Tuesday, March 8, 2011

रिअॅलिटी की शो?


स्पर्धेतला एकजण 'बरा' परफॉर्मन्स देतो... महापरीक्षक त्याच्यावर खूष होऊन त्याला आपल्या निमिर्तीमध्ये संधी देण्याची घोषणा करतात... तो आनंदाश्चर्याने चकित होतो...

... नंतर कळतं की हा मुलगा याआधीच 'त्या' निमिर्तीसाठी सिलेक्ट झालेला आहे... ते चकित बिकित होणं हा निव्वळ अभिनय होता...

............

' डान्स शो'च्या अंतिम फेरीमध्ये सेलिब्रिटींची सुमार जोडी जिंकते, बरी जोडी हरते...

...नंतर कळतं की 'आम्ही जिंकणार असू, तरच स्पधेर्त येऊ' असं पहिल्या जोडीनं आधीच बजावलेलं असतं आणि त्या जोडीला जिंकण्याबद्दल जेवढं बक्षीस मिळालेलं असतं, त्याच्या दुप्पट पैसे हरणाऱ्या जोडीला हरल्याबद्दल मिळालेले असतात.

महास्पधेर्च्या महाअंतिम फेरीमध्ये गायकांना (म्हणे) ऐनवेळची गाणी दिली जातात... रिहर्सल करूनही सलग सुरात गाण्याइतकी तयारी नसलेले तरूण गायक ऐनवेळची गाणी तयारीने सादर करताना दिसतात...

... तेव्हाच कळतं की हे सगळं ठरवून, रिहर्स करून झालंय... ऐनवेळचं काही नाही.

अशाच स्पधेर्च्या 'लाइव्ह' अंतिम फेरीतलं गाणं टीव्हीवर नीट बघितलं तर दिसतं की गायिकेचे ओठ वेगळंच गायले आहेत आणि कानावर वेगळंच पडलंय... म्हणजे आधीच ध्वनीमुदित केलेल्या गाण्यावर हे लेकाचे ओठ हलवतायत... अर्थात ज्या देशाच्या महागायिकाही भर स्टेडियममध्ये लाइव्ह प्रोग्राम म्हणून सलग २०-३० मिनिटांच्या रेकॉडेर्ड गाण्यांवर लिपसिंक करून वेळ मारून नेतात, तिथे याबद्दल आश्चर्य कशाला वाटायला हवं!

प्रेक्षकांच्या एसेमेसेसनी अंतिम फेरीचा निकाल लागतो म्हणे! कसा? प्रत्यक्षातला कार्यक्रम सहा वाजता सुरू झाला असेल, तर टीव्हीवर तो सात वाजता सुरू होतो. डिफर्ड लाइव्ह म्हणतात त्याला! आता प्रत्यक्ष कार्यक्रमात समजा नऊ वाजता एसेमेस स्वीकारणं बंद केलं असेल, तर ते टीव्हीवर दिसतं १० वाजता. नऊपर्यंत आलेल्या एसेमेसेसवर निकाल लागलेला असतो, तर मग नऊ ते १० या वेळात प्रेक्षकांनी केलेल्या एसेमेसेसचं होतं काय?

एका कार्यक्रमात प्रेक्षकांच्या एसेमेसेसचं वजन ५० टक्के आणि महापरीक्षकाचं मत ५० टक्के मोलाचं... म्हणजेच गणिताच्या भाषेत लाखो प्रेक्षकांच्या मताची किंमत एक्झॅक्टली त्या एका माणसाच्या मताइतकीच. म्हणजे पब्लिक लाखोंच्या संख्येने एसेमेस पाठवणार आणि खरा निकाल मात्र तोच लावणार!

सगळ्या देशात कलावंतांचं पेव फुटलंय म्हणे! घरटी एक किंवा दोन कलावंत पैदा होतायत. इतके गायक, इतक्या गायिका. त्यांना तथाकथित प्रकाशझोतात आणणारे एवढे कार्यक्रम... एकेका कार्यक्रमाच्या वेळेला लोक हिस्टेरिया झाल्यासारखे ज्यांचा उदोउदो करतात, त्या महान कलावंतांबद्दल १५ दिवसांनंतर कुठेच काही ऐकू येत नाही... कधीच.

मग एवढे कलावंत जन्माला येतात कसे?

अहो, जगातला प्रत्येक माणूस बाथरूममध्ये गाणं म्हणतोच. टीव्ही येईपर्यंत माणसांना भान होतं, आपलं गाणं बाथरूमच्याच दर्जाचं आहे याचं... आता टीव्ही उकसवतोय, 'अरे, तुमच्यात गाण्याचं 'पोटेन्शियल' आहे, तुम्ही थोर गायक बनू शकता!... अरे, तुमच्या नाचात काय ग्रेस आहे. तुम्हीही नाचू शकता...'

मग कधी शाळेच्या गॅदरिंगमध्येही भाग न घेतलेली माणसं पिसाटल्यासारखी आपली 'कला' दाखवू लागतात. घरोघरी नळासारखं बदाबदा मनोरंजन ओतणाऱ्या त्या चौकोनी डबड्यात आपली छबी झळकावी म्हणून तरणीताठी आई आपल्या शाळकरी मुलाबरोबर प्रेयसी बनून नाचू लागते, पाच-सात वर्षांच्या कोवळ्या पोरी उत्तान लावण्यांवर, आयटम साँग्जवर- त्यांच्या आयांनीच शिकवलेले- अश्ाील हावभाव सराईतपणे करून दाखवतात. अख्खीच्या अख्खी फॅमिली मिळून नाचकाम करते. ऐंशीची वृद्धा ठुमके लगावते आणि पंच्याऐंशीचा म्हातारा सुनेच्या नाचाला रासवट दाद देत साद घालतो, 'छम्मा छम्मा... रे छम्मा छम्मा!'

टीव्हीवरच्या बटबटीत कथामालिकांवर उतारा म्हणून ही रिअॅलिटी आली म्हणे! पण, नुसतं कुणीतरी येऊन काहीतरी सादर करतंय, ते जाणणारं कुणी त्याचं परीक्षण करतंय आणि त्यानुसार निकाल लागतोय, असलं पचपचीत काम कोण कशाला पाहील? मग, त्यात ड्रामा यायला लागला, 'रियल लाइफ' ड्रामा म्हणे! डेंजर झोन काय नि कॉल बॅक काय नि काय काय! मग, परीक्षक लुटुपुटूची भांडणं करायला लागले, स्पर्धक मेकओव्हर करायला लागले. प्रेक्षकांचा सहभाग हवा म्हणून एसेमेसेसची आयडिया निघाली आणि देशभर 'युद्धं आणि महायुद्धां'चा माहौल सुरू झाला. कोण आपल्या प्रांताचा, जातीचा, राज्याचा म्हणून त्याला एसेमेस करा आणि अस्मितेचं प्रदर्शन मांडा. आपल्याकडे एकंदरच अस्मितेच्या प्रदर्शनाचा उत्साह फार. त्यात कला मेली, तर मरू द्या. मग, स्पर्धक आपल्या गावाचं नाव सांगून मतांची भीक मागू लागले. सगळ्याच कलांनी आधीपासून 'मायबाप' म्हणून डोक्यावर चढवून ठेवलेला प्रेक्षक आणखी चढेल झाला. कोणत्याही कलेचा आस्वाद घेण्यासाठीही स्वत:ची काही पात्रता लागते, याचं भान किती प्रेक्षकांना असतं?

रिअॅलिटीपासून पळण्यासाठी मनोरंजनाचा, कल्पनारंजनाचा आधार घेण्याची परंपरा आपल्याकडे जुनीच आहे. म्हणूनच तर लोकप्रिय चित्रपटांना पलायनवादी असं विशेषण लागतं. आता आपण रिअॅलिटीपासून पळण्यासाठी आपल्या मनासारखी काल्पनिक 'रिअॅलिटी' घडवू लागलो आहोत? पलायनवादाची ही आणखी पुढची पायरी म्हणायची.

असो.

या सगळ्या गोंधळात एक दिलासा आहे.

टीव्ही पाहणारा प्रेक्षक आणि गाढ झोपलेला माणूस यांच्या मेंदूचा ग्राफ तंतोतंत सारखा असतो म्हणे!

देव करो आणि ही तरी 'रिअॅलिटी' असो.

आता तेवढाच आधार आहे.

 

(महाराष्ट्र टाइम्स)

1 comment:

  1. अगदी मांज्या मनीचे बोललात बगा .

    ReplyDelete