Thursday, March 17, 2011

कुणीही यावे, ‘डॉन' बनून जावे? (दिल पे मत ले यार)


मुंबई ही अतिशय क्रूर, उलटय़ा काळजाची महानगरी आहे. इथे यशस्वी व्हायचं तर बेईमानी, खोटेपणा, संधीसाधूपणाला पर्यायच नाही.
2. जगात कोणताही लल्लू- पंजू, बुद्धू, डफर माणूस सहजपणे गुन्हेगारी जगताचा बेताज बादशहा, डॉन बनू शकतो. ही दोन विधानं पटतात तुम्हाला?
`दिल पे मत ले यार' पाहायचा, आवडून घ्यायचा तर ही विधानं मान्य असणं फार आवश्यक आहे. कारण, एका अतिशय लांबवलेल्या कथानकातून लेखक-दिग्दर्शकांना काय म्हणायचं असेल बुवा, याचा अंदाज घेताना शेवटी हेच युक्तिवाद हाती लागतात.
आणि मुंबईत जन्मलेल्या किंवा बाहेरून येऊन स्थिरावलेल्या कोणाही मुंबईकराला मुद्दा क्रमांक एक सरसकट मान्य करणं अतिशय कठीण आहे. कष्ट उपसण्याची तयारी असणाऱयाला सुसंधींची दारं उघडून देणाऱया या जिवंत, रसशीत शहरावर अन्याय करतो हा युक्तिवाद.
त्याहून भंपक आहे दुसरा युक्तिवाद. इथला नायक जितक्या सहजपणे गुन्हेगारी विश्वात ओढला जातो, जितक्या सहजपणे त्याला डॉन बनता येतं ते पाहिलं तर मुंबईतले गुंडपुंड हसहसहसून गडबडा लोळतील. गुन्हेगार बनणं ही काही फार भूषणास्पद गोष्ट नाही; पण, त्या `क्षेत्रा'`महत्पदा'ला पोहोचण्यासाठी काही क्षमता, काही अक्कल काही अर्हता लागते, हे कसं नाकारता येईल.
असली अतिसुलभ, बेगडी मांडणी अनेक व्यावसायिक सिनेमांमध्ये हरहप्ता पाहायला  मिळत असतात. `दिल पे...' मध्ये ती असल्यानं बिघडतं काय? तर नेहमीच्या निर्बुद्ध व्यावसायिक सिनेमामध्ये हा सगळा तकलुपीपणा लुटुपुटीच्या खेळाचा एक भाग म्हणून सामोरा येतो प्रेक्षकाच्या. `दिल पे...' मात्र एक पोझ घेतो. तो हलक्याफुलक्या शैलीतून सुरुवात करून अंती काही गंभीर भाष्य करू पाहतो. त्याच्या मांडणीमध्ये (अनेकदा थेट ओंगळवाणा होणारा) वास्तवाद दिसतो. हे युक्तिवाद `पटवून' देण्याचा आग्रहीपणा त्यात आहे. म्हणूनच त्याचा तीव्र प्रतिवाद करावा लागतो.
सिनेमाचा नायक आहे रामशरम पांडे (मनोज बाजपेयी) हा जौनपूरहून `जगण्या'साठी मुंबईत आलेला मोटर मेकॅनिक. प्रामाणिकपणा, सचोटी या मूल्यांशी तो कधीच तडजोड करत नाही. हीच त्याची गुणवत्ता काम्या (तबू) या वार्ताहर मुलीच्या मनात भरते. ती त्याच्यावर लेखमाला लिहीते. मुंबईसारख्या निराशाजनक शहरात तो तिला आशेचा एक किरण वाटतो.
ही लेखमाला वाचून दिग्दर्शक महेश भट (स्वत:च्या भूमिकेत महेश भट) प्रभावित होतात. रामशरणच्या आयुष्यावर सिनेमा काढायची प्रेरणा त्यांना होते. काम्यालाच ते या सिनेमाची पटकथा लिहायला सांगतात. या `कामा'मुळे आणि कामापुरतीच काम्या रामशरणशी जवळीक वाढवते. रामशरण या जवळिकीतून तिच्या प्रेमात पडतो. तिला जौनपूरची घरेलु सून बनविण्याची (अर्थातच एकतर्फी) स्वप्नं पाहू लागतो. त्यातून त्याचा मुखभंग व्हायचा तो होतोच. काम्याचं आपल्यावर प्रेम नाही, उलट तिचे तिच्या संपादकाबरोबर `संबंध' आहेत, हे कळाल्यावर रामशरण उन्मळून जातो.
याच काळात गॅरेजमध्ये त्याच्या सचोटीपायी नुकसान सोसायला लागलेला मालक त्याला कामावरून काढून टाकतो. सच्चाई, प्रामाणिकपणावरचा विश्वास उडालेला रामशरण दुबईला जाण्याचे प्रयत्न सुरू करतो. त्यासाठी पैसे गोळा करण्याचा मार्ग म्हणून त्याला स्थानिक डॉनकरता (किशोर कदम) शस्त्रास्त्रांच्या वाहतुकीत सहभागी व्हावं लागतं. इथे `प्रमोशन' मिळून त्याला एखाद्या खुनाचं काम करावं लागेल, अशी शक्यता निर्माण होते; तेव्हा त्याचा व्हिडिओग्राफर मित्र गायतोंडे (सौरभ शुक्ला) त्याला पैसे कमावण्याची क्लृप्ती सांगतो. रामशरण एखादा `गेम' करण्याची जबाबदारी आली की गायतोंडेनं छुपेपणानं त्या कामगिरीचं छायाचित्रण करायचं आणि हे चित्रण एखाद्या टीव्ही चॅनेलला विकून भरपूर पैसे मिळवायचे, अशी ही कल्पना.
एक दिवस रामशरणवर ते काम येतंच. एका चॅनेलच्या मालकालाच ठार मारण्याचं काम. प्रत्यक्ष घटनास्थळी रामशरणचे हातपाय गळतात, तो गोळी झाडू शकत नाही. त्याचे साथीदारच गोळ्या झाडतात. ते पळून गेल्यावर स्वत:वर, परिस्थितीवर चिडलेला, अपमानित रामशरण त्या मृतदेहावर गोळ्या झाडतो. नेमका तेवढाच भाग गायतोंडे चित्रित करतो. आपल्या मित्राचा बळी देऊनही तो हा भाग वाहिनीवाल्यांना विकायला तयार होतो...
यात त्या गोयतोंडेच्या, गरिबीला कंटाळलेल्या, बायकोचं (दिव्या जगदाळे) त्याच्या दुबईरिटर्न्ड मित्राशी (आदित्य श्रीवास्तव) प्रेमप्रकरण, त्यांचाही त्याच कॅसेटवर डोळा असणे, खुनाची सुपारी देणाऱयांनाही तीच कॅसेट हवी असणे वगैरे बरेच घोळ घडून शेवटी घडतं काय...
... तर इकडे रामशरणवर आधारलेल्या सिनेमासाठी काम्याला मोठा पुरस्कार मिळतो आणि तिकडे रामशरण दुबईत स्थाईक झालेला मोठा डॉन बनलेला दिसतो.
सौरभ शुक्लानं लिहिलेल्या या सिनेमात खरंतर दोन सिनेमे आहेत. एक रामशरणच्या सचोटीच्या वासलातीचा सिनेमा आणि दुसरा गुन्ह्याचं प्रत्यक्षचित्रण करण्याच्या कल्पनेवरचा थरारपट- जो एक तृतियांश सिनेमा संपल्यावर सुरू होतो. या दोन सिनेमांना एकत्र गुंफण्यासाठी लेखक सौरभ दिग्दर्शक हंसल मेहता यांनी काहीशी विडंबनात्मक शैली वापरली आहे. ती बराच काळ रटाळ होते, अधेमधे अगदी वास्तववादी होते, शेवटी अगदी गंभीर आणि अगदी शेवटी एकदम हास्यास्पद.
मुळात हा रामशरण काही सत्त्वशील वगैरे न वाटता थेट बावळट दिसतो आणि तसाच वागतो. त्याच्यासारखी हजारो माणसं (त्याच्याइतकी भंकस न करता) या शहरात राहतात, जगतात. काम्यासारख्या पत्रकारणीला रामशरणवर खास बातम्या कराव्याशा वाटतात, महेश भटला त्याच्यावर सिनेमा काढावासा वाटतो; असं हा इसम खास काय करतो, तर काहीच नाही.
शिवाय एका पोरीकडून (अगदी अपेक्षित असाच) नकार मिळाल्यानंतर लगेच त्याचा मूल्यांवरचा विश्वास उडून जातो. एक नोकरी सुटली की मार्ग उरतो तो गुन्हेगारीचाच. एका माणसावर साध्या पिस्तुलातून गोळ्या झाडू व धजलेला हा नायक क्लायमॅक्सला तरबेज गुन्हेगारांची फौजच अत्याधुनिक बंदुकीच्या साह्यानं लोळवतो. बावळटपणाच्या `बळा'वर गुन्हेगारी साम्राज्य उभारतो.
सिनेमात दिग्दर्शक हंसल मेहतानं छायालेखक संजय कपूरच्या साह्यानं अनेक तांत्रिक प्रयोग करून सिनेमाला एक विशिष्ट पोताचं दृश्यरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. तो लक्षणीय आहे. पण, हा सिनेमा कथा पटकथेच्या पातळीवर अतिशय गोंधळलेला, ढिसाळ झाल्यामुळे ही मेहनत अस्थानी ठरते. मनोज बाजपेयीनं स्वत:च्या खांद्यावर सिनेमा पेलायला प्रयत्न केला आहे. पण, तो रामशरणला `नायक' नाही बनवू शकत. त्याच्या एकटय़ावर केंद्रित केलेल्या लंब्याचवडय़ा प्रसंगांमध्ये तो अभिनयाचं `प्रदर्शन' घडवतोय, अशीच भावना होते. तबू अशा भूमिका सहजतेनं करून जाते. सौरभ शुक्लाचा गायतोंडे काही मराठी वाटत नाही. त्याच्या- मनोजच्या एकत्र प्रसंगांवर `सत्या'ची लांबलचक सावली पसरली आहे आणि ते संकलित करायचे राहिल्यासारखेच वाटतात. अन्य मंडळींमध्ये दिव्या जगदाळेचा मराठी ठसका लक्षात राहतो.
संगीतकार विशाल भारद्वाजनं शार्षकगीत आणि `चल पडी चल पडी' ही गाणी आकर्षक केली आहेत. `सुख स्वागतम दुख स्वागतम' मध्ये कवितेची चमक आहे.
एकूणात सिनेमाच्या शीर्षकाला न्याय देऊन प्रेक्षकांनीही `दिल पे मत ले यार'चं आगमन- निर्गमन फारसं मनावर घेण्याचं कारण नाही.

No comments:

Post a Comment