Thursday, March 17, 2011

खून का खून (तरकीब)


तरकीब'मध्ये खून कोण करतं माहितीये?...
छे, छे! या प्रश्नाचं उत्तर इथे मिळणार नाहीये. पण समजा, ते आधीच मिळालं तर `तरकीब' पाहू इच्छिणाऱया प्रेक्षकाच्या उत्साहावर बोळा फिरलाच म्हणून समजा. एक किंवा अनेक खून, संशयाची भिरभिरती सुई आणि कळसाध्यायाला खरा खुनी कोण, याचं धक्कादायक रहस्योद्घाटन अशी रचना असलेल्या सगळ्या सिनेमांची हीच गोची असते. शेवटचा धक्का चुकून आधीच समजला तर सिनेमा पाहण्याचं प्रयोजनच उतर नाही. म्हणूनच आपला कुणावर राग असले, तर त्या व्यक्तीनं अशा सिनेमाची तिकिटं काढली की खुनी सांगून मोकळं व्हावं. उत्तम दर्जाचा मानसिक त्रास होईल, याची हमखास गॅरंटी.
`तरकीब' मध्येही खून आहे, संशयित आहेत आणि रहस्योद्घाटनाचा धक्काही आहे; पण अंमळ वेगळ्या प्रकारचा! `हात्तिच्या, तीन तास डोंगर पोखरून हा उंदीर निघाला होय', असे उद्गार प्रेक्षकाला काढायला लावणारा. एक गोष्ट मात्र मानायला हवी. खुनाचाच खून पाडणाऱया या सिनेमात या पचपचीत शेवटापेक्षा वेगळं काही घडेल, अशी अपेक्षा लेखक मोइनुद्दिन आणि दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांनी संपूर्ण सिनेमात कुठेच निर्माण केलेली नाही.
इथे खून होतो रोशनीचा (तब्बू) हात-पाय शिर तोडलेल्या स्थितीतला तिचा मृतदेह एका तलावात सापडतो. पोलिसांना मृतदेहाची ओळखही पटवता येत नही. ते फाइल बंद करतात. महिला संघटनांच्या दबावामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला जातो. सीबीआयचा उच्चधिकारी जसराज पटेल (नाना पाटेकर) आणि त्याचा सहायक गंगाराम (टिकू तल्सानिया) ही जोडगोळी खुनाचा तपास करते.
मृतदेह सापडण्यापासून सुरू होणारा हा सिनेमा पुढे जसराजच्या तपासात फ्लॅशबॅक तंत्रानं उलगडतो.
इथे पहिला संशयित आहे रोशनीचा प्रियकर कॅप्टन डॉक्टर अजित वर्मा (मिलिंद सोमण). लष्करी इस्पितळात नर्स असलेल्या रोशनीशी त्याचं प्रेमप्रकरण लवकरच लग्नात रुपांतरित होणार असतं. रोशनी ही खुशखबर घेऊन घरी जाते; पण तिथे तिच्यापुढे वेगळंच ताट मांडून ठेवलेलं असतं. लग्नाच्या चार मुलींचा भार डोक्यावर असलेले तिचे वडील (विनोद नागपाल) रोशनीला एकमेव `कमावता मुलगा' म्हणूनच पाहत असतात. तिला स्वत:ला लग्न करायचं असेल, हा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. त्यामुळे ते कॅप्टन अजितचा फोटो पाहिल्यावर हे रोशनीनं धाकटय़ा मुलीसाठी आणलेलं स्थळ आहे, अशी समजून करून घेतात. ही गैरसमजूत दूर न करता त्यांच्या सुखासाठी रोशनी आपल्या प्रेमाचा त्याग करायला तयार होते आणि कॅप्टन अजितला आपल्या बहिणीशी लग्न करण्याची गळ घालते. इतका मूर्ख `त्याग' करायला कॅप्टन अजित अर्थातच तयार होत नाही. रोशनी त्याच्याशी संबंध तोडते. त्याला पूर्णपणे तोडण्यासाठी डॉक्टर कमल डोग्रा (आशुतोष राणा) याच्याशी जवळिकीचं नाटक करते. गुलहौशी डॉ. डोग्राला रोशनीच्या या कृतक जवळिकीचं कारण ठाऊक असतं; पण तो आम खानेसे मतलब ठेवणारा माणूस असतो. आता त्याला त्या प्रकरणात आम खायला मिळत नाहीत, हा भाग वेगळा. उलट रोशनीमुळे त्याची लष्करातून हकालपट्टी होते.
रोशनीने प्रियकर बदलल्यामुळे ती चालू आहे, अशा समजुतीनं इस्पितळाचा कँटीन कॉन्ट्रक्टर बिशन नंदा (अखिलेंद्र मिश्रा) एकदा तिला छेडतो आणि कॅप्टन अजितकडून मार खाऊन अपमानित होतो.
तणावग्रस्त रोशनी नोकरीचा राजीनामा देऊन भोपाळमध्ये मोहन मुलतानी (आदित्य पंचोली) या धनाढय़ विधुराच्या घरी मुलांच्या गव्हर्नेसची नोकरी स्वीकारते. तिथे तोही तिच्या प्रेमात पडतो. रोशनीच्या नकरानं अस्वस्थ झालेला कॅप्टन अजित भोपाळला येऊन मोहनशी झगडा करतो, तेव्हा रोशनी ही नोकरीही सोडते आणि आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेते. भोपाळला रेल्वेत बसल्यानंतर ती गायब होते आणि त्यानंतर सापडतो तो तिचा मृतदेहच...
... मुळात मृतदेहाची ओळख पटलेली नसताना पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास (मध्ये सीआयडीचा स्टॉप न घेता) थेट सीबीआयकडे जातो, हा प्रकारच हास्यास्पद आहे. कथानकाच्या सोयीसाठी तो गोड मानून घेतला तरी आधी पोलिसांच्या आणि नंतर जसराजच्या तपासाची सगळी पद्धतीही विलक्षण उफराटी आणि तर्कविसंगत वाटत राहते.
जसराज मृतदेहाची ओळख पटवून नंतर वेगवेगळ्या संशयितांशी बोलतो तेव्हा ही कहाणी त्यांच्या आठवणीतून उलगडत जाते. अशा प्रकारच्या सिनेमात प्रत्येक संशयिताच्या बोलण्यातून, कृतीतून काही सांगण्यातून- लपवण्यातून खुनासंबंधीचे धागेदोरे जुळत जायला हवेत. तसं काही न घकडता इथे एकेक संशयित, अंताक्षरी खेळताना `शिक्षा' चुकवण्यासाठी आपल्या हातातली उशी किंवा तत्सम वस्तू पुढच्याकडे पास करावी, तसा सपाट पद्धतीनं संशयाच्या सुईचा आपल्याकडील रोख दुसऱयाकडे वळवतो. दुसराही तेच करतो. त्यातून शेवटी होणाऱया अत्यंत भिकार अशा रहस्योद्घाटनामुळंतर प्रेक्षकाची फसवणूकच होते; कारण जसराजच संपूर्ण तपासाचा खुनी सापडण्याशी थेट संबंध नाही. तो सगळा प्रकार केवळ रोशनीची दर्दनाक कहाणी सांगण्यासाठी सिनेमात येतो. बरं या कहाणीतही काही दम नाही. रोशनीच्या वडिलांच्या गैरसमजात पुढच्या तिच्या शोकांतिकेची बीजं आहेत. हा कथाभागच अत्यंत अविश्वसनीय आहे. त्यातून पुढचा घटनाक्रम केवळ रोशनीच्या अव्यवहारी हट्टातून घडत असल्यानं ती प्रेक्षकाची सहानुभूती गमावते.
इथे सगळ्यात महत्त्वाची आहे, ती खुनाची उकल. ती अत्यंत चतुराईनं केल्याबद्दल जो- तो जसराजची तारीफ करतो हे तर संतापजनकच आहे. कारण, पोलिसी तपासाचं (अगदी चार आणे मालेतल्या रहस्यकथा वाचून किंवा त्याच मोलाच्या टीव्हीवरच्या रहस्यमय मालिका पाहून मिळालेलं असेल तरी) प्राथमिक ज्ञान असलेल्या कुणाही माणसाला भोंगळ वाटेल, असा हा तपास आहे.
रोशनीचा मृतदेह जेथे सापडलेला असतो, त्या तलावावर जसराज आणि गंगाराम सुरुवातीलाच जेव्हा जातात, तेव्हा तिथला आंधळा दुकानदार नैनसुख (रघुवीर यादव) अचानक दुकान बंद करून जातो. मध्ये अख्खा सिनेमा घडल्यानंतर शेवटाला पुन्हा या प्रकाराची पुनरावृत्ती घडते. त्यावेळी जसराजचं डोकं चालतं आणि मग त्यानं केलेल्या तपासातून खुनी माणसाचा छडा लागतो. हेच जसराजनं (त्याची कथित बुद्धिमत्ता गृहीत धरल्यास) पहिल्याच वेळी करणं अपेक्षित आहे. ते तो का करत नाही, याचं कारण `तसं झालं असतं तर मधला कथाभागच घडू शकला नसता', एवढंच आहे. शिवाय, मृतदेहाच्या स्थितीवरून मृत्यूची साधारण वेळ निश्चित करून त्या काळात प्रत्येक संशयित काय करीत होता, याची कसून चौकशी करण्याचा सोपा मार्गही जसराज का अवलंबत नाही, यालाही उत्तर नाही.
रहस्यपटानं प्रेक्षकाला गुंगवून ठेवण्यासाठी त्याच्या बुद्धीला चालना देणं आवश्यक असतं. लेखक- दिग्दर्शकांनी मिळून प्रेक्षकाला पात्रांबद्दलच्या संशयाच्या भोवऱयात गटांगळ्या खायला लावल्या, त्याला काही तर्क करायला लावले, ते वारंवार बदलायला लावले, तर असा सिनेमा पाहण्याची रंगत वाढत जाते. प्रेक्षकाचे सगळे तर्क मोडीत काढणारा शेवट घडवून प्रेक्षकांचा असा कात्रज झाला, तरच प्रेक्षकाला `मर्डर मिस्टरी'चा खरा आनंद मिळतो. जेवढी फसवणूक घोर तेवढा आनंद अधिक.
`तरकीब'मध्ये असं काहीच घडत नाही. त्यात खुन्यानं अधूनमधून जसराजच्याही खुनाचा प्रयत्न करणं, तर निव्वळ बिनडोकपणाचं भासतं. अर्थात रोशनीचा खूनही ज्या बिनडोकपणे होतो, ते पाहता हेही अनपेक्षित नाहीच.
एरवी असल्या सिनेमांमध्ये संपूर्ण सिनेमात कुठेच न दिसणारा भलताच एखादा माणूस एकदम शेवटी खुनी म्हणून आणतात. (ही फसवणूक मात्र वाईट.)
तेवढा भंपकपणा `तरकीब' करत नाही, हीच जमेची बाजू.
नाना पाटेकरचा सुसह्य, समंजस वावर हीसुद्धा `तरकीब'ची जमेची बाजू आहे. खास नाना पद्धतीचे व्यावहारिक शहाणपणयुक्त खुमासदार अल्पाक्षरी संवाद (वन लायनर्स) सिनेमात भरपूर आहेत. तिथे नाना हुकमी दाद- हशा- टाळ्या वसूल करतो. भडक भावदर्शन, टिपेच्या आवाजातला आरडाओरडा वगैरेही या भूमिकेत नाही. बाकी सीबीआय अधिकाऱयाचा करडा आब-रुबाब नानानं लीलया पेलला आहे. तब्बू सिनेमाच्या केंद्रस्थानी असली तरी तिच्या भूमिकेचा पाया कच्चा आहे. तिच्या जिवलग मैत्रिणीच्या भूमिकेत शिल्पा शेट्टीला दोन नाचांपलीकडे वाव नाही. अन्य मंडळींमध्ये चार मुलींच्या बापाची
असहाय्यता जिवंत करणारा विनोद नागपाल आणि स्क्रीन प्रेझेन्सला प्रामाणिक भावदर्शनाची जोड देणारा मिलिंद सोमण लक्षात राहतात. मिलिंदचं हे रुपेरी पडद्यावरचं पदार्पण बऱयापैकी आश्वासक आहे. रघुवीर यादवला चिमूटभर भूमिकेत वाया घालवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न रघुवीरनं त्याच्या वाटय़ाच्या दोनचारच प्रसंगात नैसर्गिक गोडव्याचा भावविष्कार करून हाणून पाडला आहे.
रहस्योद्घाटनाच्या भानगडीमुळे अशा सिनेमांना एकच सिनेमा एकाहून अधिक वेळा पाहणारा प्रेक्षकवर्ग (रिपोट ऑडियन्स) मिळत नाही. विजय आनंदनं जबरदस्त ट्रीटमेंटला अफलातून संगीताची जोड देऊन रहस्यपटांनाही रिपीट ऑडियन्स मिळवून दिला होता. या सिनेमाची संगीताची बाजूही तेवढी बळकट नाही. `दुपट्टेका पल्लू किधर का किधर है' हे शिल्पा शेट्टीचं मादक नृत्यगीत, `मेरी आँखो ने चुना है तुझको' हे गोड चालीचं (मिलिंद सोमणला जगजीत सिंगचा आवाज देणारं) सुरेख प्रेमगीत आणि कव्वाली ही गाणी गीतकार निदा फाजली आणि संगीतकार आदेश श्रीवास्तव यांनी उत्तमच दिली आहेत. पण अनवट लोकेशन्सवर छायालेखक मजहर कामरान यांनी अचूक मूड टिपलेलं `मेरी आँखो ने चुना है' हे गाणं वगळता गाण्यांच्या चित्रीकरणात खास दम नाही. आणि बाकीची बहुतेक गाणी कथानकात उपरी आहेत.
एकूणात कुणावर राग असेल तर त्याला `तरकीब'चा शेवट सांगू नका. त्यापेक्षा त्याला `तरकीब'ची तिकिटं काढून द्या. म्हणजे तो (पक्षी शेवट) त्याचा त्यालाच पाहावा लागेल. ती शिक्षा अधिक त्रासदायक आणि परिणामकारक ठरेल.


(महाराष्ट्र टाइम्स) 

No comments:

Post a Comment