Friday, October 23, 2015

लोकल सिनेमाची ग्लोबल गोष्ट

कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून आपलं आत्मचरित्रच मांडत असतात म्हणे.
भाऊराव कऱ्हाडे या तरुण दिग्दर्शकाच्या बाबतीत, निदान ‘ख्वाडा’ या त्याच्या पहिल्याच सिनेमाच्या संदर्भात हे अगदीच स्पष्ट आहे... बहुतेक कलावंतांच्या पहिल्या धारेच्या कलाकृतींच्या बाबतीत असतं तसंच.
गंमत म्हणजे भाऊरावाच्या सिनेमाची गोष्ट ही ‘त्याची’ गोष्ट नाही. साधारणत: लेखक-दिग्दर्शक जेव्हा आत्मचरित्रातून स्फुरलेली गोष्ट सांगतात, तेव्हा त्यांचा नायक हे त्यांचंच प्रतिरूप असतं. त्यांनी जे केलेलं असतं, ते हे नायक करत असतात किंवा त्यांना जे करायचं होतं, ते या नायकांमार्फत करवून घेतलं जातं. भाऊरावच्या गोष्टीचं वैशिष्ट्य म्हणजे तो या गोष्टीचा नायक नाही. किंबहुना त्याने आपल्या बालजीवनातून स्फुरलेली गोष्ट निवडताना ती आपल्या समाजाचीही निवडलेली नाही. त्यासाठी त्याने लहानपणी जवळून पाहिलेला धनगर समाज निवडला आहे. हा या सिनेमाचा पहिला विशेष.
‘कोर्ट’ आणि ‘ख्वाडा’ या दोन अत्यंत वेगवेगळ्या जातकुळीच्या राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या मराठी सिनेमांच्या लेखक-दिग्दर्शकांमध्ये आश्चर्यकारक साम्य आहे, ते या विषयनिवडीचं. मराठीत लेखक आणि अन्य कलावंतांची मजल आपल्या भावविश्वाच्या पलीकडे जात नाही, कोणी कसला अभ्यास करून काही काम करत नाही, अशी रडकथा सांगितली जाते. त्यात सिनेमा ही तर यशस्वी ठोकताळ्यांची कला. त्यात अभ्यासबिभ्यास कोण करत बसतो, अशी लाडकी समजूत. सामाजिक वास्तवापासून तुटलेली, तिचे कंगोरे घासूनपुसून गुळगुळीत केलेली मनोरंजनाची गोड गुटिका म्हणजे सिनेमा. सुदैवाने ‘कोर्ट’चा दिग्दर्शक चैतन्य ताम्हणे आणि ‘ख्वाडा’कार भाऊराव कऱ्हाडे यांच्यासारख्या दिग्दर्शकांना सिनेमाची ही व्याख्याच मान्य नाही. दोघांनीही आपल्या परिचयाच्या परीघात सिनेमाचा घाणा ओढून मनोरंजनाचा सरकारीनिर्मिती उद्योग चालवणं नाकारलेलं दिसतं. दोघेही त्यासाठी आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडलेले दिसतात. चैतन्यने चळवळींच्या शाहिरी जगाचा अभ्यास करण्यासाठी वर्ष घालवलं आणि त्यात आपल्या मनातली कथा नेऊन बसवली. भाऊरावाने लहानपणापासून पाहिलेल्या धनगरी जीवनावर आधारलेला सिनेमा बनवण्यासाठी धनगरांच्या पालांसोबत अनेक महिने प्रवास केला, त्यांच्याबरोबर राहिला. त्यांच्या ताटात खाल्लं. त्यांचं आयुष्य जगून पाहिलं.
या सगळ्या उद्योगाचा परिणाम असा झालाय की, मेंढरांच्या शेणामुताच्या, धनगरांच्या घामाच्या आणि गावगणंग पुढाऱ्यांच्या पावडरलेपित खाकांच्या संमिश्र वासाचा सिनेमा तयार झालेला आहे. एरवी मुख्य धारेतला सिनेमा हा जसा माणसांचं बहुमित जगणं द्विमित म्हणजे टू डायमेन्शनल म्हणजे सपाट करून सादर करतो, तसाच हा सिनेमा इतक्या नियंत्रित वातावरणात घडतो की अगदी ग्रामीण परिसरही काल्पनिक वाटायला लागतात आणि तिथली माणसंही रामानंद सागरकृत मालिकांमधल्या देवदेवतांप्रमाणे गुळगुळीत आणि मिळमिळीत बनून जातात. कोणत्याही परिसरातल्या गंधाची संवेदनाच या डेटॉली सिनेमांमध्ये साफ पुसून काढलेली असते. ‘ख्वाडा’चं मात्र तसं नाही. संपूर्ण सिनेमाभर या सिनेमातल्या व्यक्तिरेखा, परिसर आणि जनावरं यांचा गंध घमघमत राहतो.
हा अस्सल वातावरणनिर्मितीचा गंध आहे. सिनेमाचा पिंड लक्षात घेतला, तर तो आश्चर्यकारक आहे. कारण, ख्वाडा हा धनगर जीवनावरचा ताणून मोठा केलेला लघुपट नाही. खरं तर तो व्यावसायिक सिनेमाचे सगळे घटक असलेला सिनेमा आहे.
‘ख्वाडा’ची कथा ही कोणत्याही कमर्शियल ‘मद्रासी’ सिनेमाची कथा म्हणून सहज खपून जाईल. या सिनेमाच्या रिमेकसाठी तमिळमधून विचारणा झाली, हा योगायोग नाही. नायक आणि खलनायक अशी रचना आली की आपल्या नकळत आपल्या मनातून तद्दन व्यावसायिक असा शिक्का आपोआपच एखाद्या सिनेमावर बसून जातो. त्यामुळेच, प्रायोगिक आणि कलात्मक सिनेमाच्या प्रेक्षकांना हा सिनेमा प्रच्छन्नपणे व्यावसायिक क्लृप्त्यांचा वाटू शकतो. पण, भाऊराव त्याही बाबतीत अतिशय स्पष्ट आहे. मला हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचाय, त्यांना भिडवायचाय, त्यांना जे भिडतं ते या सिनेमात आपणहून येतंय, ते मी नाकारणार नाही. 
मला हाच परिणाम अपेक्षित आहे, असं हा एरवी मवाळ भासणारा दिग्दर्शक अगदी ठामपणे सांगतो. त्याच्या कथेच्या रचनेशी, आकृतीबंधाशी तो प्रामाणिक आहे आणि त्याने निव्वळ कमर्शियल यशाची गणितं न मांडता आधी धनगरी जीवनाचं दर्शन घडवत हळूच त्यात एका लग्नाची गोष्ट सुरू केलेली आहे. आता हा पालावरचा ‘हम आप के है कौन’ आहे की काय, अशी शंका येईपर्यंत प्रेक्षकाला पिदवल्यानंतर या भटक्या जीवनातला संघर्ष पायरीपायरीने त्यात घुसवला आहे. सिनेमातला सगळा गोग्गोड भासणारा भाग झपाट्याने मागे पडत जातो आणि धनगरांचा धगधगता जीवनसंघर्ष सगळ्या पडद्याचा ताबा घेतो, तेव्हा त्या ज्वाळांच्या चटक्यांनी अवाक व्हायला होतं. आपल्या लक्षात यायला लागतं की, हा दिग्दर्शक धनगरांचं रूपक वापरून सगळ्या जगभरात गेल्या पाऊण शतकभरात सुरू असलेल्या स्थलांतरांची, स्थलांतरितांचीच वैश्विक गोष्ट सांगतो आहे. तीही अगदी परिचयाचा आकृतिबंध वापरून.
जगभरातला वेगवेगळ्या शैलींचा सिनेमा पाहिलेल्या प्रेक्षकाला सहसा व्यावसायिक सिनेमांमधला कृतक संघर्ष भिडत नाही. ‘ख्वाडा’ ही लिटमस टेस्ट पार करतो आणि आपल्याला झक मारत नायकाशी तादात्म्य पावायला लावतो. पहिल्याच सिनेमात हे रचनाकौशल्य साधणं ही मोठीच कामगिरी आहे.
पण, लहान वयात सिनेमा पाहण्यासाठी आठ किलोमीटरची पायपीट करणाऱ्या, सिनेमा बनवण्यासाठी बारावीत सुटलेलं शिक्षण मुक्त विद्यापीठातून पूर्ण करणाऱ्या, फिल्म इन्िस्टट्यूटमध्ये प्रवेश मिळवण्यात अपयश आल्यानंतर घरची जमीन विकून मनाजोगता सिनेमा बनवण्यासाठी पुरेपूर मेहनत घेणाऱ्या भाऊरावाच्या डोक्यातल्या सिनेमाच्या कल्पनेत कसलाच ख्वाडा म्हणजे खोडा नव्हता... त्यामुळेच ही अवघड गोष्ट सहजसाध्य झालेली दिसते. या सिनेमाने त्याची जमीन हिरावून घेतली आणि त्यालाही त्याच्या कहाणीतल्या धनगरांप्रमाणे स्थलांतर करायला भाग पाडलं...
रूढार्थाने आत्मकथा सांगणं भाऊरावाने कटाक्षाने टाळलंय खरं... 

पण कलावंताच्या भागधेयापासून तो पळून पळून पळणार किती?... 

त्याचं भवितव्य त्याच्याच सिनेमाने लिहून दाखवलंच.

Tuesday, April 21, 2015

ज्युरींचे डोके फिरले आहे काय?

राष्ट्रीय पुरस्कार ठरवणाऱ्या ज्युरींचे डोके फिरले आहे काय, हाच प्रश्न ‘कोर्ट’ पाहणाऱ्या कोणाही सर्वसामान्य चित्रपटरसिकाच्या मनात येईल. अरे, हा काय सिनेमा आहे का, सिनेमा असा असतो का, आजकालचा सिनेमा किती ‘पुढारलेला’ आहे, या सिनेमात तांत्रिक ‘समृद्धी’ कशी दिसत नाही, असे अनेक उपप्रश्न या एका प्रश्नाच्या मागे दडलेले असतील. हे साहजिकच आहे. या सिनेमाला भारतातील २०१४मधील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्णकमळ मिळालेलं आहे. म्हणजे देशातल्या सर्व भाषांमधल्या सर्व प्रकारच्या सिनेमांमधला सर्वोत्कृष्ट सिनेमा... आणि हा सिनेमा आपल्या परिचयाच्या, खरं तर अतिपरिचयाच्या गुळगुळीत, नाट्यमय चित्रभाषेतला एकही शब्द बोलत नाही. त्याची ‘भाषा’च वेगळी आहे. सिनेमा काय असा असतो का, असा प्रश्न पडतो तो यामुळेच.
चैतन्य ताम्हणे या फिल्ममेकिंगचं कसलंही प्रशिक्षण न घेतलेल्या २८ वर्षांच्या तरुणाने वयाच्या २६व्या वर्षी विवेक गोम्बर या समवयस्क तरुणाच्या आर्थिक पाठबळावर हा सिनेमा बनवलेला आहे. आता खुलासा झाला, प्रशिक्षणच नाही, तर सिनेमासारखा सिनेमा कसा काढायला जमणार, असं वाटेल कोणाला. पण, सिनेमाची साचेबद्ध भाषा न बोलण्याचा प्रकार हा अनभिज्ञतेतून झालेला नाही, तो जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे, अत्यंत प्रगल्भ निर्णय. सरकारी यंत्रणा एका वयोवृद्ध लोकशाहीराला निरर्थक खटल्यांमध्ये आणि कोर्टबाजीमध्ये अडकवत नेते, एवढंच या सिनेमाचं कथासूत्र आहे. ते चार-पाच प्रमुख व्यक्तिरेखांच्या माध्यमातून उलगडत जातं. सिनेमाची रचना सरळसोट. फ्लॅशबॅक, गुंतागुंतीची चतुर पटकथा, काळात पुढेमागे आंदोळणं वगैरे काही नाही. कोर्टाच्या कामकाजासारखाच सिनेमाचाही रूक्ष-रखरखीत कारभार. आता अशा आजच्या काळात ‘बाळबोध’ मानल्या जाणाऱ्या कथारचनेचे सिनेमे काही दुर्मीळ नाहीत. पण, त्यांची मांडणी सिनेमॅटिक म्हणजे खरं तर फिल्मी असते. या सिनेमाची मांडणी तशी नाही, हा मोठा धक्का आहे.
