Wednesday, March 9, 2011

वेलकम टु 'बेनेगल'पूर




बातमी काय आहे
श्याम बेनेगलांना भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वात प्रतिष्ठेचासर्वोच्च  दासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला ही बातमी आहे? की, बेनेगल सध्या दोन सिनेमांवर काम करताहेत ही बातमी आहे? यातल्या एका सिनेमाचं नाव 'महादेव' (वेलकम टु सज्जनपुर) आहे. नंतर 'चमकी' नावाच्या एका सिनेमात ते प्रेम, वासना, हिंसा यांचं तांडव रूपेरी पडद्यावर जिवंत करणार आहेत. नंतर श्रीलंका  सरकारसाठी गौतम बुद्धाच्या जीवनावरही ते पाली भाषेत सिनेमा बनवणार आहेत.

खरं सांगायचं, तर बेनेगलांना फाळके पुरस्कार मिळणं ही बातमी नाही. त्यांचं कार्यकर्तृत्त्वच त्या वकुबाचं आहे. पण, आजघडीला ते तीन सिनेमे करताहेत, ही मात्र बातमी ठरू शकते... नव्हे, बातमी आहेच.

कशी? असं पाहा, हिंदी सिनेमाचं सगळं गणित अर्थकारणावर चालतं. शुक्रवारला ज्याला बम्पर ओपनिंग मिळेल, तो मोठा दिग्दर्शक. आणि श्याम बेनेगलांच्या सिनेमांना भरलेल्या थिएटरांची फारशी सवयच नाही. 'अंकुर', 'निशांत', 'भूमिका'ला त्या त्या काळी गर्दी  झाली होती, पण फारच थोड्या ठिकाणी, थोड्या काळासाठी. 
त्यांचा सुपरहिट 'मंथन'. पण मुळात पाच लाख दूधउत्पादक शेतकऱ्यांनी प्रत्येकी दोन रुपयांचा निधी देऊन बनवलेला हा सिनेमा प्रदशिर्त झाला, तेव्हा 'आपला' सिनेमा पाहायला पाच लाख 'निर्मात्यां'च्या उड्या पडल्या, यात आश्चर्य काय?

आम पब्लिक अर्थात मायबाप रसिक नामक प्रेक्षकवर्गाचा आश्रय श्यामबाबूंच्या सिनेमांना कधी लाभला नाही, त्यांनी तो कधी मागितला नाही. एकदा एका समारंभात त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, ''मी माझ्या अभिरूचीला पटेल असा सिनेमा बनवतो आणि माझ्या अभिरूचीचे खूप प्रेक्षक असावेत आणि त्यांनी हाऊसफुल्ल गर्दी  करावी, अशी आशा मी करत राहतो. धंद्याचं गणित मांडून सिनेमा करणं मला जमणार नाही.''

श्यामबाबूंना धंद्याचं गणित कळलं नसेल, पण काहीतरी गणित नक्कीच उमगलेलं आहे. त्यांचा सिनेमा पिटातल्या पब्लिकच्या डोक्यावरून जातो. बेनेगलांची पात्रं पडद्यावर हिरो-हिरॉइनसारखी दिसत नाहीत, शिरा ताणून बोलत नाहीत, झटका आल्यासारखी गात सुटत नाहीत, नाचत नाहीत, अचकट पाचकट विनोद करत नाहीत... थोडक्यात सिनेमाकडून मनोरंजनाच्या ज्या ज्या काही कल्पना तमाम भारतवर्षानं वर्षानुवर्षं बाळगल्या आहेत, त्यातलं काहीच करत नाहीत, म्हणजे प्रेक्षकांचं 'मनोरंजन'च करत नाहीत. 
बेनेगलांची पात्रं सिनेमाच्या पडद्यावर माणसांसारखी दिसतात, माणसांसारखीच वागतात-बोलतात. आणि या गृहस्थांचं टेकिंग असं की सिनेमात दिग्दर्शक 'दिसत'च नाही... एखादी कथा-कादंबरी वाचावी, तसा सिनेमा वाचावा लागतो बेनेगलांचा. (आणि एकूण वाचनाचा आपल्याकडे 'आनंद'च आहे.) 
नटांना पडद्यावर माणसं बनवणं आणि स्वत: न 'दिसता' सिनेमा पुढे नेणं, हे एखादवेळी साधण्यासाठी आयुष्यभर साधना करावी लागते असंख्य दिग्दर्शकांना. पण, आपल्याकडच्या हिंदी सिनेमाच्या परंपरेपेक्षा भलतंच काहीतरी वेगळं आहे ना हो हे. आणि असा सिनेमा प्रेक्षक पाहायला जात नसताना, तो धंदा करत नसताना, बेनेगलांनी २० पेक्षा जास्त सिनेमे काढले, ते हिंदीत काढले आणि त्यांना आणखी तीन सिनेमे काढायला कुणीतरी पैसे देतंय, त्यांच्याकडे काम करायला स्टार मंडळी झटकन तयार होतात, ही, फाळके अॅवॉर्डपेक्षा मोठी बातमी आहे.

या इंडस्ट्रीनं भलभलत्यांचा कणा मोडला. हरएकाला तडजोडी करायला, स्वीकारायला लावल्या. अशा इंडस्ट्रीत, त्या इंडस्ट्रीच्या व्यावसायिक नियमांच्या संपूर्णपणे विरोधी अशी विचारसरणी घेऊन स्वत:च्या  अटी-शर्तीवर  सिनेमा काढायचं  धारिष्टय बेनेगलांनी सतत दाखवलंय आणि त्या इंडस्ट्रीत सतत कामही मिळवलंय. त्यासाठी बेनेगलांनी असंख्य प्रकारच्या युक्त्या लढवल्या आहेत. 
फिल्म फंडिंगच्या अतिशय नावीन्यपूर्ण कल्पना बेनेगलांच्या सिनेमांमधूनच पुढे आलेल्या आहेत. 'अंकुर', 'निशांत', 'भूमिका' यांच्यासाठी त्यांनी 'ब्लेझ' या अॅडव्हर्टायझिंग फिल्म्स एजन्सीला प्रोड्युसर बनवलं. शशी कपूरसारख्या नटानं त्यांच्यासाठी 'जुनून' आणि 'कलयुग' या सिनेमांची निमिर्ती केली. सिनेमांचं गणित फिसकटू लागलं, तशी त्यांनी भारतीय रेल्वेची निमिर्ती असलेली 'यात्रा' ही महामालिका दिग्दशिर्त केली. 'मंथन'ची निमिर्ती अद्भुत होतीच; 'सुस्मन'साठी विणकर संघटना, 'समर'साठी केंद सरकारचंच एक खातं अशा निर्मात्यांसाठी त्यांनी सिनेमे बनवले आणि समांतर सिनेमा बनवण्याचा एक मार्ग तयार केला.

सहसा संस्थात्मक निर्माते हे डॉक्युमेंटरी किंवा माहितीपटाचा आग्रह धरतात. बेनेगलांनी त्यांना फीचर फिल्मच्या स्वरूपात डॉक्युड्रामा बनवायला भाग पाडलं आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार, संवेदनशील फिल्ममेकिंगची एक वेगळीच विधा प्रचलित केली. बेनेगलांनी सामाजिक संदेशप्रधान सिनेमे काढले खरे; पण स्वत: मात्र उच्चभ्रू बुर्झ्वा राहणीमान सोडले नाही, अशी तक्रार बेनेगलांकडेच काम करून मोठा झालेल्या नसीरुद्दीन शाहने केली होती एकदा. हे म्हणजे, 'इतक्या सिनेमांमध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिका करूनही वास्तवात नसीरने एखाद्या फाटक्या पाकिटमारालाही पकडलेले नाही हो', अशी आरोळी ठोकण्यासारखं आहे. समांतर सिनेमावाले सगळेच भणंग असले पाहिजेत आणि आयुष्यभर भणंगच राहिले पाहिजेत, अशी अपेक्षा कशाला?

एका अथीर् बेनेगलांचं काम एनजीओवाल्यांसारखं आहे. समाजसेवक हा खादीझोळीदाढीधारी पारोसाच असला पाहिजे ही संकल्पना जशी काही स्वयंसेवी संस्थांनी पुसून टाकली, तसं काहीसं काम बेनेगलांनी केलं आहे. सिनेमाच्या वाटेलाही न जाणारे अनेक निर्माते निर्माण करून त्यांच्या फंडिंगमधून आपल्या अभिरूचीचा आणि संवेदनशील रसिकाला भिडणारा सिनेमा विना(कलात्मक)तडजोड बनवला आहे. दरवेळी बेनेगलांचा सिनेमा 'जमतो'च असं नाही. अनेकदा तो बेनेगलांच्या तटस्थतेमुळे 'कोरडा'ही होऊन जातो. पण, जमतो तेव्हा झक्क जमतो. 'भूमिका'सारखा, 'सरदारी बेगम'सारखा.

आजघडीला अर्थघन चित्रपटांची परंपरा प्रादेशिक सिनेमांपुरती मर्यादित राहिली आहे. मराठी, बंगाली, आसामी, कन्नड आणि मल्याळी यांसारख्या मोजक्या भाषांमध्ये छोटे निर्माते छोट्या जिवाचे प्रायोगिक सिनेमे तयार करतात. या देशातल्या व्यावसायिक सिनेमाची मुख्य भाषा असलेल्या हिंदीत मात्र असा सिनेमा विनातडजोड तयार करता येत नाही. 'अडाण्यांच्या मनोरंजना'ची पूर्वअट टाळून कुणीच पुढे जाऊ शकत नाही. ते धाडस बेनेगल करतात. त्यासाठी कधी एनएसडी, फिल्म इन्स्टिट्यूटमधले हिरे पारखून त्यांना पैलू पाडतात. कधी मसालापटांमधल्या नटनट्यांना आपल्या पद्धतीने काम करायला लावतात. आणि तरीही त्यांच्याकडे तीन सिनेमे आहेत...

... बेनेगलांचा खरा मोठेपणा सांगणारी बातमी ही आहे.

No comments:

Post a Comment