Saturday, June 11, 2011

`सत्या' आडचा भिकू आणि `भिकू' आडचं सत्य (मनोज बाजपेयी)


``हीरो बननेका है तेरे को...? अमिताभ बच्चन बननेका है तेरेको...?''
 `सत्या'मध्ये नायकाला पहिल्या भेटीत भिकू म्हात्रेनं हा सवाल केला तेव्हा पुढे काय होणार याची त्याला सुतराम कल्पना नसणार.
 कारण, `सत्या'मध्ये शीर्षक भूमिका केलेल्या चक्रवर्तीपेक्षा प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला तो भिकू म्हात्रेच. कुठल्याही गावात `दोसौ रुपयेमे `सत्या' देखो' म्हणून ब्लॅकवाल्यानं तिकिटं खपवल्याच ऐकिवात नाही. सर्वत्र `दीडशे-दोनशी रुपयात भिकू म्हात्रे बघा', असंच आवतण देत होते ब्लॅकवाले. `सत्या'चा हीरो मागे राहिला आणि भिकूच स्टार झाला... मनोज बाजपेयीची अमिताभ बच्चनशी तुलना व्हायला सुरुवात झाली.
 कोणत्याही हिंदी सिनेमातल्यासारखं नियतीचं एक वर्तुळ पूर्ण झालं... अमिताभ बच्चन ते अमिताभ बच्चन.
 बिहारच्या बेलवा गावात एका गरीब श्Zतकऱयाच्या पोटी जन्मलेल्या मनोजला अभिनयकला नावाच्या जादूच्या कांडीचा शोध लागला होता तो अमिताभमुळेच अमिताभची `जंजीर' मधली लाजवाब अदाकारी बघून एक अख्खी पिढी भारली गेली होती. त्यातल्या बहुतेकांनी अमिताभच्या फॅनमंडळाचं आजीव सदस्यत्व मिळवण्यात धन्यता मानली. मनोज अमिताभचा चाहता तर झालाच, पण त्याहून जास्त आकर्षिला गेला अभिनयाकडे. एरवी अबोल, अंतर्मुख असलेल्या या शाळकरी मुलाला एकदम साक्षात्कार झाला, की आपणही उसना चेहरा लावून उसन्या भावना सहज व्यक्त करू शकतो, स्वत:च्या शरीरातून इतर कुणाचं तरी अस्तित्व साकारू श्कतो. काही काळापुरतं दुसरंच कुणी तरी होऊन जगू शकतो.
काव्यगायन स्पर्धेत अमिताभच्या वडिलांची डॉ. हरिवंशराय बच्चन यांची कविता सादर करून मनोमनं आपला सभाधीटपणा पारखून घेतला. शाळेतली छुटपुट नाटकं, पाटण्याला केलेलं कॉलेजशिक्षण यातून त्याची अभिनयाची भूक भागेना. ती भागली दिल्लीत बारा वर्षे अर्धपोटी राहून नाटय़कामाठी केल्यावरच.
 त्याच मनोजच्या `सत्या'ची अमिताभ आणि जया बच्चन या दांपत्यानं ट्रायल पाहिली. त्याच्या दुसऱया दिवशी या दोघांशीही जे कोणी फोनवर वा प्रत्यक्ष बोलले त्यांना पहिली पंधरा मिनिटं मनोज बाजपेयी या जबरदस्त अभिनेत्याचं तोंड भरून कौतुक ऐकायला मिळत होतं. फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाच्या त्याच्या तोंडी मनोजचंच नाव होतं. माधुरी दीक्षितही म्हणाली, की बऱयाच दिवसांत भारतीय पडद्यावर एखाद्या नटाची इतकी सशक्त कामगिरी पाहायला मिळाली नव्हती. बारा वर्ष नाटकात आणि पाच वर्ष मुंबईत `घासल्या' नंतर मनोज बाजपेयीला पहिल्यांदाच निश्चित अशी ओळख मिळाली... भिकू म्हात्रे.
 असं काय होतं या भिकूमध्ये? `सत्या'चा नायक सत्या घुमा आणि आतल्या गाठीचा भारणार. सामान्य प्रेक्षकाला त्याच्याशी `आयडेंटिफाय' करणं, शक्य नव्हतं. अमिताभचा असाच थंडगार पण उद्रेकी नायक प्रेक्षकांनी त्या नायकाच्या दृष्टिकोनातून केलेल्या सिनेमांच्या मांडणीमुळं `सत्या'मध्ये मुळात कथानकाला कोणताही `अँगल' देणंच रामगोपाल वर्मानं टाळलं आहे. सत्या हा त्याचा नायक केवळ प्रमुख पात्र आहे. त्याच्या वर्तनाची पक्षपाती कारणमीमांसा किंवा त्याच्या कृतीचं ग्लॅमराईज्ड समर्थन सिनेमात कुठेही नाही. त्यामुळे, नायकावरच्या अन्यायातून प्रेक्षकाच्या कनात निर्माण होमारी सहानुभूती सत्याबद्दल निर्माण होत नाही.
 भिकूलाही रामूनं कुठेही ग्लॅमराईझ केलेलं नाही, अकारण फुटेजही दिलेलं नाही. पण मनोजनं साकारलेल्या `भाई'मध्ये प्रेक्षकांना त्यांच्या आसपासच्या भाइभचा चेहरा दिसला आणि उद्यापर्यंत न दिसलेला, त्या चेहऱयामागचा माणूसही दिसला... बडबडय़ा, आक्रमक, अस्वस्थ आणि हाडामांसाचा माणूस `भाई' लोकांच एकतर उदात्तीकृत किंवा काळंकुट्ट असं एकांगी चित्रणच पडद्यावर पाहिलेल्या प्रेक्षकाला हा अनुभव अनोखाच होता. भिकूचं फटाक्याला घाबरणं, चंदर मेल्यानंतरचं `चिडणं', बाहेर शेर असूनही बायकोपुढे मांजर होणं, सत्याला दुबईला बसवण्याचा मोठेपणा दाखवणं, या छटांनी त्याला प्रेक्षकाच्या जवळ नेलं. इतक्या जवळ नेलं की आजही बहुसंख्य प्रेक्षकांना भिकू माहिती आहे पण तो साकारणारा मनोज बाजपेयी ठाऊक नाही. ते मनोजला भिकू म्हणूनच ओळखतात.
 बिहारच्या खेडय़ातून आलेल्या मुंबईबाहेरच्या माणसाला मुंबईच्या मराठी माणसाची नाळ इतकी परफेक्ट कशी सापडली, हा प्रश्न भल्याभल्यांना पडला होता. त्यातून मनोजची भाईलोकांशी ओळखपाळख आहे, इथपासून मनोज तुरुंगात जाऊन कैद्यांचा अभ्यास करून आला, मनोजनं अरूण गवळीची भेट घेतली, इथपर्यंत बऱयाच कंडय़ा पिकल्या, खरंतर मनोजनं यातलं काहीच केलं नव्हतं.
 ``करायची गरजच काय?'' मनोज विचारतो. ``गुंडगिरी ही एक प्रवृत्ती आहे. मुंबईतला गुंड आणि बिहारमधल्या गुंड यांच्यात बाह्यत: बरेच फरक दिसतील. पण, ते खरवडून पाहाल तर अंतरंग एकच असतं. मला भिकूच्या भूमिकेची आऊटलाइन मिळाल्यावर मी विचार सुरू केला की हा बोलत कसा असेल, चालेल कसा, हसेल कसा, बायकोमुलांशी कसा वागेल, कोणत्या स्थितीत कसा रिऍक्ट होईल, लहानपणी हा कसा असेल? याचं शालेय शिक्षण तरी पूर्ण झालं असेल का? एकदा हा सगळा विचार करत गेलं, त्याचं अंतरंग आत्मसात केलं की बाहेरची सजावट सोपी असते.''

रामूनं आणि `सत्या'च्या लेखकांनी एक प्रयोग केला होता. पटकथेत अनेक प्रसंग अगदी ढोबळ स्वरुपात लिहिले होते. त्यातल्या कलावंतांनी या प्रसंगात नेमकं काय घडवायचंय, ते लक्षात घेऊन प्रसंग `इंप्रोव्हाईज' करायचा होता. प्रत्येक पात्रानं संपूर्ण प्रसंगाचा सिनेमाच्या संदर्भात विचार करून त्यात आपापली भर घातल्यानं हे प्रसंग खुलत गेले. जग्गूच्या खुनानंतर सत्याबरोबर घरी उशीरा पोहोचलेल्या भिकूची त्याच्या बायकोकडून होणारी चंपी आणि हॉटेलमधला चौघांचा `छीपकली'वाला प्रसंग हे असे सर्वांनी मिळून इंप्रोव्हाईज केलेले प्रसंग आहेत. त्यातल्या मनोज- शेफालीचा रागातून रासवट प्रेम व्यक्त करणारा पहिला प्रसंग तर `फर्स्ट टेक ओके टेक' आहे. त्याचा `सेफ्टी' म्हणूनही दुसरा `टेक' घेतला गेलेला नाही.
 एखाद्या जमून आलेल्या सिनेमातलं एखादं पात्र जेव्हा अजरामर होतं तेव्हा ती ते पात्र साकारणाऱया नटासाठी धोक्याची घंटी असते.
 मनोजच्या भिकू म्हात्रेची तुलना जेव्हा अमजद खानच्या गब्बरसिंगशी होऊ लागली तेव्हा त्यातून व्यक्त होणारा सन्मान जेवढा मोठा होता तेवढाच धोकाही वाढला. अमजदखानची ओळख `गब्बरसिंग'च्या पलीकडे कधीच जाऊ शकली नाही. त्याचा गब्बर अजरामर झाला. त्यानं अमजदला अजमरामर केलं पण अमजद खान या अभिनेत्याची पुढची प्रत्येक भूमिका त्या मापात तोलली गेली आणि खुजीच ठरली. जिथेजिथे `गब्बर, गब्बर' म्हणून ओळखला जात असताना एकदा तरी अमजदला वाटलं नसेल, की हा गब्बरचा गलका थांबवून ओरडून सांगावं सगळ्यांना मी गब्बर नाही, मी अमजद खान आहे आणि गब्बरपेक्षा वेगळं माझ्यात खूप काही आहे.
  आज मनोजच्या पुढे तोच धोका उभा ठाकलाय. इथून पुढे मनोजचा प्रत्येक सिनेमा प्रेक्षक भिकू म्हात्रेचा सिनेमा म्हणून पाहायला गेले आणि प्रत्येक भूमिकेत भिकूच शोधायला लागले तर? प्रेक्षकांचं सोड इथे निर्माते दिग्दर्शकही छापाच्या गणपतीच्या शोधात असतात. मनोजलाच कितीतरी निर्मात्यांकडून `कुछ सत्याजैसीही स्टोरी' आणि `कुछ भिकू म्हात्रेजेसीही रोल' अशा किती ऑफर आल्या असतील. आता ते काय करणार?
  ``भिकू म्हात्रे इज डेड फॉर मी'', मनोज ठामपणे सांगतो. ``ज्या दिवशी मी `सत्या'चा शेवटचा शॉट दिला त्याच दिवशी भिकू माझ्यापुरता मरून गेला त्यानं मला नाव दिलंय, इथे पाय भक्कम रोवायला मदत केलीये. लोक जेव्हा मला पाहून `भिकू, भिकू' असा गलका करतात तेव्हा मला आनंदच होतो. मी एक भूमिका, एक माणूस त्याच्या नावासकट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकलो, याचं मला समाधानच वाटतं. लेकिन वो अब इतिहास है... जिसमें झाँकना आगेभी अच्छाही लगेगा ऐसा इतिहास... लेकिन इतिहास.''
 हेच उत्तर तो `इस दुनिया के सितारे' कार्यक्रमातत जावेद जाफ्रीनं विचारलेल्या पहिल्याच प्रश्नावर देतो. आमची भेट नानावटी हॉस्पिटलच्या तळघरातल्या स्टुडिओत होते. याआधीची भेट मनोज `स्टारडम'च्या उंबरठय़ावर असताना त्याच्या पुढाकारानंच झालेली. यावेळी तो आग्रहपूर्वक सांगतो, `मुलाखत' घ्यायची नाही. गप्पा मात्र भरपूर मारायच्या. एरवी मनोज तसा बुजरा, चटकन न खुलणारा, त्यामुळं भरपूर गप्पा मारण्याची जबाबदारी समोरच्याचीच. पण, नीट ओळख झाली की मनोजला बोलतं करायलाही वेळ लागत नाही.
 साधी जीन्स आणि टीव्हीवर बरा दिसेल असा काळा टी शर्ट या वेशातला मनोज खुरटय़ा दाढीचे खुंट बाळगतच `इस दुनिया...' च्या रेकॉर्डिंगला हजर होतो. कदाचित रामूच्या तेलुगू सिनेमाच्या कंटिन्युइटीसाठी हा `लुक' कायम ठेवायचा असेल. `जैसे असलियत मे है वैसेही टीव्हीपर दिखेंगे' मनोजचं सोपं स्पष्टीकरण.
 मुलाखतीपूर्वी हलका मेकअप करण्यासाठी तो मेकअपरुममध्ये शिरतो. पाठोपाठ शिरणाऱयांसाठी स्वत: खुर्च्या मांडतो. `मुलाखती' व्यतिरिक्त काही नैसर्गिक शॉट घेण्याची आयडिया अचानक कुणाच्या तरी डोक्यात क्लिक होते. कॅमेरा- लाईट्स येणार म्हटल्यावर मनोज चक्क बावरतो. ``आप आइये, यहांपेमेरे साथ बैठकर कुछ बातचीत कीजिये। तो मुझे नॅचरल लगेगा।''
 सिनेमात कॅमेऱयासमोर सराईत वावरणारा मनोज या असल्या `कँडिड शॉट्स'च्या वेळी मात्र कॅमेरा कॉन्शस होतो, ही गंमतच. तो मेकअप करता करता, शॉट सुरू असताना हेच सांगतो, ``मुझे आप कॅमेराके सामने ऍक्टिंग करनेको बोलो। मै आरामसे कर लुँगा। लेकिन ये मनोज बाजपेयी होने की ऍक्टिंग मै नही कर पाता हूँ। सहम जाता हूँ।''
 बाहेरचा धुवाँधार पाऊस थोडा थबकल्याची वर्दी येते. आता मनोजची कारमधून `एन्ट्री' चित्रित करायची आहे. मनोज सांगतो, कारमधून कशाला? माझी काही स्वत:ची कार नाही. इथून हैदराबादचं विमान गाठायला सांताक्रूझला पळायचंय. म्हणून मित्राच्या कारनं आलोय मी. नेहमी ऑटोनं प्रवास करतो तर एंट्रीही ऑटोतूनच घेऊयात.
 ऑटोतून बाहेर पडून फ्रेमबाहेर आल्यावर मनोजला चिंता असते रिक्षावाल्याला पुरेसे पैसे मिळालेयत ना, याची मेकअप रुपमध्ये गप्पांच्या अनौपचारि मैफलीत मनोजचा सहभाग `ऐकण्या' पुरताच असतो `इस दुनिया के...' चे बरेचसे तंत्रज्ञ मनोजला ओळखतात `टीव्ही सिरीयलवाला लडका' म्हणून. तो स्टार बनून इंटरव्हयूला आलाय म्हटल्यावर त्यांना साभिमान आनंद झालेला. सिनीयर मंडळी त्याच्याशी सलगीनं पण आदर राखून बोलताहेत आणि ज्युनियर लोक मनोजनं आपणहून `क्या भाई, कैसे हो' अशी ओळख दिली की सुखावताहेत.
 त्याच दिवशी कुठेतरी मनोजचं ममता कुलकर्णीशी अफेयर असल्याचं छापून आलेलं. त्यावरून काहीजण मनोजची खेचताहेत. पूजा भट, उर्मिला पाठोपाठ मनोजची ही तिसरी काल्पनिक गर्लफ्रेंड. मनोज आधी हास्यविनोदात सहभागी होतो. नंतर मात्र चर्चेला फारच विचकट रुप यायला लागल्यावर गप्प होतो. गंभीरपणे विचारतो, जी दोन माणसं एकमेकांना एकदाही भेटलेली नाहीत त्यांच्याबद्दल त्यांना न भेटलेला माणूस असं कसं लिहू शकतो.
 ``तीच तर कला आहे.'' असं कुणीतरी सांगतं. मनोज आता मेकअपरुम बाहेर पडून सिगरेट शिलगावतो. आल्यापासूनची ही तिसरी- चौथी सिगरेट असणार. त्याबद्दल विचारलं की तो सांगतो, क्या करूं, बहोत बेचैन रहता हूँ मै। कहीं एक जगहपर टिक नही सकता हूँ। निवांतपणे एका जागी गप्पा मारतसुद्धा बसणं शक्य होत नाही मला. सतत काहीतरी हालचाल हवी. काम हवं. वो क्या बोलते है आप लोग... `नर्व्हस एनर्जी'... वो है मेरे अंदर!''
 सिगरेट ओढताना उभा असला तरी नजर भिरभिरत असते. आतल्याआत काहीतरी उकळत असल्याचा भास होतो. त्यात या मुलाखतीच्या शूटिंगची भर! ``मै ये इंटरव्हयू देनेसे बहोत डरता हूँ। मुझे ये सब अंदरसे भाता नही है। लेकिन क्या करूँ। हा व्यवसाय असा आहे. कुणाला नाराज करता येत नाही. आणि तुम्ही लोक मुलाखती घेणार, छापणार, टीव्हीवर दिसणार त्यातून माझीच प्रसिद्धी होणार आहे ना?''
 ``असं आता बोलताय बंधू! पुढे सवय झाली `स्टारडम'ची, की मग या सगळ्याची चटक लागेल.''
 ``छट्, बिल्कुल नाही.'' मनोज ही शक्यता जळमटासारखी झटकून टाकतो. ``या सगळ्याचं कौतुक कुणाला असतं माहितीये. ज्याला पहिल्या फटक्यात, फार काही न करता यश मिळतं त्याला यशाची सवय लागते. मला अपयशाची सवय झालीये. ते इतकं अंगवळणी पडलंय की आता यशानं फारसा फरक पडेलसं वाटत नाही. खरं सांगू का? माझे स्वत:चे स्वत:बरोबरचे क्षण संपलेत या प्रसिद्धीमुळे ती गेली, हा `झोन' बाजूला झाला तर माझं काहीच जाणार नाही. उलटा मेरा जो छिन गया है वही मुझे वापस मिल जायेगा.''
  `इस दुनिया के...' चा सितारा येऊन पोहोचला असला तरी `सुपरस्टार- मुलाखतकार' जावेद जाफ्री अद्याप पोहोचलेला नाही. त्याची वाट पाहणं सुरू होतं. मेक-अप रुममध्ये टाईमपास गप्पा सुरू असताना अचानक विषय नायक- नायिकांच्या भानगडींकडे वळतो. त्याच दिवशी सकाळी मनोजचं ममता कुलकर्णीशी अफेयर सुरू असल्याचं कुठेतरी छापून आलंय. मनोजशी फार पूर्वीपासून जानपछान असलेल्या बडबडय़ा मुन्नाभाय डोळे मिचकावतीत विचारतो, ``यार, तेरे तो मजे है! पहेल पूजा (भट), बादमें उर्मिला, अब ममता? कैसे पटा लेते हो भय्या?''
 मस्करीला मनोज मस्करीतच उत्तर देतो. मस्करी वाढत जाते. तिला पुरुषा-पुरुषांमधल्या वाह्यात चर्पटचावटीचं कप येऊ लागतं. जसजसं चर्चेचं स्वरुप पालटून प्रच्छन्न शब्दप्रयोग सुरू होतात तसतसा मनोज अस्वस्थ होऊ लागतो. मस्करीची कुस्करी होऊ लागलीये, हे बहुतेकांच्या लक्षात यावं इतपत मनोज कोषात जातो, विषय बदलण्याचे प्रयत्न करतो. शेवटी उसळून सवाल करतो, ``कसं काय छापतात हे लोक असलं भलतंसलतं? गॉसिप मॅगझिन्सची प्रवृत्ती मी समजू शकतो. पूजाशी नाव जोडलं तरी एकवेळ समजून घेता येईल. तिच्या निर्मितीमध्ये (तमन्ना) मी काय केलंय, ती मैत्रीण आहे चांगली. उर्मिलाबरोबर मी `सत्या' केलाय `कौन' करतोय. पण ममता...? यार, इस लडकी को मैने थिएटरके परदेके अलावा कहीं और देखाभी नहीं, उससे मिलातक नही मै। और उसके साथ नाम जोड दिया?''
 मुन्नाभाय त्याला समजावतो. ``भय्या. इसका मतलब यही है के तू अब स्टार बन गया।''
  हा `स्टार' ज्याची वाट पाहत बसलाय तो `स्टार' आता अवतीर्ण होतो. जावेद जाफ्री आणि मनोज समोरासमोर आल्यावर फारच गमतीशीर नाराज दिसू लागतो. ज्याची मुलाखत व्हायचीये तो साधी जीन्स आणि टीशर्ट मध्ये, बेंगरुळ, दाढीबिढी वाढवून आणि जो मुलाखत्या आहे तो एखाद्या स्टारसारखा चकाचक, तुळतुळीत दाढी घोटून, चेक्सचा लाँगकोअ, आत मऊशार टी शर्ट, कडक बूट वगैरे स्टायलीत. दोघांनाही न ओळखणारा कुणी आला तर कोण मुलाखत घेणारा आणि कोण देणारा. याचा गोंधळच उडेल त्याच्या मनात.
  जावेद मनोजबरोबर मेकअप रुममध्ये थोडय़ा गप्पा टप्पा करतो, बाकीच्यांना बाहेर घालवून. मनोजला मोकळं करण्याचा, प्रश्नांसाठी थोडी तयारी करण्याचा त्याचा प्रयत्न अनौपचारिक दिसतो. पण ही अनौपचारिकताही व्यावसायिक उपचारच आहे, हे सर्वांच्याच लक्षात येत असतं. `इस दुनिया के...' चे तंत्रज्ञ जावेदला आदाब- सलाम करत गोळा होऊ लागतात. त्यांच्यासह जावेद सेटकडे `नमस्कार-चमत्कारांसाठी रवाना होतो. मनोज आल्यापासून पहिल्यांदाच त्याच्या भोवतीचा गोतावळा दूर हटतो. आता मनोजबरोबरचा त्याचा अबोल दाढी-खादीधारी मित्र पुढे सरसावतो, अनिज त्याचं नाव. दोघांच्या बिहारी बोलीतून गप्पा सुरू होतात. हिंदीचीच बोली असल्यानं भाषा समजते. अनिष मनोजला सल्ला देतो, ``जावेदला समोरच्यावर कुरघोडी करण्याची सवय आहे. त्याला चान्स दिलास तर तोच बोलत बसेल. सुरुवातीलाच तोड त्याला. म्हणजे पुढचं काम सोपं होईल.''
 मनोजच्या चेहऱयावर आता स्नेहसंमेलनात पहिल्यांदाच भाग घेणाऱया शाळकरी मुलासारखा तणाव दिसतो. तो मनोज सेटवर खुर्चीत स्थानापन्न होईपर्यंत कायम असतो. आवाजाच्या चाचणीसाठी दोघांना जुजबी बोलायला सांगितलं जातं तेव्हा जावेदच्या आत्मविश्वासपूर्ण निवेदनापुढे मनोजचा आवाज पातळ आणि बुजरा वाटतो... खोल जाणार. मनोजचा चेहरामोहरा पाहताना क्षणभर शंका वाटते... मनोज बोलेल ना नीट. की अनिषनं वर्तवलेलं भाकित खरं होणार? अनिष मात्र निर्विकार दिसतो. तो मनोजला जास्त ओळखतो.
 मुलाखत सुरू होते तसा अनिषचा विश्वास सार्थ ठरू लागतो. मनोजचा पातळ वाटणारा आवाज आता खर्चात लागतो. त्याच्या उत्तरांमध्ये ठाम नम्रता आणि दुर्मिळ प्रामाणिकपणा दिसू लागतो. आपला लहानपणापासूनचा प्रवास तो नाटय़मय पण अल्पाक्षरी शैलीत मांडतो.
 बिहारमधल्या या खेडवळ मुलामध्ये अभिनयाचं भूत भरलं बच्चन पितापुत्रांनी संस्कारक्षम शाळकरी वयात मनोजनं धाकटय़ा बच्चनसाहेबांचा `जंजीर' पाहिला. या जातकुळीचं काही तोवर त्यानं रुपेरी पडद्यावर पाहिलेलं नव्हतं. समोरचा हा ताडमाड इसम आपल्याला अंतर्बाह्य हादरवून गेला तो अभिनय नावाच्या शक्तीच्या ताकदीवर, हे मनोजच्या कोवळ्या मनावर पक्कं बिंबलं.
 मग गावातल्याच एका पाठांतर स्पर्धेत मनोजनं हरिवंशराय बच्चनजींची एक कविता साद करून दाद मिळवली. त्यातलंच थोडबुहत आपल्यातही आहे, हा शोध मनोजला मोठय़ा बच्चनसाहेबांमुळे लागला. मग, शाळेत, कॉलेजात अभिनय सुरू झाला, बराचसा चोरीछुपे... कारण, बिहारमध्ये अभिनेत्याला पर्यायवाचक शब्द आहे `भांड' कोणत्याही मुलाला `मला भांड बनायचंय' असं आईबापांना कस सांगता आलं असतं?
 मनोज पाटण्याहून दिल्लीला आला तेव्हाही तो घरातल्यांना खरं कारण सांगू धजला नव्हता. त्यांना वाटत होतं, की हा उच्च शिक्षणासाठी दिल्लीला गेलाय आणि हा तिथे पथनाटय़ं करत फिरत होता. `नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मध्ये प्रवेशासाठी त्यानं तीनदा प्रयत्न केले आणि तिन्ही वेळा त्याला नकारघंटा ऐकायला लागली. तरीही तो नाटक शिकला `एनएसडी'मध्येच. एनएसडीचे विद्यार्थी, इतर संबंधित ग्रुप्स बरोबर नाटक एके नाटक करताना एनएसडीचे संस्कार त्याच्यापर्यंत झिरपत आलेच असणार.
 दिल्लीतले नाटय़महर्षी बॅरी जॉन यांच्या ग्रुपमध्ये मनोज आणि शाहरूख खान एकत्र एका नाटकात काम करायचे आणि शाहरूखपेक्षा मनोजची तारीफ जास्त व्हायची.
 ``फिल्मोंकी बात अलग है। स्टेजपर तो मनोज शहरूखसे कहीं आगे था।'' सांगतो तिथे मनोजनं लिहीलेलं `नटुआ' हे नाटको प्रचंड गाजलं होतं. लोकनाटय़ातला एक स्त्राeपार्टी कलाकार कसा स्रैण होत जातो, याची गोष्ट सांगणारं `नटुआ' दिल्लीच्या नाटय़ेतिहासातलं एक यादगार नाटक आहे.
 बारा वर्षं नाटकांमध्ये रमल्यानंतर मनोजला एकदा बोलावणं आलं शेखर कपूरच्या ऑफिसमधून. तो उडालाच. शेखर कपूरच्या `बँडिट क्वीन'साठी जुळवाजुळव सुरू असल्याचं त्याला ठाऊक होतं. त्याच्या ग्रुपमधले बरेचजण त्या शोधमोहिमेत `सापडले' ही होते. पण, मनोजनं मुळात शेखरच्या ऑफिसात फोटोज पाठवले नव्हते. तरीही त्याचा एक फोटो (कसा ते आजही गूढच आहे.) शेखपर्यंत पोहोचला आणि मनोजला `बँडिट क्वीन'मध्ये फूलनच्या प्रियकरची भूमिका मिळाली.
 शेखरनं त्यावेळी दिल्लीच्या या गुणवान कलावंतांना सांगितलं होतं... ``आता तुम्ही एका सीमारेषेवर आहात. ह तिच्या अलीकडे तुम्हाला सृजनात्मक साफल्य लाभतंय. ही रेषा ओलांडून पुढे आलात तर हे समाधान मिळवतानाच आर्थिक स्थैर्य आणि अधिकाधिक व्यापक संधी मिळेल. वेळच आली तर सीमारेषेअलीकडेही परत जाता येईल. पण, ही वेळ चुकवलीत तर मात्र सीमेवरच अडकून पडाल... कायमचे.''
 शेखरच्या सल्ल्यानं मंडळी मुंबईत येऊन थडकली. समव्यावसायिकांबरोबर कुठेतरी राणं, उधारउसनवाऱया करून पैसे मिळवणं, निर्माते-दिग्दर्शकांच्या ऑफिसांच्या चकरा... साग्रसंगीत `स्ट्रगल' सुरू झाला. त्यातून मनोजला द्रोहकाल'मध्ये एक मिनिटाची भूमिका मिळाली. गोविंद निहलानींनी पुढच्या नायिकाप्रधान `संशोधन'मध्ये मनोजला नायकाची भूमिका दिली. महेश भटच्या कँपमध्ये शिरकाव झाल्यावर त्याला `तमन्ना'मधला मोठा रोल मिळाला.
 कामचलाऊ भूमिका मिळूनही मनोजला खऱया अर्थानं `ब्रेक' मिळत नव्हता. मुंबईत तीन वर्ष पूर्णपणे बेकारीत काढल्यावर मनोज थकला. फ्रान्समध्ये जाऊन पुन्हा थिएटर करण्याची संधी मिळत होती. ती सोडू नये. असं वाटू लागलं. तो निघण्याच्या तयारीत असताना महेश भटनं अडवलं. `थोडं थांब' म्हणाला आणि `स्वाभिमान'मध्ये काम दिलं. मनोजसाठीचा खरा ब्रेक पुढच्याच वळणावर होता... `दौड'च्या रुपानं.
 रामगोपाल वर्माच्या `दौड'मध्ये मनोज दहशतवाद्यांच्या गटातला एक भिडू होता. पण, शूटिंगच्या पहिल्याच दिवशी मनोजचं बारकाईनं निरीक्षण करत बसलेल्या रामूनं त्याला बोलावून सांगितलं, ``तुझ्याबरोबर मी एक मोठा सिनेमा करणार आहे. एक कथा आहे माझ्या डोक्यात... त्यातला `टायटल रोल' तुझा...''

 हा होता `सत्या' आधी मनोज सत्याच साकारणार होता. अचानक रामूच्या मनात काय आलं कोण जाणे! त्यानं मनोजला सांगितलं की तू भिकू म्हात्रे करणार आहेस. `टायटल रोल' गेल्यामुळं अर्थातच मनोज नाराज झाला होता. पण, `पदरी पडलं पवित्र झालं' या भावनेनं त्यानं भिकू स्वीकारला. सर्वस्व पणाला लावून साकारला आणि भिकूनं सत्यालाही झाकोळून टाकलं.
 हा प्रवास ऐकताना वाटतं, एवढं भोगलंय, पाह्यलंय म्हणून यशापयशाबद्दल परिपक्व निर्विकारपणा जाणवतो, याच्या वागण्यात.
  ``तुझ्याकडे मोबाईल, कार, फ्लॅट का नाही.'' या जावेदच्या प्रश्नाच्या उत्तरात तर मनोज सगळ्यांनाच जिंकून जातो. तो गरीब आईबापांचा मुलगा आहे. त्याच्या कमाईतला निम्म्याहून अधिक हिस्सा गावी जातो. उरलेल्या पैशात त्याचं भागतं. तशी सवयच अंगवळणी पडलीये त्याच्या दोन जीन्स आणि पाच सात शर्ट-टी शर्टच्या पलीकडे त्याच्या गरजा नाहीत. तो म्हणतो, ``मला कार, फ्लॅट, मोबाईल नकोय असं नाही. पण, मी जेव्हा साधं शर्ट खरेदी करायला जातो तेव्हा एक नाही घेत, चार घेतो. माझ्या भावांसाठी त्यामुळं, जेव्हा भावाला कार घेऊन देण्याची  माझी ऐपत होईल तेव्हा मी ती घेईन.''
 जावेदसारखा फिल्मी माहौलात निबर झालेला माणूसही या सरळ- स्पष्ट उत्तरानं थोडा हलल्यासारखा वाटतो. त्याच्या पुढच्या प्रश्नांमध्ये मनोजबद्दलचा आदर जाणवतो... आपसूकच.
मुलाखत संपते तेव्हा कित्येक `खोटय़ा' मुलाखतीचे साक्षीदार असलेले `इस दुनिया के...' चे तंत्रज्ञ या अनोख्या स्टारची सच्ची मुलाखत ऐकून भारावलेले वाटतात. निरोपानिरोपी करून निघालेल्या मनोजला कारमधून अचानक परत बोलावणं येतं. त्याचा  मेकअपमन एकटाच भेटतो कारमध्ये. तो मराठीभाषिक त्याला `कसा आहे हो हा माणूस' म्हटल्यावर खास `चांगला आहे' म्हणून सांगतो. मनोज मेकअपमनला नोकरासारखं, `बॉय'सारखं वागवत नाही, हे त्याच्या मराठी बाण्याला रुचतं. तो सांगतो, ``मला जाहिरातींची खूप कामं मिळतात. त्यात पैसाही जास्त आहे. पण असं जाहिरातीचं मोठं काम सोडून मी मनोजसाठी `कौन'च्या लोकेशनवर पनवेलला गेलो दहा दिवस. हा माणूस भला आहे. त्याचं आपलं जमतं.''
 मनोज मोकळा झाल्यावर गाडी आता अंधेरीकडे, त्याच्या भाडोत्री फ्लॅटकडे निघते. मघाच्या मुलाखतीबद्दल `छान झाली' म्हणून कौतुक होतं. मनोज एखाद्या सीननंतर त्यातून बाहेर पडलेल्या निर्विकार अभिनेत्यासारखा भासतो. कौतुक अंगाला लावून न घेण्याची सवयच अंगी बाणवलीये की काय यानं?
 मुलाखतीत तो म्हणाला होता, ``मला पैसा नकोय असं नाही. पण या इंडस्ट्रीत येण्याचा तो माझा मुख्य उद्देशच नाही. माझी गरज काम करण्याची आहे आणि माझं काम आहे अभिनय करणं. ते मुख्य त्यातून मिळणारा पैसा-प्रसिद्धी दुय्यम. त्यासाठी मी इथं आलोच नाही.''
 ऐकायला छान वाटतं. त्यालाही बोलायला छानच वाटलं असणार. पण असे किती बोलबच्चन नंतर तोंडावर आपटवलेत या मायानरीनं. मनोजला आदर्शवत वाटणाऱया अमिताभचा अष्टपैलू अभिनयही खदिरांगारी संतप्त नायकाच्या चौकटीत कोंबूनच पाहिला प्रेक्षकांनी. कलापटांचा अमिताभ झालेल्या नसीरुद्दीन शाहला पोटापाण्यासाठी आजही भ्रष्ट/ दिलेर इन्स्पेक्टराचा नणवेश आलटून-पालटून चढवावाच लागतो. नाना पाटेकर मुका दाखवला तर सिनेमा पडतो. त्याची गणती सिनेमाधंद्याच्या लेखी शत्रुघ्न सिन्हा, राजकुमार वगैरे डायलॉगवीरांच्या पंक्तीत. ऍक्टिंग कों कौन पुछता है? ज्याचं त्याचं लेबल हेच त्याच्या ऍक्टिंगचं प्रशस्तीपदक. तेच कुंकू मिरवलं तर नट सौभाग्यशाली, ते पुसलं तर विधवेचं खडतर जिणं नशिबी. इथे मोतीलाल, संजीवकुमार, बलराज साहनी वगैरे बावनकशी अभिनेत्यांनाही चरित्र भूमिकांच्या सापळ्यात अडकावं लागलं. तिथे एका हिट सिनेमाच्या बळावर `टेंपरवारी हिरो' झालेल्या मनोजची काय मातब्बरी?
 मनोज या फैरीनंतरही शांतच आहे, निवांतसुद्धा.
 ठीकाय. त्याला नको असेल पैसा. पण, त्याच्यावर पैसा लावणाऱया निर्मात्यांचं काय? त्याचे सिनेमे विकत घेणाऱया वितरकांचं काय? त्यांच्या दृष्टीनं सिनेमा म्हणजे भांडवल दामदुप्पट करून देणारी `शेरेगर स्कीम' आहे. एक रेस आहे घोडय़ांची. ऍक्टिंगचं खूळ डोक्यात ठेवून एखादा घोडा `विन'मध्ये येईल तोवर या खुळाचाही उदोउदो होईल. पण एखादी रेस हरली, की मातब्बर नटालाही `फुटाची गोळी' खावी लागते.
 आणि मनोजही निर्वात पोकळीत थोडाच अभिनय करणार? त्याच्यातल्या नटालाही `ऍप्रिसिएशन'ची गरज आहेच. ही `परफॉर्मिंग आर्ट' आहे. दाद देणारे टाळी नसेल तर मनोजमधला अभिनेता कोमेजून जाईल. आणि टाळी मिळवण्याचा चस्का अल्लाद एका पिंजऱयात घेऊन जाईल. भिकू म्हात्रेच्या इमेजचा पिंजरा.
 ``बिल्कुल नाही'', मनोज ठामपणे उत्तरतो. ``भिकू म्हात्रे इज डेड फॉर मी. मै अब पूरी जिंदगीमें फिरसे भिकू नही करूंगा, किसीभी रामसे नही। माझ्याकडे तशा ऑफर्स आल्या होत्या काही. मी नाही म्हटलं. आता `कौन' मध्ये मला बघ. तिथला आपटे हा भिकू म्हात्रेपेक्षा एकदम वेगळा आहे. टोटली डिफरंट पर्सन. तो पाहताना कुणालाही भिकूची आठवण येणार नाही.''
 ``कौन'च्या फोटोंमधला मनोजचा गेटअप दिसतोही शामळू. पण, वांधा तो नाही. `सत्या'चा मनोज मध्येही भिकूच पाहायला गेला आणि ती अपेक्षा `कौन'मध्येही पूर्ण होणार नाहीच. मग तो ``ए भिख्खू, तेरी ठस्सी, तेरी दाढी किधर है, तू ऐसा पोपट कैसे बना रे?'' म्हणून मनोजला हुट आऊट करून बाहेर पडला, तर `कौन' नंतर `कौन मनोज' हा चिरपरिचित प्रश्न पुन्हा मनोजच्या कानात घुमू लागेल, त्याचं काय?
 ``प्रश्न बरोबर आहे.'' मनोज उत्तरतो. पण, एक गफलत आहे. `कौन'चा प्रेक्षक भिकू पहायला येणारच नाही कारण `कौन'च्या
 पोस्टरपासूनच त्याला वेगळा मनोज दिसू लागेल. हा भिकू नाही, हे त्याच्या डोक्यात फिट होईल एकदा त्यानं वेगळा चेहरा ऍक्सेप्ट केला की वेगळा माणूस स्वीकारायला लावण्याची जबाबदारी माझी.''
 ``आपण प्रेक्षकांना नावं ठेवतो.'' अनिषला ट्रफिक जॅममधून मार्ग काढण्याचं मार्गदर्शन करून मनोज पुन्हा संभाषणाचा धागा जुळवतो, ``आपण प्रेक्षकांना फार गृहीत धरतो. मला सांग, जे अभिनेते व्यावसायिक यशाच्या चौकटीत अडकले म्हणतोय त्यांनी आपलं व्यक्तिमत्त्व भूमिकेत मुरवण्याचा किती प्रयत्न केला? प्रेक्षकांला एका विशिष्ट अदेची सवय कुणी लावली? बाकी सगळं सोड, कितीजणांनी भूमिकेनुरूप चेहरामोहरा बदलला? मी जर प्रत्येक वेळी नवा माणूस समोर आलो तर प्रत्येक वेळी प्रेक्षकालाही कोरी पाटी ठेवून यावं लागणार नाही का? मी जसा भिकू विसरलो, आपटे विसरेन तसा माझा प्रेक्षकही त्यांना मागे ठेवून पुढे येईल. तसं यायला लावीन मी त्याला.
 मनोजची लिंक लागली तर तो सलग भरपूर बोलतो तर...? आता तर तो पुढच्या सीटवरून पूर्ण मागे वळून बसून बोलतोय... ``आणि एखादा सिनेमा अभिनेत्याच्या इमेज तोडण्याच्या प्रयोगामुळं फसला, हे म्हणणं पण फार ढोबळ वाटतं मला, अशा सिनेमांचं पुन्हा एकदा `ऍनालिसीस' व्हायला हवं. खरंच हे कारण होतं की सिनेमाच कुठेतरी फसला होता?''
 मनोजचं लॉजिक पक्कं आहे. पण, समजा `कौन' किंवा त्यापुढचा मनोजचा एखादा सिनेमा तो म्हणतो तसा मुदलातच फसला तर?
 ``सहसा नाही फसायचा. स्क्रिप्ट वगैरे नीट पाळूनच मी रोल स्वीकारतोय. आता आता पडद्यावर सिनेमा कसा दिसेल याचा अंदाज सिनेमा सुरू होण्याआधीच येतो मला थोडाफार.''
 तरीही एखादा सिनेमा फसलाच तर?
 ``दुसरा सिनेमा असेल न फसणारा''
 तोही फसला, तिसराही फसला, प्रेक्षकांनी मनोज बाजपेयीला हुडूत करून हुसकावून लावलं तर?
 ``तर मी जाईन दिल्लीला परत. तिथे थिएटर तर आहे माझ्यासाठी. मी तिथे ऍक्टिंगची खाज भागवून घेत राहीन. तिथेही वांधा आला तर जाऊन वडिलांबरोबर शेती करीन बिहारमध्ये. पण, इथले भैताड नियमफियम पाळणार नाही. मी कधीच. जो मै करना चाहता हूँ वो शायद करने को ना मिले; मगर जो मै अंदरसे करना नही चाहता हूँ वो मै किसी भी हालत में नही करूंगा। करही नही सकूँगा!''
 भलताच कठीण मनुष्य आहे हा! टिपिकल टॉरस ऍडामन्स. पण, ही वृत्ती त्याच्या त्या बेकारीच्या तीन वर्षांबद्दलच्या संभाषणातही दिसली होतीच. आपल्याकडे पैसे नव्हते, मित्रांकडे भिका मागायला लागत होत्या, खायचे-प्यायचे वांधे होते, हे तो फार चघळत नाही. त्या दिवसांमधलं सगळ्यात मोठं दु:ख काय होतं?
 ``जब मैं सेट्सपर जाता था प्रोडय़ूसरोंसे, डिरेक्टरोंसे काम माँगने के लिए; तब पता है सबसे बडी जलन, ईर्ष्या क्या होती थी? सामने मेरेजैसाही कोई ऍक्टर ऍक्टिंक करते हुए दिखता था। उससे, मुझे जलन होती थी! ऐसा लगता था कि बताऊँ इन सबको के भय्या मुझे वहाँ जाना है, उस `स्पॉट' के नीचे। एक बार मुझे वहाँ जाने दो। सिर्फ एक बार।''
 अभिनयाचा हा किडा नेमका काय आहे? मनोज म्हणतो ही एक नशा आहे, विषारी नशा. नशाबाजीत अट्टल झालेला माणूस जसा साप उसवून घेतो, भीषण तडफडाटातून सुख मिळवतो तसं काहीसं सुख मिळतं त्याला या ऍक्टिंगमधून तो उत्स्फूर्त अभिनेता नाही. त्याला आधी भूमिका वाचून, स्वत:च मुरवून घ्यावी लागते. त्या पात्राच्या सगळ्या भावभावना आता साठवून तो त्या माणसांचा आत्माच आत्मसात करून पाहतो. अशा स्थितीतला मनोज भयंकरच वेगळा माणूस असतो. फकाफका सिगरेटी फुंकत त्याची इकडे-तिकडे चळवळ- चळवळ चालते. रिक्षातून जातानाही संवाद- हातवारे सुरू असतात. बिल घेताना दिसतो तर धडधाकट, वाटत नाही स्क्रू ढिला असेल असं?- हे भाव रिक्षावाल्याच्या चेहऱयावर असतात. असल्या वेणा सोसून एकदा एखादा भिकू म्हात्रे जन्माला घातला की तो पार रिकामा होऊन जातो... लोळागोळा. एक जन्मच संपून मृत्यू झाल्यासारखा. ही पोकळी मग इथ-तिथे मित्रांकडे भटकून, स्वत:ला निरुपद्देश थकवून भरून काढायची. पुन्हा नवा जन्म घेण्यासाठी...
 बघताबघता मनोजच्या इमारतीच्या आवारात गाडी शिरते. आता बोलायला वेळ नाही. झटपट आवरून विमानतळावर पोहोचायचंय. संध्याकाळी पाच वाजताची हैदराबादची फ्लाईट त्याला पकडायचीये. मनोज बॅग पॅक करून फक्त शर्ट चेंज करतो. पंधरा मिनिटांत गाडी पुन्हा सांताक्रूझच्या वाटेवर.
 विमानतळावर पोहोचल्यावर `व्हेंडिंग मशीन'वर चहापानाचा कार्यक्रम. तिथे मनोजला तहान लागते. पाण्याची बाटली आणायला तो
दुसऱया टोकाकडे जातो. व्हेंडिंग मशीनपाशी उभा असलेला एक पोरसवदा तरुण डोळे फाडफाडून त्याच्याकडे पाहतो. तोंडावर कंप्लीट अचंबित भाव, ``डिट्टो यार, एकदम झेरॉक्स कॉपी है ये!''
 ``झेरॉक्स नही ये ओरिजिनल है'' मनिषला बहुधा अशा प्रसंगांचा सराव झालेला दिसतोय.
 ``क्या बात करता है? ये भिख्खू म्हात्रे है?''
 ``हाँ। यही है मनाज बाजपेयी''
 हे नाव त्याच्या फारसं परिचयाचं नाही. तो विचारतोच, ``क्या नाम बोला?''
  ``मनोज बाजपेयी''
 ``क्या सही काम कियेला है बाप. एकदम रियल. सॉलिड ऍक्टिंग किया है, जबरदस्त... तुमको मालूम है, मैने `सत्या' सात बार देखी है, खाली इस आदमी के वास्ते.''
 बंधूंचा दिवस सार्थकी लागलाय. आज याला झोप लागणार नाही रात्रभर.
 अचानक डोक्यात एक कल्पना चमकते.
 ``अभी इसका अगला पिच्चर आयेगा तो देखेगा क्या?''
 ``हंड्रेड ऍन्ड वन पर्सेंट देखेगा. अपना फेवरिट ऍक्टर है।''
 ``लेकिन अगली पिच्चरमे ये भिकू नही है, गँगस्टरभी नहीं है, एकदम अलग रोल कर रहा है।''
 ``वही तो करना चाहिए। `सत्या जैसा भिकू ये वापस कर भी नही सकता। अभी नेक्स्ट फिल्ममें अलग कर रहा है तो अच्छाही है। उसको बोलो, रोल कौनसाभी करो लेकिन दिल लगा के करा, `सत्या' जैसा तगडा करो। आपुन तो जरूर देखेगा।''
 ``हम क्यूं बताये। तुमही बताओ। लो आ रहा है तुम्हारा हीरा।''
 आपल्या फॅनला भेटून मनोज नम्रपणे त्याचं कौतुक ऐकून घेतो. त्यसाचा `सल्ला' ऐकताना `कळलं का?' अशा अर्थानं डोळा मिचकावतो. निरोप घेऊन लांब टांगा टाकत विमानतळावरच्या गर्दीत मिसळूनही जातो.
 हा माणूस एक प्रश्नचिन्ह बनून आला आहे. आजपासून दहा वर्षांनी हा कुठे असेल?
 पण, हे प्रश्नचिन्ह आपण हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांनीच तयार केलंय. अडनिडा, एकदम हटके बनवलेला `सत्या' आपणच तर चालवला बेफाम. मग आपल्याला कोण हवंय. भिकू म्हात्रे की मनोज बाजपेयी?
 दहा वर्षांनी मनोज कुठे असेल. हे दहा वर्षांनी आपण कुठे असू, याच्यावर ठरणार आहे

(श्री दीपलक्ष्मी, दिवाळी, १९९८)

1 comment:

  1. सॉलिड्ड उभा केलाय भिकू म्हात्रे...

    ReplyDelete