सिनेमा ही प्रतिपाद्य विषय नाट्यमयतेतूनच मांडण्याची कला आहे, अशी आजच्या काळातल्या लोकप्रिय सिनेमाची समजूत आहे. ‘कोर्ट’मध्ये शाहीर संभाजी भगतांनी लिहिलेल्या एका ओळीत ‘कलेच्या नावाने दिली जाणारी भूल’ असा उल्लेख आहे. आजची लोकप्रिय सिनेमाची मांडणी ही त्या भुलीसारखी असते. म्हणजे काय, तर लेखकाने लिहिलेल्या शब्दांची भावाभिव्यक्ती करणाऱ्या व्यक्तिरेखा एकाच कोनातून एकसंधपणे टिपत नाही. दृश्यात कॅमेऱ्याचे कोन बदलले जातात, कॅमेऱ्याच्या हालचाली घडतात, तो डावीकडून उजवीकडे जातो, वरून खाली येतो, व्यक्तिरेखेबरोबर पुढे येतो-मागे जातो. संकलकाच्या टेबलावर या सगळ्या दृश्यतुकड्यांची सांगड घालून, त्याला पार्श्वध्वनी आणि पार्श्वसंगीताची फोडणी देऊन एक सिनेमॅटिक दृश्य साकारतं. या सगळ्या युक्त्या, क्लृप्त्या, साधनांमधून दिग्दर्शक हा पटकथाकाराने लिहिलेल्या दृश्यांचं त्याच्या ‘नजरे’ने दर्शन घडवत असतो, त्याची भूमिका, त्याचा दृष्टिकोन, त्याचं इंटरप्रिटेशन प्रेक्षकाच्या गळी उतरवत असतो. आपण संपूर्ण सिनेमाभर ‘दिग्दर्शकाला काय म्हणायचंय?’ आणि ‘दिग्दर्शकाला काय कळलंय?’ हेच पाहात असतो. 
चैतन्यने ही वाटच पकडलेली नाही. त्याचा सिनेमा शाहिराच्या आयुष्यापासून सुरू होतो. त्याच्या अटकेनंतर तो त्याच्या वकिलाच्या आयुष्यात शिरतो. नंतर तो सरकारी वकिलीणबाईंच्या आयुष्याचं दर्शन घडवतो आणि सर्वात शेवटी तो न्यायाधीशांच्या आयुष्याचा एक तुकडा मांडतो. एका टप्प्यावर तुकडा संपतो, सिनेमा संपतो. आता ही काय सिनेमाची कथा सांगायची पद्धत आहे का? पण तीच या सिनेमाच्या मांडणशैलीशी सुसंगत आहे. यापेक्षा काहीही वेगळं सांगणं म्हणजे पदरचा मसाला भरण्यासारखं आहे. कारण, चैतन्यने तशी मांडणीच केलेली नाही. त्याने सिनेमातला आशय गडद, गहिरा करण्यासाठी कॅमेरा मूव्हमेंट, नाट्यमय संवाद, नाट्यमय संवादशैली, दृश्यांचे छोटे छोटे तुकडे पाडणं, यांसारखे कोणतेही सिनेमॅटिक प्लॉय वापरलेले नाहीत. त्याच्या सिनेमातला प्रत्येक प्रसंग हा स्थिर कॅमेऱ्याने, फोटो टिपावा, तसा प्रदीर्घ दृश्यांमध्ये टिपलेला आहे. हा कॅमेरा कोणत्याही व्यक्तिरेखेच्या प्रेमात नाही. कोणतीही इथे मुख्य व्यक्तिरेखा नाही. त्यामुळे तो कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ करण्याइतक्या इंटिमेट अंतरावर जात नाही. तो दूरस्थपणेच सगळं टिपतो. त्यात खटकेबाज संवाद नाहीत, अभिनयाचा गंध नसलेली माणसं त्यांचं आयुष्य कॅमेऱ्यासमोर जगतायत, असंच वाटत राहतं. कोर्टात कायद्याची क्लिष्ट कलमं इथे सलग इंग्रजीत वाचली जातात. वकील व्होराच्या घरातली सगळी माणसं गुजराती बोलतात. व्होरा सगळ्यांशी हिंदीत बोलतो. या सिनेमाची एकच एक भाषाही नाही. एका अर्थी कोर्टाच्या कामकाजाचंच हे एक रूपक आहे. एखाद्या बलात्कारितेची कैफियत ऐकून कधी कोर्ट भावविवश होत नाही, एखाद्या नराधमाच्या नरडीचा घोट घ्यावा, असं काही कोर्टाला वाटत नाही. ते कोरडेपणाने पुरावे पाहतं आणि त्या आधारावर न्याय करतं. न्यायालयाला पुराव्याशी मतलब; ते भावनेने कशातही गुंतत नाही. 
अरेच्चा, हे तर फारच सोपं आहे की काम! कॅमेरा एका ठिकाणी ठेवायचा, समोर प्रसंग घडवायचा. संपला खेळ. असं सिनेमाकलेबाबत अनभिज्ञ असलेल्या कोणालाही वाटू शकतं. पण, हे अत्यंत अवघड काम आहे. सिनेमाच्या आशयद्रव्यावर, कलावंतांवर आणि स्वत:च्या क्षमतांवर पूर्ण विश्वास असल्याखेरीज आणि आपल्या माध्यमावर पूर्ण पकड असल्याखेरीज हे शिवधनुष्य पेलणं शक्यच नव्हतं. चैतन्यने इतक्या लहान वयात ही प्रगल्भता कोठून आणली असावी, असा प्रश्न पडतो. पण, हा मुलगा काही वेगळाच आहे. तो या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या सिनेमाकडेही एक प्रोजेक्ट म्हणून पाहतो. वयाच्या १९व्या वर्षापासून तो असे प्रकल्प करतो आहे. कधी नाटक, कधी शॉर्ट फिल्म, कधी डॉक्युमेंटरी. सगळ्यांचे विषय वेगवेगळे, अॅप्रोच वेगवेगळा. एक संपला की दुसऱ्याचं काम सुरू. त्यासाठी सखोल संशोधन. वर्षभर संशोधन केल्यानंतर त्याने हे स्कि्रप्ट लिहिलं आहे. म्हणूनच त्याच्या भावविश्वाशी जराही संबंध नसलेल्या कोर्टाच्या आणि शाहिरी जलशांच्या वातावरणात वावरणारा इतका अस्सल सिनेमा तो बनवू शकला आहे. अनेक देशांमध्ये शिकलेल्या आणि सिंगापूरचा नागरिक असलेल्या विवेक गोम्बर या त्याच्या निर्मात्यानेही त्याच्या गुणवत्तेवर एवढा विश्वास ठेवला आणि स्वत:ची निर्मिती असूनही रीतसर ऑडिशन देऊन या सिनेमात एक रोल मिळवला आहे. आपल्याला गुंतवण्यासाठी कोणताही गळ न टाकणारा हा सिनेमा या तटस्थ प्रगल्भतेतूनच अखेरीस प्रेक्षकाला गुंतवून घेतो आणि सतत न्यायाधीशाच्या भूमिकेत वावरणाऱ्या आपल्या समाजातल्या प्रत्येकाला एक चपराक देतो. 
मराठी सिनेमा खूप आशयसंपन्न झाला आहे, असं आजकाल खूप कानावर येतं. प्रेक्षकांच्या प्रगल्भतेचेही गोडवे गायले जातात. ‘कोर्ट’च्या रूपाने या प्रेक्षकाची विविध अर्थांनी परीक्षा घेणारा सिनेमा आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या सिनेमाने खूप पुरस्कार मिळवले आहेत, कारण, त्या स्तरावरच्या प्रेक्षकाला अशा तटस्थ सिनेमाभाषेचा सराव आहे. भारतात मात्र असे प्रयोग फारच कमी प्रमाणात होतात. म्हणूनच या सिनेमाला एवढा मोठा पुरस्कार देताना ज्युरींनी चित्रपटकारांपेक्षा देशातल्या वेगाने चित्रसाक्षर होत चाललेल्या प्रेक्षकांवर अधिक विश्वास टाकलेला दिसतो. त्यांच्याप्रमाणेच डोकं फिरलेले प्रेक्षक या सिनेमाला लाभले, तरच हा विश्वास सार्थ ठरेल. 

‘‘फोन अशासाठी केला होता’’

मुजावरांचा फोन कधीही यायचा...
ते ‘‘हॅलो, मुजावर बोलतोय’’नंतर फोन योग्य नंबरला लागलाय का, याचीही खातरजमा न करता थेट ‘‘फोन अशासाठी केला होता’’ किंवा ‘‘फोन यासाठी केला होता’’ असं म्हणून बोलायला सुरुवात करायचे आणि थेट मुद्यावर यायचे. त्यांचा फोन म्हणजे, ते बोलायचे आणि आपण ऐकायचं; लाइन कट झालेली नाही, हे त्यांना कळत राहावं, इतपत अधूनमधून हुंकार, हो का, बरंबरं, अच्छा, अरेच्चा, वगैरे उद्गार काढत राहिलं म्हणजे बास! अर्थात, साक्षात मुजावर समोर बोलत असताना त्यांच्यापुढे तोंड उघडण्याचा गाढवपण कोण, कशाला करणार?
नव्वद टक्के वेळा त्यांचा फोन एकाच कारणासाठी असायचा. त्यांनी लिहिलेल्या, वाचलेल्या किंवा आपण लिहिलेल्या, आपल्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या एखाद्या सिनेमाविषयक बातमीच्या, पत्राच्या, लेखाच्या अनुषंगाने त्यांना काहीतरी आठवलेलं असायचं किंवा त्या मजकुरात काहीतरी गफलत झालेली असायची. आठवलेला किस्सा सांगण्यासाठी किंवा ती चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांचा फोन असायचा. अत्यंत रसाळ शैलीत, कोल्हापुरी लहेजात, मधून मधून ठसकेबाज हसत ते किस्सा सांगायचे. चूक दुरुस्त करतानाही त्यांचा आव पंतोजी टाइप ढुढ्ढाचार्याचा नसायचा. ‘तुम्ही (किंवा त्यांनी) चांगलं लिहिलंय ते, पण ही एक जराशी गफलत झालीये,’ असाच त्यांचा सौम्य, समजावणीचा सूर असायचा. आपला शहाणपणा, व्यासंग, ज्ञान वगैरे दाखवून समोरच्याला गारद करण्याचा त्यांचा हेतू नसायचा, तर आपल्या कॉमन जिव्हाळ्याच्या विषयाच्या मांडणीत काही त्रुटी राहू नयेत, एवढाच त्यांचा प्रयत्न असायचा. मुजावरांना हिंदी-मराठी सिनेमाचा माहितीकोश म्हटलं का जातं, ते त्यांच्या पाच मिनिटांच्या फोनवरूनही कळायचं. भारतीय सिनेमाच्या अगदी सुरुवातीपासूनचे अनेक संदर्भ त्यांना सनावळीसह मुखोद्गत होते आणि ते घोकंपट्टी करून पाठ केलेले नव्हते. कारण, सिनेमा हा त्यांच्या औपचारिक ‘अभ्यासा’चा विषय नव्हता, अनौपचारिक जिव्हाळ्याचा आणि कुतूहलाचा विषय होता, मुख्य म्हणजे अतीव प्रेमाचा विषय होता. ते शरीराने आजच्या काळात वावरत होते खरे; पण, वयोमानानुसार अधू झालेल्या त्यांच्या डोळ्यांना जे जग दिसायचं, ते रंगीत कमी आणि कृष्णधवल अधिक होतं... त्यांच्या काळातल्या सिनेमाचं जग. ते जणू त्याच जगात वावरत असायचे. त्या काळातल्या कलावंत-तंत्रज्ञांच्या गराड्यातून अधून-मधून बाहेर येऊन आपल्याशी बोलायचे. 
मुजावर चित्रपट समीक्षक नव्हते. तेवढ्या अंतरावरून त्यांना सिनेमाकडे पाहता आलं असतं की नाही, कोण जाणे! एकेकाळी शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या आगामी सिनेमाची धडधडत्या हृदयाने वाट पाहात असलेल्या सिनेमावेड्या तरुण मुलाचं मन त्यांच्या शरीरात सतत जिवंत होतं. थिएटरच्या अंधारामध्ये विरघळून जायचं, पडद्यावरच्या प्रतिमांनी मनाचे अंधारे कोपरे उजळवून टाकायचे आणि मग तीच झिंग घेऊन वास्तव आयुष्यात वावरायचं, असा त्या काळातल्या सिनेमावेड्यांचा परिपाठ होता. मुजावरांचा पिंड तोच होता, पण ते निव्वळ चाहता बनण्याच्या पुढे गेले. चित्रपटविषयक लेखनाच्या माध्यमातून त्यांनी या तारेतारकांच्या जगात प्रवेश मिळवला. तो काळ छापील माध्यमांच्या चलतीचा होता. चित्रपटांच्या ग्लॅमरस प्रसिद्धीसाठी साप्ताहिकं, मासिकांशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे, सिनेपत्रकारांना सिनेसृष्टीत मानाचं स्थान होतं. उपयुक्ततेला महत्त्व देणाऱ्या या कागदी फुलांच्या दुनियेत मुजावरांनी अनेक मान्यवर कलावंतांचा स्नेह कमावला. त्यांच्याशी असलेल्या जवळीकीचा शोबाज बाजार न मांडता त्यांनी ‘आतली बातमी’ वाचकांपर्यंत अधिकाराने पोहोचवली. या व्यवसायातल्या मैत्रीमध्ये एक अंतर राखणं अनुस्यूत असतं. ते भान भल्याभल्यांना राहात नाही आणि मग गोट तरी निर्माण होतात किंवा शत्रुत्वाला तरी चालना मिळते. मुजावर सदैव या सगळ्यापासून दूर राहिले. अनेक ज्येष्ठ कलावंतांच्या प्रदीर्घ मुलाखतींमधून त्यांनी प्रचंड संदर्भसाधनं निर्माण केली. रसरंग आणि चित्रानंदचे- खासकरून दिवाळीचे विशेषांक ही तर मेजवानीच असायची. हे सगळे संदर्भ त्यांना कुठे मांडून ठेवावे लागले नाहीत, त्यांच्या गरजेप्रमाणे ते त्यांना सापडत जायचे... त्यांच्याच डोक्यात. हे संदर्भ इतरांनाही मुक्तहस्ते उपलब्ध असायचे. म्हणूनच तर शिरीष कणेकरांसारख्या पत्रकाराने असं सांगून टाकलं होतं की, मुजावर नावाच्या महासागरात लोटा बुडवून तेवढ्या  पाण्यावर माहितगार म्हणून मिरवता येतं. 
आपल्याकडच्या इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे सिनेमाच्या क्षेत्रातही दस्तावेज ठेवण्याच्या बाबतीत भोंगळपणा आहे. विश्वासार्ह ग्रथित इतिहासाची तर वानवाच आहे. अशावेळी वेगवेगळ्या कलावंत-तंत्रज्ञांच्या मुलाखतींमधून मिळालेल्या माहितीचा ताळेबंद मांडून त्यातून त्यातल्या त्यात निकं सत्त्व पाखडून घेण्याचा किचकट उपक्रम मुजावरांनी आयुष्यभर केला. त्यांच्याकडे सर्वच फिल्मी पत्रकारांप्रमाणे अनेक गावगप्पांचीही नोंद होती. त्यांची खासगीत चर्चाही व्हायची. पण, लेखनात त्यांनी सहसा अशा गॉसिपचा, अधिकृत माहिती म्हणून उल्लेख केला नाही. जिथे शक्य होतं तिथे माहिती कोणी दिली हे सांगितलं; जिथे ते शक्य नव्हतं, तिथे त्यांनी नावं घेणं टाळलं. त्यांना या सगळ्या गोष्टींच्या मसालेदारपणापेक्षा त्यातल्या माहितीत अधिक रस असायचा. ती नोंद बहुतेक वेळा कोरडी ठाक असायची.
त्यामुळेच की काय, मुजावर कधीही शैलीदार लेखक म्हणून प्रसिद्ध झाले नाहीत. क्रिकेट आणि सिनेमा या विषयांवर  शैली असली तरच लिहिता येतं (म्हणजे शैलीच्या झालरीखाली अज्ञान झाकता येतं) असा एक समज आजही रूढ आहे. तो मुजावरांनी मोडीत काढला. त्यांना लोकप्रिय होण्यासाठी शैलीची गरज पडली नाही. त्यांच्याकडे असलेले संदर्भ आणि माहितीच इतकी जबरदस्त होती की त्यांची अनलंकारिक पण आंतरिक जिव्हाळ्याचा स्पर्श असलेली शब्दकळाही वाचकाचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेशी होती. मुजावरांचं लिखाण ओबडधोबड असतं, संस्कारित नसतं, अशी नाकं मुरडणाऱ्यांनाही त्यांची संदर्भसमृद्धता झक्कत मान्य करायला लागायची आणि त्यांच्या त्या ‘जंत्री’तून संदर्भ उचलून, नकलून आपलं लेखन सजवून नवा माल म्हणून खपवावं लागायचं. त्याबद्दल कधी त्यांनी तक्रारही केली नाही. तो त्यांचा स्वभावच नव्हता. दुसरं म्हणजे त्यांच्यापाशी तेवढा वेळ नव्हता. त्यांना सतत काहीतरी सुचायचं, आठवायचं, जुन्या माहितीची नवी संगती लागायची आणि त्यातून लेख आकार घ्यायचा. कधी पुस्तकांच्या कल्पना जन्म घ्यायच्या. वयाला आणि प्रकृतीला न साजणाऱ्या झपाट्याने ते हे उपक्रम हातावेगळे करायचे.
‘आय ईट सिनेमा, आय ड्रिंक सिनेमा, आय ड्रीम ऑफ सिनेमा’ असं राज कपूर म्हणाला होता. त्याच्याइतकंच ते लागू असलेली इतर माणसं शोधली असती, तर त्यात इसाक मुजावरांचं नाव फारच वरच्या क्रमांकावर आलं असतं. 
सिनेमाच्या जगापलीकडे त्यांचं काही जग आहे का, हे फार कमीजणांना ठाऊक असेल. इतरांच्या बाबतीतही ते फारशा बिनकामाच्या चौकशा करत नसत. त्यांच्या फोनवर म्हणूनच कधीही कौटुंबिक संदर्भ यायचे नाहीत... शेवटची काही वर्षं वगळता. तेव्हा हळुहळू प्रकृतीच्या तक्रारींपासून पत्नीच्या आजारापर्यंत काही उल्लेख मोघमात यायला लागले होते. पत्नीच्या निधनानंतर ते बऱ्यापैकी एकटे पडले होते. शरीरही थकलं होतं. ‘फोन अशासाठी केला होता’नंतर उत्साही आवाजात येणाऱ्या किश्शाच्या जागी काही व्यावहारिक विचारणा येऊ लागल्या होत्या. संयुक्तपणे काही उपक्रम करूयात, तुम्हाला हवं तर लेखनिक देतो, वगैरे उभारी देण्याच्या प्रयत्नांच्या पलीकडे ते गेले होते. 
आता ते त्याच्याही पलीकडे गेले आहेत...
पण, अलीकडे बरंच काही आहे. 
त्यांचं कोणतंही पुस्तक काढून कोणतंही पान उलगडलं, तर मुजावरांच्या उत्साही शब्दांमध्ये किस्सा ऐकू येऊ लागतो... 
‘फोन अशासाठी केला होता’ ही ओळ ऐकू आली नाही, म्हणून काय झालं?