Wednesday, March 9, 2011

जाओ, भीगो यार! (चीनी कम)


ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन

जब प्यार करे कोई, तो देखे केवल मन...

हिंदी सिनेमाच्या असंख्य गाण्यांमध्ये असे उदात्त विचार ऐकायला मिळतात...

... पण, यातलं 'पाहायला' काय मिळतं?

' जन्म का बंधन' अर्थात जातीपातीची, धर्माची बंधनं ओलांडून एकमेकांशी जन्मगाठ बांधणारे प्रेमिक हिंदी सिनेमानं असंख्य दाखवले. आथिर्क स्थितीमधला फरक अर्थात लडका अमीर, लडकी गरीब किंवा व्हाइसे व्हर्सा, अशा प्रकरणांचं तर पीकच आलं पडद्यावर. पण, 'उम्र की सीमा' ओलांडण्याचं धाष्टर््य फार कमी केलं आपल्या सिनेमानं. 'कुंकू'सारख्या सिनेमांमध्ये जरठ-बाला विवाहातल्या अन्यायविरोधी आक्रंदनात त्या जरठाच्या कोमल भावना झाकोळून गेल्या. क्वचित एखाद्या 'मौसम'मध्ये म्हातारा पुरुष आणि तरुण स्त्री यांच्यातलं आकर्षण बरंच थेटपणे पडद्यावर आलं. पण, त्याला बाप-लेकीच्या वात्सल्यपूर्ण नात्याची डूब होती. 'शौकीन'मधले तीन म्हातारे फटाकड्या रती अग्निहोत्रीच्या प्रेमात पडतात, पण ते गंमतीगंमतीत. गाजराची पुंगी, वाजली तर वाजली... अशा रीतीनं. वयात खूप फरक असलेल्या स्त्रीपुरुषांमधलं नातं पुरेशा गांभीर्यानं पडद्यावर आलं ते अनंत बालानीच्या 'जॉगर्स पार्क'मधून. पण, तिथेही त्या नात्याच्या 'मर्यादा'च उघड करण्याचा प्रयत्न होता.

बिच्चाऱ्या बायकांवर इथेही अन्याय. वयानं मोठी बाई आणि लहान वयाचा बाप्या यांच्यात असं काही दाखवण्याचा विचारही इथे कुणाच्या मनाला शिवला नाही. ती रेखा तेवढी भाग्यवान. तिला व्हॅम्प बनून का होईना, अक्षयकुमारबरोबर चिखलात भरपूर लोळणफुगडी खेळण्याची आणि शॉवरमध्ये रमण्याची संधी मिळाली होती 'खिलाडी नं. १'मध्ये. मध्यमवयीन स्त्री आणि तिच्याहून धाकटा पुरूष यांच्यातलं सिरियस नातं नसीरुद्दिन शाहच्या 'यूँ होता तो क्या होता'मध्ये (सुहासिनी मुळ्ये-इरफान खान) दिसलं होतं थोडंफार.

त्यामुळेच, परंपरेच्या, रूढीच्या, समकालीन समाजधारणेच्या कोणत्याही प्रकारच्या चौकटींमध्ये न अडकता, चौसष्ठीचा पुरुष आणि चौतिशीतली स्त्री यांच्यातलं प्रेमप्रकरण लख्ख नि:संकोचाने फक्त स्त्री-पुरुष नातं अशा स्वरूपात मांडणारा 'चीनी कम' एकदम वेगळा आणि फ्रेश वाटतो. लंडनमध्ये भारतीय पदार्थांचं रेस्तराँ चालवणारा बुद्धा (अमिताभ बच्चन) आणि टुरिस्ट म्हणून तिथे आलेली, त्याच्या प्रेमात पडणारी नीना यांच्यातली ही प्रेमकहाणी 'चीनी कम' असलेल्या अस्सल चहासारखीच मंेदू तरतरीत करणारी आहे.

आपण भारतीय मंडळी चहाचीही बासुंदी करून पितो. निगुतीनं खुडलेली खानदानी चहाची चिमूटभर पानं आणि उकळलेलं पाणी एवढ्यातच अस्सल चहा तयार होतो. आपण त्यात साखर, दूध, मलई, मसाला, वेलची, आलं वगैरे बारा हजार तेराशे नव्वद पदार्थ घालून चहाचा मुडदा पाडतो... काही कोकणी हॉटेलांमध्ये, आधीच मेलेली कोंबडी ढीगभर खोबऱ्याच्या मसाल्यात घालून पुन्हा 'मारतात' ना, तसा.

हे पाकपुराण अशासाठी की, जी आपली जेवणा-खाण्याची आवड, तीच सिनेमाचीही. असंख्य प्रकारचे मसाले घालून आपण सिनेमातल्या मूळ आशयाचाही असाच मुडदा पाडतो... प्रेमकहाण्या तर फिल्मी गोडव्यात बुचकळून बुचकळून त्यांची गोडगिट्ट काकवी करून टाकतो. 'चीनी कम'मधला बुद्धिगामी तिरकस विनोद आणि अत्यंत परिपक्व मोकळेपणानं हाताळलेला अनूठा रोमान्स या सिनेमाला अस्सल चहाची किंचित कडवट पण रिफ्रेशिंग चव देतो.

जॅक निकोल्सन आणि हेलन हंट यांना अभिनयाचे ऑस्कर पुरस्कार मिळवून देणाऱ्या 'अॅज गुड अॅज इट गेट्स'ची थोडीशी सावली या सिनेमातल्या रोमँटिक नात्यावर पडलेली दिसते. तसाच तिरसटराव नायक आणि त्याच्या तिरसटपणाला पुरून उरणारी नायिका अशी जोडी इथेही जमली आहे. पहिल्यांदाच सिनेमा दिग्दशिर्त करत असलेल्या आर. बालकी (म्हणजे बालकृष्णन) यानं लिहिलेले चुरचुरीत आणि खटकेबाज संवाद स्वतंत्रपणे दोन्ही व्यक्तिरेखा उभ्या करतील, अशा तोलाचे आहेत. 
या सिनेमातली 'सेक्सी' नावाची, आठदहा वर्षांची कॅन्सरग्रस्त मुलगी असो की नायकाची जख्ख म्हातारी आई... सगळेच्या सगळे शाब्दिक तलवारबाजीच करतात. हाही हॉलिवुडचा प्रभाव असावा. 
तिथल्या बेस्टसेलर कादंबऱ्यांची आणि ब्लॉकबस्टर सिनेमांची भाषा अशीच टण्त्कारी असते. मराठी भाषेलाही अशा शाब्दिक खणखणाटाचं वावडं नाही म्हणा. जिज्ञासूंनी पुण्यातले विद्वान (म्हणजे शहराच्या हद्दीत राहणारे सर्व लोक) एकमेकांशी ज्या भाषेत बोलतात, ती ऐकावी.

या शब्दांच्या खेळाच्या माध्यमातून आर. बालकीनं हिंदी फिल्मी रोमान्सला एका वेगळ्या प्रतलावर नेऊन ठेवलंय. रूढ प्रेमकथांमधला रोमान्स हा सर्वांनी (म्हणजे नायक-नायिकांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनी) डोकं गहाण ठेवून खेळायचा खेळ आहे. तिथे प्रेम म्हणजे एकतर फक्त शारीरिक आकर्षण (लैंगिक नव्हे, शारीरिक- गुलाब की पंखुडी जैसे होंठ, काली घटा जैसी जुल्फे वगैरे) किंवा मग एकदम (फक्त) मन की मन से लगन. काही धीट सिनेमांमध्ये शारीरिकतेतला लैंगिक भागही उघड होतो. पण, स्त्रीचं चित्रण नेहमी पौगंडावस्थेतल्या प्रेक्षकाच्याच नजरेतून केलेलं. प्रेम हा शरीर-मनाचा व्यामिश्र खेळ आहे, याचं भानच नाही. बरं, ज्या सिनेमांनी काहीसा परिपक्व वयातला रोमान्स चित्रित करायचा प्रयत्न केला, त्यांची वेगळीच तऱ्हा. 'जॉगर्स पार्क'सारख्या सिनेमांमध्ये सिनेमात 'प्रकरण' करणाऱ्या जोडप्यापेक्षा ते चित्रित करणारे लेखक-दिग्दर्शकच अपराधगंडाने पछाडलेले दिसतात. दुसरा पंथ 'लोलिता'भक्तांचा. मध्यमवयीन पुरुषांच्या मनातली शाळकरी कोवळ्या वयाच्या मुलींबाबतची शारीर असोशी(च) पाहणारा. आपल्या मुलीच्या मदमस्त मैत्रिणीच्या 'प्रेमा'त पडणाऱ्या बापाची कहाणी सांगणारा 'ब्लेम इट ऑन रिओ' ही अशा पुरुषांची अल्टिमेट फँटसी. (या सिनेमातल्या नायिकेच्या चेहऱ्यावर नायकाच्या प्रेमात पडल्याचे खूप निरागस भाव होते म्हणे! पण, अनेकदा सिनेमा पाहूनही तिच्या चेहऱ्याकडे नजर गेलेला कुणी प्रेक्षक अद्याप भेटलेला नाही.) अमिताभच्याच 'नि:शब्द'मध्ये या प्रकारचंच अल्पजीवी आकर्षण केंदस्थानी होतं.

कोणत्याही प्रौढ स्त्री-पुरुषांमध्ये अशा प्रकारच्या 'बेसिक इन्स्टिंक्ट्स' असतातच. ते नैसगिर्कच आहे. पण, त्यातून 'नातं' नाही तयार होत. नात्याचे ट्रिगर इतके फुटकळ नसतात. लंडनसारख्या इंटरनॅशनल शहरात स्वत:चा सुस्थापित व्यवसाय असलेल्या चौसष्टीच्या बाप्याला स्त्री-शरीराचं काय महान कौतुक आणि आकर्षण असणार? त्यात त्याचा स्वभाव कारल्यासारखा आणि बुद्धी तीक्ष्ण. अशा पुरुषासाठीचं 'स्टिम्युलेशन' निव्वळ शारीर असू शकत नाही, याचं दुमीर्ळ भान हा सिनेमा दाखवतो. चौतिशीच्या नायिकेच्या बाबतीतही हे असंच घडतं. गंमत म्हणजे, याचा अर्थ, हे दोघे पुलंच्या 'हंड्रेड परसेंट पेस्तनकाका'मधल्या भाऊसाहेब आणि त्यांच्या बायडीप्रमाणे बेडरूममध्ये 'बाजूबाजूला चोपडी वाचत बसणाऱ्यां'पैकी नाहीत. त्यांच्या नात्यातली लैंगिकताही तेवढ्याच मोकळेपणानं व्यक्त होत असते. पण, तो त्यांच्यातला 'ट्रिगर' नाही. कारण, एरव्हीही एका शारीरिक वयाचे स्त्री आणि पुरुष यांच्यात बौद्धिक अंतर असतं. 
 'माझ्या वयाची पोरं बुद्धीनं माझ्या बरोबरीची होतील, तोपर्यंत मी मरूनही गेलेली असेन', असं बुद्धावर 'लाइन मारणारी' चिमुरडी सेक्सी सांगते, तेव्हा ती हेच अचूकपणे व्यक्त करते. सिनेमातली चौतिशीची तबू चौसष्ठीच्या अमिताभबरोबर एकाही फ्रेममध्ये विजोड वाटत नाही. या बयेचं डोकं फिरलंय किंवा हा बाप्या चळलाय, असं त्यांचं प्रेम पाहून वाटत नाही. कारण तिच्याशी त्याचं नेमकं काय नातं जुळत चाललंय, ते अगदी लख्खपणे दिसतं तिच्या चेहऱ्यावर. (काही प्रसंगांमध्ये ती निव्वळ भावदर्शनातून अमिताभची डायलॉगबाजीही फिकी पाडते. अर्थात तिच्यासंदर्भात तिच्यामागे 'व्हल्नरेबल' होत जाणं तितक्याच बेहतरीन पद्धतीनं दाखवून अमिताभही परतफेड करतोच.)

सिनेमात अमिताभ आणि तबू यांच्यात एकाच छत्रीची सुरू असलेली देवाणघेवाण पाहून त्याच्याच किचनमधला एक कुक उद्गारतो, ''जब अपनीही छत्री आदमी बार बार किसी को देता है और वापस लेता ही नहीं, तो समझना, उस के भीगने का वक्त आ गया है!''

प्रेम नावाच्या गोष्टीचा कोणाच्याही वयाशी काहीच संबंध नसतो, हे (कंटाळवाणा, टिपिकल क्लायमॅक्स व इतर काही किरकोळ उणिवांसह) इतक्या छानपणे सांगणारा सिनेमा आलाय गावात...

जाओ, भीगो यार!


(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment