बलात्कार करणारा पुरुष सजा (झालीच तर) भोगून समाजात उजळ माथ्यानं वावरायला मोकळा होतो. बलात्कारितेला मात्र त्या अत्याचारानंतर सर्वसामान्य आयुष्य जगण्याची मुभाच राहत नाही. स्त्राeची अब्रू हे काचचं भांडं वगैरे मानणाऱया भारतीय समाजात अत्याचार करणाऱयापेक्षा अत्याचारितेच्या चारित्र्याचेच वाभाडे निघतात. जणू तिच्यावर अत्याचार झाला हा तिचाच दोष!
अशा परिस्थितीत एका बलात्कारितेला आदार, प्रेम, आत्मसन्मान देणारा नायक `हमारा दिल आप के पास है' सारख्या बटबटीत कौटुंबिकपटात भेटला, तरी त्याचं स्वागतच करावसं वाटतं. कारण, निव्वळ निर्बुद्ध, उथळ `करमणूक' करणारे कौटुंबिकपट आणि अगदी तशाच हाताळणीचा पण गाभ्यात काही वेगळा- बंडखोर आशय मांडणारा `हमारा दिल...' सारखा सिनेमा यांना केवळ चित्रपटीय गुणवत्तेच्या तागडीत एकाच मापानं मोजणं अयोग्य ठरेल. ती चंगळ आपल्या अद्यापही दृक्निरक्षरच असलेल्या देशाला परवडणारी नाही. चित्रपटीय मनोरंजनाच्या अत्यंत प्राथमिक कल्पना बाळगणारा मोठा प्रेक्षकवर्ग असे सिनेमे बाह्यस्वरुपावरून `कौटुंबिक' मानून गाफीलपणे त्यांना गर्दी करतो. अशा धक्कादायक विषयाच्या मात्रेचे अगदी किंचितसे का होईना वळसे, गोडमिट्ट चिकटचिट्ट फॉर्म्युल्याच्या साखरगोळीतून त्याच्या गळी उतरतात, हे विसरून चालणार नाही.
गंमत म्हणजे सदैव पारंपारिक आणि कालबाह्य नीतीमुल्यांची तळी उचलून धरणाऱया दाक्षिणात्य कौटुंबिकपटांनीच असा आधुनिक बंडखोर आशय मांडण्याचाही एक फॉर्म्युला तयार केला आहे. नेहमीचा कौटुंबिक नाटय़मय मालमसाला, त्यात पेरलेली `नेत्रसुखद' वगैरे गाणी आणि क्वचित ओंगळपणाकडे झुकणारा ग्राम्य विनोद यात आधुनिक आशाय घुसवायचा आणि `पुरातन परंपरेचा हाच खरा अर्थ' अशा वरपांगी बिनतोड भासणाऱया ढोबळ युक्तिवादासह फिट्ट बसवायचा, अशी साधारण मांडणी.
वेंकटेश आणि सौंदर्या यांच्या एका सुपरहिट तेलुगू सिनेमावर बेतलेला `हमारा दिल...' हाच धडा गिरवतो. अत्यंत पातळ फुळकवणीच्या स्वरुपात का होईना, तो काही सत्त्व पुरवतो.
इथली प्रीती (ऐश्वर्या राय) ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातली आदर्शवादी मुलगी. भररस्त्यात एका गावगुंडानं (मुकेश ऋषी) एका माणसाला मारहाण करून भोसकल्याची घटना ती पाहते; पण गर्दीतल्या इतरांसारखी ती स्वस्थ बसत नाही, पोलिसांत तक्रार नोंदविते. परिणामी, या गुंडाचा धाकटा भाऊ (पुरू राजकुमार) तिच्यावर बलात्कार करतो.
या घटनेमुळं इभ्रत धुळीला मिळण्याच्या भयानं वडील तिला घरातून हुसकावतात आणि मैत्रिणीकडेही थारा मिळत नाही. तिला आसरा देतो तो अविनाश (अनिल कपूर). तिच्या धडाडीची आधीपासून माहिती असलेला, अविवाहित आणि एकटा राहणारा अविनाश लोकापवादाला न घाबरता तिला थेट आपल्या घरातच थारा देतो. समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आपल्या कंपनीत मोठय़ा पदावर नेमतो.
कालांतरानं तो तिच्यावरचं प्रेम व्यक्त करून लग्नाची मागणी घालतो, तेव्हा त्याला अनपेक्षितपणे नकार मिळतो. कारण, त्याच्यावर मनोमन प्रेम करणारी प्रीती त्याच्या प्रेमाला मात्र `उपकार' मानते आणि आपण त्याला `लायक' नसल्याचा गंड जोपासते. काही काळानं त्याचं प्रेम स्वच्छपणे प्रेम म्हणून स्वीकारण्याची तिची तयारी होते तेव्हा परिस्थितीनं आणखी एक वळण घेतलेलं असतं...
... टीव्हीवरून `हमारा दिल...'चे प्रोमोज- गाणी पाहिलेल्या मंडळींना हे (पक्षी : एवढंच) कथानक वाचून गोंधळून जायला होईल. `अविनाश आणि प्रीती हे नवराबायको नाहीत तरी एका घरात राहतात. त्यांच्याबरोबर दिसणारी मुलं त्यांची नाहीत, तरी ती त्यांना मम्मी- डॅडी म्हणतात. असं हे विलक्षण पण सुखी कुटुंब आहे', या आशयाचा प्रोमो आणि सिनेमातली गाणी पाहणाऱया प्रेक्षकांना त्या मुलांचा या कथानकात उल्लेख कसा नाही, असा प्रश्न पडेल. ही मुलं आणि त्यांच्याशी संबंधित ब्रह्मघोटाळा हा खरंतर मूळ कथेच्या प्रवाहातला अनावश्यक अडथळा आहे, शिवाय त्याच्याशी संबंधित माफक सस्पेन्सही आहे, म्हणून त्या ठिगळाचा उल्लेख टाळायची इच्छा होते.
बलात्कारातून आपण अपवित्र झालो आहोत, या भावनेनं पोखरलं जाणं, त्यातून मनात तयार होणारे गंड, प्रेमाला उपकार मानणं वगैरे प्रीतीच्या अंतरंगातल्या घडामोडींवर पटकथाकार- दिग्दर्शकांनी लक्ष केंद्रित केलेलं नाही. अविनाशचा पुरोगामी देवतास्वरुप आवेशही इतका एकांगी होतो, की तो उपकाराच्या भावनेविना, `खरोखरीच' प्रेमात पडण्यास पात्र असा `माणूस' आहे का, असा प्रश्न प्रीतीबरोबरच विचारी प्रेक्षकालाही पडतो. कारण, तिचं `पुनर्वसन' करण्याचा त्याचा आवेग इतका जबरदस्त की, तो तिला (शैक्षणिक अर्हता वगैरे न तपासता) थेट कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरच बसवतो. त्याची ठिकठिकाणची भाषणबाजीही डोकं उठवते. त्यामुळे, अविनाशच्या प्रेमाचा तात्काळ स्वीकार करून टाक बिनधास्त, असा सल्ला देणारी प्रीतीची मैत्रीण (तनाझ करीम) आणि अविनाशवर एकतर्फी प्रेम करणारी बडबडी बालमैत्रीण खुशी (खास भूमिकेत सोनाली बेंद्रे) या व्यक्तिरेखाच सिनेमात सर्वात खऱया आणि आकर्षक ठरतात.
बऱयाच विनोदी कलावंतांना एकत्र आणणारा एक विनोदी ट्रक सिनात आहे. हे सगळे अविनाशचे शेजारी आहेत. पण, हा संबंध जेवढयास तेवढाच. कारण, पुढे त्यांच्या उचापती अगदीच स्वतंत्रपणे चालतात. मनात येईल तेव्हा मनात येईल तो सण साजरा करणारा सटकू बंगाली (जॉनी लिव्हर), सतत नाइट डय़ुटीवर जाणारा पंजाबी पहेलवान (राणा जंगबहाद्दूर), तो जाताक्षणी मद्रासी शेजाऱयाला (अनुपम खेर) शयनगृहात घेणारी त्याची पत्नी (उपासना सिंग), या उपक्रमासाठी मद्राश्यानं झोपेत चालण्याचं नाटक करणं, सतत सरदाजीछाप प्रतिक्रिया देणारा सरदार (जसपाल भट्टी), आयुष्यभर एकच कोट घालून अस्खलित उर्दूत निरर्थक संवाद बोलणारा स्थानिक दिलीपकुमार (आबिद) अशा या मंडळींच्या व्यक्तिरेखा समजल्या तरी त्यांच्याकडून करवून घेतलेल्या कामगिरीचा अंदाज येईल. या सर्वांनी (अनुपम आणि जॉनी हे बेष्टच) झकास व्यक्तिगत कामगिरी करूनही सांघिक परिणाम उबगवाणा ठरतो.
अनिल कपूरच्या प्रगल्भत वावरामुळे अविनाशच्या व्यक्तिरेखेला योग्य वजन मिळतं खरं; पण क्लोजअपमध्ये स्पष्टपणे जाणवणाऱया वयामुळे `इतकी वर्षं कारा (अविवाहित) राहिल्यामुळेच हा अद्याप इतका एकांगी आदर्शवादी आणि अतिरेकी स्त्राeदक्षिण्ययुक्त राहिला आहे काय' अशी एक खोडसाळ शंकाही येते. ऐश्वर्याच्या व्यक्तिरेखेला सखोलता नसल्यानं तिच्या व्यावसायिक सफाईवरच समाधान मानावं लागतं. अन्य कलावंतांमध्ये प्रीतीच्या आईच्या भूमिकेतील मराठी नाटय़अभिनेत्री विदुला मुणगेकर तसंच वडिलांची भूमिका साकारणारा कलावंत हे लक्षवेधी कामगिरी करून जातात. सोनाली बेंद्रे आणि तनाझ करीमही उल्लेखनीय. अत्याचारापूर्वी हात जोडून नमस्ते करणाऱया खलनायकाच्या भूमिकेत पुरु राजकुमारला स्टाईलबाजीपलीकडे वाव नाही, पण, त्याला सेकंड इनिंग मिळण्यासाठी या भूमिकेचा फायदा होऊ शकतो.
दृश्यरचना, प्रकाशयोजनेतून काही आशय मांडणारे कबीर लालचे छायालेखन आणि अन्य निर्मितीमूल्ये ठाकठीक. संगीताच्या बाबतीत मात्र शीर्षकगीत वगळल्यास सुमार मामला आहे. संगीतकार संजीव- दर्शन हिंदी सिनेसृष्टीत फारच लवकर (आणि फारच चुकीच्या अर्थानं) रुळलेले दिसतात. `मन'मधल्या `काली नागन के जैसी जुल्फे तेरी' या हिट गाण्याची नक्कल त्यांनी इथे खपवली आहे, तीही आपल्या तिसऱयाच सिनेमात.
दिग्दर्शक सतीश कौशिकला चित्रपटाच्या तांत्रिक अंगांची उत्तम समज आहे आणि त्याची हाताळणी सफाईदार असते, हे `प्रेम'पासून `हम आपके दिल मे रहते है' पर्यंत प्रत्येक सिनेमात दिसून आलंय. पण, त्यापलीकडे काहीही यातल्या कोणत्याच सिनेमात दिसलं नाही आणि दुर्दैवानं याही सिनेमात दिसत नाही.
सबब, `हमारा दिल...'चा मूळ गाभा बंडखोर आशयामुळे स्वागतार्ह वाटला तरी दक्षिणी कौटुंबिकपट पाहताना सद्गतित वगैरे होणाऱया कुळीतल्या प्रेक्षकांपलीकडे इतरांना त्याची शिफारस करता येत नाही, हे दुर्दैव.
(महाराष्ट्र टाइम्स)
No comments:
Post a Comment