स्त्री असो की पुरुष... माणूस असतो अर्धामुर्धाच. वय वाढतं, समज वाढते, तसं या अपूर्णतेचंही भान येतं आणि ओढ लागते पूर्ण होण्याची. मग तो/ती आपला अर्धा हिस्सा- जोडीदार शोधू लागतात.
यातूनच विवाहाची परंपरा रूढ झाली असावी. ज्याच्या/जिच्यामुळं एकमेकांना परिपूर्णता येते, अश व्यक्तींनी एकमेकांबरोबर आयुष्य व्यतीत करावं, अशी मूळ कल्पना असणार. वास्तवात मात्र, ज्याच्याशी/ जिच्याशी विवाह होईल, त्या व्यक्तीलाच `बाय डिफॉल्ट' जोडीदार `मानायची' पद्धत रूढ झाली, भले त्याच्यात/ तिच्यात आपला अर्धा हिस्सा गवसत नसला तरीही.
प्र. ल. मयेकर लिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित `जोडीदार' हा अशा त्रांगडय़ाचा बऱयापैकी थेट आणि धीट वेध घेऊ पाहतो.
निष्ठेच्या कल्पनेनं (अनेकदा `सवयी'मुळं किंवा कधीकधी तर निव्वळ आळसापायी) वैवाहिक बंधनात बांधला गेलेला असमाधानी माणूस मनातल्या आदर्श जोडीदाराचे गुण वैवाहिक जोडीदारातच शोधतो, त्याच्या/ तिच्या काल्पनिक प्रतिमेशी मनोमन संसार करतो. पण, ही हुबेहूब प्रतिमा प्रत्यक्षात साकार होऊन आली तर? हीच `जोडीदार'ची मध्यवर्ती कल्पना आहे.
इथला असमाधानी नवरा आहे मनोहर देशमुख (मिलिंद गुणाजी) हा कर्तबगार पण पदवीअभावी आर्थिक उत्कर्ष साधू न शकलेला इंजिनीयर. त्याची बायको सुनीती (मृणाल देव- कुलकर्णी) ही दोन मुलांची आदर्श माता आहे, पत्नीची बहुतांश कर्तव्यंही ती नेकीनं पार पाडते; पण तिच्यातली अभिसारिका, `प्रेयसी' जवळपास लोप पावली आहे. शरीरसुखाची ओढ तिच्यात उरलेली नाही. त्यामुळे मनोहर उदास चिडचिडा झाला आहे.
अशात सुनीती आपल्या गैरहजेरीत विश्वास (रमेश भाटकर) या आपल्याच मित्राबरोबर रंग उधळत फिरते, अशी माहिती मिळाल्यावर मनोहर पिसाटतो. स्वत:च्या डोळ्यांनी त्या दोघांना एकत्र पाहिल्यावर उन्मळतो, संताप, द्वेष, त्वेष, असूया, दु:खानं करपतो.
पण योगायोगानं त्याची गाठ आदितीशी (मृणालचा डबल रोल) पडते, तेव्हा त्याच्या मनातली जळमटं झडतात. एका प्रख्यात उद्योगसमूहाची कर्तबगार मालकीण असलेली आदिती म्हणजे सुनीतीचंच हुबेहूब प्रतिरूप. ती मनोहरची गुणवत्ता हेरते. त्याला मोठय़ा पदावर नोकरी देते. चांगला पगार, फ्लॅट, मानमरातब आणि कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळाल्यानं मनोहरची स्वप्न साकार होऊ लागतात. त्याचबरोबर सुनीतीमध्ये न मिळालेला अर्धा हिस्सा त्याला आदितीमध्ये गवसल्याचा भास होऊ लागतो. आदितीला मनोहर सहकारी आणि मित्र म्हणून हवाहवासा वाटते. कारण, ती प्रेम किंवा लग्नाच्या बेडय़ांविनाही स्त्राe पुरुष मैत्री शक्य आहे, अशा विचारांची. या दोघांतल्या जवळिकीनं अस्वस्थ झालेली सुनीती मनोहरला ही नोकरी सोडण्याचा निकराचा आग्रह करते तेव्हा तो संसारातून निघून जाण्याचा पर्याय पसंत करतो. आदितीबरोबर राहू लागतो. काही काळानं तो आदितीमध्ये सुनीतीचे- `पत्नी'चे गुण शोधू लागतो आणि फसतो. प्रेयसी आदिती आणि उद्योजिका- `मालकीण' आदिती यांच्यात गल्लत केल्यावर त्याचा `भ्रमनिरास' होतो. मग साठा उत्तराच्या समस्त कहाण्या पाचा उत्तरी जशा सुफळ- संपूर्ण होतात, तशीच ही कहाणीही `अखेर मुलांचे पप्पा परतले' पद्धतीनं किनाऱयाला लागते.
चाळीतलं टिपिकल वातावरण, देशमुख कुटुंबियांचे शेजारी (विजय चव्हाण, सविता मालपेकर), मनोहरच्या हँडसम व्यक्तिमत्त्वावर भाळलेली तरुण शेजारीण (लीना भागवत) यांच्या ताण्याबाण्यातून तसंच मनोहरची शारीर ओढ आणि सुनीतीचा निरुत्साह दर्शविणाऱया संयत प्रसंगातून लेखक- दिग्दर्शकांनी पूर्वार्ध रंजक आणि ओघवता केला आहे. विश्वास आणि आदिती यांच्या आगमनानंतर मात्र ही कहाणी कृतक नाटय़निर्मितीच्या हव्यासापोटी अगम्य आणि अतर्क्य वळणं घेऊ लागते.
सगळ्यात गोंधळ उडवते ती विश्वासची व्यक्तिरेखा. हा या कहाणीतला एक प्रकारचा सुत्रधार. त्याचा एकाच पत्नीशी दोनदा विवाह झाला आहे. म्हणजे काही गैरसमजांमुळे घटस्फोट झाल्यानंतर उपरती होऊन त्यानं पहिल्या पत्नीशीच दुसऱयांदा विवाह केला आहे. लग्नं फसतात कशी, या विषयातला हा अधिकारी पुरुषच. मात्र, तोच सुनीती आणि मनोहर यांच्यातली विसंवादाची दरी रुंदावायला कारक ठरताना दिसतो, तेव्हा प्रेक्षक हतबुद्ध होतो.
सुनीती- आदिती एकमेकींसारख्या दिसतात, हे सर्वात आधी ठाऊक असलेला हा इसम (निखळ आश्चर्याच्या धक्क्य़ातूनही) हा योगायोग कुणालाच सांगत नाही. त्याला आदितीबरोबर पाहिल्यामुळेच सर्वांचा सुनीतीबद्दल गैरसमज होतो, हे समजल्यावर तो हा गैरसमज दूर करत नाही. संतप्त मनोहर त्याच्या कानफटात खेचतो, तेव्हाही तो त्याला वस्तुस्थिती सांगत नाही. लेखक- दिग्दर्शकांना सिगरेटच्या धुराची वलयं सोडणारी मॉडर्न आदिती एकदम मनोहरसमोर आणून त्याला आणि प्रेक्षकांना धक्का द्यायचाय, म्हणून हा उपद्व्याप. पण त्यात ही व्यक्तिरेखा भुसभुशीत होते त्याचं काय?
संशयग्रस्त मनोहरच्या वागण्यामुळं सुनीतीची तगमग होत असताना तसंच पुढे मनोहर आदितीकडे खेचला जात असताना हा `मित्र' कोणतेही मित्रकर्तव्य पार पाडताना दिसत नाही. शेवटी सुभाषितप्रचुर मोनोलॉगी भाषणबाजी करून तो त्वज्ञाचा आव आणतो खरा! पण आधीच्या भलत्या उचापतींमुळे तो एक तटस्थ निरीक्षकही वाटत नाही.
संशयग्रस्त मनोहरच्या वागण्यामुळं सुनीतीची तगमग होत असताना तसंच पुढे मनोहर आदितीकडे खेचला जात असताना हा `मित्र' कोणतेही मित्रकर्तव्य पार पाडताना दिसत नाही. शेवटी सुभाषितप्रचुर मोनोलॉगी भाषणबाजी करून तो त्वज्ञाचा आव आणतो खरा! पण आधीच्या भलत्या उचापतींमुळे तो एक तटस्थ निरीक्षकही वाटत नाही.
सुनीतीपेक्षा `वेगळी' दाखवण्यासाठी आदितीला सिगरेट फुंकायला लावून लेखक- दिग्दर्शकांनी या व्यक्तिरेखेवर अन्यायच केला आहे. स्त्राe- पुरुष नात्याविषयी अत्यंत सूज्ञ आणि धीट विचार मांडणारी ही व्यक्तिरेखा. तिच्या व्यक्तिमत्त्वातली झळाळी अकारण काजळवणारी सिगरेट तिच्या तोंडी देऊन लेखक- दिग्दर्शकांनी तिला नकळत `निगेटिव्ह' छटा दिली आहे. शिवाय मित्र ते प्रियकर- प्रेयसी हा आदिती- मनोहर यांचा प्रवासही पुरेसा सुस्पष्ट नाही.
स्वार्थी मनोहरला खरंतर दोन्ही स्त्रियांनी ठामपणे नाकारायला हवं. नेमकी इथं मुलं महत्त्वाची ठरतात आणि नवरा, प्रियकर, मित्र म्हणून नालायक ठरलेला मनोहर `पप्पा'पणाच्या ढालीआडून विजयी होतो.
उत्तम निर्मितीमूल्यं, सफाईदार आणि संयत हाताळणी, निर्मितीमूल्यांच्या श्रीमंती बरोबरच आशयाचा गहिरेपणा टिपणारं समीर आठल्ये यांचं छायालेखन, प्र. ल. मयेकर यांचे चमकदार, चुरचुरीत संवाद याबरोबरच मृणाल देव- कुलकर्णी हिचा बावनकशी भावाविष्कार या `जोडीदार'च्या जेमेच्या बाजू आहेत. सुनीतीचा मध्यमवर्गीय अवता, सालस स्वभाव आणि आदितीचा उच्चशिक्षित आत्मविश्वासपूर्ण `नो नॉन्सेन्स' वावर यातला फरक तिनं सुरेख दाखवला आहे. त्यासाठी मुद्राभिनय, देहबोली आणि संवादफेक या आयुधांच्या अचूक वापर केला आहे. रमेश भाटकर, विजय चव्हाण, सविता मालपेकर, लीना भागवत, सुनील शेंडे यांनी तिला उत्तम साथ दिली आहे. मिलिंद गुणाजीनं मात्र त्राग्याचा एकच सूर का पडकला आहे, ते कळत नाही.
नीला सत्यनारायण यांची गीते आणि नीला आकाश यांचं संगीत यात भावगीत पद्धतीचा एकसुरी गोडवा आहे.
No comments:
Post a Comment