Wednesday, March 9, 2011

रामगोपाल वर्मा की 'आग आग'!


रामगोपाल वर्मा संतापलाय... भयंकर संतापलाय. साहजिकच आहे. त्याचा 'सरकार राज' मोठा गाजावाजा करत प्रदर्शित झाला, लोकांमध्ये त्याची हवाही खूप होती. पण फुग्याला टाचणी लावून ही हवा बाहेर काढण्याचं काम जवळपास सर्वच चित्रपट समीक्षकांनी केलं. बहुतेकांनी हा सिनेमा निष्प्रभ, नीरस, गोंधळलेला असल्याची टीका केली.

( रामूच्या मते) समीक्षेच्या नावाखाली होणारी ही एकतर्फी टीका सहन न करता तिला रोखठोक उत्तर देण्याचा पवित्रा रामूने घेतला. त्यासाठी त्याच्या हातात सध्याचं सर्वात लोकप्रिय शस्त्र आहेच... ब्लॉग. रामूने त्याच्या ब्लॉगवर 'सरकार राज'ला ठोकणाऱ्या सगळ्या समीक्षकांना 'आडे हाथों' घेतलंय. प्रख्यात इंग्रजी दैनिकं, वेबसाइट्स आणि टीव्ही चॅनेल्सच्या समीक्षकांचा त्याने जाहीर पंचनामा केलाय.

या समीक्षकांना अक्कल काय?

त्यांची पात्रता काय?

त्यांना सिनेमातलं कळतं काय?

हे त्याचे प्रश्न आहेत.

प्रत्येकाच्या समीक्षणातले मुद्दे देऊन त्या मुद्द्याबद्दलची आपली प्रतिक्रिया त्याने सविस्तर नोंदवलेली आहे. मात्र, हे करताना रामूने बहुतेक वेळा (त्या समीक्षकांच्याच पातळीवर घसरून) व्यक्तिगत पातळी गाठलेली आहे. कोणत्या समीक्षकाचे दिग्दर्शक म्हणून किती सिनेमे पडलेले आहेत, कोणती समीक्षक स्क्रिप्ट्स घेऊन निर्मात्यांची दारं ठोठावत फिरत असते, कोणता समीक्षक दिग्दर्शनक्षेत्रात घुसायच्या विचारात आहे, असे संदर्भ रामूने दिले आहेत. शिवाय संदर्भ सोडून एक वाक्य उचलायचं आणि त्या विधानाला ठोकायचं, असाही (समीक्षकांना साजेसा) उपक्रम केलाय रामूने.

तरीही समीक्षकांच्या या समीक्षेत रामूच बाजी मारतो.

समीक्षकांच्या सिनेमाविषयक ज्ञानाबद्दलच्या रामूच्या शंका फार गांभीर्याने घेण्याचं कारण नाही. कारण, सिनेमाची समीक्षा ही (भारतात तरी) मोठ्या प्रमाणावर 'परिचयात्मक परीक्षण' वर्गातली असते. त्यात ऊहापोह असतो तो त्या सिनेमाने घडवलेल्या/ किंवा न घडवलेल्या परिणामाचा. तेवढ्यापुरतीच ती चर्चा असते. तो कोणताही प्रेक्षक करू शकतो. सिनेमाचा आशय न आवडणं हा भाग अनेकदा 'परीक्षणा'चा गाभा बनतो. ते सिनेमा बनवणाऱ्यावर अन्यायकारक असतं. उदाहरणार्थ एखाद्या सिनेमात माफिया मनोवृत्तीचं उदात्तीकरण आहे, तर ते एखाद्या समीक्षकाला पटत नाही. त्यावर तो ताशेरे झोडतो. पण, माफियांच्या उदात्तीकरणाचा दिग्दर्शकाचा हेतू त्याच्या हाताळणीतून कितपत साध्य झाला, याची तटस्थ चर्चा नसते. किमान, सिनेमाचा परिणाम का घडतो/ घडत नाही, याच्या खोलात शिरताना आपला मुद्दा स्पष्टपणे आणि गांभीर्याने मांडला पाहिजे, याचं पथ्य अनेक नामवंत समीक्षक पाळत नाहीत. भाषिक कोलांट्या आणि गमतीजमती करण्याच्या नादात वाहावत जातात. काहीजण विश्वकोश, शब्दकोश आणि व्युत्पत्तीकोश एकत्र घेऊन बसल्यासारखे जडजंबाल गोलमाल भाषेत सिनेमावर काहीतरी विद्वज्जड लिहितात. या एकंदरीत पसरटपणावर रामू नेमकं बोट ठेवतो.

पण, समीक्षकांच्या ज्ञानाविषयी एवढे प्रश्न उपस्थित करणा-या रामू आणि रामूसारख्याच अन्य दिग्दर्शकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो. हे समीक्षक जेव्हा तुमच्या सिनेमांची तोंडफाट स्तुती करतात, तेव्हा त्यांच्या अकलेविषयी हेच सगळे प्रश्न का पडत नाहीत?

रामूजी, 'शिवा', 'रंगीला'ची सगळी परीक्षणं काढून बसा एकदा... आम्ही ब्लॉग रिफ्रेश करत राहू! 

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment