेल्या शत्रुत्वाचा कळसाध्याय. तुझ्याकडे सत्तेची
शक्ती आहे, माझ्याकडे
जनतेची शक्ती आहे.
माझ्या शक्तीपुढे तुझी
शक्ती फुटकळ आहे,
असंही त्याने या सिनेमात थेट बजावलं होतं.
जयललितांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात रजनीने खास त्याच्या
पद्धतीने त्यांना दिलेला झटका म्हणून एक किस्सा सांगितला जातो. चेन्नईच्या एका रस्त्यावरून त्याची कार चालली होती. मध्ये
ट्रॅफिक जॅममध्ये अडकली. ड्रायव्हरने चौकशी केल्यावर
कळलं की मुख्यमंत्री जयाबाईंच्या ताफ्यासाठी पुढचा रस्ता अडवण्यात आलाय. त्या कुठूनतरी विमानाने येणार आहेत. विमानतळावरून त्यांना
घरी विनात्रास जाता यावं, यासाठी वाहतूक रोखुन धरण्यात
आली आहे.
विमान अजून विमानतळावर उतरायचं असताना काही किलोमीटर दूरचा
हा रस्ता बंद करण्यात आला होता. रजनीने गाडीतून उतरून
पोलिसांना गाठलं. त्यांनी नम्रपणे त्याला त्यांची अडचण
सांगितली.
रजनीनेही नम्रपणे हे बरोबर नाही, असं
सांगितलं आणि एक सिगारेट शिलगावून तो आपल्या गाडीच्या बॉनेटवर येऊन बसला... साक्षात् थलैवा या ट्रॅफिक जॅममध्ये अडकलाय, हे कळल्यावर
त्याच्या दर्शनासाठी सर्व अडलेल्या रस्त्यांवरचे भाविक मोकळ्या रस्त्यावरून धावत
निघाले.
पोलिस रस्त्यातून चालणाऱ्या माणसांच्या लोंढ्यांना कसा आवर
घालणार.
आता सगळ्या बंदोबस्ताचा बोऱ्या वाजणार हे लक्षात आल्यावर
रजनीकांतची मनधरणी करून त्याला गाडीत बसवलं गेलं. सगळे
रस्ते मोकळे केले गेले. रजनीकांतची गाडी बाहेर
पडल्यानंतर मग पुन्हा बंदोबस्त लागला आणि रस्ते बंद झाले. तर
वास्तवातही ही रजनीकांतची थलैवा स्टाइल आहे प्रश्न सोडण्याची.
त्याच्या या उघड राजकीय भूमिकांमुळे जयललितांचा कट्टर
विरोधक असलेल्या द्रमुकचीही अभूतपूर्व गोची झालीच होती. त्यांना
रजनीच्या जयाविरोधाचा तात्कालिक फायदा होत होता, पण
उदया हाच राजकारणात उतरला तर आपलं काय होईल, या
भीतीची तलवारही करुणानिधींच्या डोक्यावर कायमस्वरूपी टांगली गेली होती. रजनी तेव्हा राजकारणात आला असता, तर जयललिता यांना
त्याने भुईसपाट केलंच असतं, पण, त्याच्या
वावटळीत द्रमुकचाही पालापाचोळाच झाला असता. पण, का कोण जाणे, समकालीन राजकीय परिस्थितीवर सिनेमांच्या
माध्यमातून चपखल भाष्य करणाऱ्या आणि सत्ताधीशांना, तामीळनाडून
त्यांच्या वरही एक महाशक्ती बसलेली आहे, याची जाणीव करून
देणारा रजनीकांत त्या शक्तीचा प्रत्यक्ष प्रयोग मात्र करायला अजूनपर्यंत तरी कचरला
आहे.
खरंतर त्याच्यात तामीळच नव्हे, भारतीय
जनतेला मोहात पाडणारे सगळे गुण आहेत. तो स्वत:च्या बळावर मोठा झाला आहे. एका निम्नमध्यमवर्गीय
कुटुंबातून खस्ता खात प्रचंड कर्तबगार, यशस्वी, धनवान
व्यक्ती बनण्याचा त्याचा प्रवास त्याच्या कोणत्याही
सिनेमापेक्षा कमी नाट्यमय आणि स्फूर्तीदायी नाही. यशाच्या
शिखरावर विराजमान झाल्यानंतरही त्याच्यात कमालीचा साधेपणा आहे. औपचारिक नम्रता आणि ऋजुता तर अमिताभमध्येही आहे, पण
ते सुसंस्कारित अलंकृत व्यक्तिमत्त्व आहे. तो
त्याचा स्वभाव नाही. रजनीकांतला सिनेमाच्या पडद्यापलीकडे
पाहिल्यानंतर आकर्षून घेतं ते त्याचं दिलखुलास हसणं आणि अगदी आतबाहेर नितळ वागणं. ऐन तारुण्यात त्याने अफाट यश उपभोगलं आहे. यशाबरोबर
आलेली सगळी सुखंही मन:पूत भोगून झाली आहेत. या सुखांच्या पलीकडे काहीतरी शाश्वत आहे, असलं
पाहिजे,
अशी आंतरिक जाणीव असलेल्या माणसाचा हा तृप्त, निर्लेप संन्यास आहे... तोही राजस. देवाने आपलं काम नेमून दिलंय, तो सांगतो, तसं आपण वागतो, तो ठरवतो, त्या
मार्गाने आपण चालतो, जे काही करायचं ते मन:पूर्वक करतो, असा त्याचा खाक्या आहे. सुपरस्टारपदाचे कसलेही तामझाम तो मिरवत नाही, पार्ट्या
करत नाही.
रंगरोगन लावून, खोटे केस लावून, वय लपवून फिरत नाही. क्रॉफर्ड मार्केटच्या
कोणत्याही गाळ्यावर सहज खपून जाईल, असं रूप घेऊन तो बिनधास्त
सगळीकडे फिरतो.
यूट्यूबवर अमिताभच्या उपस्थितीत रोबोच्या एका सोहळ्यात
त्याने सांगितलेला किस्सा उपलब्ध आहे. तो अद्भुत आहे. अमिताभ,
ऐश्वर्या, ए. आर. रहमान, यांच्या उपस्थितीत रजनी सांगतो की, कोणीएक नंदूलाला
नावाचा राजस्थानी माणूस त्याला एका टूरवर भेटला. म्हणाला, अरे रजनी,
कैसे हो? ये क्या बालवाल सब उड गये (अर्धटकलावरून हात फिरवतो.) अब मस्त रिटायरमेंट लाइफ चल
रही है ना?
रजनी उत्तरला, नाही. एक सिनेमा करतोय रोबो. हिरोइन कोण आहे? ऐश्वर्या.
अरे वा, ऐश्वर्या, फार चांगली मुलगी आहे. मस्त हिरोइन. हीरो कोण आहे? (डेड पॉझ) रजनी
मवाळपणे उत्तरतो, मीच आहे. नंदूलाल
पुढची दहा मिनिटं शांत राहतो. रजनी म्हणतो, नंतरही मागून आवाज येत होते, नंदूलाल कुणाला तरी सांगत
होता,
अरे, ऐश्वर्या हिरोइन? याची?
अभिषेकला काही कळत नाही का? अमिताभने
हे कसं खपवून घेतलं... हे सगळं बोलून तो आपल्या वयाच्या नटाबरोबर
नायिका साकारल्याबद्दल ऐश्वर्याचे आभार मानतो, तेव्हा
सभागृह खुर्चीतून कोसळायचं बाकी राहिलेलं असतं.
तामीळ जनतेने नायकात किंवा
पडद्यावरून राज्याच्या सिंहासनावर पोहोचलेल्या कोणत्याही महानायकात अशी परिपक्व
निरीच्छता आणि प्रांजळपणा पाहिला नसेल. म्हणूनच ही जनता मुथ्थूमध्ये
त्याने ‘नान एप्पो वरुवेन एप्पडी वरुवेन यारुक्कुम तेरुयादु. आणा वर वेण्डिय नेरत्तिले नान करेक्टा वरुवेन’ असं वचन दिल्यापासून २२ वर्षं त्याच्या
आगमनाच्या करेक्ट वेळेकडे डोळे लावून बसली आहे... भारतातल्या
घातक अस्मितावादी राजकारणात करेक्ट वेळ यायची वाट पाहायची नसते; आपण जी वेळ
साधू ती करेक्ट बनवून दाखवायची असते, हे रजनीकांतला तेव्हाही कळलं
नसावं, अजूनही
कळलेलं दिसत नाही...
नाहीतर लोखंड तापलेलं असताना हातोडा मारायला तो चुकला
असता का?
राजकारणात प्रचंड ऊर्जा लागते, ती त्याच्यात
आहे. लोकांच्या
मनात प्रचंड मोठं स्थान आहे. पण, किलर
इन्स्टिंक्ट आहे का, हा मोठा प्रश्न आहे. कारण, आताच्या
टप्प्यातल्या रजनीकांतमध्ये एक अजब विरक्ती आहे... ती आशकमस्त
टाइप बोलघेवडी फकिरी नाही... सर्व प्रकारची सुखं हात जोडून
समोर उभी असताना आणि त्यांचा एकेकाळी रसिकतेने मन:पूत आस्वाद
घेतलेला असताना त्याच्यामधला साधा माणूस हरवला नाही. देवांनाही
हेवा वाटावा इतकी अफाट लोकप्रियता मिळाल्यानंतरही तो कमालीचा साधा आहे.
पडद्यापलीकडे तो जसा असतो तसा दिसतो. टक्कल झाकत नाही आणि पांढरे केसही लपवत नाही. दक्षिणेचा
हा महानायक उत्तरेत अगदी फाटक्या माणसासारखा हिमालयात तीर्थाटन करून येतो, तेव्हा तिथे त्याला कोणीही ओळखत नाही. सफेद लुंगी
आणि शर्टातल्या कोणत्याही अण्णासारखाच तो दिसतो आणि तसाच राहतो-वावरतोही. कुटुंबाचं खासगी आयुष्य तो प्राणापलीकडे जपतो. सार्वजनिक
शोबाजीसाठी कुख्यात असलेल्या दक्षिण भारतात तो कुठल्याही समारंभात चमच्यांची फौज
घेऊन जात नाही. शक्य तेथे
स्वत: गाडी
ड्राइव्ह करत जातो. सेटवरही त्याचे नखरे नसतात. झोप आली, तर एसी
व्हॅनमध्ये न जाता तो सेटवरच एखाद्या कोपऱ्यात डोळ्यांवर
थंड पाण्याची घडी ठेवून आडवा होतो. असा माणूस राजकारणात, खासकरून
आजच्या, दिवसातून १७
वेळा परीटघडीचे कपडे बदलण्याच्या डिझायनर राजकारणात कसा चालेल? राजकारणात
तीव्र चिवट महत्त्वाकांक्षा लागते. ती रॉकेटच्या इंधनासारखं काम
करते. ते इंधन
रजनीकांतमध्ये आहे का? की ते बस कंडक्टर ते महानायक या भल्या मोठ्या झेपेमध्ये
संपून गेलं? हे समजून
घ्यायला त्याच्या सिनेमातल्या संवादांबरोबरच गाणीही पाहायला हवीत. त्याच्या संवादांमध्ये
तात्कालिक प्रतिक्रियांचे खटके असतात आणि गाण्यांमध्ये असतं चिरकालीन तत्त्वज्ञान. त्याने २००२
साली, फारशा न
चाललेल्या ‘बाबा’ सिनेमातल्या
गाण्यात म्हटलं होतं, ‘कच्चगलाई पथविगलाई नान विरुम्बमात्तेन, कालाथी
कट्टलईयाई नान मरक्कमात्तेन.’ म्हणजे मला पक्ष आणि पदांची आवड
नाही, पण मी
परमेश्वराचा आणि काळाचा आदेश कधीही विसरणार नाही. तो आदेश
त्याला कधी मिळणार याची तामीळ जनता वाट पाहते आहे. ‘शिंक,
खोकला, झोप आणि
सत्ता ही ये
म्हटल्याने येत नाही
आणि जा म्हटल्याने
जात नाही,’ असा
मुथ्थुमध्येच एक संवाद होता.
त्याचा अर्थबोध त्याला आता
झाला असावा. वयाच्या
६७व्या वर्षी, आपल्या फॅन
क्लब्जच्या संमेलनात, आपल्या खास शैलीत तो संवादांची फैर झाडतो,
राज्यव्यवस्था भ्रष्ट झाली आहे, तामीळनाडूमध्ये लोकशाही सडली
आहे आणि योग्य वेळी युद्ध छेडायची तयारी ठेवली पाहिजे... त्यावर
त्याचे फॅन अत्यानंदाने वेडे होतात... आता हृदयसिंहासनाधिष्ठित थलैवा
तामीळनाडूच्या सर्वोच्च आसनावरही विराजमान होणार, या भावनेने
त्यांच्या मनात हर्षाची कारंजी उसळू लागतात...
...मात्र, त्याचवेळी त्याच्या घरासमोर
तमिळार मुन्नेत्र पडई या संघटनेचे लोकही निदर्शनं करत असतात... हे कट्टर
तामीळवादी लोक म्हणतात, राज्यात कोट्यवधी तामीळ लोक
आहेत आमच्यावर राज्य करायला... शेजारच्या राज्यातून पोट भरायला
आलेल्या माणसाची, एका नटाची गरज नाही आम्हाला...
...तर हे सगळं असं आहे शिवाजीराव रामोजीराव गायकवाड...
तुम्ही ४४ वर्षं तामीळनाडूत काढूनही काही माणसांसाठी
का होईना ‘शेजारच्या
राज्यातून आलेला’ नटच राहिलात...
पुढची गंमत ऐका...
जिथे तुम्ही त्याआधीची २३ वर्षं व्यतीत केली, त्या
कर्नाटकातही तुम्ही ‘कन्नडिगा’ म्हणून मान्य व्हाल?...
छ्या, तिथे तुम्ही कटकट्या
महाराष्ट्रातून पोट भरायला आलेला स्थलांतरित मराठी माणूस आहात...
आणि महाराष्ट्रात?
मराठी अस्मितेचा अधून मधून उमटणारा एक सोयीस्कर
उद्गार.
कोणत्या मार्गाने निघाला होतात आणि कुठे येऊन
पोहोचलात शिवाजीराव?
..............................
२.
एन वळी, तनी
वळी
माझा मार्ग फक्त
माझा आहे.
(चित्रपट : पडैयप्पा)
शाळेपासून अभिनयाचा चस्का
लागलेल्या रजनीकांतला जेव्हा
गुरू के. बालचंदर यांनी
तामीळ शिकण्याचा सल्ला
दिला, तेव्हा आपलं आयुष्य
किती वेगळ्या मार्गाने चाललं
आहे, याची त्याला कल्पनाही
आली नसणार.
नाव शिवाजीराव गायकवाड,
म्हणजे मराठी. पण,
मराठीचा गंध नाही. कारण,
जन्म बेंगळुरूचा. शिक्षण
तिथलंच. घरात थोडंबहुत मराठी
कानावर पडलं असेल तेवढंच.
त्यामुळे खरं सांगायचं तर
तो कन्नडिगाच. पण,
नियती त्याला चित्रपटातल्या अभिनयाच्या
शिक्षणासाठी मद्रासला जावं
लागलं. तिथे बालचंदर यांच्यासारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकापुढे इम्प्रेशन
मारायला त्याने शिवाजी गणेशनसाहेबांचे संवाद पाठ केले
आणि त्यांची खणखणीत फैर
झाडली... ते म्हणाले, गचाळ
उच्चारेत तुझे. तामीळमध्ये नाव
कमावायचं तर तामीळ बोलायला
शीक.
त्यांच्या सूचनेनुसार हा
तामीळ शिकला आणि कर्नाटकात
वाढलेल्या या मराठी तरुणाने
नंतर सगळ्या जगाला तामीळ
शिकायला भाग पाडलं.
शिवाजीराव गायकवाडच्या मार्गाचं
वेगळेपण, एकमेवाद्वितीयपण इथे
समजतं...
...क्षणभर असा विचार
करा की हीच अभिनयक्षमता
घेऊन आणि हेच व्यक्तिमत्त्व
घेऊन तो महाराष्ट्रात त्याच्या
मूळ गावी जन्माला आला
असता आणि सिनेमाच्या ओढीने
कोल्हापूरला पोहोचला असता, तर
काय झालं असतं? काय
बनू शकला असता तो
मराठीत?
लक्ष्मीकांत बेर्डे? अशोक
सराफ? दादा कोंडके? की
स्वप्नील जोशी?
त्याचा काळ लक्षात
घेतला आणि प्रवास लक्षात
घेतला तर आधी त्याच्या
रंगाच्या आणि रूपाच्या नटाला
मराठीतही फार पटकन काम
मिळालं नसतं. मिळालं असतं
आणि तो चमकला असता
तरी फार फार तर
अशोक सराफच्या सर्वात
जवळ जाणारा ठरेल. त्यानेही
सिनेमात अष्टपैलू कामगिरी
केली, खलभूमिकाही केल्या.
नायकही बनला. विनोदी अभिनयही
केला. चरित्र अभिनयही केला.
रजनीकांत फारतर तिथवर पोहोचू
शकला असता.
त्याने मुंबईची वाट
पकडली असती, तर काळ्या
रंगामुळे त्याच वाटेने, त्याच
गाडीने परत यावं लागलं
असतं. संधी मिळालीच असती
तर व्हिलनगिरीची. (तामीळमध्येही
तीच मिळाली.) शत्रुघ्न
सिन्हासारखा संघर्ष करून पुढच्या
एखाद्या टप्प्यात नायकगिरीपर्यंत पोहोचला असता. पण,
अमिताभच्या झंझावातात तो
कुठे टिकला असता? फार
फार तर नाना पाटेकरप्रमाणे
संपूर्ण वेगळ्या धाटणीचा सिनेमा
करून त्याने एक वेगळं
स्थान निर्माण केलं असतं.
आता सिनारिओ नंबर
दोन : रजनीकांत मद्रासच्या
फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकून
कर्नाटकाच्या चित्रपटसृष्टीतच पुढे
गेला असता तर? तरीही
मराठीतल्यापेक्षा फारशी वेगळी
परिस्थिती झाली नसती. कारण,
कन्नड चित्रपटसृष्टीत दक्षिणी
सिनेमाचे सगळे गुण असले,
तरी ती समाजजीवनाला व्यापून
उरलेली नाही. तिथे स्टार्सचा
असा प्रभाव कमी आहे
आणि मुळात चित्रपटसृष्टीचा जीवही
छोटा आहे. हिंदीपुढे मराठीचा
आहे, तसा.
तिथे तो सुपरस्टार
बनला असता, तरी त्याची
मजल डॉ. राजकुमार यांच्यापुढे
नक्कीच गेली नसती...
...सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
तो तामीळमध्ये गेला
नसता, तर नायकपदाचे सगळे
स्टिरिओटाइप मोडीत काढून आधी
देशव्यापी आणि नंतर आंतरराष्ट्रीय
पातळीवरचा आयकॉन बनला नसता...
७० हजाराच्या आसपास
फॅन क्लब असलेला रजनीकांत
हा मायकल जॅक्सननंतरचा सर्वात
मोठा आंतरराष्ट्रीय पॉप
आयकॉन असावा, असा
तज्ज्ञांचा अंदाज आहे... त्याच्या
तामीळ सिनेमाच्या दहापट
आकाराच्या हिंदी सिनेमामधल्या कोणाही
सुपरस्टारला ही मजल मारता
आलेली नाही...
...त्याने तामीळ सिनेमातल्या
नायकाच्या संकल्पनेची केलेली
मोडतोड त्याच्या कोणत्याही
सिनेमातल्या भयंकर मारामारीच्या प्रसंगामध्ये
झालेल्या मोडतोडीइतकीच भयंकर
आहे...
रजनीकांतने तामीळ शिकून
घेतल्यानंतर के. बालचंदर यांनी
अपूर्व रागांगल या सिनेमात
त्याला १५ मिनिटांच्या पाहुण्या
भूमिकेत पहिली संधी दिली,
तेव्हा पुढे तो काय
धुमाकूळ घालणार आहे, याची
बालचंदर यांना किंवा खुद्द
रजनीला आणि त्या सिनेमाचे
नायक-नायिका कमलहासन आणि
श्रीदेवी यांनाही काही कल्पना
आली नसेल. सिनेमात ऐन
मोक्याच्या प्रसंगी परतून येणारा
श्रीदेवीचा आधीचा पती या
भूमिकेत त्याने नायकनायिकेच्या सहजीवनावर
राक्षसी छाया पाडणारा खलनायक
साकारला होता. १६ वयंथिले
या सिनेमात कमलहासन हा
थोडासा मंदबुद्धीचा, अपंग
नायक होता आणि श्रीदेवी
त्याची पत्नी. तिथेही
रजनीकांत खलभूमिकेतच होता.
अगदी श्रीदेवीने तोंडावर
थुंकावं, इतके गलिच्छ धंदे
करणारा खलनायक. ग्रामीण
भागातल्या गोष्टीवरच्या या
सिनेमात हे तिघेही जण
इतक्या सुंदर, सहज
गावरान ढंगाने वावरतात की
नंतर यांच्यातला प्रत्येकजण
वेगवेगळ्या अभिनयवैशिष्ट्यांसाठी नाणावलेला
सुपरस्टार बनला आहे, याची
आठवणही उरत नाही... भाषा
कळत नसताना. इदु
एप्पडी इरुक्कू म्हणजे
‘आता कसं वाटतंय’ हे
पालुपद अतिशय खुनशी पद्धतीने
वापरणारा रजनीचा रासवट खलनायक
तर खास पाहण्याजोगा. गंमत
म्हणजे हा त्याचा संवाद
ही त्याची पहिली पंचलाइन.
अजूनही तामीळ मंडळी एखाद्याला
डिवचून आता कसं वाटतंय,
हे खास रजनी स्टायलीत
विचारतात.
पुढची चारेक वर्षं
रजनीकांत खलभूमिका करत
होता. मात्र, त्याच्या
अभिनयाची रेंज त्या काळातही
समजत होती. त्याने वैविध्यपूर्ण
भूमिका करून चतुरस्त्र अभिनयाचं
दर्शन घडवण्याचा प्रामाणिक
प्रयत्न केला. त्याच्या त्या
काळ्या रंगरूपातही विलक्षण
आकर्षून घेणारा स्मार्टनेस होता.
सहजता होती. डोळ्यांत चमक
होती. त्यामुळे आणि
त्याच्या अभिनयकौशल्यामुळे १९७९च्या
आसपास त्याच्याकडे सहृदय
व्यक्तिरेखाही यायला लागल्या. तो
‘नायक’ बनू लागला.
काळ्यासावळ्या द्रविड रंगरूपाचा
काहीसा गंडच बाळगणाऱ्या तामीळनाडूत
हे एक मन्वंतर होतं.
भाषा, रंगरूप आणि लहेजा
यांच्यामुळे सगळे दक्षिण भारतीय
तथाकथित भारतीय मुख्य प्रवाहात
मद्रासी (उच्चारी मडरासी) म्हणून
ओळखले जात होते. समस्त
भारतवर्षाप्रमाणे इथेही गोऱ्या
रंगाचं आकर्षण आणि काळ्या
रंगाबद्दल न्यूनगंड अशी
तीव्र भावना होती. रजनीच्या
आधी काळासावळा नायक
दाखवता येत नाही पडद्यावर.
सगळे नायक दिसायला श्यामलवर्णीयच
होते. पण, पौराणिक भूमिका
असोत की शहरी, ग्रामीण.
ते चेहऱ्यावर पाच
किलो रंग थापूनच उभे
राहात. नायिकांचीही तीच
गत. त्यांना प्रत्यक्षात मेकअपविना
पाहणारा माणूस चटकन ओळखूही
शकायचा नाही. पडद्यावर गोरे
दिसलो नाही, तर आपल्याला
प्रेक्षक स्वीकारणार नाहीत,
अशीच प्रत्येकाची धारणा
होती. दक्षिणेतला दक्षिणेतल्यासारखा दिसणारा माणूस राक्षसगणांत
गणला जात होता उर्वरित
भारतात (तिथेही श्यामवर्णीयांची कमतरता
नसताना आणि श्यामल कृष्णाचा
वारसा अभिमानाने सांगितला
जात असताना). रजनीने
या राक्षसाला नायक
बनवलं. रजनीकांतला तामीळनाडूने
दत्तक घेतलं, नाम,
इज्जत, शोहरत, पैसा
सब कुछ दिलं... पण,
रजनीकांतने तामीळनाडूला जे
दिलं, त्याची तुलनाच करता
येत नाही कशाशी... त्याने
सर्वसामान्य तामीळ माणसाला पडद्यावरचा
नायक बनवलं... त्याने
भविष्यात गोरं बनावं, मग
गोऱ्या नायिका मिळतील, यश
मिळेल, कीर्ती मिळेल, पैसा
मिळेल, हे सिनेमातलं स्वप्नरंजन
खिडकीतून बाहेर भिरकावून दिलं
आणि काळ्या, पण
स्मार्ट, तैलबुद्धीच्या, पाणीदार
डोळ्यांच्या सर्वसामान्य दाक्षिणात्याला तू आहेस असावी
हीरोच आहेस, असा टेरिफिक
आत्मविश्वास दिला. एका प्रचंड
मोठ्या स्टीरिओटाइपच्या पद्धतशीरपणे
ठिकऱ्या उडवून दिल्या रजनीकांतने.
म्हणूनच आज नंब ओरू
सुपरस्टारू रजनीकांत करूप्पू
थ्थान (सुपरस्टार रजनीकांतही
काळाच आहे की) आणि
सुपरस्टार करुप्पू, अण्णा
सुपरस्टार मानसू रोंबा वेलुप्पू
(सुपरस्टारचा रंग काळा आहे,
पण त्याचं हृदय पूर्णपणे
शुभ्रधवल आहे) अशा ओळी
असलेली गाणी चालतात तामीळमध्ये...
ही त्याच्याप्रतीची कृतज्ञताच
आहे.
त्याच्या आधीपर्यंतचे बहुतांश
नायक सद्गुणपुतळे होते.
रजनीने त्यांना गहिरी छटा
दिली, काळी बाजू दिली,
त्यांच्या व्यक्तिरेखाटनात व्यामिश्रता
आणली. त्यांच्यात कालानुरूप
मर्दानगी भरली. रजनी-कमल-श्रीदेवी
हे सुपरहिट त्रिकूट होतं
एकेकाळचं. पण, त्यात रजनी
खूष नव्हता. कमलहासन
आणि श्रीदेवी हे
अभिनयकुशल कलावंत आणि रजनीकांत
हा स्टाइलभाई कसरतबाज
नट अशा प्रकारची अन्यायकारक
विभागणी होऊन बसली होती
त्यात. शिवाय, रजनीला
निखळ स्वत:चं असं
यश हवं होतं. कमललाही
तेच हवं असणार. त्या
दोघांनी घनिष्ठ मैत्रीला जागून
एका टप्प्यावर एकमेकांना
वचन दिलं... एकमेकांच्या प्रदेशात
अतिक्रमण न करण्याचं. प्रयोगशील
बुद्धिगामी सिनेमा हा कमलहासनचा
प्रांत. त्यात रोमँटिक सिनेमाही
आला. त्यात रजनी कधी
शिरला नाही. टिपिकल मनोरंजनप्रधान
सिनेमाचं भावनेला आवाहन करणारं
मसालेदार होलसेल पॅकेज हा
रजनीचा प्रांत. कमल
कधी त्या वाटेला गेला
नाही. कमलचे प्रेक्षक बाल्कनीतले.
बुद्धिवंत, विचारशील, उच्चवर्गीय.
रजनी हा पिटाचा फॉर्म्युलेबाज
बादशहा. या दोघांनी ही
सीमारेषा आजतागायत पाळली
आहे. त्याचवेळी दोघांनी
एकमेकांबरोबर काम करणंही टाळलं
आहे... एकमेकांबद्दल कमालीचं
प्रेम आणि आदर असताना.
तर ७० आणि
८०च्या दशकात रजनीची गाडी
रूळ बदलून फास्ट ट्रॅकवर
चाललेली असताना नेमका त्याच
वेळेला हिंदीत अमिताभ बच्चनच्या
रूपाने अँटी हिरोचा उदय
झाला होता. अमिताभच्या सुपरहिट
सिनेमांचे जेवढे तामिळ रिमेक
झाले, त्यांतल्या बहुतेकांमध्ये
नायक रजनीकांतने साकारला,
हा योगायोग नव्हता. त्या
दोघांमध्ये साम्य होतंच.अमिताभच्या
डॉनचा रिमेक असलेला बिल्ला
हा रजनीकांतला सुपरस्टारपदाच्या वाटेवर नेणारा पहिला
सिनेमा. या सिनेमापर्यंत रजनीकांत
हा एक मोठा स्टार
बनला होता; पण, त्याच्या
एकट्याच्या बळावर सिनेमा किती
चालू शकतो, याचं पहिलं
प्रत्यंतर निर्मात्यांना आलं
ते ‘बिल्ला’मधून.
या सिनेमाने तेव्हा
मूळ डॉनपेक्षाही जास्त
कमाई केली होती. अमिताभला
रजनीकांत फार मानतो. कारण,
अमिताभच्या सिनेमांनीच रजनीला
त्याच्या भाषेतला ‘अमिताभ’
बनायला आणि त्याद्वारे पुढे
द वन अँड ओन्लली
रजनीकांत बनायला मदत केली.
अमिताभपटांमुळे रजनीला महानायकत्वाचा प्रारंभिक
सूर सापडला. अमिताभशी
त्याचे व्यक्तिगत संबंधही
फार छान राहिले. ‘अंधा
कानून’ या रजनीच्या हिंदीतल्या
पदार्पणाच्या सिनेमात पाहुणी भूमिका
करून अमिताभने त्याच्या
यशाला मोठा हातभार लावला
होता. ‘हम’मध्ये गोविंदापेक्षाही कमी प्रभावी अशी
धाकट्या भावाची भूमिका रजनी
अमिताभबरोबर काम करण्याची संधी
म्हणूनच स्वीकारली असणार.
सिनेमाच्या जगात आपण फारतर
एका राज्याचे राजा
आहोत, अमिताभच खरा बादशहा,
सम्राट आहे, असं रजनीकांत
आजही खऱ्या नम्रतेने सांगतो.
स्वतंत्र यश मिळायला
सुरुवात झाली, रजनीचा करड्या
छटांचा अनेक अर्थांनी डार्क
नायक तामीळ जनतेने स्वीकारला
होता. रजनीकांतची, खास
त्याची ओळख असलेली झटकेबाज
शैली विकसित व्हायला लागली
होती आणि रजनीकांतचा सिनेमा
म्हणजे नेमकं काय, हे
गणित पक्कं व्हायला लागलं
होतं. फुटाफुटाला अॅक्शन-इमोशनने
खच्चून भरलेल्या त्या
पॅकेजमधल्या घटकांचं आयएसओ मान्यताप्राप्त प्रमाण ठरू लागलं
होतं. सिगारेट-चिरूट
हवेत फेकून तोंडात पकडण्याच्या, ते पेटवण्याच्या, गॉगल
परिधान करण्याच्या नाना
तऱ्हा ही त्या काळात
रजनीकांतची देशभरात प्रस्थापित झालेली
मुख्य ओळख. मुंद्रू मुडिचू
या पहिल्या टप्प्यातल्या कमलहासन-श्रीदेवी
यांच्याबरोबरच्याच सिनेमातून ती
प्रस्थापित झाली. दिसायला हे
निव्वळ टाळ्याखेचक सर्कसबाज
कसरतीसारखं वाटत असलं तरी
ही कसरत जमवून प्रसंगातलं
गांभीर्य कायम ठेवणं आणि
तिच्यातूनच आपला प्रभाव दाखवणं,
हे वाटतं तेवढं सोपं
नव्हतं. तसं असतं तर
मिथुनला ते जमायला काय
हरकत होती? रजनीच्या सिनेमातल्या
अतर्क्य मारामाऱ्या (बहुदा
तेच अॅक्शन डिरेक्टर वापरल्याने)
मिथुन चक्रवर्तीच्याही सिनेमांमध्ये
असायच्या. दक्षिणेत तर
त्याच्या नकला करणाऱ्यांच्याही नकला
होतात, इतकं त्यांचं पीक
आलं. पण, रजनीची स्टाईल
कोणी तेवढ्याच प्रभावी
पद्धतीने सहीसही उचलू शकला
नाही. मिथुनच्या सिनेमांमधल्या
रजनी स्टाइल मारामाऱ्या आणि
करामती हा तर आता
हास्यस्फोटक विनोदी ऐवज ठरला
आहे. कारण, अतर्क्य कसरती
आणि मारामाऱ्या करताना
मिथुनच्या चेहऱ्यावर मारहाण
करून थकल्यासारखे आणि
स्वत:चाच विश्वास नसल्यासारखे
ठरीव संतप्त भाव असतात.
रजनीकांत मात्र या मर्कटलीलांमध्ये रूपांतरित होतील, अशा
क्लृप्त्या आणि हालचाली ज्या
रूबाबात करतो, तो रूबाब
पाहण्यासारखा असतो. आपण अत्यंत
अविश्वसनीय गोष्ट करतो आहोत,
मात्र ती आपल्याला शक्य
आहे, आपणच ती करू
शकतो, कारण आपण रजनीकांत
आहोत, असा भाव त्याच्या
देहबोलीतून दिसत असतो. तो
आत्मविश्वास अगदी कठोरातल्या कठोर
टीकाकारालाही नि:शस्त्र करणारा
असतो. रजनी संतापून मारामारी
करतो, तेव्हा त्याच्यात खदिरांगारी
संतापाचा ज्वालामुखी धगधगतोय,
याचं दर्शन घडवण्यात तो
कसलीही कसर सोडत नाही.
तेच तो प्रसंग विनोदी
किंवा हलक्याफुलक्या पद्धतीने
होणार असेल, तर तो
ही अतिमानवी ताकद
हसत-खेळत, मौजमजा करत
वापरतो. खलनायकांची पिटाई
असो की नायिकेचं गर्वहरण
असो, अतिशय निरागस असा
आनंद आपल्याला मिळतो
आहे, असा अष्टसात्विक भाव
त्याच्या चेहऱ्यावर विलसत
असतो. रजनीची बाह्यत: क्लृप्तीबाज
भासणारी स्टाइलबाजी हा
प्रत्यक्षात अत्यंत अवघड परिस्थितीही ‘कूल’ राहण्याचा वस्तुपाठच
असतो पिटातल्या प्रेक्षकांसाठी... त्यांच्यासाठी तो फार
महत्त्वाचा असतो... कारण, त्यांना
त्यांच्या आयुष्यात रोजच
अवघड परिस्थितीचा सामना
करायला लागत असतो.
फटाके लावल्यासारखे तडतडणारे
संवाद, ही रजनीकांतची आणखी
एक महत्त्वाची खासियत.
या लेखासोबत काही
संवादांची झलक देताना मुद्दाम
तामीळ संवादही दिले आहेत,
त्यांचा खटका समजावा म्हणून.
मुळात ट थ द
ध न या तालव्य
अक्षरांच्या आघाती उच्चारणामुळे या
भाषेत आपोआपच खटके निर्माण
होतात. त्यांची रेलचेल असलेल्या
संवादांमध्ये रजनीकांतच्या जीवनविषयक
तत्त्वज्ञानाचं प्रतिबिंब उमटलेलं
असतं. रजनीकांत म्हणजे
त्या चित्रपटातली ती
व्यक्तिरेखा किती निडर, किती
ताकदवान आहे, यांचं वर्णन
असतं. शिवाय या संवादांमध्ये
समकालीन परिस्थितीवर भाष्य
असतं. खरं सांगायचं तर
त्यात त्याच्या चाहत्यांसाठी
त्या त्या वेळचे राजकीय
भूमिकांचे आदेशच असतात थलैवाने
सोडलेले.
भल्याचं सगळं भलंच
होतं, वाईटाला शिक्षा मिळतेच;
आपण आपलं काम करत
राहावं, फळाची अपेक्षा करू
नये; स्त्रियांनी आपल्या
मापात राहावं, पुरुषांची
बरोबरी करायला जाऊ नये;
भौतिक गोष्टींमध्ये जास्त
रमू नये, अशा प्रकारचं
साधारणत: कोणाही सर्वसामान्य प्रेक्षकाला
खटकणार नाही आणि फारशी
सखोल अर्थनिष्पत्ती होणार
नाही, असं सरधोपट तत्त्वज्ञान
तो आकर्षकपणे मांडतो.
त्याला देवावरच्या अडीग
विश्वासाची डेडली जोड आहे.
हे लिथल म्हणतात इतकं
भयावह प्रभावी कॉम्बिनेशन. वेगळ्या
संदर्भांत आणि स्वरूपांत ते
सचिन तेंडुलकरच्या प्रतिमेत
दिसतं. त्याच्या गगनचुंबी
लोकप्रियतेच्या पायात हेही सिमेंट
आहेच. रजनीकांतचा नायक
हा सतत देवाच्या इच्छेनुसार
वागताना दिसतो... म्हणजे
तो जे जे करतो,
ती देवाची आज्ञा आहे,
देवच ते करवून घेतो
आहे, अशी त्याची श्रद्धा
असते. ते तो सिनेमात
वारंवार सांगतो. म्हणजे
माझ्या हातून जे काही
घडेल त्याची माझ्यावर जबाबदारी
नाही आणि माझं काही
श्रेय नाही. या नायकावर
सिनेमात एक बेतीव संकट
येतं. ते त्याला शून्यावर
आणतं. तिथून तो याच
निरीच्छ श्रद्धेच्या बळावर
पुढे येतो. आधीच्या ऐश्वर्यापेक्षा अधिक कमावतो.
सामाजिक टिप्पणीच्या झिरझिरीत
बुरख्याआडून थेट राजकीय भाष्य
हा त्याच्या सिनेमाचा
आणखी एक विशेष. खासकरून
१९९१पासून जयललितांच्या राजवटीच्या
कालखंडात केलेल्या सिनेमांमध्ये
रजनीकांतचे शेरेताशेरे ऐकायला
मिळतात. साड्या, धोतरं
दान म्हणून स्वीकारायला तुम्ही
भिकारी आहात का, नोकऱ्या
द्यायला सांगा म्हणजे हे
सगळं विकत घेण्याची तुमचीच
ऐपत होईल, हा संवाद
म्हणजे थेट जयललितांच्या अम्माबाज
उपक्रमांवरचं टोकदार भाष्य आहे.
अशा प्रकारच्या छोट्या
छोट्या संवादांमधून आणि
दृश्यांमधून रजनीकांतने त्या
त्या काळच्या समकालीन परिस्थितीवरची
टिप्पणी सिनेमांमध्ये पेरलेली
दिसते.
त्याच्या ज्या पंचलाइन
संवादांवर प्रेक्षागृह उसळलंच
पाहिजे, असं गणित असतं
त्या संवादांची नुसती
फेकच महत्त्वाची नसते.
त्यांचं टायमिंग, त्यांचं
टेकिंग हेही वेगळं असतं.
रजनीकांतच्या पंचलाइन्स यूट्यूबवर
उपलब्ध आहेत. त्यांचं टेकिंग
पाहिलं की त्यामागचा विचार
आणि मेहनत समजते. रजनीकांत
प्रत्येक संवादाला एक
उच्चारी ढब देतो. सिनेमात
जिथे जिथे तो संवाद
येतो, तिथे तिथे तो
त्या शैलीत उच्चारला जातो.
त्याचबरोबर त्या शब्दांमधल्या आघातांनुसार, संवादाचं चित्रण कसं
होणार त्यानुसार आणि
त्याने धारण केलेल्या व्यक्तिरेखेनुसार त्या संवादासाठीचे हातवारे
ठरवले जातात. काही
गिमिक्स करणार असेल, तर
तेही ठरवतो. ते
हातवारे कशा प्रकारे प्रभावीरित्या
टिपता येतील, अशा
पद्धतीने दिग्दर्शक दृश्यविभागणी
करतो. त्याचबरोबर एखाद्या
गाण्याप्रमाणे त्या संवादाचं पार्श्वसंगीतही ठरवलं जातं. या
सगळ्यांच्या जुळणीतून रजनीकांतचा
पंच डायलॉग साकारतो. अरुणाचलममध्ये ‘देव ठरवतो आणि
अरुणाचलम ते करतो’ हा
संवाद पाहा. या संवादाच्या
अखेरीला देवळाची घंटा वाजते.
तो नायकाला परमेश्वराने कौल
दिल्याचाच संकेत असतो. बहुतेक
वेळा सिनेमाचं सिग्नेचर
संगीत अशा प्रसंगांमध्ये योग्य
प्रकारे गुंफलेलं असतं.
अलीकडच्या टप्प्यात सुपरस्टार
रजनीकांत हे रजनीचं क्रेडिट
टायटल पडद्यावर श्रेयनामावलीत
येतं, तेच ए. आर.
रहमानने त्यासाठी खास
तयार केलेल्या संगीतासह.
तेच संगीत रजनीकांतच्या पंच
डायलॉगलाही वापरलं जातं कधीकधी.
इतक्या पद्धतशीरपणे वातावरणनिर्मिती करून त्याच्या संवादातून
असा जोश तयार होतो
की रजनीच्या या
संवादांवर सगळं प्रेक्षागृह खुर्चीतून
उसळून बाहेर आलेलं असतं...
दौलतजादाही होतो.
पंचलाइन्सबरोबर किंबहुना त्यापेक्षाही
महत्वाची असते ती थलैवाची
एन्ट्री. सिनेमा सुरू झाल्याबरोब्बर
रजनीकांत दिसला, अगदी
साधेपणाने फ्रेममध्ये आला,
असं कधी होत नाही.
त्यासाठी त्याच्या व्यक्तिरेखेच्या आणि ती रजनीकांत
साकारतो आहे, याच्या हिशोबाने
प्रसंग रचला जातो. सुळसुळीत
उंची गाड्यांचा ताफा
येतो, मग त्यांचा दरवाजा
उघडतो, बूट घातलेला कडक
सूटधारी पाय बाहेर येतो,
मग नायक बाहेर येतो
आणि ऐटीत चालू लागतो,
हा वेगवेगळ्या अँगल्सनी,
सहसा स्लो मोशन वापरून
चित्रित होणारा एन्ट्रीचा सीन
आपण शेकडो सिनेमांमध्ये पाहिला
असेल. त्याची सुरुवात रजनीने
केली आहे. कधी तो
पंचमीच्या दिवशी वारूळ खोदू
पाहणाऱ्या गावकऱ्याला हवेत
उडवून देऊन त्या वारुळात
हात घालून नागाला बाहेर
काढतो आणि त्याच्या फण्याचं
चुंबन घेऊन नायिकेला इम्प्रेस
करतो प्रथमदर्शनात. कधी
तो कंपनीच्या बोर्ड
ऑफ डिरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये
प्रतिस्पर्धी खलनायकाचं नाव
अध्यक्ष म्हणून जाहीर होण्याच्या
बेताला असताना कडक सुटाबुटात
टॉक टॉक बूट वाजवत
येऊन सिगारच्या धुराची
वलयं सोडत एन्ट्री मारून
त्याच्या खुर्चीत जाऊन बसतो.
कधी पूजेच्या नृत्यगीतामध्ये हवेत फेकलेलं फळ
हवेतच डोक्याने फोडून
जमिनीवर अवतरून प्रेक्षकवृंदाला नमस्कार
करतो. रजनीकांतच्या सिनेमात
त्याची एन्ट्री हा देव
भूतलावर अवतरले तरी त्यांनाही
दुर्लभ असा एक प्रेमसोहळा
असतो. काबाली या अगदी
अलीकडच्या सिनेमात म्हातारा रजनीकांत
तुरुंगातून बाहेर पडून आपले
कपडे वगैरे ताब्यात घेतो
आणि ते घालून बाहेर
पडतो, या साध्याशा वाटणाऱ्या
प्रसंगाची मांडणी पाहिली की
त्याच्या एन्ट्रीचं महत्त्व
कळतं.
हा या माणसाचा
सिनेमा आहे...
आपण थिएटरमध्ये या
माणसाला पाहायला आलो आहोत...
आता इथून पुढे
हा आपला तारणहार...
हा जे जे
करील ते आपल्याला कमालीचा
आनंद देणार आहे...
असं सामूहिक संमोहन
करणारा तो प्रसंग असतो.
पडद्यावर रजनीकांत बाशा
साकारतोय, अरुणाचलम आहे,
पडैयप्पा आहे, बाबा आहे,
शिवाजी आहे, रोबो आहे
की काबाली आहे, याच्या
सगळ्या मर्यादा भेदणारी ही
रचना असते. चित्रपटाच्या सगळ्या
चौकटी भेदून चाहत्यांशी थेट
भेट असते ही रजनीकांतची.
दिग्दर्शक वगैरे सगळे पुजारी
बाजूला- परमेश्वर आणि
भक्त यांच्यातली थेट
‘मन की बात.’
सिनेमाकलेचे सगळे निकष,
कथा-पटकथा हेच सिनेमाचे
प्राण, दिग्दर्शक हाच
कॅप्टन, वगैरे सगळं सगळं
प्रेक्षकांच्या दृष्टीने कम्प्लीट
मोडीत निघतं त्या क्षणांमध्ये. रजनीकांतच्या सिनेमांमध्ये सहसा
नायिकांचाही पालापाचोळा होऊन
जातो, तो त्याच्या अशाच
प्रकारच्या सर्वभक्षी अस्तित्वामुळे. तो पडद्यावरचा भयंकर
नरभक्षक आहे, याची सुन्न
करणारी जाणीव इतर अभिनेत्यांना
होत असेल हे प्रसंग
पाहताना... पाठीची पन्हळ थंडगार
पडत असेल त्यांची.
‘रजनीकांतचा सिनेमा’ हा
कल्ट नेमका काय आहे,
त्याच्यात आणि इतर महानायकांच्या
सिनेमांमध्ये नेमका काय फरक
असतो, हे अधोरेखित करणारे
हे सगळे घटक आहेत.
तेच इतरांनीही, अगदी
रेसिपी बुकातून घेतल्याप्रमाणे तंतोतंत
वापरून सेम टु सेम
सिनेमा बनवला, तरी
रजनीच्या सिनेमाची सर
त्याला येत नाही... कारण
या रेसिपीचा पंचप्राण,
सर्वात महत्त्वाचा घटक,
रजनीकांत त्यात नसतो.
रूपेरी पडद्यावरचा गेल्या
शतकाचा अमिताभ बच्चन आणि
रजनीकांत यांच्यातला फरकही
इथेच स्पष्ट होतो.
अमिताभ जिथे काम
करतो ती हिंदी चित्रपटसृष्टी
मुळात इतकी लाऊड, अतिनाट्यवादी
नाही, हे एक मुख्य
कारण. अमिताभलाही सलीम-जावेद
यांनी खटकेबाज संवाद दिले
असले, तरी त्यांच्यात तामीळ
संवादांच्या आघाती गंमतीचे उच्चारी
खटके नाहीत. पण,
त्याहून महत्त्वाची गोष्ट
म्हणजे अमिताभचं व्यक्तिमत्त्व. तो फक्त एक
अभिनेता आहे. व्यक्तिरेखा आणि
आपण यांच्यातलं अंतर
तो ओळखून आहे... रेखा
आणि तो यांच्यातल्या अंतराप्रमाणेच. असो. त्याने जो
अँग्री यंग मॅन साकारला
तो सलीम-जावेद यांचा
होता, प्रकाश मेहरांचा होता.
त्याचं कोणतंही दायित्व अमिताभने
कधीही स्वीकारलं नाही.
सुरुवातीच्या, जंजीरनंतरच्या एका
टप्प्यात अमिताभ हा आपल्या
मुक्तीसाठी अवतरलेला महानायक
आहे, अशी त्रिविध तापांनी
त्रस्त आम पब्लिकची धारणा
झाली होती. त्याच्यात ज्यांनी
गरजेपेक्षा जास्त भावनिक गुंतवणूक
केली, ते तोंडावर पडले.
अमिताभ कसलीही क्रांती करायला
पडद्यावर अवतरलेला नव्हता.
त्याला यशस्वी बनायचं होतं.
त्याच्या मनात तसले काही
भ्रम नव्हते. तो
निव्वळ व्यक्तिरेखा समरसून
साकारत होता, लेखकांच्या शब्दांना
दिग्दर्शकाच्या चौकटीत न्याय देण्याचा
प्रयत्न करत होता. त्यामुळेच
मनमोहन देसाईंनी त्याला
विनोदी डूब दिली तेव्हा
तो तिकडे वळला आणि
यश चोपडांनी त्याला
ट्युलिपच्या बागांमध्ये नेलं,
तेव्हा तिकडे गेला. बिडी
ओढणारा, फाटके गंजीफ्रॉक घालणारा,
समाजव्यवस्थेच्या अन्यायामुळे तळागाळात
फेकला गेलेला, मोलमजुरी
केलेला, अर्धशिक्षित माणूस
एका टप्प्यानंतर अमिताभमध्ये
आपलं प्रतिबिंब पाहू
शकला नाही. ज्याने पाहिलं
तो ठगला गेला... आपल्याच
मूर्खपणामुळे ठगला गेला.
मुळात हिंदी सिनेमाही
देशाच्या राजकारणाशी थेट
जोडला गेलेला नाही, इथले
सुपरस्टार देशाच्या राजकारणात
फार मोठ्या पदांवर कधी
पोहोचू शकलेले नाहीत. सिनेमा
आणि राजकारण-समाजकारणाची
सरमिसळ व्हावी इतका एकजिनसी
समाजही नाही हिंदीभाषकांचा.
रजनीकांतने दक्षिणेत स्वीकारलेल्या
मेगास्टार बनण्याच्या मार्गावर
या सगळ्या सवलती नव्हत्या
आणि नाहीत. तिथे
सिनेमा, राजकारण, समाजकारण
यांच्या झणझणीत भेळीतून काहीही
वेगळं काढून पाहता येत
नाही... लोकप्रिय नायक
किंवा महानायक होण्याचा मार्ग
हा राजकीय भूमिका घेण्याचे
आणि पडद्यावरून राज्याचं
राजकारण खेळण्याचे मुक्काम
टाळू शकत नाही...
रजनीकांतने आपल्या या
मार्गाचं वर्णन आधीच केलं
होतं...
एनी वळी, तनी
वळी.
माझा मार्ग फक्त
माझा आहे.
.............................................
३.
त्याचा मार्ग अचानक
मध्येच इतकी वेगवेगळी वाटा-वळणं
धुंडाळेल, असं कोणालाच वाटलं
नसेल...
...तामीळ सिनेमात उत्तम
बस्तान बसलेलं आहे... मित्र
आणि प्रमुख स्पर्धक कमलहासन
हिंदी सिनेमात स्थिरावायचा प्रयत्न
करतोय... त्यामुळे मैदान
मोकळं झालेलं आहे... अशावेळी
त्याला हिंदी सिनेमात येण्याची
इच्छा झाली... कमलच्या एक
दूजे के लिएने मिळवलेलं
बेफाट यश हे त्याचं
एक कारण असावं...
कमल आणि रजनी
या दोघांचेही गुरू
के. बालचंदर यांनीच कमलला
हिंदीत मोठ्या दिमाखात आणलं
होतं... गुरूचा तो आशीर्वाद
रजनीला लाभला नाही... त्यानेही
टी. रामाराव या भरवशाच्या
दक्षिण भारतीय दिग्दर्शकाच्या साथीनेच
‘हिंदी महासागरा’त
उडी घेतली... पहिल्या
उडीत हातात ‘अंधा
कानून’च्या रूपाने मोठं
घबाडच लाभलं... रजनी
सुखावला... मात्र, जे
कमलच्या नशिबात होतं, तेच
त्याच्याही नशिबात होतं... कमलला
नंतर काही मध्यम यशस्वी
सिनेमे देऊनही एक दूजे
के लिएच्या यशाची उंची
कधी गाठता आली नाही...
रजनीकांतलाही अंधा कानूननंतर जवळपास
२० वर्षं हिंदीत यशस्वी
होता आलं नाही... कमलहासनच्या
सिनेमांची जातकुळी हिंदी सिनेमाच्या
अभिरुचीसंपन्न प्रेक्षकांच्या पसंतीला
उतरणारी होती. तो अभिनेता
म्हणून ख्यातकीर्त होता.
त्याच्या सिनेमांच्या यशापयशाने
त्याच्या अभिनयक्षमतेवर कधी
प्रश्नचिन्ह लावलं नाही. सागर,
अप्पूराजा, पुष्पक, सनम
तेरी कसम, सदमापासून अगदी
चाची ४२० आणि हे
रामपर्यंतच्या प्रत्येक सिनेमाने
कमलला कोणत्या ना कोणत्या
बाबतीत आदर तरी कमावून
दिला. रजनी मात्र बी
आणि सी ग्रेडच्या वर
आलाच नाही. इथेही पिटातलं
पब्लिक हाच टार्गेट ऑडियन्स
धरून त्याने आपला नेहमीचा
अतिरंजित मालमसाला ओतला.
पण, तो स्लॉट मिथुन
चक्रवर्तीने कधीच बुक करून
ठेवला होता. दक्षिणेत जी
रजनीची क्रेझ होती, ती
चवन्नीछाप सिंगल स्क्रीन थिएटरांमध्ये
मिथुनची होती. दक्षिणेतच ऊटीला
हॉटेल काढून तिथेच राहणाऱ्या
आणि त्याच परिसरात शूटिंग
करणाऱ्या मिथुनने स्वस्त मसालापटांची
फॅक्टरीच लावली होती. हे
सगळे सिनेमे इतके एकसारखे
होते की एकाची रिळं
कधी चुकून दुसऱ्यात मिक्स
झाली असती, तरी कुणालाही
पत्ता लागला नसता. त्या
सगळ्या रजनीपटांच्या, स्वस्त
खानावळीतल्या रश्शासारख्या पचपचीत
पातळ आवृत्त्या होत्या.
पण, खुद्द रजनीच्या सिनेमांपेक्षा
मिथुनच्या सिनेमांना बंगाली,
भोजपुरी, बिहारी, उत्तर
प्रदेशी मजूरवर्गात अधिक
प्रतिसाद होता.
दक्षिणेत जी क्रांती
रजनीने घडवली होती, ती
उत्तरेत घडायला वेळ होता...
काळाकुळकुळीत, आपल्यासारखाच दिसणारा
आणि मुख्य म्हणजे दक्षिणी
उच्चारांमध्ये हिंदी बोलणारा नायक
हिंदीने स्वीकारायला आणखी
२० वर्षं जायची होती...
कमल आणि रजनी
यांच्या हिंदीतल्या दोन्ही
पदार्पणपटांना मिळालेला प्रतिसाद
हा रुचिपालटाला, रुचिवैचित्र्याला मिळालेला प्रतिसाद होता...
हिंदी सिनेमाच्या मिळमिळीत
थाळीमध्ये या दोघांच्या या
सिनेमांनी झणझणीत झटका दिला
होता...
एक दूजे के लिएमध्ये कमलसाठी टेलरमेड भूमिका होती. तो मुळातच हिंदी न येणारा दक्षिण भारतीय नायक होता सिनेमात. सिनेमाचं सगळं नाट्यच मुळी त्या मुद्द्यावर फिरणारं होतं. त्यामुळे त्यांचं अवघडलेल्या उच्चारांमधलं हिंदी, एस. पी. बालसुब्रम्हण्यमच्या आवाजातली गाणी, हे सगळं व्यवस्थित सूट झालं. या सिनेमात कोवळी काकडी रती अग्निहोत्री होती, प्रणयदृश्यं त्या काळाच्या मानाने बोल्ड आणि फिजिकल होती, रतीच्या सपाट पोटावर फिरणारा भोवरा आयकॉनिक