Tuesday, March 8, 2011

काय मिळतं भयपट पाहून?


माणसाच्या अनेक गरजांचा काल्पनिक आणि तात्पुरता निचरा करण्याची जागा म्हणजे सिनेमा. स्वप्नरंजन करणाऱ्या मेनस्ट्रीम सिनेमाचा प्रेक्षक स्वत:ला नायक-नायिकेच्या जागी कल्पून वास्तवात कधीही न लाभणारी सुखं मन:पूत भोगतो.

अशी कोणती गरज भागवतात भयपट?

माणसाला घाबरण्याचीही 'गरज' असते की काय?

मानसशास्त्रज्ञ सांगतात की हो, माणसाला कण्ट्रोल्ड भीतीही हवीहवीशी असते. कण्ट्रोल्ड भीती म्हणजे रोलरकोस्टरमध्ये बसल्यावर वाटणारी भीती. प्रचंड वेगाने अस्ताव्यस्त धावणाऱ्या, उंच चढणाऱ्या, धपकन खाली येणाऱ्या रोलर कोस्टरच्या राइडमध्ये माणसाला भीती वाटते; पण आत खोलवर हे माहिती असतं की इथे जिवाचा धोका नाही. ही राइड 'सुरक्षित' आहे. तसं ब्रेक तुटलेल्या कारमधून घाटातून सुसाट वेगाने उतरताना वाटेल का? तिथे वाटते ती खरी भीती.

भयपटातली भीतीही असंच काहीसं विरेचन करते. पुढे काय होणार, याच्या भयशंकेने खुचीर्ला खिळलेल्या प्रेक्षकाला दचकवणारं, किंकाळी फोडायला लावणारं काहीही पडद्यावर किंवा त्याच्या खुचीर्खाली लावलेल्या स्पीकरमध्ये घडू शकतं... त्याने प्रचंड भय वाटतंच. पण, हे सगळं खोटं आहे, मेक बिलीफ आहे, याचंही भान असतंच. ज्यांचं हे भानही सुटतं ते प्रेक्षागृहात बेशुद्ध पडतात. अशाच प्रेक्षकांमुळे रामगोपाल वर्माला, जो त्याचा भयपट एकट्याने पाहील, त्याला पाच लाख रुपये बक्षीस देण्याची आयडिया सुचते. (अशीच आयडिया त्याला 'रामगोपाल वर्मा की आग'च्या वेळी का नाही सुचली?... जो सिनेमा पूर्ण पाहील, त्याला पाच लाख रुपये देण्याची!)

शिवाय भयपटांमध्ये आणखी एक 'समाधान' असतं... पडद्यावरच्या व्यक्तिरेखांच्या संदर्भात जे काही भयंकर घडतंय, ते आपल्या बाबतीत घडत नाहीये. आपण सुरक्षित आहोत, याचं समाधान. या सुप्त समाधानासाठीच लोक 'क्राइम डायरी', 'सनसनी' वगैरे कार्यक्रम पाहतात आणि पोलिसी चातुर्यकथांची पुस्तकं वाचतात.

भयभावनेला आवाहन करण्याचा ज्याचा त्याचा फॉर्म्युला वेगवेगळा आहे. कुणी मेंदू पोखरणारा सस्पेन्स वापरतो, कुणी खुचीर्खाली आवाज काढणारे इफेक्ट्स टाकतो, कुणी उंदीर-झुरळं-शार्क-पिरान्हा-अॅनाकोंडा वगैरे प्राणीजगताला कामाला लावतो, कुणी भुताखेतांना पाचारण करतो, तर कुणी अतृप्त आत्म्यांना. रामसे बंधूंसारखे निर्माते हिडीस मुखवटे, रक्ताच्या चिळकांड्या वगैरेंचा वापर करतात.

पण, खरं भय कोणतं?

जे या क्लृप्त्यांच्या विना दाटून येतं... 'ओमेन'मध्ये निरागस आणि गोंडस दिसणाऱ्या सैतानी बालकाला पाहून कोणत्याही साऊण्ड इफेक्ट, व्हिज्युअल ट्रिकविना जे मनात दाटून येतं, ते खरं भय!

विश्वास नाही बसत?...

मग नीट वाचा...

हे वाचून झालं की कीबोर्डवरून सावकाश हात उचला आणि डोळ्यांसमोर आणा. हातांकडे पाहा. त्यांच्या मागच्या बाजूला गरम, लालजर्द रक्त कसलं लागलंय?...

...

हा हा हा! टरकलात ना

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment