सिनेमा केव्हा संपतो?...
काय गाढवासारखा प्रश्न आहे?... रुपेरी पडद्यावर जेव्हा पश्चात्तापदग्ध खलनायक- काही सेकंदांपूर्वीच आपण जिच्यावर जबरदस्तीचा प्रयत्न केला, त्या नायिकेला बहीण मानून राखी पौर्णिमा नसताना राखी बांधून घेतो, जेव्हा नायक- नायिका हातात हात गुंफून (दिनमानानुसार) उगवतीच्या किंवा मावळतीच्या सूर्याच्या दिशेने नाचत बागडत जाऊ लागतात, जेव्हा अर्धा पाऊण तास धुमश्चक्री करून सर्व संबंधितांनी शक्य त्या सर्वांचे, शक्य तेवढय़ा प्रकारांनी मुडदे पाडलेले आहेत, याची खात्री करून घेऊनच पोलिस घटनास्थळी अवतीर्ण होतात, तेव्हा सिनेमा संपतो; हेही न कळणाऱया अडाण्यांसाठी `दि एन्ड'ची किंवा `फिर मिलेंगे'ची पाटी झळकवली जाते... निदान हिंदीतला, तथाकथित `एन्टरटेनिंग' सिनेमा तरी असा आण इथेच संपतो... तसा न संपणारा, संपण्याआधी आणि नंतर `त्रास' देणारा सिनेमा सहसा तिकीटबारीवरच `संपतो'... ऑडियन्स क्लासचा असो की मासचा, सिनेमाकडून होणारं मनोरंजन त्याला `स्वस्त', `हलकं'च हवं असतं... असला सिनेमा `दि एन्ड'च्या पाटीबरोबर संपायलाच हवा...
पण, ऋतुपर्ण घोषचा `रेनकोट' हा अजब सिनेमा आहे...
जो ज्या क्षणी संपतो त्याच क्षणी सुरू होतो... किमान सिनेमाकडूनच्या मनोरंजनाच्या बथ्थड कल्पना नसलेल्या प्रेक्षकाच्या मनात... तो संपतो तेव्हा एक फारच छोटा जीव असलेली एकांकिका किंवा लघुकथा पाहिल्याचीच भावना असते... एवढंसं काहीतरी सांगायला सिनेमाचा मोठा पडदा कशाला हवा होता, अशी शंकाही काही `सिनेमास्कोपिक' टाळक्यांमध्ये येऊ शकते...
कलाटणीतंत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या ओ हेन्रीच्या एका अतिशय गाजलेल्या कथेचा `रेनकोट'ला आधार आहे... मुळ कथा आदर्श नवरा- बायकोच्या संस्कारमाला छाप प्रेमाची! महागडय़ा, रुबाबदार कोटाला साजेशी सोन्याची बटणं घेण्याची ऐपत नाही म्हणून तो वापरू न शकणारा नवरा आणि लांबसडक रेशमी केशसंभाराच्या योग्यतेची फणी जिच्याकडे नाही अशी बायको... लग्नाच्या वाढदिवशी दोघेही एकमेकांना सरप्राइझ भेट देतात... नवरा बायकोसाठी हस्तिदंती फणी घेऊन आलेला असतो... ती कोट विकून... आणि बायको त्या कोटासाठी सोन्याची बटणं घेऊन आलेली असते... कोणा विग बनवणाऱयाला आपला केशसंभार विकून!...
हळहळ्या- हुळहुळ्यांच्या छातीत अस्फुट हुंदका दाटवणारी, नकळत डोळ्यांच्या कडाबिडा ओलावणारी ही गोष्ट! ऋतुपर्णाच्या सिनेमात ती दोन दुरावलेल्या प्रेमिकांची गोष्ट बनते, तिथेच तिचा पोत बदलतो... साफल्याचा तुपकट तवंग चढलेलं हे प्रेम नाही... इथे एकमेकांची साथ संपल्याचा विखारी दंश आहे... ती दंश झालाच नाही, असं दाखवण्याची केविलवाणी धडपड आहे.. एकमेकांना बोचकारणं आहे... पण, त्यांच्या त्या नखांच्या मागे उबदार कुरवळणाऱया पंजाची मऊशार मायाही आहे...
पैशाच्या चणचणीनं गांजलेला मनू (अजय देवगण) जुन्या मित्रांकडून धंद्यासाठी भांडवल जमवण्यासाठी कोलकत्यात येतो तेव्हाच त्यानं नीरूला (ऐश्वर्या राय) भेटायचं पक्कं ठरवलेलं असतं... ती त्याची माजी प्रेयसी... त्याचं प्रेम धुडकावून कोणा गबर आसामीशी लग्न करून बसलेली... पावसाळी दुपारी मित्राचा रेनकोट घेऊन तो तिच्या घरी जातो... ती एकटीच... दोघांच्या गप्पा सूरू होतात... ती त्याच्याविना सगळं कसं ठिकठाक आहे हे दर्शवत आपल्या ऐश्वर्याच्या, राजेशाही आरामाच्या कहाण्या सांगत राहते... तो तिच्याविना सगळं उत्तम चाललंय असं दाखवत, मित्राच व्यवसाय जणू आपलाच आहे, अशा थाटात थापा मारतो... काही नाटय़मय घटामोडींनी तिच्या अनुपस्थितीत त्याला तिच्या खऱया परिस्थितीची माहिती कळते... तिच्यावर ओढवलेल्या दुर्धर प्रसंगातून तिची मुक्तता करण्यासाठी तो जमा केलेली सगळी रक्कम तिच्या गादीखाली लपवून, चिठी लिहून निघतो... तो नीरूच्या घरी असताना, तिनं पावसात बाहेर जाण्यासाठी वापरून परत दिलेला त्याचा रेनकोट जेव्हा रात्री त्याच्या हाती येतो, तेव्हा त्यालाही काही सापडतं... ही सापडलेली वस्तू काय असेल, याचा अंदाज सहज करता येईल... इथे ऋतुपर्णचा सिनेमा संपतो पण, तो आत पुढे सुरूच राहतो...
...बाईच्या बाईपणातल्या व्यामिश्रतेचा रत्तीभरही अदमास नसलेला, नात्यातल्या सगळ्या गोष्टी फक्त `फेस व्हॅल्यू'वर जोखणारा बुद्धू नायक आणि त्याच्यावर परिपक्व प्रेम करणारी नायिका... ही यच्चयावत बंगाली कादंबरीकारांची लाडकी सिच्युएशन ऋतुपर्णाला ओ हेन्रीच्या कथानकात गवलली आहे... मनू या देशातल्या बहुसंख्य पुरुष प्रेक्षकांच्या एकारल्या मानसिकतेचं प्रतिनिधित्व करतो... त्यात नीरूनं त्याचं प्रेम नाकारण्याची सिच्युएशन ऋतुपर्णाने `चांदी की दीवार ना तोडी, प्यार भरा दिल तोड दिया' असं गाणं बॅकग्राऊंडला आपोआप ऐकू यावं इतक्या फिल्मी आणि शब्दश: `परकऱया स्टाइलनं चित्रित केली आहे... त्याच्या या ट्रपमध्ये प्रेक्षक स्वत:च्या पायांनी चालत जातो... नीरूही बराच काळ, गबर पैसेवाल्यानं ऐपत आहे म्हणून महागडा, देखणा प्लॉवरपॉट आणावा तशी सजावटीत आणलेली `भाभी आयटम' वाटत राहते...
तिच्या सधनतेबद्दल जरा शंका येत असतानाच, घरमालकाच्या (अन्नू कपूर) पात्राकरवी मनूला तिची खरी स्थिती समजते. तेव्हा तिच्याबद्दल किंचित कणव वाटते खरी पण पैशासाठी प्रेम ठोकरणाऱया स्वार्थी मठ्ठ मुलींना अशीच शिक्षा हवी असं सूडाचं समाधान अमळ मोठ असतं... (तिच्यावर निस्सीम प्रेमबीम असलेला मनू तिच्या लग्नाला काही वर्ष उलटून गेल्यानंतरही अजून आर्थिकदृष्टय़ा सेटल होऊ शकलेला नाही, तेवढा त्याचा वकूबही नसेल, अशी शंकाही या पुरूषमनाला चाटून जात नाही...) एकदा नीरूची खरी परिस्थिती समजल्यानंतर तिच्या त्या `साहिब, बिवी और गुलाम'मधल्या मीनाकुमारीसारखा आवाज लावू बोलण्याची, बडय़ा बडय़ा बाता मारण्याची, खांद्यावर ब्रा स्ट्रप दिसत राहतील, अशा रितीनं, आपल्या माजी प्रियकराला कायम अप्राप्य राहिलेल्या आपल्या शरीराचं ऊष्ण अस्तित्व जाणवत राहील, अशा प्रकारे वावरण्याची घृणाच येऊ लागते... तिच्या वाटय़ाला आलेल्या भोगवटय़ाला ती पात्रच होती, अशी मनोभूमिक ऋतुपर्ण आणि त्याला, आजवरच्या कारकीर्दीतल्या सर्वोत्कृष्ट अभिनयदर्शनानं साथ देणारी ऐश्वर्या राय मिळून घडवतात... त्यात मनूनं खिशात होती नव्हती ती सगळी रक्कम स्वत:च्या पायांनी खड्डय़ात पडलेल्या `असल्या' बाईसाठी काढून ठेवण्यानं डोकं सटकतं... त्याच्या बुद्धूपणाची कीव येते...
त्या रेनकोटच्या खिशातून मनूला नंतर मिळणारी वस्तू काय असेल? आपल्या परिस्थितीची जाणीव करून देणारे त्याच्याकडे प्रेमाची भीक मागणारं किंवा ती न मागून त्याच्यावर चतुरपणे भावनिक दडपण आणणारं पत्र असेल किंवा जुन्या प्रेमाची आठवण करून देणारं काही असेल... त्या रेनकोटच्या खिशातून निघतात ते नीरूचे काही दागिने... तिच्या सद्यस्थितीत कदाचित तिला अखेरचा मोठा आधार ठरतील असे... दुपारी रेनकोटच्या खिशातल्या काही कागदपत्रांतून मनूच्या खऱया स्थितीची माहिती मिळाल्यावर नीरूनं ते तिथे ठेवलेले असतात... त्याला उपयोगी पडावेत म्हणून...
इथे हरएक `बुद्धू' बाप्याच्या लक्षात येतं की ऋतुपर्ण आणि ऐश्वर्या यांनी मिळून आपल्याला साफ गंडवलं आहे... पुरतं नागवलं आहे... आपण पुन्हा एकदा साफ बुद्धू ठरलेलो आहोत...
(महाराष्ट्र टाइम्स)
अजून जुने लेखपण ठेवा की इकडे आणून.
ReplyDeleteतेच काम सुरू आहे सध्या.
ReplyDeleteधन्यवाद हा जाम भोंदू शब्द, पण तरी धन्यवादच. नाहीतर काहीच स्कोप नव्हता तुमचे लेख मिळवायचा. :)
ReplyDeleteहा चित्रपट मी पाहिला आहे. आणि खरच तो असा फ़सवत गुंगवणारा चित्रपट आहे! ऎश्वर्या रायच्या अभिनय कारकीर्दीतला अविस्मरणीय आविष्कार ठरावा !
ReplyDeleteखूप छान परिक्षण! मी नक्की पाहणार आता रेनकोट
ReplyDeleteखूप छान परिक्षण! मी नक्की पाहणार आता रेनकोट
ReplyDelete