... गुरू आले, ज्युरी आले, महागुरू आले, सगळे स्थानापन्न झाले, स्पर्धा सुरू झाली, एकेक स्पर्धक येऊन परफॉर्मन्स देऊ लागले...
... नेहमीप्रमाणे एकेकाचा परफॉर्मन्स संपल्यावर महागुरू त्याला मार्गदर्शन करीत होते. म्हणजे आपली जीवनगाथा, यशोगाथा, लग्नगाथा सांगत सांगत अधूनमधून परफॉर्मन्सबद्दल कधी स्पर्धकांचे, त्यांच्या गुरूंचे कान उपटत होते, तर कधी कौतुक करत होते. शेर-ओ-शायरी आणि हिंदी सिनेमातले किस्से यांचीही पेरणी होतीच...
... पण प्रत्येकाला जाणवत होतं, आज काहीतरी चुकतंय. काहीतरी बिनसलंय महागुरूंचं...
... अरे देवा! त्यांची तब्येत तर नाही ना बिघडलेली?...
... या शंकेनं युनिटवाल्यांना घेरलं. डॉक्टर वगैरे बोलावायचे का? असा खलही सुरू झाला. स्पर्धक, निवेदक, प्रेक्षक, गुरुकुल, परीक्षक सर्वांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्ान्... महागुरूंना झालंय तरी काय? आता जेव्हा पुढचा ब्रेक होईल, तेव्हा डॉक्टरांना बोलावून सरळ चेकअप करायचं ठरलं...
... शेवटच्या स्पर्धकाचा परफॉर्मन्स झाला...
... महागुरूंनी त्या स्पर्धकाचं कौतुक केलं, तुमची एनजीर्, तुमची कमिटमेंट, तुमची मूव्हमेंट मला आवडली, असं सांगितलं...
... इकडे युनिटवाल्यांनी सलाईन वगैरे जय्यत तयारी केली होती...
... तेवढ्यात... तेवढ्यात त्यांच्या कानी महागुरूंनी त्या स्पर्धकाला उद्देशून विचारलेले शब्द पडले...
...'' माझ्या आगामी सिनेमात एक नृत्य करायला तुम्हाला आवडेल?''
... हुश्श!
... सगळ्यांचा जीव कसा भांड्यात पडला.
साहजिक आहे. एक अख्खा एपिसोड पार पडला आणि महागुरूंनी एकाही स्पर्धकाला आपल्या आगामी सिनेमात काम-नृत्य करण्याची ऑफर दिली नाही म्हणजे काय? ही ऑफर ऐकल्यानंतर अत्यानंदाने बेभान झाल्यासारखा चेहरा करण्याची प्रत्येकाने केलेली प्रॅक्टिस वाया गेली असती ना?
आता काही प्रश्ान् पडतात टीव्हीवर कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांना.
उदाहरणार्थ, प्राथमिक फेरीतच महागुरूंनी डायरेक्ट आपल्या सिनेमात काम देण्याची मेगाऑफर देऊन टाकल्यावर पुढच्या फेऱ्यांमध्ये ते काय देऊ करणार?
अ. आपला सिनेमा दिग्दशिर्त करण्याची ऑफर
ब. स्पर्धकाच्या सिनेमात आपण मोफत नृत्य करू अशी ऑफर
क. संजय लीला भन्साळीच्या सिनेमात काम देण्याची ऑफर
आणि एपिसोडला तीन या प्रमाणात जर नर्तक सिनेमासाठी निवडले गेले असतील, तर एवढ्या नर्तकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महागुरू सिनेमात किती गाणी ठेवतील?
अ. ३
ब. १५
क. महागुरू संपूर्ण सिनेमाभर ज्याच्यात नाचच आहेत असा मराठीतला पहिला डान्स ऑपेरा बनवत आहेत
या प्रश्नांची योग्य उत्तरं द्या आणि आगामी 'दोनापेक्षा तीन'मध्ये शेवटून तिसऱ्या रांगेतली डावीकडून चौथी सीट तुमच्या नावे बुक करून टाका!!!!
(महाराष्ट्र टाइम्स)
No comments:
Post a Comment