प्रिय लाच्छी,
कशी आहेस बाई?
मजेत ना? असायचीसच. तुझ्या अगदी मनाजोगतं झालं ना गं सगळं! असं सगळं `साठा उत्तरी सुफळ संपूर्ण' होण्याचं भाग्य आजच्या काळातल्या बाईलाही लाभत नाही गं! तू तर कोण जाणे कुठल्या शतकातली, त्यात राजस्थानातली. अगदी नशीब काढलंस.
तसं नशीब तू जन्मापासूनच काढलंयस म्हणा! अगं लोककथेतला जन्म तुझा. त्यामुळे आयुष्य कसं अगदी सरळसोट... एकमार्गी... अगदी त्या आयुष्यात उभी राहणारी `दुविधा'सुद्धा! तुझी दुविधाही सोपी आणि तिचं उत्तरही.
काय होती तुझी दुविधा? तुझं लग्न लागलं एका बेपाऱयाच्या मुलाशी, किसनशी. तो बायडीपेक्षा चोपडीत रमणारा. देखणं रुप वगळता बाकी सुमार, अनरोमँटिक. ऐन सुहागरातीला तुझ्या उफाळत्या तारुण्याचं आव्हान नजरेआड करून हिशोबाच्या चोपडीत डोकं घालणारा. आणि दुसऱयाच दिवशी बापाच्या आज्ञेनुसार व्यापारासाठी दूरदेशी पाच वर्षांसाठी रवाना झालेला. तूही तशी अबोध बालिकाच! म्हणूनच तुझ्या स्वप्नीचा राजकुमार अगदी आजच्या हिंदी फिल्मी हिरोंसारखा! सतत बायकोच्या आगेमागे करणारा. तिच्या शरीराच्या उबेसाठी धडपडणारा. शय्येवर मन:पूत देणारा आणि घेणारा. त्यात गैर काहीच नाही. आजच्या अबोध बालिकांचे राजकुमार कुठे वेगळे असतात. काळ कोणताही असो; अबोध बालिका अबोधच राहायच्या.
तुमच्या वरातीनं भुतांच्या गावात घेतलेल्या विश्रांतीच्या काळात तुझ्यावर लुब्ध होऊन कधी खारीचं, कधी कावळ्याचं, कधी नीलरंगी स्वप्नील पाखराचं रूप घेणाऱया एका भुतानं ही संधी साधली आणि तुझ्यासमोर उभा ठाकला... थेट तुझ्या नवऱयाचंच रुप घेऊन. पण, त्यानं तुला फसवलं नाही. आपण कोण आहोत हे सांगून त्यानं तुझ्यापुढे पेच टाकला, `मी तुझ्या प्रेमात आहे. माझा स्वीकार कर!' तुझ्या डोळ्यांसमोर पुढच्या पाच वर्षांचा निष्प्रेम रखरखाट उभा राहिला असणार... त्या दुविधेतून तू धाडसी निर्णय घेतलास... त्याला तनमनानं स्वीकारण्याचा. मायावीच तो. शिवाय प्रेमवीर. त्यानं तुझ्यावर प्रेम प्रेम प्रेमाचा वर्षाव करून तुला चिंब करून टाकली.
शिवाय, सासरच्यांच सगळ्या अडचणींमधून चुटकीसरशी मार्ग काढून त्यांनाही पटवलं. जणू `दिलवाले दुल्हनिया...'चा शाहरुखच. त्याच्यापासून तुला गर्भही राहिला. तुम्ही भर राजस्थानात, भारत सरकारच्या एखाद्या सामाजिक जाहिरातीत काम करत असल्यासारखा एकमेकांपाशी ऐलानही केलात, `आम्हाला मुलगीच हवी'!

पण तिकडे तो तुझ्याशी लग्न होऊनही कोरा, कोरडा राहिलेला खरा किसन... आता त्यालाही तुझी आस लागली आणि तो आसुसून परतला तुझ्याकडे... पण, तोवर फार उशीर झाला होता. या भुतानं तुलाच नव्हे, तर सगळ्या घराला, पुऱया गावाला पछाडलं होतं. खऱया किसनला कोणी खरा मानेना. मग, रस्त्यावरच्या एका मेंढपाळानं न्याय केला. प्रेमाची कसम देऊन भुताला बाटलीबंद केलं आणि खरा किसन पुन्हा तुझा नवरा झाला... तू मात्र या किसनला सांगितलंस, मी तनमनानं `त्या'ची झाली आहे. आता तुझी कशी होऊ...
आणि चमत्कारच झाला गं! या किसनच्या देहात तो शिरला... तुझ्याबरोबर आयुष्यभर सुखासमाधानानं नांदण्यासाठी! तुझी `पहेली' उलझली की फटाक्कन!
लाच्छी! इतक्या सहजगत्या सुटली कशी गं तुझी `दुविधा'? ज्याला तुझ्या कहाणीतल्या कळसुत्री भूतबाहुल्या `वो सात फेरोंवाला' म्हणून हिणवतात, तो तुझा नवरा इतका वाईट होता का गं? सुहागरात्रीचा `मुहूर्त' त्यानं साधला नाही, तुझ्या मनातल्या प्रेमाचा आणि तनातल्या प्रेमज्वराचा त्यानं अव्हेर केला, याची इतकी मोठी सजा? नंतर तुझ्या भुताबरोबर तू ज्या वाडय़ात ऐश्वर्यात, सुखसमाधानात नांदलीस, त्याचा मालक `तो' आहे, ते ऐश्वर्य `त्या'च्या कष्टातून उभं राहिलं आहे, आजही त्या ऐश्वर्यासाठी `तो' कुठेतरी दूर, तुझ्यापासून तुटलेला, एकटा, कोरडा खपतो आहे, याचा विचारही नाही आला का गं तुझ्या मनात? आणि एकमेकांच्या शरीरातली आग एका रात्रीपुरती चेतवून दूर जाण्यापेक्षा ती आग चेतवूच नये, हा विचार अगदीच टाकाऊ तरी कसा?
बाई गं! थोडी कळ काढली असतीस, तर तुझा `सात फेरोंवाला' किसनही आलाच असता ना तुझ्याकडे? तो तरी तिथे दूरदेशी कुठे सुखात होता? तुझ्या आठवणींनी त्याच्याही मनात फेर धरलाच होता ना! वरातीच्या प्रवासात तुझ्या बोरं खाण्यावरून चिडणारा तो... नंतर त्या दूरदेशी दुसऱया एका बाईला बोरं खाताना पाहून त्याच्या मनात तुझ्या आठवणीनं असा डंख केला की, तो बिचारा पसाभर बोरं सोबत घेऊन मजल दरमजल करत तुझ्या ओढीनं घरी परतला... त्याच्या मनात जागलेलं हे प्रेम, तेव्हा पुत्रीजन्माच्या वेणा देत असलेल्या तुझ्यापर्यंत कधी पोहोचलंच नाही! अभागी बिचारा!
आणि आता गं काय करशील? तुझ्यासमोर रोज उभ्या राहणाऱया किसनमध्ये `सात फेरोंवाला' कधी आहे आणि `तुझा' किसन कधी आहे, हे कसं जोखशील? तुला थोडा तरी सहवास त्या `सात फेरोंवाला'चा लाभेलच ना! त्यातून तुझ्या मनात त्याच्याविषयी करूणा, प्रेम, वात्सल्य... काहीच जागणार नाही? की दिवसा चोपडय़ा घेऊन राबायला `तो' आणि रात्री तुझ्याशी रत व्हायला `हा', अशी `सोप्पी' विभागणी आहे तुमची? त्याच्या कष्टांवर आपल्या प्रेमाचे इमले चढवताना जराही कचरणार नाही मन तुझं?
... आणि तुमच्या प्रेमाचं केवळ `माध्यम' बनून बसलेल्या त्या हाडामांसाच्या माणसाच्या जगण्याचं, भावनांचं, प्रेमाचं काय? की ते सगळंच बेमतलब!
परीकथेत जगायचं ठरवलं असशील तू, तर बरंच आहे. विचार करणंच टाळलं की बरेच प्रश्न निर्माण होत नाहीत, मग, ते सुटण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
पण, आता आई झाल्यानं काही पोक्तपणा आलाच असेल तुझ्यात तर विचार कर जरा.
`पहेली' सुलझली असेल तुझी, पण, `दुविधा'...
ती तर आता सुरू होणार आहे...
............................................
ता. क. : हा लेख 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रकाशित झाला, त्यानंतर एके दिवशी तिथले ज्येष्ठ सहकारी प्रकाश अकोलकर यांनी त्यांच्या खास सस्पेन्स्फुल शैलीत सांगितले, ''थोड्याच वेळात तुझा मोबाइल वाजेल. अननोन नंबर असेल, तरी तू तो घे.''
''का?''
''कारण पलीकडे प्रमोद महाजन असतील.''
थोड्या वेळाने फोन वाजला, पलीकडे महाजनच होते.
''मी आणि माझी बायको आत्ताच 'पहेली' पाहून बाहेर पडलोय. तो पाहताना आमच्या मनात जे जे प्रश्न उमटले, ते सगळे तुम्ही लिहिले आहेत. छान. मुंबईत आलो की कधीतरी भेटूयात निवांत.''
तो योग कधीच आला नाही...
याच महाजनांनी, त्यांना ठोकून काढणारा 'महाजन साहेब, हमारा चुक्याच' हा 'फटका' या सदरातला लेख वाचून 'म. टा.'चे दिल्लीतील प्रतिनिधी सुरेश भटेवरा यांना फोन लावला. 'अनंत फंदी' या टोपणनावामागचा लेखक कोण आहे, अशी विचारणा त्यांनी केली. संभाव्य धोके लक्षात घेऊन भटेवरानी 'असे नाव सांगता येत नाही' हे निक्षून सांगितले. त्यावर महाजन म्हणाले, ''अरेरे, मला या लेखकाचे अभिनंदन करायचे होते. इतकी फर्मास सालटी काढलीयेत माझी. आमच्या घरात सकाळी जाहीर वाचन केले आम्ही या लेखाचे.''

चला, पाव लाखाचा commentवाला होण्याचा योग तरी साधला!
ReplyDeleteक्या बात क्या बात. अनाहत प्रमाणे शेवट 'पहेली'च ठेवला असता तर जास्त मजा आली असती.
ReplyDelete