धप् धप् धप्...
जड पावलं...
कष्टानेच उचलली जाणारी...
एखादा अस्फुट हुंदका
किंवा किंकाळी...
क्षणार्धात काळ्या कापडाआड झाकली जाणारी...
मग...जीवघेणी शांतता...
खटॅक्.... सर्रर्रर्रर्रर्र.... किच्च!
खटका ओढताच दोर सुटून अखेरीला बसलेला हिसका...
बस्स, खेळ खल्लास!
कुईं कुईं कुईं कुईं....
पुढे फक्त लटकंती...
हेलकावे... काही क्षणांपूर्वी
जिवंत असलेल्या देहाचे... कलेवराचे...
... खटका ओढणारे हातही त्या क्षणी तेवढेच
निजीर्व झालेले...
... मनाचा दगड होऊन तर
कित्तीतरी वर्षं लोटली...
... पहिली फाशी दिली, तेव्हाच तर आपलीही लटकंती
सुरू झाली ना...
ओम पुरीचा राकट, कणखर चेहरा... पण, तो ठरवेल तेव्हा वेदनेनं भरून जातो... डोळ्यांतून सगळी असाहायता, सगळी उलघाल व्यक्त होत राहते... समोर फासाचा दोर... 'द हँगमन'... पुण्याच्या विशाल भंडारीचा हा सिनेमा अशाच एका जल्लादाच्या कहाणीवर बेतलेला. गोव्यात २००५च्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला गेलेला हा इंग्रजी सिनेमा आता १८ ऑगस्टला रिलीज होतोय.
ओमसोबत सिनेमात श्ाेयस तळपदे, गुलशन ग्रोव्हर आणि स्मिता जयकरही आहेत. कसा असेल हा सिनेमा, याबद्दल बऱ्या सिनेमांची ओढ असलेल्या मंडळींमध्ये उत्सुकता असणारच. उत्कंठेचं एक कारण ओम पुरी. हा माणूस निव्वळ पोटासाठी कराव्या लागणाऱ्या भुक्कड कमशिर्अल सिनेमांमध्येही काय मस्तपैकी आब राखून वावरतो (अशा सिनेमांत नसीरुद्दीन शाहला पाहताना त्रास व्हायचा, का हा माणूस स्वत:ला इथे वाया घालवतोय, असं वाटायचं, त्याचं अवघडलेपणच दिसत राहायचं). आणि 'द हँगमन'कडे खेचणारा दुसरा फॅक्टर... त्याचं टायटल... त्याचा विषय...
ही एका जल्लादाची कहाणी आहे...
...माणसांचा समाज संस्कृतीची एकेक पायरी चढताना काय भीषण कोडी निर्माण करत गेलाय पाहा. समूहाने कायदे ठरवले, ते मोडणारांना शिक्षा ठरवल्या...
सवोर्च्च अपराध... जीव घेणं...
त्याबद्दलची शिक्षा... देहदंड... म्हणजे जीव घेणंच...
खून केल्याबद्दल खून...
देहदंड देणारा जल्लाद जे काम करतो, ते स्वेच्छेनं करत नाही (नाहीतर तो 'खुनी'च ठरायचा)...
तो जीव घेतो, ते समाजाच्या वतीनेे. असा देवभोळा, पापपुण्याच्या, स्वर्गनरकाच्या कल्पना मानणारा समाज, जो कोणत्याही प्रकारच्या मनुष्यवधाला महापातक मानतो, त्या समाजासाठी. त्याच्या या जीव घेण्याला कायद्याचं, उदात्त कर्तव्याचं परिमाण आहेच. पण, एक माणूस म्हणून दुसऱ्या माणसाचा जीव घेण्याचं साधन बनणं त्याच्या आत काय काय उलथून टाकत असेल? केवढा जाळ आतून सगळ्या माणूसपणाला करपवत असेल.
... तरीही त्याच्यावर हे काम लादणारा (हा जातिनिष्ठ 'परंपरा'गत आनुवंशिक 'व्यवसाय'च आहे हो) समाज मात्र त्या कामाकडे आणि ते करणाऱ्याकडे अतीव घृणेनंच पाहणार. रोजच्या रोज नवी घाण निर्माण करणारा समाज ती साफ करणाऱ्या आपल्याच घटकांकडे कृतघ्न घृणेनं पाहतो, हेही काही नवीन नाही म्हणा.
...अलीकडच्या काळात हा जल्लाद आपल्या नजरेसमोर प्रकर्षाने आला तो नाटा मलिकच्या रूपानं. बंगालातल्या धनंजय चॅटजीर् नामक बलात्कारी खुन्याच्या फाशीवरून उठलेल्या वादळात नाटा मलिक हे नाव पहिल्यांदा पुढं आलं होतं. हा पेशेवर जल्लाद. तब्बल १० वर्षांनंतर त्याच्याकडे धनंजयच्या फाशीची वदीर् आली होती. वयाच्या ८३ व्या वषीर्. त्याचं डोकं फिरलं. तुम्ही १० वर्षांतून एखादी फाशी देणार आणि १० वर्षांतून एकदा हातांना 'काम' मिळणार. फाशीचा मेहनताना फाशीपुरता. बाकी वेळ फाशी देणाऱ्यानेच मरा. आणि 'त्या' हातांकडून दुसरं कुठलं काम करून घ्यायला कोण तयार होणार? वैतागलेल्या नाटा मलिकनं फाशी द्यायलाच नकार दिला होता. चॅनल्सच्या कुत्रीछत्रीगदीर्त नाटा 'सेलिब्रिटी हँगमन' झाला आणि मग प्रत्येक फोटोचे, मुलाखतीचे पैसे मागू लागला. रोकड...
... जो तो आपापल्या लटकंतीतून मार्ग काढतोच ना!
सिनेमात असा जल्लाद दिसला होता तो अदूर गोपालकृष्णनच्या 'निजलकुथू'मध्ये (शॅडो किल). तो म्हाताराही जवळपास नाटाच्याच वयाचा. आपल्या हातून कधीतरी कोणातरी निरपराधाच्या गळ्याभोवती फास अडकला होता म्हणून आयुष्यभर तळमळणारा. दारूच्या नशेत तो सल बुडवू पाहणारा. म्हातारपणी त्याच्यावर पुन्हा एकदा एकाला फाशी देण्याची वेळ येते, हाही गुन्हेगार निरपराध आहे हे समजल्यावर तो उन्मळून जातो... आणि त्याच्या क्रांतिकारक लेकावर बापाचं कर्तव्य पार पाडायची वेळ येते...
...आणि आता हा 'द हँगमन'! आयुष्यभर गुन्हेगारांना फासावर लटकवणारा हा शिवा (ओम पुरी) एकच ध्येय उराशी बाळगून आहे... आपल्या मुलाला, गणेशला (श्ाेयस तळपदे) या पेशापासून आणि त्या पेशानं दिलेल्या बहिष्कृत आयुष्यापासून लांब ठेवायचं, या गतेर्तून बाहेर काढायचं. एका सहृदयी जेलरच्या (गुलशन ग्रोवर) साथीने गणेशला इन्स्पेक्टर बनवण्याचं स्वप्न शिवा पाहतो. पण...
या 'पण...' पुढचा कथाभाग प्रत्यक्ष सिनेमात पाहायचा... १८ ऑगस्टनंतर.
...वाईट इतकंच आहे की आपण सिनेमा पाहू, त्याची चिरफाड करू, चांगला असेल तर कौतुक करू, ओम पुरीच्या सशक्त अभिनयाला सलाम ठोकू, श्ाेयस तळपदेच्या उमद्या पाठीवर कौतुकाची थाप ठोकू. या सिनेमाने कसा गहिरा अनुभव दिला, कसं ढवळून टाकलं, याची रसचर्चा करू... आणि नंतर आपापल्या कामाकडे वळू... असल्या 'हँगमन'च्या उपेक्षित आणि भयावह आयुष्याचा कलात्मक अनुभव 'भोगला' की संपली जबाबदारी...
...जोवर ही महान जबाबदारी समाजातल्या सगळ्या घटकांवर आळीपाळीनं, सामाजिक कर्तव्य म्हणून कंपल्सरिली सोपवली जात नाही, तोवर (म्हणजे बहुदा जगाच्या अंतापर्यंत) फाशी जाणारा आणि फाशी देणारा हे भोगत राहतील...
... आपापली लटकंती!
(महाराष्ट्र टाइम्स)
No comments:
Post a Comment