Sunday, March 27, 2011

अलविदा देबूदा (देबू देवधर)


सामान्य चित्रपट रसिकांचे चित्रपटांचे आकलन पडद्यावरील अभिनेत्यांच्या पलीकडे फारसे जात नाही. दिग्दर्शकाला थोडीबहुत ओळख लाभते. चित्रपट ही तंत्राधिष्ठित कला असल्यामुळे चित्रपटाच्या कलात्मक यशापयशाचे खरे श्रेय पडद्यामागच्या गुणवान कलावंत-तंत्रज्ञांचे असते. प्रख्यात छायालेखक देबू देवधर हे अशाच प्रतिभावान तंत्रज्ञांपैकी एक होते. `नेत्रसुखद छायाचित्रण' या घासून गुळगुळीत झालेल्या दोन शब्दांनी उल्लेखल्या जाणाऱया छायालेखन कलेतील ते दादा होते. म्हणूनच `देबूदा' ही त्यांची चित्रपटसृष्टीतील ओळख ही जिव्हाळय़ाबरोबरच आदरही व्यक्त करणारी होती. देबूदा हे पुण्याच्या फिल्म इन्स्टिटय़ूटचे विद्यार्थी. पुण्यातील एका मध्यमवर्गीय घरातील तरुणाने त्या काळात या पेशाकडे वळावे, हीच आश्चर्याची गोष्ट होती. देबूदांच्या नावाभोवती सुरुवातीच्या काळात मराठी सांस्कृतिक जगतात जे कौतुकाचे वलय निर्माण झाले होते, त्याला त्यांचे अमराठी शैलीचे (टोपण)नाव जेवढे कारणीभूत होते, तेवढेच एक मराठी तरुण सिनेमॅटोग्राफर झाला, याचेही कौतुक अंतर्भूत होते. देबूदांनी हे कौतुक कधीही अनाठायी ठरू दिले नाही. महाराष्ट्र दृश्यकलांच्या बाबतीत `साक्षर' नाही, असे गंभीरपणे मानणाऱया अमोल पालेकर यांच्यासारख्या चोखंदळ दिग्दर्शकाच्या मनातील चित्रप्रतिमा फिल्मवर उतरवल्या त्या `मराठी' देबूदांनी. `आक्रित'मधील मानवी मनांचे अंधारे कोपरे, `कैरी'मधील तरलता, `बनगरवाडी'चा रखरखाट, `थोडासा रूमानी हो जाए'ची काव्यात्म लय, यांचे दृश्यरूप पडद्यावर साकारले ते कॅमेऱयामागे देबूदा होते म्हणून. प्रत्येक दृश्याची रंगसंगती, प्रकाशयोजनेतून निर्माण होणारा पोत, कॅमेऱयाच्या हालचालींमधून निर्माण होणारी लय याबाबतीत देबूदा अतिशय दक्ष होते, म्हणूनच पालेकर यांचे ते आवडते छायालेखक होते. अभिनेते नाना पाटेकर यांनी `प्रहार' दिग्दर्शित केला, तेव्हाही त्याचे तांत्रिक सुकाणू त्यांनी याच विश्वासाने देबूदांच्या हाती सोपविले होते. अनेक नवोदित आणि काहीवेळा अर्धकच्च्या दिग्दर्शकांनीही देबूदांच्या आधाराने दिग्दर्शकीय पदार्पण केले. त्यांच्या फसलेल्या चित्रपटांतही सर्वात यशस्वी भाग छायालेखनाचा असायचा, यात काहीच आश्चर्य नव्हते. कॅमेऱयापलीकडच्या जगात देबूदा सदैव प्रसन्न हसताना दिसायचे. अतिशय दिलखुलास स्वभावामुळे त्यांनी अनेक मित्र जोडले. पत्नी श्रावणी जन्माने बंगाली असूनही मराठीतील यशस्वी दिग्दर्शक झाली आणि तिने हिंदीतही प्रवेश केला. लहानपणापासून अभिनयाची गोडी असणारी मुलगी सई ही टीव्ही-चित्रपटांतील अभिनेत्री म्हणून नावारूपाला आली. या चित्रपटांमध्ये रमलेल्या देवधर कुटुंबाविषयी मराठी रसिकांमध्ये कौतुकाची भावना आहे. त्या कुटुंबाचा मुख्य पुरुष काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांचा वारसा मात्र या कुटुंबाच्या रूपाने आणि देबूदांकडे शिक्षण घेतलेल्या छायालेखकांच्या रूपाने पुढे चालतच राहील.

(प्रहार) 

No comments:

Post a Comment