Wednesday, March 9, 2011

'प्लेबॅक'चा ज़माना संपला?


का बुवा! असा प्रश्न का पडावा?

अजूनही हिंदी सिनेमाचे नायक-नायिका गाणी (पडद्यावर) गाताहेत, त्यांवर नाचताहेत. झाडांभोवतीच्या फेऱ्या आणि फुलांची चुंबाचुंबी यांचा जमाना सरला. आता थेट पकडापकडी आणि लिप टु लिप किसेसचा जमाना आलाय, इतकाच काय तो फरक?

इतकाच फरक आहे? जरा विचार करून पाहा. स्मरणशक्तीला ताण द्या आणि सांगा आज टॉपला असलेल्या नायकांचे 'आवाज' कोण आहेत? नायिकांबद्दल हा प्रश्ान् विचारला तर भोवळ येईल, इतकी मोठी संख्या त्यांच्या आवाजांची आहे, म्हणून तो प्रश्ान् तात्पुरता स्थगितच करायला हवा.

आजच्या पोराबाळांनाही नीट ठाऊक असलेली हिंदी सिनेमातली जुन्यात जुनी त्रिमूतीर् म्हणजे दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद. दिलीपकुमारसाठी मोहम्मद रफी, राज कपूरसाठी मुकेश आणि देव आनंदसाठी पहिल्या टप्प्यात रफी, नंतरच्या टप्प्यात किशोरकुमार हे आवाज इतके पक्के ठरले होते की आजही त्या जमान्यातले गाणे लागले, तर ते कोणावर चित्रित झालेले आहे, ते सहज सांगता येईल. दिलीपकुमारसाठी तलत मेहमूद, राज कपूरसाठी मन्ना डे यांनीही अप्रतिम गाणी गायली आहेत. पण, ते या दोघांचे 'आवाज' नाही बनू शकले. मुकेश हयातभर राज कपूरचाच आवाज बनून राहिला. रफी-किशोर मात्र दिलीप-देव यांच्यासाठी आणि नंतरच्या पिढीतल्या इतरही नायकांसाठी त्यांचा आवाज बनून गाण्याचा प्रयत्न करत होते. रफींनी देव आनंदसाठी गायलेले गाणे कधी दिलीपकुमारच्या चेहऱ्यावर इमॅजिन करता येते का? त्याचप्रमाणे 'नैन लड गयी है'वर देव आनंदचा चेहरा चिकटवता येईल का? शम्मीसाठी गायलेलं 'ये चाँद सा रोशन चेहरा' देव आनंदला सूट होऊ शकत नाही आणि 'तू कहाँ ये बता'च्या मधाळ सुरावटीवर देव आनंदचेच नाव ठसठशीत लिहिलेले आहे. 'ढल गया दिन' (जीतेंद), 'ये जो चिलमन है' (राजेश खन्ना), 'आज मौसम बडा बईमान है' (धमेर्ंद) ही नंतरच्या पिढ्यांसाठीची गाणीही एकमेकांपेक्षा वेगळी साऊण्ड होतात की नाही, ऐकून पाहा. 'प्यासा'मध्ये गुरुदत्तसाठी 'ये महलों, ये तख्तों'ही तेच गायले आणि जॉनी वॉकरसाठी 'सर जो तेरा चकराए'ही तेच गायले. जॉनी ज्या ज्या सिनेमात होते, त्या त्या सिनेमात हे घडलेले दिसते. ('मधुमती', 'सीआयडी', 'नया दौर' आठवा.)

स्वत: अभिनेता असलेल्या किशोरकुमारनेही अशीच परकायाप्रवेश करून गाणी गायली आहेत. 'मेरे सपनों की रानी' फक्त राजेश खन्नाच गाऊ शकतो. 'शौखियों मे घोला जाए'मध्ये देव आनंदचे सगळे झटके सुरातून व्यक्त होतात. 'नैनों मे सपना'मध्ये फक्त जीतेंदच साजून दिसतो. 'मंझिले अपनी जगह है'ची गहराई फक्त अमिताभच्याच चेहऱ्यावर उमटू शकते. 'मेरी भीगी भीगी सी', 'गम का फसाना', 'तेरे बिना जिंदगी से कोई', 'इस मोड से जाते हैं' या गाण्यांमधून त्यांनी संजीवकुमारची उच्चारणशैली अचूक पकडली आहे.

या पठडीतला शेवटचा प्लेबॅक सिंगर कोण? उदित नारायण की अभिजीत? 'पापा कहते है'ने आमिर खानचा आवाज बनलेला उदित अगदी 'लगान'पर्यंत त्याचा आवाज होता. शाहरूख खानला अभिजीतच्या रूपात स्वत:चा आवाज लाभायला थोडा वेळ लागला. पण, त्यांनी धमाल आणली. कुमार सानू अनेकांसाठी गायला, पण कुणाचा आवाज नाही बनू शकला. आमिर हल्लीच्या काळात शानचा आवाज प्रिफर करताना दिसतो तर शाहरूखला सुखविंदरपासून शफकत अमानत अली, केकेपर्यंत कोणाचाही आवाज चालतो.

हीच पद्धत नंतर सुरू राहिलेली दिसते. खूप नवे, चांगल्या आवाजाचे गायक पेव फुटल्यासारखे इंडस्ट्रीत येताहेत. त्यांच्या आवाजाला त्यांच्या चेहऱ्याचीच ओळख पहिल्यापासून लाभलेली आहे. उत्तम उदाहरण- सोनू निगम. त्यांचे गाणे हे 'त्यांचे' म्हणूनच मनात ठसते. ते कोणावर चित्रित झाले, ते दुय्यम ठरते. दुसरीकडे एकाच अभिनेत्यावर इतक्याजणांच्या आवाजातली गाणी चित्रित होतात की त्याचा सांगितिक 'आवाज' एस्टॅब्लिश होतच नाही.

प्लेबॅकची 'ती' गंमत आता संपलीच आहे. एक युग अस्तंगत झाले आहे. 

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment