Sunday, March 27, 2011

मारून मुटकून देशभक्त (द पेट्रियट)

सिनेमाच्या नावातून सिनेमाचा ढोबळ आशय थोडक्यात व्यक्त व्हावा, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते.
म्हणूनच कोलंबिया- ट्रायस्टारच्या `द पेट्रियट'चं नाव गोंधळात पाडतं. वरपांगी हा एक ऐतिहासिक युद्धपट आहे. नायक लढवय्या योद्धा आहे, तो देशाच्या सार्वभौमत्त्वासाठी शिरतळहाती वगैरे घेऊन लढतो. (शिवाय या भूमिकेत मेल गिब्सन आहे, त्याची रंगभूषा- वेशभूषा आणि सिनेमातला काळ- माहौल गिब्सनच्याच `ब्रेव्हहार्ट'ची आठवण करून देतात, या `पेट्रियट'बाह्य घटकांचाही विचार करायला हवा.) या सगळ्या गोष्टी जमेस धरूनही नायकाला `देशभक्त' असं ढोबळ लेबल लावता येत नाही. लावायचंच झालं तर `मारूनमुटकून देशभक्त' असं लेबल लावायला हवं किंवा `पेट्रियट'च्या हिंदी आवृत्तीचं `योद्धा' हे सपाट शीर्षकच समर्पक.
कारण `ब्रेव्हहार्ट' सारखाच हाही `शूर मर्दाचा पवाडा' वगैरे भासत असला तरी त्याहूनही अधिक एक कुटुंबवत्सल गृहस्थाची, एका बापाची ही कहाणी आहे. अपरिहार्य परिस्थितीच्या रेटय़ानं देशभक्तीच्या लाटेवर फेकल्या गेलेल्या एका सामान्य `माणसा'ची कहाणी... देशभक्तीची सनातन संकल्पनाच पुन्हा तपासून पाहायला लावणारी.
`पेट्रियट'चा नायक आहे बेंजामिन मार्टिन (मेल गिब्सन) हा अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिना प्रांताचा रहिवासी. काळ आहे 1763 चा. कॅनडावर तसेच अपाल्शियन पर्वत आणि मिसिसिपी नदी यांच्या दरम्यानच्या प्रेदशावर ब्रिटनची अधिसत्ता प्रस्थापित झाली आहे. अमेरिका नामक `नव्या जगा'त ब्रिटिशांच्या 13 वसाहती वसविण्यासाठी घाम गाळलेल्या आणि लढायांमध्ये रक्त सांडलेल्या `ब्रिटिश' नागरिकांचं ब्रिटनशी असलेलं नातं तुटू लागलेलं आहे आणि इथल्या भूमीशी नाळ जुळू लागलेली आहे. सातासमुद्रापारच्या ब्रिटिश बादशहानं बसविलेले भरमसाठ कर त्यांना जाचक वाटू लागले आहेत. या `प्रतिनिधित्वविना कर आकारणी विरुद्धचा असंतोष वाढीस लागला आहे आणि स्वराज्याची सार्वभौमत्वाची मागणी जोर धरू लागली आहे... ब्रिटिश सेनेशी युद्ध आता अटळ आहे.
बेंजामिन मार्टिनचे बाहू खरं तर युद्धवार्तेनंच फुरफुरायला हवेत. कारम तो एकेकाळचा असामान्य जिगरबाज योद्धा... ऐन तारुण्यात रणांगणं गाजवून तो आता दक्षिण कॅरोलिनात बडा मळेवाला बनून स्थिरावलाय. विधुर बेंजामिनच्या पदरात आईवेगळी सात मुलं आहेत.
म्हणूनच या युद्धाबद्दल तो अजिबात उत्साही नाही; उलट भयाकुल आहे. कारण हे युद्ध आता फक्त रणांगणांवर नाही, तर घराघरांत लढलं जाणार आणि असंख्य निरपराधांचे बळी घेणार, अशी त्याची खात्री आहे. जुलमी करांना त्याचा विरोध आहेच. स्वातंत्र्य त्यालाही हवंय; पण वाटाघाटींच्या शांततामय मार्गानं कारण तो एक बाप आहे... या युद्धाची झळ आपल्या मुलाबाळांना पोहोचली तर... ही काळजी त्याचं काळीज पोखरते.
...कधीकाळी अनेकांच्या मुलाबाळांची कत्तल करण्याचं `शौर्य' गाजवणाऱया या योद्धयाला आता भयानं ग्रासलंय. या पातकांची किंमत आपल्या मुलाबाळांना चुकती करावी लागली तर...?
दुर्दैवानं त्याच्या 18 वर्षांच्या थोरल्या मुलाला- गॅब्रिएलला (हीथ लेजर) बापाचा हा मवाळ सूर पटत नाही. ओजस्वी युद्धकथांनी भारलेल्या वातावरणात वाढलेल्या गॅब्रिएलला युद्धाची अमानुषता ठाऊक नाही. शौर्य, देशभक्ती, स्वातंत्र्य या उच्च कल्पनांनी तो भारून गेलेला आहे. `भेकड' बापाच्या इच्छेविरुद्ध तो स्थानिकांच्या फौजेत भरती होतो.
ब्रिटिशांची शिस्तबद्ध `रेडकोट आर्मी' आणि स्थानिक शेतकरी- कामकऱयांच्या छोटय़ा `मिलिशिया' टोळ्या यांच्यातला संघर्ष हळूहळू बेंजामिनच्या मळ्यापर्यंत, घरापर्यंत येऊन ठेपतो.
एके रात्री जखमी अवस्थेतील गॅब्रिएल घरी पोहोचतो आणि दुसऱयाच दिवशी रेडकोट सेना बेंजामिनचं घर घेरते. युद्धाचे नियम धाब्यावर बसवून सामान्य नागरिकांवर बिनदिक्कत अत्याचार करण्याबद्दल कुप्रसिद्ध असलेल्या `ग्रीन ड्रगून्स' या पलटणीचा कर्दनकाळ कर्नल टॅव्हिंग्टन (जेसन आयझॅक्स) बेंजामिनसमोर उभा ठाकतो. गॅब्रिएल हा शत्रूसैनिक बेंजामिनचा मुलगाच आहे, हे कळल्यावर विकृत टॅव्हिंग्टन गॅब्रिएलला फासावर लटकावण्याचा हुकूम देतो. बेंजामिनचा धाकटा मुलगा न राहवून गॅब्रिएलकडे झेपावतो आणि टॅव्हिंग्टनच्या गोळीला बळी पडतो... बेंजामिनचं घर- कोठी त्याच्या डोळ्यांदेखत पेटविल्या जातात... मांडीवर एका मुलाचं कलेवर... दुसऱयाची वधस्थानाकडे वरात निघालेली आणि संपूर्ण कुटुंबाचा दाणागोटा, आसरा आगीच्या भक्ष्यस्थानी... बेंजामिनला त्या क्षणी युद्धाची अटळता पडून जाते. तीरासारखा धावत तो पेटत्या घरात शिरतो, जुन्या संदुका उघडतात, तरतऱहेची शस्त्रं बाहेर पडतात, मुलाचे प्राण वाचवण्यासाठी बेंजामिन पुन्हा योद्धा बनून बाहेर पडतो...
इथपर्यंतचा कथाभाग पाहताना प्रेक्षकाची भावना होते ती हिंदीतल्या रूढ सूडपटांचा ऐतिहासिक रुपडे ल्यालेला चकचकीत हॉलिवुडी आवृत्ती पाहात असल्याची. या सिनेमाचा पुढचा सगळा प्रवासही तसाच घडतो. गॅब्रिएलचं प्रेमप्रकरण, पुढे लग्न. टॅव्हिंग्टननं बेंजामिनला धडा शिकवण्यासाठी गॅब्रिएलच्या सासुरवाडीची केलेली होळी, बेंजामिनच्या उर्वरित कुटुंबाचा तलास लावण्याचा प्रयत्न, गॅब्रिएलची कपटानं हत्या, खचून गेलेल्या बेंजामिननं अखेरीस उसळी मारून युद्धात पुन्हा सहभागी होणं आणि अखेरचा निर्णायक विजय हा सगळाच कथाभाग लोकप्रिय ऍक्शनपटांच्या वैश्विक रुपबंधाशी थेट नातं सांगणारा आहे. त्यानं ब्रिटिश सेनेला जेरीस आणण्यासाठी रचलेल्या चाली शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची आणि रॉबिनहुडपटांची आठवण करून देतात.
शिवाय, हा काही अस्सल ऐतिहासिकपट नाही. कारण, बेंजामिन मार्टिन या नावाचा कोणीही स्वातंत्र्ययोद्धा अमेरिकी इतिहासात नाही. फ्रान्सिस मॅरिअन, डॅनियल मॉर्गन आणि थॉमस सम्टर यासारख्या वास्तवातल्या योद्ध्यांच्या गुणावगुणांचा मेळ घालून पटकथाकार रॉबर्ट रोडॅट यांनी बेंजामिनला जन्म दिला आहे. कर्नल टॅव्हिंग्टनही लेफ्टनंट कर्नल बेनॅस्ट्रे टॅर्लेटन या क्रूरकर्म्यावर बेतलेला आहे.
 तरीही `पेट्रियट' ही इतिहासाचा सोयीस्कर संदर्भ घेऊन मनोरंजक काल्पनिका होत नाही, याचं श्रेय पटकथाकार रोडॅट, दिग्दर्शक रोलँड एमेरिच आणि मेल गिब्सन यांना द्यायला हवं. प्रचंड मोठय़ा कॅनव्हासवर थरारक, रोमांचक, भव्यदिव्य अशा युद्धांचं श्वासरोधक चित्रण करण्याच्या नादात तसेच चित्रणस्थळांच्या निवडीपासून, रंग- वेशभूषा, कलादिग्दर्शन, विशेष दृकपरिणाम आदींमधून एक काळ उभा करण्याच्या ओघात सिनेमाचं मूळ सूत्र त्यांनी हरवू दिलेलं नाही. आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी युद्धात न उतरणारा बेंजामिन देशभक्तीचं स्फुरणदायी इंजेक्शन टोचून घेऊन रणमर्दानगी गाजवतो ते केवळ कुटुंबरक्षणासाठीच. हा गाभा कधीच विसरता येत नाही प्रेक्षकाला
कारण, बेंजामिन रणांगणात शौर्य आणि रणाबाहेर लष्करी डावपेचांची अक्कलहुशारी दाखवत असताना सतत त्याच्या बोलण्यावागण्यात थकलेपणा जाणवत असतो. युद्धाचा फोलपणा समजल्यानतंरही लढावं लागत असलेल्या योद्धयाचा हा थकवा आहे. त्याच्या डोळ्यांत सतत पूर्वायुष्यांतल्या पातकांच्या प्रायश्चित्ताचं भय दिसत राहतं. या एकाच पैलूमुळं हा नायकही वेगळा होतो आणि सिनेमाही रुटीन युद्धपटांच्या पलिकडे जातो. इथले सर्वच मृत्यू प्रेक्षकाला हलवून सोडतात. त्यात हा सिनेमा भारत- पाकिस्तान युद्धाचा नसल्यानं आपोआप `तटस्थ' ठरणाऱया भारतीय प्रेक्षकाला तर एका क्षणी असंही लक्षात येतं की, समजा रोडॅट- एमेरिच द्वयीचं हाच सिनेमा बरोब्बर उलटा करून- म्हणजे बेंजामिनला खलनायक आणि टेव्हिंग्टनला नायक कल्पून बनवला असता तरी तो आपल्याला इतकाच प्रभावी वाटला असता. `देशभक्ती म्हणजे आपली मातृभूमी हा- केवळ आपला जन्म तिथे झाला म्हणून जगातला सर्वश्रेष्ठ प्रांत मानण्याची प्रवृत्ती' ही सुप्रसिद्ध व्याख्या इथे आठवते आणि माणसामाणसांना आपसात झुंजवणाऱया देशभक्तीच्या संकल्पनेतला अंतर्विरोध मन अस्वस्थ करतो.
अत्यंत अभ्यासपूर्वक रचलेला युद्धाचा काळ, त्याचं अप्रतिम चित्रण, बापाची उलाघाल, जाणत्यची तगमग आणि योद्ध्याची जिगर यांचा अद्भुत मेळ दाखवणाऱया मेल गिब्सनसह सर्व कलावंताची जबरदस्त कामगिरी आणि एमेरिचनं कुशलतेनं टिपलेला भावभावनांचा कल्लोळ यामुळे तब्बल पावणेतीन तासांची `पेट्रियट'ची महागाथा एरवीही प्रेक्षणीय झाली आहेच. संदर्भाविना आणि/ किंवा विचारांविना पाहणाऱयालाही तो उत्तम ऍक्शनपट पाहिल्याचा आनंद देऊन जाईल.


(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment