Monday, March 14, 2011

एका लग्नावर दोन साखरपुडे फ्री!!! (हम साथ साथ है)


एकूण सिनेमा तीन तास आठ मिनिटांचा. त्यातला अडीच तास सिनेमात घडत काहीच नाही. म्हणजे `अब कहानी और एक मोड लेती है' छापाचं काही घडत नाही. एका चित्रपट महोत्सवातून दुसऱया महोत्सवात फिरणाऱया, चित्रपट मंडळांच्या रसिक सभासदांखेरीज कुणालाही जो पाहण्याचे भाग्य सहसा लाभत नाही, अशा एखाद्या चित्रपटात हे घडलं असतं (म्हणजे काहीच घडलं नसतं), तर त्यातली प्रयोगशीलतेचा किती उदोउदो झाला असता. पण हे सगळं जेव्हा लक्षावधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, अशा रीतीनं प्रदर्शित होणाऱया, स्टार्सचा, गाण्या-बजावण्याचा भरणा असलेल्या, मुख्य प्रवाहातल्या सिनेमात घडतं, तेव्हा मात्र तो 'लग्नाचा व्हिडिओ आल्बम' तरी ठरतो किंवा एका कुटुंबाचा जंगी फॅमिली व्हिडिओपट.
कथापटांच्या (फीचर फिल्म) लेबलाखाली विकला जाऊनही लंबीचवडी कथा न सांगणारा `हम आपके है कौन?' प्रदर्शित झाला, तेव्हा जाणकारांनी नाकं मुरडली होती. सामान्य प्रेक्षकांनी तो इतका डोक्यावर घेतला की, तो हिंदीतला सर्वाधिक उत्पन्न कमावणारा सिनेमा झाला. `हम आपके...'च्या यशाची कारणं काहीही असली, तरी `हिंदी सिनेमाचा प्रेक्षक `गोष्ट'च पाहायला येतो', ही समजूत त्यानं मोडीत काढली, हे महत्त्वाचं.
व्यावसायिक चित्रपटसृष्टीत एवढा मोठा आणि यशस्वी प्रयोग करणाऱया सूरज बडजात्यानं आता `हम साथ साथ है'मध्ये त्याच प्रयोगाची पुनरावृत्ती केली आहे. अधिक मोठय़ा प्रमाणावर म्हणजे `हम आपके...'मध्ये एका वेळी कॅमेऱयासमोर १५ माणसं असतील, तर `हम साथ...'मध्ये एका फ्रेममध्ये ४५ माणसं दिसतात. कारण सोप्पंय, `हम आपके...' एका लग्नाची गोष्ट सांगणारा सिनेमा होता, तर `हम साथ...' हा एक लग्न आणि दोन साखरपुडय़ांची गोष्ट सांगतो.
इथे लग्न होतं विवेक (मोहनिश बहल) आणि साधना (तबू) यांचं. विवेक हा रामकिशन (आलोकनाथ) आणि ममता (रिमा) या दाम्पत्याचा मोठा मुलगा. धनाढय़ व्यावसायिक असलेले रामकिशन आपल्या भल्यामोठय़ा कुटुंबासह एका प्रासादतुल्य हवेलीत राहतात. `सुसंस्कारां'च्या आणि परस्परप्रेमाच्या धाग्यांनी बांधलेल्या या परिवारात विवेक, विनोद (सैफ अली खान) आणि प्रेम (सलमान खान) ही रामकिशनची गुणी मुलं, मुलगी संगीता (नीलम), जावई आनंदबाबू (महेश ठाकूर), विवेकचा भावासारखाच मित्र अन्वर (शक्ती कपूर), ममताचा भाऊ मुलांचा मामा (अजित वाच्छानी), मामी (हिमानी शिवपुरी), रामकिशनचा मित्र (सतीश शाह), ममताच्या फटाकडय़ा मैत्रिणी (कल्पना अय्यर, जयश्री टी., शीला शर्मा) आणि प्रसंगोपात्त जे कोणी वेळी अवेळी येऊन टपकतील, ते सगळे पाव्हणेरावळे अशा साऱयांचा समावेश आहे.
परदेशात उच्चशिक्षण घेऊन परतलेली साधना एका हातानं अधू असलेल्या विवेकचा आनंदानं पती म्हणून स्वीकार करते. त्यांच्या विवाहानिमित्त साजऱया होणाऱया जंगी सोहळयामध्ये विनोदची प्रेयसी सपना (करिश्मा कपूर), प्रेमची डॉक्टर प्रेयसी प्रीती (सोनाली बेंद्रे) याही सहभागी होतात. नवनवे एथ्निक, डिझायनर कपडे घालून, हसत-खेळत, नाचत-गात, मजेत फिरत मंडळी आयुष्याची पिकनिक साजरी करतात. त्यात विवेक-साधनाचं लग्न होतं. विनोद-सपना आणि प्रेम-प्रीती या जोडय़ांनाही प्रेमकूजनाची, प्रणयाराधनाची संधी मिळत जाते. त्यांची एकमेकांमधली `गुंतवणूक' लक्षात घेऊन घरातले बडेबूढे त्यांचेही वाङ्निश्चय करून टाकतात.
सिनेमात अडीच तास हेच घडतं नंतर मात्र कथानक एकदम घडू लागतं. संगीताचा मोठा दीर अचानक तिच्या नवऱयाची, मालमत्तेतली कपर्दिकही न देता, व्यवसायातून हकालपट्टी करतो. ममताच्या मंथरा मैत्रिणी आणि सपनाचा शकुनी बाप (सदाशिव अमरापूरकर) ममताच्या घरातही हेच महाभारत घडेल, असा इशारा ममताला देतात. त्यासाठी विवेकच्या सावत्रपणाचा उपयोग करून घेऊन घरात रामायण घडवून आणतात. ममताही कैकयीचा अवतार धारण करून विवेक-साधना यांना वनवास भोगायला लावते. पण थोडाच काळ! कारण रामकिशनची संस्कारशील मुलं आणि भावी सुना आपल्या रामभैय्याचा वनवास संपवून सगळं कुटुंब पुन्हा एकत्र आणतात आणि सिनेमाचं नाव सार्थ ठरवतात.
सिनेसृष्टीत अर्धशतकी वाटचाल केलेल्या `राजश्री प्रॉडक्शन'नं आजतागायतच्या चित्रपटनिर्मितीत काही पथ्यं आवर्जून पाळली आहेत. हिंसाचार, लैंगिकतेचा वासही नसलेले, कर्मठ हिंदू संस्कार घडवू पाहणारे, शुद्ध तुपातल्या मिठाईसारखे साजुक आणि भावभावनांनी थबथबलेले सिनेमे `राजश्री' नं दिले आहेत. असे सिनेमे चालण्याचा हंगाम नसतानाही हट्टानं दिले आहेत. या संस्कारशील निर्मितीचं बाळकडू पिऊन मोठा झालेला सूरजसारखा घरचाच लेखक-दिग्दर्शक लाभल्यामुळं `राजश्री'च्या संस्कार केंद्रा'ला चांगलीच बरकत आली आहे.
`एकत्र कुटुंब, मोठे कुटुंब, सुखी कुटुंब' असा सूरजनं `हम साथ...' मधून दिलेला संस्कार आहे. खरंतर आधुनिक काळात अगदीच गैरलागू ठरेल असा, कालविसंगत- जुनाट भासणारा हा संस्कार... अव्यवहारीसुद्धा. याशिवायही कालबाह्य आणि काहीवेळा संतापजनक वाटणाऱया इतर संस्कारांचे डोसच आहेत या सिनेमात. `जिथे घरातले सगळे पुरुष कामाधंद्यात मग्न असतील आणि सकाळी- संध्याकाळ त्यांना घरच्या बायकांच्या हातचं सुग्रास अन्न मिळत असेल, तेच खरं आदर्श घर आहे', असं इथं एक 'पात्र' सांगतं. इथल्या समस्त स्त्रीवर्गाला आपापल्या `मर्दा'पुढे गोंडा घोळण्यापलीकडे आणि देवरजी, ससुरजी वगैरे अन्य पुरुषवर्गाबद्दल आदर दाखवत फिरण्यापलीकडे काही कामच नाही. अगदी डॉक्टर असलेली प्रीतीही सोयीस्कर दीर्घ सुटी काढून प्रेमचे प्रेमकटाक्ष झेलण्यात आयुष्याची इतिकर्तव्यता मानताना दिसते. या सिनेमात काही व्यक्तिमत्व असलेल्या बायका आहेत, त्या ममाताच्या कजाग, घरभेदी मैत्रिणीच, हा योगायोगही लक्षणीय.
मुळात परस्परप्रेम टिकत नसेल आणि व्यावहारिकदृष्टय़ा गैरसोयीचे असेल, तर, एकमेकांशी अकारण जखडून घेऊन एकत्र कुटुंबपद्धती टिकवायची कल्पना सांस्कृतिकदृष्टय़ा श्रेष्ठ मानणेच भंपकपणाचे आहे. आपल्या समाजात अशी कुटुंबपद्धती लयाला जाऊन विभक्त कुटुंबपद्धती रुजत जाण्याची काही सामाजिक, आर्थिक आणि व्यावहारिक कारणे आहेत. त्यांचा विचार करण्याची सूरजला गरज भासत नाही. त्यामुळे, त्याच्या सिनेमातली सगळीच माणसे पुठ्ठय़ाच्या आकृत्यांसारखी सपाट आणि एकच एक प्रतिनिधीक प्रवृत्ती दर्शवणारी सदगुणसंपन्न पात्रे आहेत. त्यांना वेठीला धरून एकत्र कुटुंबपद्धती संपूर्णपणे दोषरहितच असल्याचा हेका धरल्यामुळे या सिनेमावर वस्तुनिष्ठ विश्लेषणाचा आरोप कोणी करू धजणार नाही. म्हणजेच, हा सिनेमा पाहून विभक्त कुटुबंपद्धतीत राहणारा कोणीही शहाणा माणूस पुन्हा एकत्र कुटुंबाकडे वळायला प्रवृत्त होणार नाही. (पु.लं.ची `बटाटय़ाची चाळ' वाचून कुणी ब्लॉकवासी कितीही भारावला, तरी पुन्हा चाळीत जातो का राहायला?) तरीही हा सिनेमा पाहून तो काहीसा सग्दतित होईल, `गेले ते दिन गेले'छाप हळहळही वाटेल त्याला.
कारण या सिनेमाचं स्वरूप एखाद्या देवळासारखं आहे. देवळात नमस्कार करून, हलक्या हाताने दोन थोबाडीत मारून घेऊन आपण नित्याच्या कर्माला, दैनंदिन पापे करायला मोकळे होतो. तसंच या सिनेमातली कौंटुबिक प्रेमाची खोटीखोटी असोशी पाहून हळूहळून, गदगदून घ्यायचं आणि पुन्हा आपल्या सुखी छोटय़ा कुटुंबात रमायला मोकळं व्हायचं. असं अनोखं 'पापक्षालन' पुरवतो हा सिनेमा. समाजातील लोप पावलेल्या व्यवस्थांविषयी एक सुप्त आकर्षण असतं प्रत्येकाच्या मनात. त्या आकर्षणाला स्मरणरंजनात्मक न्याय देण्यात हा सिनेमा बऱयापैकी यशस्वी होतो.
त्यासाठीच सूरज रूढ अर्थानं कथात्मक असं काही बराच काळ घडवत नाही सिनेमात. सणासुदीला, कौंटुबिक सोहळ्यांमध्ये आढळणारं उत्सवी चैतन्यशील वातावरण तो पडद्यावर निर्माण करतो आणि त्यात प्रेक्षकाला गुंगवून ठेवतो. मग, परीटघडीचे कपडे, दागदागिने, गृहसजावट, पारंपारिक प्रथा, रंगांची उधळण अशा बाह्य सजावटीलाच प्राधान्य मिळतं त्याच्या सिनेमात. माणसंही अशीच दिखाव्याची आणि मूल्यंही तशीच वरवरची.
पण, तरीही कुठेतरी या खोटय़ा भासण्याइतक्या तकलादू मांडणीतही तो फिल्मी स्नेहभावाचा थोडाफार आत्मा भरण्यात यशस्वी होतोच. इथेही रामाचा अवतारच असा विवेक, साक्षात सीतामाई साधना, मदर तेरेसांचं पुस्तक वाचत असताना फोटो काढून घेतल्यामुळे कुटुंबात विचारवंत देवमाणूस गणला जाणारा प्रेम, त्याच्यावर मुग्ध प्रेम करणारी प्रीती, खटय़ाळ विनोद आणि तितकीच खोडकर सपना ही मुख्य पात्रं हळूहळू सिनेमापुरती खरी वाटू लागतात प्रेक्षकाला. चांदोबातल्या गोष्टीत एकरंगी पात्रं असायला कुणी हरकत घेतं का?
एकेका प्रसंगात भल्यामोठय़ा संख्येनं व्यक्तिरेखा गोळा करून त्यांच्यातल्या हालचाली, संवादांचा एकसंघ गोफ विणण्याची कलाही सूरजला अवगत आहे. त्याची प्रदीर्घ दृश्यं अत्यंत कुशल अशा दृश्यविभागणीमुळंच कंटाळवाणी होत नाहीत. दृश्यचौकटीत प्रत्येक पात्राला काही अर्थपूर्ण बिझनेस देऊन त्यांचा एकत्र वावर सहज भासविण्याचं कसब अवघड आणि म्हणूनच दाद देण्याजोगं आहे. मोठे प्रसंग माऊंट करण्याचा वस्तुपाठच या सिनेमात मिळतो. छायालेखक राजन किनागी यांनी सिनेमाचा एकंदर पोत लक्षात घेऊन सर्व पात्रांवर टय़ुबलाईटसारखा सपाट प्रकाश राहील अशी, खोलीची (डेप्थ) मितीच न देणारी, प्रकाशयोजना केली आहे. सूरजचा कॅमेरा सहसा लो किंवा हाय अँगलला जात नाही. तो पात्रांच्याच पातळीवर राहून त्यांच्यातले दैवी भासणारे मानवी गुण टिपतो, हेही लक्षणीय आणि अभ्यसनीय.
गाण्यांच्या जागा हाही या दृष्टीनं अभ्यासता येण्याजोगा विषय. सर्व कुटुंबाची ओळख नव्या सुनेला करून देणारं `सुनो दुल्हन' हे पॅरडी साँग, मुलांच्या लहानपणच्या आठवणींना मोठपणाशी जोडणारं `एबीसीडी', विनोद- सपना यांच्या `बचपनका प्यार'ची गुंफण करून घेणारं `मैय्या यशोदा' ही सिच्युएशनल गाणी पडद्यावर संदर्भासह पाहिल्याखेरीज नुसत्या कॅसेटवर गोड वाटत नाहीत. आईवडिलांना परमेश्वराची उपाधी देणारं `ये तो सच है' आणि केवळ आयटेम साँग म्हणून सादर होणारं `म्हारे हिवडामे नाचे मोर' ही गाणीही रसभंग करीत नाहीत. रामलक्ष्मण यांच्या संगीतात `हम आपके...'सारखी खास गंमत नसली, तरी ही गाणी सिनेमात एंजॉय करता येतात.
कलादिग्दर्शन (बिजॉन दासगुप्ता), वेशभूषा (शबिना खान, मनीष मल्होत्रा इ.), केशभूषा, रंगभूषा यातून एका हरवलेल्या आणि सणासुदीलाच तात्पुरत्या गवसणाऱया पारंपारिक संचिताचा अभ्यास निर्माण करण्यात आला आहे.
दिवाळीच्या किल्ल्यासारख्या असल्या सिनेमात व्यक्तिरेखांना किल्ल्यावरच्या चित्रांइतपच वाव असणार हे उघड आहे. सगळा फौजफाटय़ाकडून सूरज एका कौटुंबिक छापाची, बिनचेहऱयाची कामगिरी करवून घेतो. एकतर संत, नाहीतर मंबाजी, सालोमालो अशा ब्लॅक अँड व्हाइट पात्रांच्या गोतावळ्यात मानवी पातळीवरच्या चटपटीत नैसर्गिक वावरामुळे सैफ आणि काही अंशी करिष्मा मनाला भावतात.
कधीही कालबाह्य झालेली पण परंपरानिष्ठ भारतीय मनांना आजही आतून सुखावणारी मूल्यं मांडून एनआरआय मंडळींना विदेशातच राहून आपल्या मातीचा सुगंध हुंगल्याचा आभास देणारी आणि निवासी भारतीयांना परंपरा, संस्कृती, संस्कारांबद्दल उगाचच गदगदविणारी कृतक कौटुंबिक चित्रपटांची एक शैलीच सूरज बडजात्यानं घडविली आहे. या शैलीच्या सिनेमात त्याचा हात धरणारा दुजा दिग्दर्शक नाही, हे `हम साथ...'मध्ये स्पष्ट होतंच. पण, मुळात ही जातकुळीच मान्य नसलेल्यांनी या प्रायोगिक सिनेमाच्या वाटेला जाऊ नये, हेच इष्ट.

(महाराष्ट्र टाइम्स) 

No comments:

Post a Comment