Monday, March 14, 2011

राँग नंबरची राइट धमाल! (हेराफेरी)

 हिंदी सिनेमा ठराविक चाकोरी सोडत नाही, वेगळे विषय हाताळत नाही, अशी आपली नेहमीची तक्रार असते. प्रियदर्शन दिग्दर्शित `हेराफेरी'या तक्रारीला बऱयापैकी समाधानकारक उत्तर देतो आणि वेगळेपणाच्या अपेक्षा काही अंशी पूर्ण करतो.
अक्षयकुमार आणि सुनील शेट्टी हे या सिनेमाचे नायक सामान्य बेकार तरुणांच्या भूमिकांमध्ये आहेत. ते पडद्यावर बहुतेक काळ सामान्य बेरोजगार तरुणांसारखे दिसतात. तब्बू ही सिनेमाची नायिका एक कनिष्ठ मध्यमवर्गीय मुलगी आहे, तीही कनिष्ठ मध्यमवर्गीयच दिसते. शिवाय, नायकनायिकांचं रुढ प्रेमप्रकरण, हसीन वादियोंमधली गाणीबिणी भानगडी नाहीत
सिनेमाच्या कथानकात या तिघांपेक्षा चरित्र भूमिकेतल्या (पुरस्कारांच्या सोयीसाठी त्याला `सह'कलाकार म्हणूया) परेश रावलला जास्त वाव आहे. पडद्यावर त्याची भूमिका न्याय्य फुटेजसह झळकली आहे, तोच खरं तर सिनेमाचा नायक आहे. आता एका सिनेमात एवढा वेगळेपणा पुष्कळच म्हणायला हवा. आनंद बर्धन यांच्या कथेवर, नीरज व्होरानं पटकथा- संवाद लिहिलेल्या `हेरा फेरी'चं स्वरुप आहे हलक्याफुलक्या मनोरंजनपटाचं. मात्र, `डोक्याला ताप नाही' पद्धतीनं प्रेक्षकाला रिझविताना `डोक्याचा वापरच करायचा नाही', अशी पूर्वअट न घालणारा हा सिनेमा आहे, हे विशेष.
कथेच्या केंद्रस्थानी आहे बाबुराव गणपतराव आपटे (परेश रावल) हा झक्कू गॅरेज मालक. कर्जात आरपार बुडालेला बाबुराव दिवसरात देशी दारूच्या नशेत डुंबतो. आला दिवस कसातरी ढकलायचा, अशी त्याची वृत्ती झाली असली, तरी कधीतरी सगळ्या देणेकऱयांची देणी चुकवून एक दिवस तरी स्वाभिमानानं ताठ मानेनं जगण्याची त्याची मनीषा आहे.
राजू (अक्षयकुमार) आणि श्याम (सुनील शेट्टी) हे त्याचे पेइभग गेस्ट. पैकी राजू लाँड्रीत इस्त्राe करण्यासारख्या फुटकळ नोकऱया करून पोट जाळतोय. वृद्धाश्रमात राहणाऱया त्याच्या आईला त्याच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. आपला कलकत्त्याला मोठा व्यवसाय आहे, असं तिला भासवून तो तिला खोटंखोटं खुश ठेवतोय. पण, येणकेणप्रकारेण पैसा कमावून तिला कधीतरी खरोखरचं सुख देण्याची त्याची महत्त्वाकांक्षा आहे.
बँकेत दिवंगत वडिलांच्या जागी चिकवटण्यासाठी श्याम एका गावातून शहरात आलाय. पण त्या नोकरीवर अनुराधा (तब्बू) या गरीब मुलीचाही डोळा आहे. तिची परिस्थिती पाहून तो या नोकरीवरचा क्लेम सोडतो. त्यात श्यामच्या वडिलांच्या मृत्यूच्या वेळी त्याला कर्ज देणारा खडगसिंग (ओम पुरी) आता शहरात येऊन त्याच्यामागे परतफेडीसाठी तगादा लावतोय. 35 हजार रुपयांसाठी त्याच्या बहिणीचं लग्न अडलंय.
थोडक्यात त्या तिघांनाही पैशाची प्रचंड गरज आहे आणि सरळमार्गानं मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. एखादा चमत्कारच या आकांक्षा पुऱया करू शकेल... आणि अचानक चमत्कार घडतो.
 बाबुरावच्या फोनवर सतत कुणा देवीप्रसादसाठी चुकीचे फोन (राँग नंबर येत असतात
त्यातला एक राँग नंबर लागतो तो कबिरा (गुलशन ग्रोव्हर) या गुंडाचा. कोटय़ाधीश देवीप्रसादच्या लाडक्या नातीचं अपहरण करून खंडणी मागण्यासाठी तो या नंबरवर फोन करतो, तेव्हा चलाख राजूच्या डोक्यात एक शक्कल येते. कबिरासाठी आपण देवीप्रसाद बनायचं आणि देवीप्रसादसाठी कबिरा. म्हणजे कबिरानं मागितलेल्या खंडणीच्या दुप्पट रक्कम देवीप्रसादकडून उकळायची आणि कबिराला खंडणी देऊन मुलगी सोडवायची. निम्मी रक्कम आपल्या खिशात. शॉर्टकटमध्ये मालामाल होण्याची आयडिया.
या कल्पनेतून पुढे काय घडत असेल, हे कुणीही तर्कानं ताडावं.
बाबुराव, राजू, श्याम आणि अनुराधा या `पात्रां'च्या परिचयानं सिनेमाचा पूर्वार्ध व्यापलाय आणि तोच सिनेमाचा सगळ्यात आल्हाददायक भाग आहे. ठाशीव स्वभावरेखाटन आणि परस्परविरोधी स्वभावाच्या व्यक्तिरेखांच्या एकत्र वावरातून, विसंगत वर्तनातून घडणाऱया गमतीजमतींनी या भागात धमाल उडवली आहे. सरळमार्गी श्याम आणि चालू राजूची रस्त्यात घडणारी `धडक' भेट, दोघांनी एकमेकांना पाकिटमार समजून केलेली मारामारी, त्यातून दोघांमध्ये निर्माण होणारी खुन्नस, सर्किट बाबुरावच्या घरात एकत्र राहताना श्यामला घड्डय़ात घालण्यासाठी राजूनं रजलेल्या चाली, श्यामवर मात करून नोकरी मिळवण्याच्या अनुराधाच्या लटपटी- खटपटी, त्यातून दोघांचं जवळ येणं, अशा रंगतदार घटनांच्या ताण्याबाण्यातून सिनेमा घट्ट विणला जातो. बाबुरावाच्या घरातला कडी नसलेला, पत्र्याच्या दाराचा संडास, बाबुरावाचं धोतर फिरणं वगैरे एरवी बीभत्सतेकडे झुकू शकणारा आचरट मालमसाला या कथाभागात आहे. पण, नीरज व्होरानं त्याची कथानकात केलेली निरागस गुंफण आणि प्रियदर्शनची संयत हाताळणी या भागाला डेव्हिड धवन छाप अवकळा येऊ देत नाही
समोरच्यानं उच्चारलेल्या शब्दांचा फक्त वाच्यार्थ लक्षात घेऊन बोलणारा बाबुराव, श्यामचा भाबडा मठ्ठपणा, राजूचा व्रात्य खोडकरपणा, अनुराधाचा सुरुवातीचा कांगावखोरपणा आणि खडगसिंगचं `सरदार'छाप मद्दड डोकं या स्वभाववैशिष्टय़ांचा नीरजनं प्रसंगरचनेसाठी आणि विशेषत: संवादांसाठी करून घेतलेला वापर अभ्यसनीय आहे. त्याचे संवाद चित्रपटगृहात सात मजली हशा पिकवत नाहीत, खुर्चीतून कोसळण्याची वेळ आणत नाहीत, पण खुर्चीतल्या खुर्चीत सुसखुसत ठेवतात.
सिनेमाच्या शीर्षकस्थानी असलेली `हेरा फेरी' सुरू होते, तेव्हा मात्र सिनेमाची वीण उसवू लागते. एक तर हा कथाभाग अगदीच `प्रेडिक्टेबल' आहे. त्यात लेखक- दिग्दर्शकांनी श्याम आणि राजू यांच्यातल्या कुरघोडय़ांसाठी जेवढी कल्पनाशक्ती खर्च केलीये, तेवढी कबिरा आणि कंपनीबरोबरच्या या तिघांच्या उंदरामांजराच्या खेळासाठी वापरलेली नाही. शिवाय जिथे कथाभागाला वेग वाढायला हवा, तिथे स्पीडब्रेकरसारखी अकारण येणारी नीरस गाणी (नम्रता शिरोडकरच्या स्पेशल अपीयरन्सवाल्या तथाकथित कडक नृत्यगीतासह) रसभंग करतात. मग, देवीप्रसादचा खरा फोन नंबरसुद्धा ठाऊक नसण्याइतका कबिरा खुळा कसा, देवीप्रसादच्या घरात फोन टॅप करणारे पोलिस त्याआधारे बाबुरावाच्या घरापर्यंत आधीच कसे पोहोचत नाहीत वगैरे (अशा सिनेमात कधीच पडू नयेत असे) प्रश्न पडत राहतात.
 पूर्वार्धांन निर्माण केलेल्या अपेक्षा उत्तरार्धात फारशा पुऱया होत नसल्या, तरी `हेरा फेरी'च्या तिकिटाचे पैसे अगदीच वाया जात नाहीत, कारण, त्यात मांडणीचा, विषयाचा ताजेपणा आहे. उदाहणार्थ, सुनील शेट्टी आणि अक्षयकुमार यांच्या भूमिका. हे दोघेही अभिनयपटू म्हणून विख्यात नाहीतच. तरीही त्यांच्या नेहमीच्या `पैलवानकी'ला जराही वाव न देणाऱया भूमिका त्यांनी प्रामाणिकपणे निभावल्या आहेत. सुनील शेट्टीच्या चौकोनी चेहऱयावर पारदर्शक काचांचा, गोल फ्रेमचा चष्मा बसवला, की तो एकदम `श्याम' वाटायला लागतो... मठ्ठ दिसतो. (तो `हुशार' कोणत्या वेशात दिसतो, हा प्रश्नच आहे.) मठ्ठ माणूस बहुतेकवेळा सरळसाधा, प्रामाणिक, सचोटीचा वगैरे आपोआपच वाटू लागतो, तसा सुनीलही इथे सरळमार्गी वाटतो. त्याची- प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारण्याच्या धडपडीतून आलेली- मंद, एकसुरी शब्दफेकही इथे फिट बसते. अक्षयकुमारला विनोदी अभिनयाचं अंग आहे, ही सुवार्ता `डेव्हिड धवनचा `मिस्टर अँड मिसेस खिलाडी' पाहिलेल्या तुरळक प्रेक्षकांना फार पूर्वीच समजली होती. तो योगायोग नव्हता, हे ` हेरा फेरी'मध्ये स्पष्ट होतं. श्यामबरोबरची पोरकट खुन्नस त्याच्या दिलखुलास वावरामुळं मजा आणते. तब्बूच्या भूमिकेची लांबी फार मोठी नाही; पण साध्या मुलीच्या भूमिकेत साधं दिसूनही सपक न होणं, ही कसरत तिनं लिलया करून दाखवली आहे. उत्तरार्धातल्या पळापळीत तिलाही सहभागी करून घेतलं असतं, तर किती धमाल झाली असती, अशी हळहळ वाटत राहते. खडगसिंगच्या भूमिकेत ओम पुरीही मजेशीर.
पण, या सगळ्या मंडळींच्या बऱयावाईट कामगिऱयांसकट हा अख्खा सिनेमा परेश रावलनं कनवटीला लावून नेला आहे. `हेरा फेरी' का बघायचा, या प्रश्नाचं सगळ्यात सोप्पं उत्तर `परेश रावल'साठी असं आहे. जाड भिंगाचा चष्मा, बंडी, धोतर, चेहऱयावरचे हरवलेले तरीही बेरकी भाव, नजरेतून झळकणारी संशयखोर वृत्ती, मराठी माणसाच्या हिंदी बोलीचा लहेजा, `अरे'ला लगेच `कारे' करण्याची सहजप्रवृत्ती यातून त्यानं बाबुराव आपटे जिवंत आणि रसरशीत केलाय
एरवी, अभिनयाच्या नावाखाली स्टाईलबाजी खपवणाऱया नायकांच्या इर्दगिर्दच्या फुटकळ भूमिकाही लखलखून टाकणारा हा अभिनेता मोकळाढाकळा वाव मिळाला की काय बहार उडवून देऊ शकतो, हे अनुभवण्यासाठी `हेरा फेरी' पाहायलाच हवा.
उत्तम निर्मितीमूल्यं, वेगळ्या बाजाची कथा, बऱयापैकी रंजक पटकथा- संवाद, सफाईदार तंत्रशुद्ध हाताळणी, साबू सिरीलचं देखणं कलादिग्दर्शन, छायालेखक जीवा यानं प्रियदर्शनच्या शैलीत टिपलेला माहौल या सगळ्यापेक्षा परेश रावल या जबरदस्त अभिनेत्याला `फुल सुटण्या'साठी दिलेला स्कोप हेच या सिनेमाचं सगळ्यात मोठं महत्त्वाचं वैशिष्टय़ आहे आणि तेच बलस्थानही.


(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment