Wednesday, March 9, 2011

'प्राण जोशी'ची गोष्ट


त्याची भुवई उंचावली की पडद्यावरच्या हिरोइनीबरोबरच थिएटरातल्या बायाबापड्यांच्याही काळजाचा थरकाप उडायचा... त्यानं डोळा बारीक केला की आता काहीतरी राडा पाडणार हा , याची खात्रीच व्हायची... सालाबादप्रमाणे शेवटच्या रिळात सगळं काही गोड गोड होण्यासाठी तो हृदयपरिवर्तनाचा पुचाटपणा करायचा , पण हा काही सुधारण्यातला गडी नाही , अशी धास्ती घेऊनच पब्लिक बाहेर पडायचं... त्याचा चेहरा पोस्टरवर दिसला की (मनातल्या मनातच- त्याचा धाकच तसा जबरा) शिव्यांची लाखोली वाहिली जायची... व्यक्तिगत आयुष्यात अतिशय सालस , सज्जन असलेल्या अभिनेत्याला मिळालेली ही सवोर्च्च पावती होती.

पण , प्राणसाहेबांना एक खंत कायम बोचायची. ते नेहमी म्हणत , ' लोक म्हणतात की , तुमच्या अभिनयाचीच ही पावती आहे वगैरे. पण , लोकांना या अभिनयाचं श्ाेष्ठत्व पटलं असेल , तर त्यांनी त्याला खुली दाद कधी कशी दिली नाही ? माझ्या खलनायकीच्या काळात नायकपदी देव आनंद , दिलीपकुमार , राज कपूर ही त्रयी विराजमान होती. त्या काळात लोकांनी आपल्या मुलांना कौतुकानं दिलीप , देव , राज अशी नावं ठेवली. माझ्या अभिनयाचं इतकं कौतुक होतं लोकांना , तर आपल्या मुलाला प्राण हे नाव ठेवणारा एकही हरीचा लाल का पैदा झाला नाही ?'

हीच मनात सलत राहिलेली खंत त्यांनी परवा ' राज कपूर पुरस्कार ' स्वीकारतानाही व्यक्त केली. या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचा वृत्तांत एका वाहिनीवरून प्रसारित झाला आणि दुसऱ्याच दिवशी ज्येष्ठ चित्रपटेतिहास अभ्यासक इसाक मुजावर यांच्या घरचा फोन खणखणला. पलीकडे होते चिपळूणचे डॉ. जोशी. त्यांनी हा कार्यक्रम पाहिला होता आणि आता त्यांना मुजावरांमार्फत प्राणसाहेबांशी संपर्क साधायचा होता. ' का ?' असं मुजावरांनी विचारलं , तेव्हा जोशींनी सांगितलं , ' मी प्राणसाहेबांचा कट्टर चाहता आहे. इतका कट्टर की , माझ्या नातवाचं नाव मी ' प्राण ' ठेवलं आहे. प्लीज , प्राणसाहेबांना हे कळवा... '

... मुजावरांनी प्राणसाहेबांना हा निरोप पोहोचवला आहे.... आता त्यांना खरी पावती मिळाली आहे. 

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment