Wednesday, May 18, 2011

देवदास वजा देवदास


``दारूच्या नशेत तू काय काय बरळत असतोस तेव्हा मी खूप काही ऐकते देवदास. पण, मला नाही वाटत की पार्वतीनं तुला फसवलं. तूच स्वत:ला फसवलंयस...चूक तुझ्याच हातून घडली असणार... पार्वतीनं तुला रत्तीभरही दगा दिलेला नाही. तूच स्वत: स्वत:ला दगा दिलायस... आज हे समजणार नाही तुला. पण वेळ येईल तेव्हा समजेल की मी खरं तेच सांगितलं होतं...
... मला खात्री आहे, पार्वतीच आधी तुझ्या प्रेमात पडली असणार, तिनंच आधी ते व्यक्त केलं असणार...
... मला माझ्यावरून कळतं रे, तिनं तुझ्यावर किती प्रेम केलं असेल ते!''
-      चंद्रमुखी(देवदास, लेखक- शरत्चंद्र)
.....................................................
 देवदास... शरत्चंद्र चट्टोपाध्यायांनी ऐन तारुण्याच्या नव्हाळीत लिहिलेली एक छोटेखानी कादंबरी. त्यांच्या स्वत:च्या मते. बरीचशी बालिश आणि खूपच कच्ची.
तरीही ती शरत्चंद्राची सर्वाधिक लोकप्रिय साहित्यकृती आहे आणि भारतीय साहित्यातील अजरामर रचनांपैकी एक. कदाचित त्या नवथर वयातली अभिव्यक्ती त्या वयाच्या भाषेत आणि अनुभवपरिघात, आकलनात मांडली जाणं हेच तिचं बलस्थान असेल. बंगाल्यांच्या तिच्यावर उडय़ा पडल्याच; पण. झटपट भाषांतरांची सोय आणि प्रथा नसलेल्या त्या काळात केवळ देवदास वाचता यावी. म्हणून अनेक अन्यभाषिकांनी बंगालीची शिकवणी लावली होती!
देवदासवर वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळ्या काळात 11 सिनेमे निघाले, हेही आश्चर्यच. कारण, देवदासच्या कथानकात काळाची व्यक्तिरेखा सर्वात महत्त्वाची. ती ज्या काळात घडते. त्या काळातल्या स्त्राe-पुरुष नात्यावरच्या बंधनांमधून तिच्यातले ताणतणाव निर्माण होतात. भाऊ, नवरा, वडील किंवा अन्य रक्ताचा नातेसंबंध नसलेल्या स्त्राe-पुरुषांमध्ये स्नेहभाव किंवा प्रेम उत्पन्न होण्यास पोषक नसलेला तो काळ! अशा स्त्राe-पुरुषांना एकमेकांशी `मानलेल्या' भावबहिणींचं नातं जोडावं लागायचं. अशातल्या काही भाग्यवान `दादा' आणि `ताई'ना कधी मोकळीक आणि आधार मिळाला तर हा जबरदस्तीचा बोळा निघून ते श्री. आणि सौ. बनूही शकायचे. अशा घुसमटीचं धाडसी आणि प्रत्ययकारी चित्रण शरत्चंद्रांच्याच `प्रकाश आणि छाया'सारख्या कथांमधूनही दिसतं.
काळ बदललला. भारतीय समाज हळूहळू पण निश्चितपणे मोकळा होत गेला. स्त्राe-पुरुष संबंधाकडे पाहण्याची, प्रेमाला मान्यता देण्याची दृष्टी बदलत, सुधारत गेली. नव्या जमान्यात देवदास खरंतर जुनाट ठरायचा. तरीही त्याची मोहिनी दिग्दर्शकांना, अभिनेत्यांना खेचत राहिली. ती का?
  भारतीय प्रेक्षकाचं सरासरी भावनिक वय पौगंडावस्थेतलं मानलं जातं. देवदास हा या वयात जखडत्या गेलेल्या भारतीय पुरुषांच्या सर्व मनोगंडांचं प्रतिनिधित्व करतो. म्हणून तो प्रेक्षकांना सतत आकृष्ट करीत राहिला का?
  बहुतेक दिग्दर्शकांनी सुलभीकरणाच्या नादात देवदासची. `अल्टिमेट' प्रेमिक अशी `लार्जर दॅन लाइफ' प्रतिमा निर्माण केली. त्याची मानसिक जटिलता सोपी- सुटसुटीत करून टाकली. देवदास हे प्रेमभंगाचे आणि त्यातलं वैफल्य बुडवण्यासाठी केल्या गेलेल्या देवदासमधल्या भावनांच्या खोलीशी मॅच होईल. असा भव्य अवकाश मिळवून देण्याचा, `देवदास'ला मॅग्नम ओपस' बनवण्याचा हा उपक्रम आहे, असं तेव्हा सांगितलं जायचं.
  संजय लीला भन्साळीच्या दिग्दर्शकीय वकुबावर भरवसा असणाऱयांना, तो ही सगळी `सिनेमॅटिक लिबर्टी' घेऊन, खास त्याच्या शैलीतलं इंटरप्रिटेशन मांडणारा, वेगळाच देवदास पेश करील. याची अजूनही खात्री होती...
  ... यथावकाश `देवदास' प्रदर्शित झाला आणि तो खरोखरच किती `वेगळा' आहे याचा भानावर आणणारा साक्षात्कार घडला.
  उबगवाणी जाहिरातबाजी करून `देवदास' भारतात विक्रमी प्रिंट्सवर प्रदर्शित झाला. तेव्हा पहिले दोन आठवडे तो बुकिंगवरच फुल होता; इतकी जनमानसात त्याच्याविषयी उत्सुकता होती. पण, तिसऱया आठवडयापासून प्रेक्षकांचा ओघ आटला. गाण्यांचे हक्क. परदेशी वितरणाचे हक्क, सॅटेलाइट प्रसारणाचे हक्क वगैरेंतून त्यानं खर्चाची वसुली केलीही असेल; पण, प्रेक्षक प्रतिसादाच्या दृष्टीनं `देवदास' प्लॉप झाला नसला, तरी देवदासच्या देशातल्या प्रेक्षकांनी त्याचं हात फैलावून प्रेमभरानं स्वागतही केलेलं नाही. त्याला `ब्लॉकबस्टर'चा दर्जा दिला नाही.
  `देवदास'ला उचलून धरलं. ते देशातल्या मल्टिप्लेक्सेसच्या आश्रयदात्या उच्चभ्रूवर्गानं आणि त्याहून अधिक `बॉलिवूड'च्या प्रेमाचा उमाळा आलेल्या परदेशी प्रेक्षकांनी. भावनांच्या नाटय़मय (खरंतर नाटकी) मांडणीला नृत्य-संगीताची चरचरीत फोडणी देऊन मनोरंजनाची सर्वसमावेशक खिचडी पकवणारी भारतीय चित्रपटशैली हल्ली पाश्चात्यांच्या मनात भरली आहे. `पडद्यावर अचानक ही मंडळी दुसऱया कोणाच्या तरी आवाजात गायला कशी लागतात. त्यांच्या गाण्यांना म्युझिक वाजवणारे दिसत कसे नाहीत?' अशी नाकं मुरडणाऱया पाश्चात्यांना हा फिल्ममेकिंगचा किती प्रभावी फॉर्म आहे. याचा साक्षात्कार घडला आहे. `मुलँ रूज'सारख्या हॉलिवूडपटांनी हा नाचगाणीयुक्त सर्वभावनासमावेशक फॉर्म वापरून उदंड यश कमावलं.
  अशा काळात भारतातल्या एका बडय़ा दिग्दर्शकानं, देशातले सर्वात मोठे स्टार घेऊन, सर्वाधिक खर्च करून, रंग, रूप, भावना, सूर, ताल, खास `एथनिक इंडियन' दागदागिने, कपडे, साजश्रृंगार यांची पडद्यावरून ओतप्रोत उधळण करीत बनविलेल्या. सर्वार्थानं भरगच्च सिनेमाला प्रतिसाद न मिळाला, तरच नवल! त्यात हा सिनेमा भारतातल्या नामवंत लेखकाच्या एका `क्लासिक' कादंबरीवर बेतलेला आहे, ही माहिती तोंडी लावायला असली, की वाटणारी धन्यता वेगळीच!
  त्यांना बोल कशाला लावावा? आपणही विदेशी सिनेमे पाहतो. आस्वादतो, तो अशाच वरवरच्या `बझ'च्या आधारावर. त्या त्या देशातली, संस्कृतीतली पाळंमुळं कोण खणून पाहतं?
  तोच प्रकार या देवदासच्या बाबतीत घडू शकतो. मूळ कादंबरीशी परिचय नसलेली देशातली नवी पिढी आणि परदेशांतल्या. भारतीय सिनेमाप्रेमी प्रेक्षकांसाठी संजय लीली भन्साळीचा `देवदास' हाच `खरा' देवदास असेल.
  पण, हा शरत्बाबूंच्या देवदास आहे का? देवदास आहे का? हा पारोचा देवदास आहे का? जिला देवदास सर्वाधिक कळला, त्या चंद्रमुखीचा तरी हा देवदास आहे का?
  तसं नसेल तर त्याला देवदास म्हणणं योग्य आहे का?
    ........................................
 'मी देवदास का बनवला? नेहमी मला हा प्रश्न विचारला जातो. ही एक वाचकप्रिय कादंबरी आहे आणि अनेकदा रुपेरी पडद्यावर आली आहे. प्रेक्षकांना आधीपासून परिचयाचं असलेलं एक पात्र, माझ्या पद्धतीनं, माझ्या दृष्टिकोनातून सादर करणं, हे मला आव्हान वाटलं.
  शिवाय, देवदासच्या व्यक्तिरेखनंही माझं मन घुसळून काढलं होतं. हा माणूस एखाद्या लहान मुलासारखा, त्याच्या चटकन प्रेमात पडावं असा. त्याला प्रेमाची तीव्र तहान होती आणि त्यानं प्रेम केलं तेही त्याच तीव्रतेनं. पण, यातलं काहीच त्याला शब्दांत व्यक्त नाही करता आलं कधीच. सगळ्या प्रकारच्या चुका त्यानं केल्या; पण तो किती निर्मळ होता, हे कोणी समजून नाही घेतलं...
 देवदास आजही इथल्या प्रत्येक रस्त्यावर दिसतो. तो प्रत्येक पुरुषात आहे... खासकरून भारतीय पुरुषांत...
 या एका साध्या कथेचा आत्मा खूप मोठा आहे, म्हणूनच मी तो भव्य आणि नेत्रदीपक पार्श्वभूमीवर पेश करायचं ठरवलं... या कहाणीत कोणतंही पात्र `नायक' नव्हे, तर मानवी भावना हीच नायिका आहे... हे शरत्चंद्रांच्या अप्रतिम कादंबरीचं इंटरप्रिटेशन आहे. पण सर्वस्वी माझं इंटरप्रिटेशन!!''
  -- संजय लीला भन्साळी
 ...........................
 ``हे सर्वस्वी माझं इंटरप्रिटेशन आहे...'' असं म्हणून संजय लीला भन्साळी स्वत:ची सुटका करून घेऊ शकतो? त्याला इंटरप्रिटेशनचा हक्क आहेच, असं त्याचं समर्थन करणारे म्हणू शकतात. `सिनेमॅटिक लिबर्टी' आणि `पोएटिक लायसन्स' अशा दोन परवान्यांच्या आधारे हे गाडं दामटण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण, या परवान्यांची हद्द कुठवर गृहीत धरायची?
  संजय लीला भन्साळी म्हणतो तिथवर? तसं करता येणं कठीण आहे. कारण, एकतर त्याला देवदास हा निखळ प्रेमवीर वाटतो, हाच गुन्हा अजामीनापात्र आहे
सिनेमाच्या सुरुवातीलाच भन्साळीचं ` इंटरप्रिटेशन' प्रेक्षकावर आदळतं. सिनेमाची सुरुवात होते, देवदासच्या स्वागताच्या प्रसंगानं. कादंबरीत देवदास किशोरवयात शिक्षणासाठी कलकत्त्याला पाठवला जातो आणि तरुणवयात तिथूनच आपल्या गावाला परततो. कलकत्त्याची हवा लागल्यावर तो उंची कपडे, कुरते, सोनसाखळी, सोन्याचं घडय़ाळ, हातात छडी, विलायती बूट अशा थाटात वावरतो. भन्साळीच्या सिनेमात देवदासला काही काळासाठी सूटबूट चढवला गेलाय. त्यासाठी देवदासला कलकत्याऐवजी ऑक्सफर्डला पाठवलं गेलंय. तो ऑक्सफर्डहून परततो. तिथूनच सिनेमाची सुरुवात होते. या त्याच्या स्वागताच्या प्रसंगात देवदासची आई (स्मिता जयकर) आणि पारोची आई (किरण खेर) या खानदानी बंगाली स्त्रिया हिस्टेरिया झाल्यासारख्या चेकाळून वागता- बोलतात. पैकी पारोची आई तर संपूर्ण सिनेमाभर इतक्या उंच पट्टीत वावरते की हिला कोणत्याही क्षणी ब्लडप्रेशरचा ऍटॅक येईल. अशी शंका यावी.
 हा संजय लीला भन्साळीच्या सोडा, चोप्रा कँपच्या स्टँडर्डवरही भडक मानला जाईल. इतका हायपर प्रसंग सिनेमाच्या सुरुवातीला का योजला असावा? ही भन्साळीची चतुर ट्रिक आहे. आपण स्टीअरिंग व्हीलवर बसलेले सलमान खान आहोत असं कल्पून पहिलाच सीन तो प्रेक्षकांच्या असा काही अंगावर आणतो की प्रेक्षकांचं लशीकरणच होऊन जातं. देवदास ही कादंबरी, देवदासवर आधी बनलेला एखादा सिनेमा यांच्याशी प्रेक्षकाचं चुकून काही नातं असेलच. तर ते जोरदार आघात करून तोडून टाकण्याची ही युक्ती आहे. त्यातून हा इतर कुणाचा नाही. माझा देवदास आहे. हे अत्यंत परिणामकारकपणे दिग्दर्शक प्रेक्षकाच्या मनावर बिंबवतो. इथून पुढे साडेतीन तास समोरच्या पडद्यावर काहीही सहन करायची मानसिक तयारी करून टाकतो. आणि पुढचा सिनेमा या तारसप्तकात घडत नसल्यानं तो आपसूकच सुसह्य वाटू लागतो.
  पण, ही ट्रिक म्हणजे देवदासच्या मूळ कथानकातल्या नाटय़ाचे सगळे तलम पोत उद्ध्वस्त करून टाकणारा प्रथमग्रासे मक्षिकापातच  ठरतो. देवदासला सिनेमात (निव्वळ पोस्टरच्या सोयीसाठी?) साहेबी पोशाखात एन्ट्री करायला लावण्यासाठी आणि आणखी काही मिनिटं सस्पेंडरयुक्त ट्राउझर्स आणि तलम, उंची शर्टात दाखवण्यासाठी भन्साळी देवदासच्या व्यक्तिरेखेला पहिला सुरुंग लावतो.
  लहान वयात हूडपणा करून घरातल्यांचं जिणं हराम केल्याची शिक्षा म्हणून शरत्चंद्रांचा देवदास कलकत्त्याला शिक्षणासाठी पाठवला जातो. या, घरातून बाहेर काढलं जाण्याचा, देवदासच्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्याच्या-पोराच्या स्नेहसंबंधावर मोठा गहिरा परिणाम झालेला आहे. हा सगळा परिणामच इथे वजा होता. कारण, इथल्या देवदासला ऑक्सफर्डला कुणी शिक्षा म्हणून तर निश्चितच पाठवलं नसणार? शरत्बाबूंचा देवदास लहानपणात कुठेही विशेष शैक्षणिक चमक दर्शवत नाही आणि ऑक्सफर्डमध्ये `पेमेंट सीट' असल्याचं ऐकिवात नाही. खरंतर तो लहानपण वांडपणा करण्यात आणि त्यातही चोरून तंबाखूसेवनासारखा हुमदांडगेपणा करण्यात दवडतो. इथला देवदास मात्र ऑक्सफर्ड जातो म्हणजे ब्रिलियंटच असणार. असा हुशार मुलगा घरातल्यांचा लाडका असणार. ज्या अतिभडक उत्साहात देवदासच्या घरातले त्याच्या स्वागताची तयारी करताना दिसतात. त्यातून याच समजाची पुष्टी होते. या देवदासच्या मनात घराबद्दल. वडिलांबद्दल अढी असण्याचं प्रयोजन उतर नाही.
  त्यामुळेच पुढे एकदा हा देवदास आपल्या परमभक्त नोकराकडे. धरमदासकडे जेव्हा रडगाणं गातो, की वडिलांचं माझं कधी जमलं नाही, मोठा भाऊ द्विजदासच आईचा लाडका होता. मी कायम दुय्यमच राहिलो, तेव्हा तो खोटारडा वाटतो.
 हा `ऑक्सफर्ड रिटर्न्ड' देवदास आपलं उच्चशिक्षण मिरवताना अमेरिकी पद्धतीनं `या...या...' म्हणतो, `येस'ची ब्रिटिश अदब दाखवत नाही. हा गावठीपणाही घडून गेलाय दिग्दर्शकाकडून त्याला सूटबूट चढवण्याच्या घाईत.
  हा क्लृप्तीबाजपणा सिनेमाच्या आणखी अंगलट येतो. तो देवदास घरातल्यांवर रुष्ट होऊन कलकत्त्याला निघून जातो तेव्हा. कारण, सिनेमातल्या देवदासचा कलकत्त्याशी संबंध काय?
  कादंबरीतल्या देवदासला कलकत्ता परिचयाचं आहे. तिथे तो राहिला. वाढला, शिकला आहे. चुन्नीलालची आणि त्याची तिथल्या होस्टेलवजा निवासातली ओळख आहे. म्हणूनच लहानपणी कलकत्त्याला `हुसकावल्या' गेलेल्या देवदासनं तरुण वयात घरातल्यांवर रुष्ट होऊन स्वेच्छेनं कलकत्त्याला निघून जाण्याला जो अर्थ आहे. तो या ` ऑक्सफर्डरिटर्न्ड' देवदासनं नंतर तडकून कलकत्त्याला जाण्याला लाभू शकत नाही.
 भन्साळीच्या कथित इंटरप्रिटेशनच्या सोयीसाठी असा तकलादू आणि जागोजागी उघडा पडणारा फिल्मीपणा देवदासच्या पटकथेत जागोजाग दिसतो. देवदासला घरातला लाडका ठरवल्यावर त्याच्या थोरल्या भावजयीचा (प्रीती खरे) कादंबरीतला खाष्टपणा सिनेमात दुष्टपणाच्या पातळीवर आणून ठेवला जातो. देवदास आणि पारोच्या प्रेमप्रकरणात बिब्बा घालण्याची जबाबदारी तिला पार पाडावी लागते. पारोच्या खलनायकी जावयाचं, कालीबाबूचं (मिलिंद गुणाजी) संपूर्णपणे काल्पनिक पात्रही याच गरजेतून निर्माण होतं.
 भन्साळीनं `सिनेमॅटिक लिबर्टी'च्या नावाखाली केलेला सर्वात ढोबळ बदल म्हणजे त्यानं सगळ्या पात्रांना कादंबरीतल्यापेक्षा कैकपटींनी अधिक श्रीमंत बनवलंय. कादंबरीतल्या मानसिक घडामोडींना पुरेसा अवकाश (स्पेस) देण्याचा मुद्दा वर आलाच आहे. शिवाय. संजय लीला भन्साळीच्या शैलीची अशा प्रकारच्या दृश्यात्मक भव्यतेशी नाळ जुळली आहे. आणि मेनस्ट्रीमचे रूढ संकेत धुडकावत. मेनस्ट्रीमच्या रूपबंधातच तयार होणाऱया चित्रपटांना किमान विक्रयमूल्य लाभावं यासाठी अशा ढोबळ तडजोडींची मुभा देण्यात गैर काहीच नाही. पण, सर्वात महत्त्वाचा निकष असावा, तो भव्यदिव्यतेच्या सोसामुळे देवदासच्या मूळ गाभ्याला छेद जातो असा छेद जातोच.  
कादंबरीतल्या देवदास आणि पारो यांच्या घरांचे या सिनेमात महाल झाले आणि त्यांच्याशी बरोबरी करण्यासाठी चंद्रमुखीचा कोठाही राजेशाही झालाय. सिनेमातली चंद्रमुखी कादंबरीतल्या चंद्रमुखीच्या ऐपतीच्या दहा दासी पदरी बाळगेल, असं वाटतं. त्यामुळेच, देवदासला आपलं नाचणं-गाणं, बाजारबसवीपण आवडत नाही, म्हणून ज्यावर गुजारा आहे तो कोठा सोडून देऊन चंद्रमुखीनं साधेपणानं जगण्याचा निर्णय घेण्यातली भावनेची तीव्रता इथे बोथट होऊन जाते.
देवदासच्या भावविश्वातल्या सगळ्याच पात्रांवर हा अन्याय होतो. देवदासला चंद्रमुखीच्या कोठय़ावरर नेणारा चुन्नीलाल ऊर्फ चुन्नीबाबू कादंबरीतही रंगेल-छटेल दिसतो. तसा वागतो. पण, हा त्याचा मूळ पिंड नाही. त्याच्या बहकण्यामागे तेवढीच मोठी, छुपी वेदना आहे. याचा वाचकाला विसर पडत नाही. तो छचोर वाटत नाही. बिमलदांच्या देवदासमध्ये मोतीलालसारख्या नटश्रेष्ठानं त्याच्या वाटय़ाचे मोजकेच प्रसंग यादगार करताना चुन्नीलालचा आब काय सुरेख राखला होता.
  तोच चुन्नीबाबू (जॅकी श्रॉफ) भन्साळीकृत देवदासमध्ये कॉमेडिनच्या पातळीवर घसरतो. बी ग्रेड मुजरापटांमधल्या दिलफेक आशिकांसारखा `द से दिल होता है, द से दोस्त होता है, द से दर्द होता है...' असली. स से सरदर्द निर्माण करणारी, प से पोपटपंची करीत फिरतो. दिग्दर्शकानं पिटातल्या पब्लिकला डोळ्यासमोर ठेवून `रिलीफ' देण्याची हमाली करण्यासाठी चुन्नीलालची नियुक्ती करून एका उमद्या. रसरशीत व्यक्तिरेखेचा बेजान कटआउट बनवून ठेवला आहे.
  मूळ कादंबरीतलं सूक्ष्मनाटय़ नाकारायचं, तिथले तलम पोतपदर धुडकावून द्यायचे. त्याजागी विजोड ठिगळं जोडायची आणि मग एक खड्डा बुजवायला दुसरा खणायचा, असा या देवदासचा प्रवास चालतो.
  या प्रवासातला `माइलस्टोन' म्हणजे पारो-चंद्रमुखी भेटीची आणि सहनृत्याची कल्पना. या घटनेपर्यंत एखाद्या अट्टल दारुडय़ासारखा लडखडत का होईना. चालणारा हा सिनेमा कोसळत जातो. मूळ देवदासच्या कहाणीपासून पूर्ण फारकत घेतो.
 आणि या उपक्रमाचं कारण काय? सिनेमात ऐश्वर्या आणि माधुरीसारख्या नृत्यनिपुण रुपगर्विता आहेत. त्यांना एकत्र आणून नाचवलं नाही तर मजा काय, हे या निर्णयामागचं उथळ लॉजिक आहे.
कादंबरीतल्या पारो आणि चंद्रमुखीची कुठेही, कधीही भेट होत नाही. तरीही त्यांची एकमेकींशी `ओळख' आहे.
धरमदास आणि मानोदीदीकडून पारोला देवदास चंद्रमुखीच्या किती आणि कसा आहारी गेलाय. याविषयी कपोलकल्पित कहाण्या ऐकायला मिळतात. देवदासला चंद्रमुखीनं नादी लावलंय, या माहितीत, देवदास हा पारोच्या विरहदु:खातून बाहेर पडण्यासाठी का होईना. अन्य कोणाच्या `नादी' लागू शकतो, असाही गर्भितार्थ दडलेला आहे. तो काही पारोच्या मनात चंद्रमुखीच्या बद्दल स्नेहभावना निर्माण करणारा नाही. पारोला देवदासची सतत काळजी लागून राहिलेली असते. अशावेळी कुणा दुसऱया स्त्राeनं त्याला आधार दिला. तर स्त्राeसुलभ उदारतेनं ती ते मान्य आणि `सहन' करायला तयार होईल. पण, त्यानं एका गणिकेच्या कोठय़ावर पडून राहावं. दारूच्या आहारी जावं. तिच्यावर पैसे उधळावेत, हे तिला खपणं अशक्यच. म्हणूनच वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गावी आलेल्या देवदासची भेट झाल्यावर पारो त्याला `तिला कित्येक हजाराचे दागिने करून दिलेस म्हणे!' असं तिरकसपणे विचारते.
  त्याउलट चंद्रमुखी... देवदास तिचा तिरस्कार करतो आणि किती तिरस्कार करतो, हे तिला वारंवार टोचटोचून सांगत राहतो. तिच्या कोठीवर पडून, तिच्याकडून कळत नकळत सेवा करून घेत असताना, दारूच्या नशेत बरळणाऱया देवदासच्या ओठी नाव मात्र येतं ते पारोचं. आपण एखाद्यावर जीव ओतून प्रेम करावं, त्यात स्वत:ला पोळून घ्यावं. या प्रेमातून आपल्याला रत्तीभरही सुख लाभणार नाही याची खात्री असताना सर्व प्रकारचा आधार प्रियकराला द्यावा आणि त्यानं मात्र मनोमन त्याच्या प्रियपात्राचा धावा चालवावा, असला उफराटा न्याय चंद्रमुखीच्या भाळावर रेखला गेलाय. ती तो सौभाग्यचिन्हासारखा स्वीकारते. देवदासारख्याचं प्रेम `आपल्यासारखी'ला अप्राप्यच असायचं, अशी ठाम समजूत करून घेतल्यासारखी ती वागते. त्यामुळेच देवदासकडून जेव्हा प्रेमाचे भासण्याजोगे चार गोड शब्द ऐकायला मिळतात. तेव्हा तिला धन्य. कृतार्थ वाटतं. ती परीचा द्वेष करीत नाही. पारोनं देवदासला अव्हेरलं नसणारं. देवदासनं आपल्या करणीनं पारोला गमावलं असणारं. याचं अचूक भान तिला आहे. ते ती स्पष्टपणे बोलूनही दाखवते; तेही देवदासच्या प्रेमात आकंठ बुडालेली असताना.
  एकमेकींना कधीच न पाहूनही मनात एकमेकींची विशिष्ट प्रतिमा पक्की तयार झालेल्या या दोन स्त्रिया म्हणजे देवदासच्या कहाणीचे भक्कम आधारस्तंभ. त्यांच्याविना देवदास अपुरा आहे. आणि तो इतका हतभागी आहे, की या दोन भक्कम पिळाच्या स्त्रियांचं बिनशर्त प्रेम लाभूनही तो अपुराच राहतो, अधुराच जगतो आणि अधुराच मरतो. आणि त्याच्याशी नशीब जोडून घेतल्याचं फळ म्हणून या दोघींच्याही आयुष्यांची वाताहत होते.
  शरत्चंद्रांना या दोघींना भेटवून. देवदासबद्दल बोलायला लावून, त्यांची मनं हलकी करायला लावणं अशक्य होतं का? पण, त्या प्रतिभावंत लेखकाच्या लेखणीतून बोलणारी या तिघांची नियती विलक्षण क्रूर आहे. तिच्या खात्यात असे सोयीस्कर उ:शाप नाहीत.
  पारो आणि चंद्रमुखी यांना मिळालेल्या अदृष्टाच्या या भीषण तडाख्याचा सारा जोरच त्यांच्या सिनेमातल्या अस्थानी, आचरट भेटीनं पातळ- पचपचीत होऊन जातो.
 तसं पाहिलं तर, बिमल रॉयनीही `सिनेमॅटिक लिबर्टी' घेऊन पारो आणि चंद्रमुखी यांची दृष्टभेट घडवून आणली होतीच की! पण ती कशी? देवदासच्या वाताहतीची कहाणी ऐकून त्याला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी तालसोनापूरला आलेल्या पार्वतीला, देवदास कलकत्त्याला निघून गेल्याची माहिती मिळते आणि ती विन्मुख याचकासारखी परत फिरते. त्याचवेळी, देवदासच्या सांगण्यावरूनच कलकत्ता सोडून एका गावात वसलेली चंद्रमुखी त्याची खबर घ्यायला येत असते. कादंबरीत स्वतंत्रपणे घडणारे हे प्रसंग एकाच कालपटात बसण्याजोगे आहेत. हे लक्षात घेऊन बिमलदांनी या दोघींना एका दृश्यचौकटीत एकत्र आणलंय. कहारांच्या लयबद्ध गाण्याच्या पार्श्वभूमीवर पालखीत बसून निघालेली उद्विग्न पारो आणि अनवाणी पावलांनी कैक कोसांची मजल मारून देवदासच्या गावी निघालेली चंद्रमुखी रस्त्यात एकमेकींना ओलांडून जातात. एवढाच हा प्रसंग. दोघींही एकमेकींना कुतुहलाने क्षणभर न्याहाळतात इतकंच. त्यांना एकमेकींची ओळख लागण्याची शक्यता नसते. बिमलदा अतिउत्साहीपणा करून ती घडवून देण्याच्या फंदात पडत नाहीत. मात्र, या एका प्रसंगी ती कॅमेऱयाला आणि पक्षी प्रेक्षकाला नियतीच्या जागी नेऊन बसवतात. या दोघी कोण आहेत, त्यांचा संबंध काय आहे. आणि त्यांच्यापुढे काय वाढून ठेवलंय, याची कल्पना असलेला प्रेक्षक असहाय्यपणे चुटपुटतो.
  सिनेमाच्या तंत्राच्या अचूक वापरानं बिमलदा कादंबरीचा आशय अधिक गहिरा करून टाकतात.
  भन्साळीच्या देवदासमध्ये मात्र पारो दुर्गापूजेसाठीच्या देवीच्या मूर्तीकरता वेश्येच्या अंगणातली माती आणण्याच्या मिषानं, गरत्या स्त्रिया जिकडे जाण्याचा विचारही करत नाहीत. अशा ठिकाणी दिवसाढवळ्या जाते. चंद्रमुखीला भेटून तिच्यापाशी देवदासची विचारपूस करते. तिचं दु:ख समजून घेते. तिला दुर्गापूजेचं आमंत्रम देऊन, तिथे आपल्यासोबत नाचवून छोटीशी सामाजिक क्रांती घडवून आणते. या उपक्रमशीलतेतून कथानकातच उपटसुंभ असलेल्या कालीबाबूला कृष्णकारस्थान करण्यासाठी योग्य मालमसाला पुरवते. आणि पूजा मंडपात दोघी मिळून त्याचा नक्षा उतरवणारी भाषणबाजीही करतात...
  ... थोडक्यात, शरत्चंद्रांच्या मानसकन्यांपेक्षा या दोघी एखाद्या मद्रासी सामाजिकपटातल्या तद्दन फिल्मी नायिकांसारख्या वागतात. या सगळ्यातून भन्साळीच्या देवदासची कथा पुढे सरकते. पण
शरत्चंद्रांच्या देवदासला मागे सारून, इथून पुढे पडद्यावर त्यांच्या कादंबरीतल्या प्रसंगांशी साधर्म्य सांगणारे प्रसंग घडणार असले तरी ती वाटचाल प्राणहीन असणार, याबद्दल शंका उरत नाही.
संजय लीला भन्साळीला देवदासचा खपाऊ सांगाडा दिसला. आत्मा गवसलेलाच नाही, यावर इथे शिक्कामोर्तब होऊन जातं.
........ ....... .........
देवदास ही प्रेमभंगाची त्यातून आलेल्या वैफल्याची आणि दारूबाजीतून होणाऱया अध:पाताची गोष्ट आहे, हा भारतीय जनमानसात पसरलेला भ्रम आहे, गैरसमजूत आहे. मला विचाराल. तर देवदास ही समस्त भारतीय पुरुषांची शोकांतिका आहे. प्रत्येक भारतीय पुरुष `स्व-स्त्राe'वर भयानक प्रमाणात अवलंबून असतो. त्याला तिच्यात सर्वकाही हवं असतं. त्याच्या गरजेनुसार तिनं अभिसारिका बनावं, पत्नी बनावं, आई बनावं, बहीण बनावं, सखी बनावं, अशी त्याची अपेक्षा असते. त्यात जरा काही कमी पडलं की तो कोलमडतो, उद्ध्वस्त होतो... माझ्या दृष्टीनं देवदास हा या कथानकाचा `नायक' नाही. असलाच तर खलनायक आहे. ` देवदास' साकारताना माझ्या मनात एकच विचार होता... त्याची शोकांतिका पाहून प्रेक्षक त्रयस्थपणे हळहळले तर हरकत नाही. पण, त्याच्या तशा मरणाचं कुणाला `दु:' होऊ नये, त्याच्याबद्दल सहानुभूती वाटू नये... तो कुणाला अनुकरणीय वाटू नये.'
-      शाहरूख खान
-      ... शाहरूख खानला देवदास समजला होता. पण दुर्दैवानं तो सिनेमाचा दिग्दर्शक नसल्यानं, त्यानं यथाशक्ती प्रयत्न करूनही संजय लीला भन्साळीच्या ` देवदास'मधून देवदासच वजा होण्याची प्रक्रिया टळू शकली नाही...
-        ... हिंदी सिनेमाच्या इतिहासात नोंद होईल ती अशी. एखाद्या सिनेमाच्या कथावस्तूचं नेमकं आकलन त्याच्या दिग्दर्शकापेक्षा त्यातल्या अभिनेत्याला होणं हा दुर्दैवाचा परमावधी. या समजशक्तीच्या बळावरच भन्साळीच्या फिल्मी चौकटीत वावरूनही शाहरूख शक्य तिथे शरत्चंद्रांचा देवदास बनण्याचा. त्याची नेमकी शोकांतिका दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.
-        शाहरूखच्या आधी दिलीपकुमार, अमिताभ बच्चन, संजीवकुमार अशा नटश्रेष्ठांनीही कमकुवत, बथ्थड दिग्दर्शकांच्या दिग्दर्शनात. दुय्यम दर्जाच्या प्रसंगांतल्या, कथानकांतल्या गाळलेल्या जागा निव्वळ आपल्या समजशक्तीच्या आणि ती समज पडद्यावर जिवंत करण्याच्या अलौकिक कसबाच्या बळावर भरून काढल्या आहेत आणि तो तो क्वचित आविष्कार ग्रेटनेसच्या पातळीवर नेऊन ठेवला आहे.
-        पण, इथे शाहरुखनं यथाशक्ती प्रयत्न करूनही ती शक्यता नाही. कारण. खेळ देवदास नावाच्या आगीशी आहे. आणि खेळ करणारा संजय लीला भन्साळीसारखा बुद्धिमान, प्रतिभावान, विलक्षण ताकदीचा पण हट्टाग्रही दिग्दर्शक आहे.
-        तो आपल्या अधिकारात काहीही करू शकतो. काहीही म्हणजे काहीही! आपल्या अनिर्बंध अधिकारात तो शरत्चंद्रांच्या देवदासमध्ये नसलेली पात्रं, नसलेल्या घटना सिनेमात घुसडू शकतो. आणि या भरताडभरतीला जागा करण्यासाठी थेट देवदासच्या आत्म्यालाही नख लागू शकतो...
-      ... तसं नसतं तर त्याच्या देवदासमधून देवदासचं बालपण इतक्या सहजगत्या वजा कसं झालं असतं?
-      वांड देवदासला कलकत्त्याच्या काळ्या पाण्यावर पाठवण्यासाठी निघालेल्या बग्गीच्या मागे, बाळमुठीत त्याचे तीन रुपये घेऊन जिवाच्या आकांतानं धावणारी पारो... देवदासच्या अपरिहार्य शोकांतिकेची बीजं जिथे पेरली गेली, त्या त्याच्या बाळपणातली ही आणि एवढी एकच प्रतिमा भन्साळीच्या देवदासमध्ये दिसते. पारो आणि त्याची किती घनिष्ट मैत्री होती. याचे उल्लेख इतरेजनांच्या बोलण्यातून येत राहतात. बास, संपला वास्ता!
-        वस्तुत: देवदासचं बालपण समजल्याशिवाय त्याची घडण समजून घेणं अशक्य आहे. कारण, शाळकरी वयातच त्याच्या अविचारी घरसोड वृत्तीचे, आततायीपणे कशालाही तीव्र प्रतिक्रिया देण्याचे, आपलं तेच खरं करण्याच्या स्वभावाचे कंगोरे धारदार आहेत. त्यांच्या धारेनं जखमी होणं स्वेच्छेनं स्वीकारणारी एकच व्यक्ती त्याच्या आयुष्यात आहे... पारो... देवदासपेक्षा जातीच्या आणि पैसा, मानमान्यतेच्या हिशेबातही हलक्या कुळातल्या जमीनदाराची ही मुलगी, `देवदा'हा तिच्या बालविश्वाचा केंद्रबिंदू.
-       शाळेत खोडय़ा काढणारा, बरोबरीच्या पोरांवर ढेकळं फेकून मारणारा, कुणाचीच ना कुणाची कळ काढून रोज नवनवे तमाशे घडवून आणणारा. शाळेला दांडी मारून कुठेतरी दडी मारून चोरून धूम्रपान करणारा देवदास घरच्यांच्या लेखी, वाया जाण्याच्या मार्गावर असलेला हुच्च मुलगा आहे. त्याच्या या अवगुणांमुळे कुणालाही त्याच्याबद्दल प्रेम वाटणं शक्य नाही. प्रेम म्हणजे बिनडोक स्वामीभक्ती अशी धारणा असलेला धरमदास आणि `देवदा'ची एकतर्फी अधिकार गाजवण्याची वृत्ती निमूटपणे सहन करणारी पारो हेच काय ते त्याचे सगे.
-        त्याची वट चालते ती फक्त पारोपाशी. ती त्याच्यामागे फरपटत राहते. त्याला अनेक प्रसंगी पाठीशी घालते. त्याची काळजी घेते आणि या सगळ्याचं फळ म्हणून वर त्याचा मारही खाते. तो आपल्यावर वर्चस्व गाजवतो. हीच तिला. तो आपल्याला `आपलं' मानतो, याची खूण वाटते. मुळात अत्यंत मानी असलेला तिचा स्वभाव कधीकधी या समर्पणवृत्तीच्या आगीत स्वत:च पोळून निघते.
-        पराकोटीच्या आत्मकेंद्रित देवदासपाशी त्याच्या उपद्व्यापांतून पारोचा विचार करायची फुरसतही नाही आणि त्याला तशी गरजही भासत नाही. पारोचं अस्तित्व त्यानं इतकं गृहीत धरलंय की त्याबद्दल तो बेफिकीर आहेतिचं त्याच्याजवळ असणं हे जणू तिचं कर्तव्यच आहे.
-      कोणत्याही नात्यातली जबाबदारी स्वीकारायची नाही. त्यासाठी प्रसंगी ते नातंच नाकारून मोकळं व्हायचं. हे देवदासला `कराव' लागत नाही, त्याच्याकडून ते आपसूक `होत.'
-      त्यामुळेच कलकत्त्याला जातानाही त्याला त्रास होतो, तो घरातल्यांनी हुसकावून काढल्याचा. पारोपासून आपण तुटणार, याची त्याला त्याहीवेळी फारशी पर्वा नाही.
-        कलकत्त्याला रवानगी झाल्यानंतर तो तिथे किती रमतो, तिथे त्याचे कुणाशी भावबंध जुळतात का, घरच्यांना ज्या अर्थानं तो `सुधारावा' अशी इच्छा असते, त्या अर्थानं तो सुधारतो का, याविषयी शरत्चंद्र मौन राखतात. ते पुरेसं बोलकं आहे. कारण, देवदासचा स्वभाव कुणात मिसळण्याचा, कुणापाशी व्यक्त होण्याचा नाही. त्याच्या भावविश्वाचा गाभा त्याच्याही नकळत कोराच राहिला असण्याची शक्यता जास्त.
-        मधल्या काळात तो अधूनमधून सुटीला गावी येऊन जातो. त्याच्या वागण्यात शहरी बाबूच्या शिष्ट छटा दिसू लागतात. पारोची तो आवर्जून भेट घेत नाही. तिच्याशी गप्पागोष्टी करीत नाही. दोघांचंही वयात येण्याचं अवघड वय आणि तत्कालीन सामाजिक स्थिती लक्षात घेता त्यांना सहवासाचे क्षण मिळणं अशक्यच असतं. ज्या काही भेटी होत असतील, त्यांत पौगंडसुलभ लज्जा आड येत असेल. पण, देवदासचा सहवास नसतानाही पारोच्या मनातली देवदासची प्रतिमा पक्की राहते. वाढत्या वयाबरोबर ती नवा, भावी `नवऱया'चा आकार घेते. देवदासला मात्र रिकम्या मनानंच जगणं सोयीचं वाटतं की काय, कोण जाणे! कलकत्त्यात त्याला कधी पारोची तीव्रतेनं आठवण आल्याचं दिसत नाही. तो तिच्याशी फारसा पत्रसंपर्कही ठेवत नाही. तिच्या नसण्यानं त्याच्या भावविश्वात काही उणावत नाही... निदान तशी जाणीव त्याला त्यावेळी होताना दिसत नाही...
-      ... संजय लीला भन्साळीनं काट मारलेल्या देवदासच्या `बालकांडा'त इतकं सगळं घडतं. शिवाय, कादंबरीत देवदास हे मध्यवर्ती पात्र आहे, ही त्याची कहाणी असली तरी तो `नायक' नाही. हेही त्यातून स्पष्ट होतं. शरत्चंद्र कोणत्याही प्रसंगात देवदासच्या वागण्याचं समर्थन करीत नाहीत. त्यांच्या तटस्थ लेखणीमुळेच देवदासबद्दल `असा काय हा माणूस' अशा कुतुहलापलीकडे वाचकाच्या मनात वेगळी. जवळिकीची भावना उत्पन्न होत नाही.
-       संजय लीला भन्साळीचा सिनेमा हे सगळं निगरगट्टपणे नाकारतो; हा भक्कम पाया वगळून `देवदास'ची इमारत रचण्याचा प्रयत्न करतो. आणि वर देवदासला `हीरो'ही बनवतो... पुठ्ठय़ाच्या कटआउटसारखा! कसलीही खोली नसलेला, तकलादू हिंदी फिल्मी हीरो... ऑक्स्फर्डरिटर्न्ड, उच्चशिक्षित, घरातल्यांचा लाडला बेटा देवदास ऊर्फ राहुल, ऊर्फ राज, ऊर्फ रोहित ऊर्फ... शाहरूख खान.
-        म्हणूनच देवदासवरच्या प्रेमाचा एक कध्धीच न विझणारा दिवा वर्षानुवर्षे पेटताबिटता ठेवणारी फिल्मी पारो जेव्हा त्याला विचारते. ``इतक्या वर्षात एवढयाच चिठ्ठय़ा लिहिल्यास मला! जराही आठवण नाही आली तुला माझी?'' तेव्हा हा देवदास खोडकरपणे उत्तरतो, ``नाही बुवा, नाही आली फारशी आठवण. फक्त एक गोष्ट व्हायची तेव्हा मला तुझी खूप आठवण यायची... जेव्हा मी श्वास घ्यायचो...''
-        इतक्यावरच हा पठ्ठय़ा थांबत नाही. तर आपल्या विरहकाळातले तास/ घटका/ पळं वगैरे हिशेबही तोंडी मांडून दाखवतो आणि आपलं उच्चशिक्षण सार्थकी लावतो...
-       ... हा प्रसंग कुणाला उत्कट प्रेमाचा आविष्कार दर्शवणारा वाटू शकतो. कुणाला त्यात विलक्षण नाटय़ सापडू शकतं. स्वतंत्रपणे या प्रसंगाचा मगदूर काहीही असो; हा शरत्चंद्रांच्या देवदासमधला प्रसंग असू शकत नाही.
-        ज्या सिनेमात हा प्रसंग आहे, तो सिनेमा `देवदास' असू शकत नाही.
देवदासला पारोवेडा प्रेमवीर बनवून, काळाचे संदर्भ धाब्यावर बसवत, उभयतांकडून प्रेमचेष्टा करवून घेऊन भन्साळीनं देवदास- पारो नात्याला थेट रोखेबाजारातील निर्दैशांकासारखे बाजारू केलं आहे.
  मुळात पारोवर आपलं प्रेम आहे की काय, अशी अस्फुट जाणीव देवदासला झाली ती वेळ सर्व अर्थांनी, कायमची टळून गेल्यानतंर. ज्या एका गफलतीची फळं त्यानं आणि त्याच्यावर प्रेम करणाऱया सर्वांनी आयुष्यभर भोगली... ज्या गफलतीनं त्याला आत्मनाशाच्या खोल गर्तेत ढकललं, ती गफलतच भन्साळीकृत सिनेमातला देवदास करत नाही आणि त्या गफलतीची फळं मात्र यांत्रिकपणे भोगतो. आणि मग त्याची सगळी शोकांतिकाच सिनेमात निष्प्राण, निष्प्रभ होऊन जाते.
  कादंबरीत देवदास-पारो यांच्या लग्नासंबंधी चर्चा होते, तेव्हा मुळात तो फारसा उत्साही दिसत नाही. वडिलांनी हा रिश्ता नाकारल्यावर त्याला व्यक्तिगत पातळीवर दु:ख होत नाही; तर पारोला, तिच्या घरातल्यांना किती वाईट वाटेल, याचंच दु:ख होतं. त्याचवेळी रूढ प्रथेप्रमाणे आपले आईवडील वागले ते बरोबरच, असंही त्याला वाटतंच. पारोसारखी मानी मुलगी बदनामीची भीती न बाळगता ऐन रात्री त्याला भेटायला, त्याच्या चरणी आसरा मागायला येते, त्या वेळीही, केवळ तिची आपल्याशी लग्न करण्याची इतकी तीव्र इच्छा आहे म्हणून, जणू तिच्यावर उपकार करीत असल्यासारखाच, तो या प्रस्तावाला मंजुरी देतो. मात्र, आईवडिलांच्या मनाविरुद्ध लग्न करण्याइतकी पारोची ओढ त्याच्या मनात अजिबातच नसते.
  काहीतरी चमत्कार घडून दोघांच्या लग्नाचा मार्ग निघावा, पण. तो सर्वसंमतीनं, कुणालाही न दुखावता किंवा अगदीच वेळ पडली तर बदनामीतून, असा `परस्पर पावणेबारा'वाला आदर्शवादी भासणारा दृष्टिकोन आहे त्याचा कशातच गुंतवणूक नसल्यानं देवदासला कशाचीही किंमत मोजणं जड होतं. `सर्वे सन्तु निरामय:' किंवा `जो जे वांछिल तो ते लाहो'सारखी उदात्त भासणारी, पण तशी सखोल तात्विक बैठक नसलेली यदृच्छावादी भूमिका आहे त्याची. माणसांच्या आकांक्षा परस्परविरोधी, म्हणून कुणाला ना कुणाला तरी दु:खकारक असतात. याची जाणीव ठेवून स्वत:च्या आयुष्यात जे काही घडावंसं वाटतं ते प्रसंगी कटुता स्वीकारून स्वत:ला घडवावं लागेल, याचं त्याला भान नाही.
 आईवडील बघत नाहीत म्हटल्यावर तो हातपाय गाळतो आणि निषेधाचा मार्ग म्हणून सरळ कलकत्त्याला पळ काढतो. तिथून पुन्हा पारोला पत्र लिहितो. की तुझ्याबद्दल मला कधीच `तसं' काही वाटलं नव्हतं... देवदासची शोकांतिका ही की ते त्या घटकेला खंरही असतं.
  ते पत्र लिहिल्यानंतर देवदासला पारोची चिंता सतावू लागते. ही मुलगी काही जिवाचं बरंवाईट तर करून घेणार नाही ना, अशी भीती वाटून तो तिला भेटायला गावी परततो. पण तोवर खूप उशील झालेला असतो. त्याचं पत्र मिळाल्यावर पारोनं आपलं आयुष्य एका बिजवराशी बांधण्याचा निर्णय घेतलेला असतो. हे कळतं. तेव्हा लहानपणचा पझेसिव्ह देवदास. पारोला आपल्या मालकीही वस्तू मानणारा, तिचं अस्तित्व गृहीत धरणारा देवदास जागा होतो. आपल्या छोटय़ाशा चुकीची तिनं इतकी सजा द्यावी, इतकी कशी ती अभिमानी, असा तिलाच बोल लावतो. आणि आता ही चूक सुधारता येणार नाही, हे लक्षात आल्यावर संतापाच्या भरात हातातल्या फोकानं तिच्या कपाळावर निष्ठूरपणे आपल्या `प्रेमा'ची निशाणी उमटवतो... कायमच्या गमावलेल्या प्रेमाची निशाणी.
... देवदास योग्य वेळी पारोपाशी प्रेम व्यक्त करीत नाही, ही त्याची शोकांतिका नाही; तर ती त्याच्या प्रेमात पागल झालेली असताना त्याला आपल्या मनातल्या प्रेमाची जाणीवच होत नाही. ही त्याची शोकांतिका आहे. दोन प्रेमिकांना एकमेकांशी विवाह करता येणं. एकत्र संसार करणं ही प्रेमाची व्यावहारिक परिणती आहे. प्रेमसाफल्य नाही. प्रेमाचं भावनिक साफल्य आपल्या प्रिय व्यक्तीकडून प्रेमाला तेवढाच उत्कट प्रतिसाद मिळवण्यात असतं. देवदासला हे साफल्य दोनदा लाभतं आणि त्याच्यावर जिवापाड प्रेम करणाऱया पारो आणि चंद्रमुखीला मात्र तो हे साफल्य सहजासहजी, जेव्हा हवं तेव्हा देत नाही. पारो जेव्हा त्याच्या आयुष्यात असते, तेव्हा तिच्या अस्तित्वाची तो कदर करीत नाही. तिला आपण पराकोटीनं गृहीत धरलंय हेच जिथे त्याला समजत नाही. तिथे असं गृहीत धरण्याला प्रेम म्हणतात, त्याचा काही तकाजा असतो. हे त्या हतभाग्याला कुठून कळणार?
  त्याचा इथून पुढचा अध:पातही मासलेवाईक आहे. आयुष्यातली एक गोष्ट. तीही निव्वळ आपल्या गाढवपणामुळं, धड झाली नाही, म्हणून तो संपूर्ण जगणंच नाकारतो. आईवडिलांना दु:खी करायचं नाही, म्हणून पारोला नाकारल्याचा दावा करणारा देवदास पुढे त्यांना कणभरही सुख लाभणार नाही, असं वर्तन करतो.
  तो दांभिक नाही; मात्र, त्याची बुद्धी आणि वकूब सामान्यच आहे. आयुष्यातल्या काही असामान्य घटना आणि दोन असामान्य स्त्रियांचं अपार प्रेम त्याला अपरिहार्यपणे असामान्य करून जातं. तेवढं असामान्यत्व त्याला पेलत नाही. म्हणून तो कोलमडत जातो.
 ...पारोला गमावण्याचा चटका हाच चिदराह, असं देवदास ठरवतो. त्यात पोळण्याची शिक्षा स्वत:च स्वत:ला सुनावतो. पण, तो तेवढाही नशीबवान नाही. आयुष्य असं एका टप्प्यात गोठत, थांबत नाही. कोणतीही पोकळी शाश्वत नसते. कितीही नाकारलं तरी ती भरतेच. याची जाणीव चंद्रमुखीमुळे त्याला होते. तो चंद्रमुखीला झिडकारत, नाकारत राहतो. त्याचवेळी दु:खाच्या चटक्यांनी मिळालेली संवेदनशीलता त्याच्या मनात चंद्रमुखीबद्दल करूणा उत्पन्न करते. तिच्या कोठय़ावर जाऊन तिचे वामाडे काढतो तोही देवदास आणि तिच्यासारख्या स्त्रिया किती सहन करतात, किती ताकदीच्या असतात, याचे मनापासून गोडवेही गातो, तो तोच. तिच्याही तो असहाय्य अपरिहार्यपणे प्रेमात पडतोय. पण, तिलाही स्वीकारत नाहीच.
  पारो आणि चंद्रमुखीसारख्या विलक्षण सामर्थ्यवान स्त्रिया देवदाससारख्या बुळ्या माणसाच्या इतक्या प्रेमात कशा पडतात. या प्रश्नाचं उत्तर त्याच्या असामान्य दुबळेपणातच आहे. स्त्राe-पुरुष प्रेमात दिली- घेतली जाणारी सुखं वेगळी असतात. देवदास त्याच्या स्त्रियांना आपली काळजी वाटण्याचं सुख देतो, अगदी भरभरून देतो. आपल्या नसण्यामुळे कुणीतरी उद्ध्वस्त होऊ शकतं. इतक्या आपण महत्त्वाच्या आहोत. हे सुख तो पारोला देतो. आणि आपल्याला धुत्कारण्याइतकं महत्त्व कुणीतरी आपल्याला देतं, आपल्यावर कुणीतरी इतकं अवलंबून आहे. कुणालातरी आपल्याकडून सांभाळलं जाण्याची तीव्र गरज आहे. या चंद्रमुखीसारखीला एरवी अप्राप्य असलेल्या भावनेचं सुख तिला लाभतं ते देवदासकडून योगायोगाची नसलेली गोष्ट म्हणजे दोघीही आपापल्या कारणांमुळे माता बनू शकलेल्या नाहीत. त्यांची वात्सल्याची गरज देवदास अगदी मन:पूत भागवतो.
  देवदास चंद्रमुखीच्या दारात जातो. तो सतत पोखरणाऱया दु:खावर जी काही मिळेल ती दवा करायची म्हणून. पण, नितांत गरज असतानाही तिच्याकडे `ग्राहका'च्या दृष्टिकोनातून पाहू शकत नाही; आधी घृणेपोटी आणि नंतर कणवेपोटी. देवदासच्या व्यक्तिमत्त्वातलं हेच बलस्थान हीच त्याच्या असामान्यत्वाच्या प्रवासाची सुरुवात. आपल्या `मालकी'ची पारो आता आपली नाही म्हणजे काय, इतक्या आप्पलपोटय़ा आत्मपीडेतून सुरू झालेला देवदासचा प्रवास चंद्रमुखीच्या साथीनं अपरिहार्यपणे नव्या भानाचा, आत्मज्ञानाचा आणि ज्ञानाबरोबर बहुश: जोडूनच येणाऱया अपार दु:खाची वाट चालतो. आपलं पारोवरचं प्रेम इतकं उत्कट असताना. त्यातून इतकी वाताहत झाली असताना. त्यातून मिळालेली वेदनाही शाश्वत नाही. आपण दुसऱयांदा प्रेमात पडू शकतो. ही जाणीव त्याला खचवून टाकते.
  त्याचं हे ढासळणं प्रेमभंगापेक्षा खूप वरचं, तात्विक, आध्यात्मिक पातळीवरचं आहे. काहीही शाश्वत नाही. मग जगण्याची व्यर्थ धडपड का करायची, असली कासाविशी, मधेमधे सगळ्यातून सावरण्याचा सतत फसणारा प्रयत्न, कुणालाही दु:ख होऊ नये म्हणून धडपडताना आपल्या प्रत्येक कृतीनं सर्वांना दु:खीच करत जाण्यातली असहाय्यता अशा गर्तेत देवदास कोसळत जातो. आणि या ढासळण्यातून त्याला सावरू पाहणाऱया दोन स्त्रियांची भावनिक साथसोबत असूनही तो सतत एकटाच असतो, हा त्याच्या शोकांतिकेतला सर्वात करूण भाग. पारोच्या दाराशी पोहोचल्यानंतरही, त्याला तिच्या सावलीच्याही दर्शनाविना बेवारशी भिकाऱयाचं मरण पत्करावं लागतं, तेव्हा त्याच्या या असीम एकटेपणाचं भेसूर विश्वरुपदर्शन घडतं.
....................................
 देवदास आणि पारो यांच्यात खास भन्साळी शैलीतले प्रेमप्रसंग घडवण्याच्या फुटकळ, सवंग मोहापायी संजय लीला भन्साळीनं देवदासवर सिनेमा काढल्याचं भासवून देवदासचं व्यक्तित्वच नाकारलंय. त्याच्या अशा मरणामागची एवढी मोठी आणि काळगर्तेसारखी खोल पूर्वपीठिका बहुश: नाकारली आहे. स्वीकारलेली विकृत करून मांडली आहे. शरत्बाबूंच्या देवदासचं नाव घ्यायचं, त्याच्याभोवतीच्या वलयाचा फायदा घ्यायची आणि त्याच्या आत्म्यात डोकावूनही न पाहता त्याला आपल्या फिल्मी आकलनाच्या, कथित इंटरप्रिटेशनच्या चौकटीत ठाकूनठोकून बसवायचं, या हट्टापोटी संजय लीला भन्साळीनं शरत्चंद्रांच्या देवदासला आसन्नमरण अवस्थेत पुन्हा पारोच्या दारी नेऊन टाकलंय...
................................
 ... दाराशी कुणी परदेशी मुसाफिर मरून पडल्याचं कळल्यानंतर पारो विचारते. ``कौन मरा?''
  ``तुमच्याच गावचा कुणी देवदास मुखर्जी होता...'' कुणीतरी कोरडेपणानं सांगतो आणि पारोच्या पायाखालची जमीन सरकते...
.............................
... संजय लीला भन्साळीचा देवदास पाहिल्यावर जाणकार प्रेक्षकाच्या मनातून प्रश्न येतो. ``कौन मरा?''
  त्याच्याच आतून उत्तर येतं, ``कुणा शरत्चंद्र नावाच्या कादंबरीकाराचा मानसपुत्र होता म्हणे... देवदास!''


3 comments:

 1. One of the best reviews ever on this movie!!

  I bet the director reads it.

  ReplyDelete
 2. Superb!!
  Btw...तुम्ही Dev D बद्दल लिहलं आहे का?
  ते वाचायला आवडेल

  ReplyDelete