एखादा नवा दिग्दर्शक जेव्हा
आपला पहिलाच सिनेमा प्रेक्षकांपुढे आणतो,
तेव्हा सिनेमाररिकांमध्ये त्याच्याबद्दल एक स्वागतशील उत्सुकता असते.
कारण, स्वत:ची ओळख निर्माण
करण्यासाठी तो कथानकापासून हाताळणीपर्यंत कशात ना कशात, काही
ना काही ताजे देईल, अशी अपेक्षा असते.
दुर्दैवानं श्रीकांत आर. शर्मा या नव्या दिग्दर्शकाचा पहिलावहिला `लावारिस'
या निकषांवर कमालीचा अपेक्षाभंग करतो. रस्त्यावर
मवालीगिरी करीत वाढलेल्या एका अनौरस तरुणाच्या आयुष्यात एका सज्जन लढाऊ वकिलाच्या भेटीमुळे
घडणाऱया परिवर्तनाची ही कथा `मशाल', `अंकुश'पासून गेल्या वर्षीच्या `गुलाम'पर्यंतच्या अनेक सिनेमांमध्ये येऊन गेली आहे. वर उल्लेखलेल्या
प्रत्येक सिनेमात कथानकाचा गाभा तोच असला, तरी त्या-त्या काळात वेगळ्या ठरलेल्या, तत्कालीन वास्तवाशी नाते
सांगणाऱया मांडणीमुळे हे सिनेमे लक्षवेधी ठरले होते. अशा प्रकारचं
कोणतंही `पोटेन्शियल' नसलेली, सलीम-जावेदची `उरवळ' वाटावी अशी हनी इराणीची ही कथा-पटकथा दिग्दर्शकानं पहिल्या
सिनेमासाठी का निवडली असावी, हे आश्चर्यच आहे.
कॅप्टनदादा (अक्षय खन्ना) आणि त्याचे मवाली मित्र एका वस्तीत कालरा
(गोविंद नामदेव) या गुंडासाठी हप्तावसुलीचं
काम करतात. तिथे राहायला आलेला वकील आनंद सक्सेना (जॅकी श्रॉफ) आणि त्याची पत्नी कविता (डिम्पल) त्यांच्या दादागिरीला जुमानत नाहीत. कॅप्टन आणि गँगशी आनंद तर्ककठोरपणे वागतो, तर कविता मात्र
कॅप्टनच्या व्यथावेदना समजून घेणारी मोठी बहीण, मैत्रीण बनू पाहते.
त्यातच, आनंदची सहायिका अंशू (मनीषा कोईराला) कॅप्टनच्या प्रेमात पडते. तिच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी कॅप्टन स्वत:ला बदलण्याचा
प्रयत्न करतो. हे कालराला रुचत नाही. त्यात
अंशू ही कालराची संगनमत केलेल्या पोलिस कमिशनरची पुतणी असते. त्यातून उद्भवलेल्या संघर्षातून भरपूर गोळीबार, रक्तपात
घडून अखेरीस नायक-नायिका एकत्र येतात.
आनंद-कविता
यांचा कॅप्टनला `हीरो' मानणारा चुणचुणीत
छोकरा, हॉस्पिटलच्या आवारात एकमेकांच्या नकळत एकाच पेशंटला भेटायला
येणाऱया कॅप्टन-अंशूमधील प्रेमप्रकरण, कॅप्टन
आणि त्याच्या मित्रांमधल्या गमतीशीर उखाळ्यापाखाळ्या यातून सिनेमाचा पूर्वार्ध `रुटीन' असला, तरी सुसह्य होतो.
मात्र, उत्तरार्धात त्यावर बोळा फिरतो आणि प्रेक्षकांच्या
सहनशक्तीचा कडेलोट करणाऱया सहनशक्तीचा कडेलोट करणाऱया रक्तरंजित प्रसंगांची मालिका
सुरू होते.
नायकाला पोतंभर गोळ्या झाडून आणि गॅलनभर
रक्त गाठूनच सन्मार्ग गाठायचा होता, तर आधीची मतपरिवर्तनाची व्यर्थ
भाषणबाजी केली कशाला, असा प्रश्न प्रेक्षकाला पडतो. कमलेश पांडे यांचे संवाद अधूनमधून पिटातल्या टाळ्या-शिटय़ा
मिळवतात. क्वचित्प्रसंगी (उदा. नायक आपण सामूहिक बलात्काराचं अपत्य आहोत, हे सांगतो
तेव्हा) बाल्कनीतल्या संवेदनांना धक्काही देतात. पण, त्यात गांभीर्याऐवजी सनसनाटीबाजपणाच अधिक आहे.
कला-दिग्दर्शक
आर. वर्मन यांनी सिनेमासाठी बस्तीचा मोठा सेट लावला आहे,
तोही अतिशय फिल्मी पद्धतीचा, डुगडुगता.
नजीब खान यांनी या सेटवर चित्रण करताना त्यातील कृत्रिमता झाकणारे कोन
किंवा दृश्याकार निवडलेले नाहीत. बस्तीमधले जीवनव्यवहार दर्शविणाऱया
दुय्यम कलावंतांच्या हालचाली आणि एकूण वावर साचेबद्ध असल्याने सिनेमाचा `खोटे'पणा सतत नजरेला खुपत राहतो. दिग्दर्शक श्रीकांत शर्मा यांनी व्याकरणशुद्ध आणि (तांत्रिकदृष्टय़ा)
सफाईदार चित्रण केले असले, तरी अनेक प्रसंगांत
पात्रांचे बोलणे आणि पात्रांचे `ऐकणे' यांच्यातील
मेळ नीट साधला न गेल्याने प्रसंगाचा एकसंध परिणाम घडत नाही. संकलक
आर. राजेन्द्रन यांनीही या कामी अधिक मेहनत घ्यायला हवी होती.
सर्व कलावंतांचा ठीकठाक अभिनय ही
`लावारिस'ची त्यातल्या त्यात बरी बाजू.
अक्षय खन्नाचा चॉकलेटी चेहरा आणि बेतास बात शरीरयष्टी पाहता तो कॅप्टन`दाद' बनण्यास सर्वथैव अयोग्य होता. त्याच्या चेहऱयाला आणि शरीरभाषेला वळण देऊन राकट कॅप्टनदादा घडला असता,
तर कदाचित `लावारिस' किमान
प्रेक्षणीय झाला असता. पण, लेखक-दिग्दर्शकांनी अक्षयची गुणवत्ता कसाला लावून त्याला कॅप्टन बनवण्याऐवजी कॅप्टनचं
पात्रच वळवून-वाकवून अक्षय खन्ना बनवलंय. अक्षयचा कालराकडून होणारा `चिकना' असा उल्लेख, कविताने त्याचं हसू लहान मुलासारखं आहे असं
सांगणं, यातून लेखक-दिग्दर्शकांची `शॉर्ट-कट'ची हौस दिसून येते.
मुळात `दादा' म्हणून `टेरर'न वाटणाऱया अक्षयमधलं परिवर्तन त्यामुळेच रंगत नाही.
पांढऱया-पांढऱयाचा `कॉन्ट्रास्ट'
कसा प्रभावी होईल?
तरीही अक्षयमधली नैसर्गिक गुणवत्ता
त्याचा पडद्यावरील वावर सुखद बनविते. त्याचा आत्मविश्वासपूर्ण
वावर लेखक-दिग्दर्शकांना सावरून घेतो. पण,
अलीकडचे त्याचे सिनेमे पाहता आपली अभिनशक्ती तो इतरांना सावरण्यातच वाया
घालवून टाकेल, अशी भीती वाटू लागली आहे. जॅकी श्रॉफची समंजस आणि तडफदार `बडे भय्या' साकारण्यात `मास्टरी' आहे.
इथेही तो तेच सफाईने करतो. डिम्पलची भाषणबाज दीदी
नेहमीचा आक्रस्ताळा आरडाओरडा करीत नाही, हे आपलं सद्भाग्यच.
ती कसर गोविंद नामदेव भरून काढतो. या गुणी कलावंतानं
कालरा साकारताना स्वत:च्याच भूमिकेची- `सत्या'मधील भाऊची नक्कल मारावी, हे क्लेशकारक आहे.
मनीषा कोईरालाची असल्या सजावटीच्या
भूमिकांसाठीची `नभिनया'ची खास शैली आहे.
ती (समोर अक्षय असल्यामुळे की काय?) तिने `लावारिस'मध्ये वापरलेली नाही,
हेच पुष्कळ. मात्र, तिची
संवादफेक अशा भूमिकांमुळे इतकी वेगवान आणि सदोष का होते, हे समजत
नाही.
राजेश रोशनच्या संगीताचा एक साचा
ठरलेला आहे. त्याच्या कोणत्याही सिनेमात एक ठेकेबाज गोड युगुलगीत
(इथे `आ कहीं दूर चले जाये हम'),
एक प्रयोगशील संथ लयीचं गाणं (इथे `मेरे दोस्तों मुझे आजकल') आणि एक पाश्चात्य चालीवरून
थेट उचललेलं गाणे (इथे `ऍक्वा'च्या बार्बी गर्ल'वर बेतलेलं `तुमने
जो कहा') आणि बाकीची अदखलपात्र गाणी असतातच. इथे गीतकार जावेद अख्तर असल्याने गाण्यांचे शब्द अर्थवाही आहेत, पण गाण्यांच्या `सिच्युएशन' आणि
`टेकिंग'मध्ये कणमात्र नाविन्य नाही.
जुन्या `लावारिस'मधल्या `अपनी तो जैसे तैसे'ची सुमार नक्कल करणारे `तुम जो फिरते हो लंबी कारों में' हे गाणं तर सिनेमातून
पूर्ण कापण्याच्या पात्रतेचे आहे. यात सुनीता रावचा `स्पेशल अपिअरन्स' अगदी फुसका झाला आहे. `आ कहीं दूर चले जाये हम' हे सिनेमातलं सर्वाधिक लोकप्रिय
गाणं ऐन क्लायमॅक्सच्या `मारो- काटो'च्या गदारोळात घातल्याने वाया गेलं आहे.
एकूणात, या
`लावारिस'वर प्रेक्षकांकडूनही वात्सल्याचा
वर्षाव होणं कठीण आहे.