Sunday, March 27, 2011

गाठींच्या गुंत्याचा गडबडगुंडा (कही प्यार ना हो जाये)


... बिकॉज मॅरेजेस आर मेड इन हेवन... ... किंवा लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात म्हणून...
... ही के. मुरली मोहन राव दिग्दर्शित 'कही प्यार ना हो जाये' या चित्रपटाची थीमलाइन आहे...
पण, हा सिनेमा लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात म्हणून घडत नाही, तर मर्त्य माणसं या स्वर्गातल्या गाठींची `गाठ' पडण्याची वाट न पाहता इहलोकी परस्पर काही गाठी मारायला जातात आणि त्यांच्या सुरगाठी, निरगाठी वगैरे गुंता करून घेतात, म्हणून घडतो.
इथला मनुष्यजातीचा प्रतिनिधी आहे प्रेम (सलमान खान) हा विवाह- सोहळ्यांमध्ये नाचगाणी करून पोट भरणारा हौशी गायक. त्याची मोठी बहीण (कश्मिरा शाह), तिचा नवरा (मोहनिश बहल) आणि टायगर (जॅकी श्रॉफ) हा जिवश्चकंठश्च मित्र, हे त्याचे कार्यक्रमांतले साथीदार, प्रेमाची गाणी म्हणणारा प्रेम स्वत:ही निशाच्या (रवीना टंडन) प्रेमात पडलाय. तिच्याशी लवकरात लवकर लग्न करण्याची त्याला घाई लागलेली आहे.
या घाईगडबडीतच प्रेम लग्नाची तारीख ठरवतो. सगाई करून मोकळा होतो आणि ऐन लग्नाच्या दिवशी निशा मांडवात येतच नाही. तिच्या भावाला कॅन्सर झालाय. त्याच्या उपचारांसाठी तिला प्रचंड पैसा हवाय. तो तिच्यापाशी नाही. प्रेमपाशीही नाही. त्यामुळे दोघांचं एकमेकांवर असलेलं निरातिशय वगैरे प्रेम व्यवहारात फजूल आहे. कुणी राहुल नावाचा श्रीमंत एनआरआय निशाशी लग्न करायला तयार झालाय आणि तो (अर्थातच) तिच्या भावाच्या उपचारांचा सगळा खर्चही करणार आहे.
तिची मजबुरी कळल्यावर समजूतदारपणे तिच्या आयुष्यातून प्रेम दूर होतो पण त्याच्या भावविश्वातून निशा काही वजा होत नाही. उद्ध्वस्त झालेला प्रेम दारूत दु:ख बुडवता बुडवता पक्का बेवडा होऊन जाण्याची वेळ येते. इथे त्याला सावरते ती प्रिया (रानी मुखर्जी) ही शेजारीण. प्रेमच्या शेजारी राहणाऱया फटाकडय़ा मोनाची (प्रिया बात्रा) ही लांबची बहीण. तिच्या (प्रेमच्या आयुष्यातल्या) आगमनापूर्वीच प्रेम एंगेज्ड असल्यामुळे ती प्रेमची फक्त जवळची मैत्रीण असते. आपल्याला प्रेमविषयी काही `वेगळं' वाटत असले, याचा तलास करायची संधीच नसल्यामुळे ती आईनं निवडलेल्या मुलाबरोबर लग्न करायला मोकळी हेते. दुर्दैवानं हाही राहुल नावाचाच एक एनआरआय (इंदरकुमार) निघतो. (हा `निशावाला'च राहुल आहे, हे शेवटी कळतं.) दरम्यानच्या काळात प्रेमला आपण आता प्रियाच्या प्रेमात पडलो आहोत, याचा साक्षात्कार होतो. त्याची पुन्हा बिकट परिस्थिती होते. प्रियाचं लग्नच ठरलेलं असल्यानं तो तिच्यासमोर प्रेम व्यक्त करू शकत नाही. राहुलशी लग्न ठरल्यानंतर प्रियाला प्रेमचं `महत्त्व' कळायला लागतं, पण तिचीही तीच गोची.
अर्थात, स्वर्गात याच लग्नाची गाठ मारलेली असल्यानं आणि सिनेमात तिसरी नायिका नसल्यानं नाटय़मय वगैरे क्लायमॅक्समधून प्रेम- प्रियाची गाठ पडतेच, हे सांगायला नकोच.
`वेडिंग सिंगर' या भावभीन्या वगैरे हॉलिवुडपटावर बेतलेल्या `कही प्यार...'ची पटकथा संजय छेल आणि मनोज ललवाणी यांनी लिहिली आहे. संवाद संजय छेल आणि अब्बास हिरापूरवाला यांचे आहेत. या लेखकांच्या टीमनं `वेडिंग सिंगर'चं भावुक स्वरूप गुंडाळून ठेवून `कहीं प्यार...'ला कॉमेडीचं स्वरूप दिलं आहे. त्यातून काही हिंदी सिनेमात अनोख्या वाटणाऱया गमतीजमती घडवल्या आहेत.
टाइट जीन्स, गोल- खोल गळ्याचे टी- शर्ट्स, पार्टी गाऊन्स वगैरे आधुनिक पेहराव करणारी नायकाची मोठी, विवाहित बहीण (तीही कश्मिरा शाह) हा फिल्मी बहिणींच्या साच्यातला स्वागतार्ह बदल आहे. या दृष्टीनं प्रेमचं सगळं कुटुंबच जरा हटके आहे. हिंदी सिनेमाचे नायक- नायिका `जनम जनम का प्यार', `मर के भी ना टुटनेवाला रिश्ता' वगैरे शाश्वत प्रेमाच्या विव्हळण्यामधून बाहेर पडून व्यवहाराच्या कसोटीवर `चलनी' ठरणाऱया `ऑन- ऑफ' प्रेमाला सरावायला लागलेत. एकाच सिनेमात (पक्षी : एकाच आयुष्यात) एका इन्टेन्स प्रेमातून बाहेर पडून लगेच दुसऱया तेवढयाच इन्टेन्स प्रकरणात गुंतण्यात काहीही अमानवी नाही, हे नायक- नायिकांबरोबरच प्रेक्षकांच्याही पचनी पडायला लागलेलं आहे.
त्याचबरोबर हा सिनेमा अधोरेखित करतो ती नायकाची बदलत चाललेली प्रतिमा.  
हे घडवण्यात लेखकांबरोबरच सलमान खानचाही मोठा वाटा आहे. त्यानं सिनेमाचा नायकही हास्यास्पद असू शकतो, फसू शकतो, प्रसंगी मार खाऊ शकतो, अशी स्खलनशील, पडखाऊ नायकाची वेगळीच प्रतिमा उभारायला सुरुवात केली आहे.
पण, पटकथाकारांची गोची झाली आहे ती इथेच. त्यांनी `वेडिंग सिंगर'ची भावुकता त्यागताना त्याच्या संपूर्ण सांगाडय़ाचं विडंबन केलेलं नाही. मूळ सिनेमाचा भावुक गाभा कायम ठेवू त्यांनी विनोद करायचा प्रयत्न केला आहे, तो हास्योत्पादक होण्याऐवजी हास्यास्पद होत जातो आणि प्रेक्षकाला ना विनोदी सिनेमा पाहिल्याचं समाधान मिळत ना प्रेमपट पाहिल्याचं.
हे फसणं सुरू होतं ते निशा प्रेमच्या मांडवात येत नाही. तिच्या भावाच्या आजाराची प्रेमला कल्पनाही नसणं, तिला या लग्नाविषयीची दुविधा प्रेमला आधी कधीच सांगायला संधी न मिळणं आणि पैशासाठी ती प्रेम ठोकरते आहे. वगैरे सगळा कथाभाग अतिशय लंगडा आहे. ऐन लग्नाच्या मांडवातच ते लग्न मोडून `ड्रामा' निर्माण करण्याच्या मोहातून पटकथाकारांनी प्रेमच्या पहिल्या प्रेमाचा बळीच दिला आहे. त्यामुळे, निशाच्या घरात प्रेम तिच्यावर न ओरडता; स्वत:वर तिच्यावर आणि आपल्या नशिबावर विनोद करत, हसताहसता रडत तिची अपरिहार्य वजाबाकी स्वीकारतो, या प्रसंगाची मजाच निघून जाते. कारण, मुळात हे दोघे कधी एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाले होते, हेच कुठे दिसत नाही.
पुढे प्रेम या प्रेमाचा गम दारूत बुडवत असण्याच्या लंब्याचवडय़ा प्रसंगात सलमान पुन्हा स्वत:वर आपल्या प्रेमावर विनोद करताना दिसतो. मात्र, या सगळ्या बालिशपणाच्या आडची वेदना खरी आहे, हे लेखक पोहोचवत नाहीत. यातून ते पूर्वार्धात आपल्या नायकाला अगदी उथळ करून टाकतात आणि उत्तरार्धात त्याच नायकाचं दुसरं प्रेमप्रकरण मात्र प्रेक्षकांनी `नेहमीच्या' गांभिर्यानं घ्यावं अशी अपेक्षा बाळगतात. शिवाय, या प्रेमप्रकरणाची अडथळ्यांची शर्यत ते अगदी बनचुकेपणांत रचतात. त्यासाठी प्रियाचा मंगतर राहुल याला पोरी फिरवणारा वगैरे `बॅड बॉय' बनवण्याचा सोपा मार्ग पत्करून मोकळे होतात. आरशासमोर रिसेप्शनची प्रॅक्टिस करताना रडव्या चेहऱयानं स्वत:ची `मै मिसेस प्रिया फुगलिया' अशी ओळख करून देणारी प्रिया नकळत `मै मिसेस प्रिया प्रेम कपूर' अशी ओळख करून देऊ लागते आणि खुलते... यासारखा एखाददुसरा प्रसंग सोडला, तर बाकी सगळा उत्तरार्ध बेतलेपणाचं बटबटीत प्रदर्शन मांडतो.
दिग्दर्शक के. मुरली मोहन राव यांनी पटकथेचं तंत्रशुद्ध चित्रीकरण म्हणजेच दिग्दर्शक अशी कल्पना करून घेतलेली दिसते. त्यामुळे, संकलक एम. रामकोटी हे हा सिनेमा करताना `लाँग लीव्ह'वर होते की काय, अशी शंका येण्याइतपत लांबलेले प्रसंग सिनेमात भरपूर आहेत. हा दक्षिणी दिग्दर्शकाचा सिनेमा असल्यामुळे मूळ कथानकाला समांतर असा विनोदी ट्रक हवाच, तो इनोदी होणंही ओघानं आलचं. त्यासाठी शक्ती कपूरला नेमलं की दिग्दर्शकांचे `कष्ट' वाचतात बहुतेक.
हिमेश रेशमियाचं फडकतं संगीत ही `कही प्यार...'ची जमेची बाजू. म्हणजे हे काही ग्रेट वगैरे संगीत नाही, पण हिमेश `ओढ ली चुनरिया'च्या चालीतून बाहेर पडून स्वत:ची वाट धुंडाळू लागलेला दिसतो. त्या वाटेवर त्याला `इन्फेक्शस' म्हणण्याजोगं ` ओ प्रिया, ओ प्रिया, प्रिया' आणि ताबडतोब ताबडतोब जिभेवर रुळणारं टायटल साँग यासारखी गाणी गवसत असली, तर चांगलंच की! बाकी `तेरी चुनरी बन्नो लाखों की', `आ मेरी लाइफ बना दे' आणि `सावरियाँ' ही खास हिमेश स्टायलीतली नाचरी गाणी आहेत. त्यातलं शेवटचं तर सिनेमात का आहे, याचा काही पत्ताच लागत नाही.
कलाकारांत सलमान खास स्वत:च्या शैलीतला नायक झकास साकारतो, पण, त्यात तो नायकाला काहीसा उथळ बनवून टाकतो. जॅकी आपल्या यारदोस्तांत वावरल्यासारखा सिनेमात वावरतो. पूजा बात्रा फटाकडेपणा व्यवस्थित दाखवते. रवीना टंडन मुळात सलमानची प्रेमिकाच वाटू नये, अशी व्यवस्था पटकथाकारांनी केली आहे. इंदरकुमार काहीशा निगेटिव्ह भूमिकेत आत्मविश्वासानं वावरतो. मात्र, सर्वात पाहण्या- अनुभवण्यालायक कामगिरी करते ती रानी मुखर्जी. प्रियाच्या एरवी सपाट, एकसुरी ठरू शकणाऱया व्यक्तिरेखेत ती नुसत्या हसण्या बोलण्या- वावरण्याच्या अदेतून रंग भरते.
...तर, एकूणात, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जात असतील, तर मर्त्य माणसांनी काय करावं, त्यांची इहलोकात `गाठ' पडण्याची (किंवा कुणी म्हणेल, फास आवळण्याची) वाट पाहावी की आपण गाठी मारण्याच्या कार्यानुभवातून त्या गाठीपर्यंत पोहोचावं, याचं नेमकं `मार्गदर्शन' काही या सिनेमातून होत नाही. मात्र, एकदा ही `स्वर्गथियरी' मान्य केली की एकूणातच नियतीवाद मान्य करावा लागतो, आणि आपण मारलेल्या सुरगाठी- निरगाठींचे बिलही नियतीवर फाडून मोकळं होता येतं, असा छुपा संदेश मिळतो या सिनेमातून पण, त्यासाठी थिएटरात जाण्याची गरज काय?

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment