अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांचा आगामी `गंगा' नावाचा सिनेमा तुम्हाला माहिती आहे?
नाही? नसू द्यात. निदान दिलीपकुमार एका सिनेमाची निर्मीती करताहेत, हे तरी ठाऊक असले? तेही नाही? मग, नृत्यदिग्दर्शिका सरोज खान आता दिग्दर्शिका झाली आहे, तिच्या सिनेमाचं शुटिंग सुरू आहे, याची तरी खबर असेल तुम्हाला? तीही नाही!
रविकिशन, मनोज तिवारी हे सुपरस्टार नट समोरून गेले, तर ओळखू तरी शकाल की नाही?
कोण रविकिशन? कोण मनोज तिवारी?
धन्य आहे. जरा आपल्या आसपास बघा. मल्टिप्लेक्सेसकडे वळू नका. आता कधी एकदा बुलडोझर फिरतोय आपल्यावरून या प्रतीक्षेत असलेल्या मरणासन्न, `डबडा' सिंगल स्क्रीन थिएटरांच्या परिसरात फिरा. तिथे हल्ली मरणकळेच्या जागी जीवनाचा उल्हास जाणवेल, वेगळीच चहलपहल दिसेल. माणसांचा वावर जाणवेल... अधिककरून कानी पडेल. त्या उच्चरवातील सुप्रसिद्ध बोलीवरूनही काही अंदाज आलाच नाही तुम्हाला, तर मग, होर्डिंगवर नजर टाका. पाहिलंत, `पंडितजी बताई ना बियाह कब होई'च्या पोस्टरवरून गरगरीत नगमा आवाहक नृत्याच्या पोझमध्ये खुणावत असेल.. `ससुरा बडा पैसेवाला'च्या पोस्टवर विनय तिवारीला दोन मदमस्त ललनांच्या गोऱया बाहूंचा विळखा पडलेला असेल... किंवा `गंगा के पार सँया हमार'चं पोस्टर एकदम `नदिया के पार' छाप. `राजश्री'च्या शुद्ध गावठी तुपातल्या `फैमिली एंटरटेन्मेंट'ची आठवण तरोताजा करून जाईल... या थिएटरांनी बऱयाच काळानंतर लांब लांब रांगा पाहिल्या आहेत... हिट, सुपरहिटचे बोर्ड झळकवले आहेत. ही किमया आहे भोजपुरी सिनेमांची. आणि बबुवा, ई हमार फिलमवा हिटही नाही, सुपरहिट होई रही है! भोजपुरी सिनेमा ही आजघडीची `इन थिंग' आहे, हे कशावरून ओळखायचं?
अमिताभ आणि हेमामालिनी एक भोजपुरी सिनेमा करताहेत, एवढं पुरेसं नाही वाटत का? मग ऐका!
अभिषेक बच्चनसुद्धा `नैन लड गई सौतन से' या भोजपुरी सिनेमात काम करणार आहे. रति अग्निहोत्री, नगमा, जुही चावला, हृषिता भट, प्रीती झांगियानी यांचे तर सिनेमेही तयार झालेत. नगमा ही तेलुगूनंतर आता भोजपुरी सिनेमाची सुपस्टार होण्याच्या वाटेवर आहे. `फिरंगी दुलहन' नामक सिनेमात तर तान्या नावाची एक रशियन अभिनेत्री नायिका आहे... ती या सिनेमासाठी भोजपुरी शिकली आहे.
बालाजी फिल्म्स, एबी कॉर्पोरेशन या बडय़ा बॅनर्सबरोबर बीअरकिंग विजय मल्ल्या हेही भोजपुरी सिनेमानिर्मितीत उतरत आहेत.
तीस- चाळीस लाखांत तयार होणाऱया भोजपुरी सिनेमानं आता दीड कोटी रुपये बजेटची मजल मारली आहे.
`कब होई गवना हमार' हा सिनेमा मॉरिशसमध्ये चित्रित झाला होता. आता लंडमध्येही भोजपुरी सिनेमाचं शुटिंग होऊ लागलंय.
`कब होई...'च्या निमित्तानं भोजपुरी सिनेमा डॉल्बी डिजिटलही झाला आहे आणि `साला मैं तो साहब बन गया' म्हणून स्वत:कडेच कौतुकानं पाहतो आहे...
अमिताभचा `नमकहलाल' भोजपुरीत डब होऊन प्रदर्शित झाला आहे. `शोले', `दीवार'सह शंभरएक हिंदी सिनेमे डब होण्याच्या वाटेवर आहेत. ट्वेंटीएथ सेंच्युरी भोजपुरीत डब करण्याचा घाट घातलाय...
... हे काय आक्रित घडते आहे? चकाचक हिंदी सिनेमातले सगळे स्टार्स `खेडय़ाकडे चला', हा महात्मा गांधीचा संदेश अंगिकारून एकदम ग्रामीण भारतातल्या गावंढळ बटबटीत सिनेमाकडे का वळले आहेत? बिग बजेट हिंदी सिनेमालाही न साधणारा हिटचा फॉर्म्यूला तिकडें सापडल्यासरखा दिसतो आहे. कमी गुंतवणुकीत, कमी श्रमात भरपूर फायदा मिळतो आहे आणि इकडच्या इनिंग संपलेल्या (काहीच्या संदर्भात तर ती सुरूच न झालेल्या) अनेकांना तिकडे पोटापाण्याचा धंदा सापडला आहे, हेच याचं सोपं कारण आहे.
... हा चमत्कार कसा घडला?
... भोजपुरीत काही आज नव्याने सिनेमा बनायला सुरुवात नाही झालेली. 1961 पासून भोजपुरी सिनेमे बनताहेत. मधलं एक दशक वगळता बरेच सिनेमे बरेच चालत. काही सुपरहिटही होत असत. पण, भोजपुरीची आज दिसते तशी लाट कधीच उसळली नव्हती. मुळात भोजपूर या नावाचा विशिष्ट प्रांत नाही. उत्तर प्रदेशाचा काही भाग, बिहारचा काही भाग आणि झारखंडाचा काही भाग अशा एकत्रित भूभागात हिंदीची ही `बबुवा, ललनवा, का करी'च्या हेलाची भोजपुरी बोली बोलली जाते (तीही बिहारमध्ये वेगळी, अलाहाबादकडे वेगळी... बारा कोसांवर बदलणाऱया आपल्या कोकणीसारखी). ही भाषा बोलणारे जवळपास 20 कोटी लोक आहेत म्हणे! तेही याच भागात नव्हेत, तर देशभर पसरलेले... फिजी, मॉरिशससारख्या परदेशांतही मोठय़ा संख्येने असलेले. हा समाज कष्टकऱयांचा. मजूर- कामगारांचा. जोवर हिंदी सिनेमा त्यांची भाषा बोलत होता, त्यांची संस्कृती, मूलव्यवस्था, त्यांची स्वप्नं, त्यांच्या आकांक्षा जोवर त्यात प्रतिबिंबित होत होती तोवर हाच वर्ग व्यावसायिक हिंदी सिनेमाचा मुख्य आश्रयदाता होता... पण आता रामगोपाल वर्मा, जोहर, चोप्रा वगैरे नव्या पिढीच्या हिंदी दिग्दर्शकांनी हिंदी सिनेमा ग्लोबल करायला सुरूवात केली. परदेशातले भारतीय आणि शहरी भागांतले थैलीगच्च धनिक हा यांचा टार्गेट ऑडियन्स. हॉलिवुडची बरोबरी करणारं तंत्र आणि मंत्र घेऊन आजचा हिंदी सिनेमा बनतो आहे तो व्यहारात, घरात हिंदी नव्हे, तर इंग्रजी बोलणाऱया मूठभरांसाठी. परदेशी राइट्स, नानाविध करार आणि बडय़ा शहरांतली मल्टिप्लेक्सेस यांतून त्यांचं व्यावसायिक गणित साधलं जातंय, त्यामुळे, त्यांना ग्रामीण भारतातल्या प्रेक्षकांना `मायबाप' म्हणण्याची, पिटातल्या पब्लिकची आवडनिवड ओळखून सिनेमा बनवण्याची गरज उरलेली नाही.
सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये माफक दरात, स्टॉलमध्ये बसून तीन तासांचं घसघशीत (बऱयाचदा बटबटीतसुद्धा) मनोरंजन हवं असणाऱया पब्लिकची गरज हिंदीतल्या `बी' आणि `सी' ग्रेड डाकूपटांमधून, मिथून(चक्रवर्ती) पटांमधून भागवली जात होती. पण तो ओघ कमी झाला.
आणि एक पोकळी निर्माण झाली. भोजपूरी सिनेमांनी ती आपसूक भरून निघाली.
विनय तिवारी नामक नटाच्या `ससुरा बडा पैसेवाला' या सिनेमाच्या यशानं भोजपुरी सिनेमाकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलं आणि मग सपाटाच सुरू झाला. `बंधन टुटे ना', `कब होई गवना हमार', `दरोगा बाबू आय लव्ह यू' अशा सिनेमांची रांगच लागली. आज. दिल्ली, यूपीमध्ये संपूर्णतया दिवाळ्यात निघालेल्या अनेक थिएटरांना भोजपुरी सिनेमांनी संजीवनी दिली आहे. हा समाज देशभर पसरलेला असल्यानं देशभर भोजपुरी सिनेमे दणक्यात रिलीज होतायत आणि हिंदीशी भोजपुरीचं साधर्म्य असल्यानं `देशी' सिनेमाला आचवलेला सर्व ठिकाणचा कष्टकरी प्रेक्षकवर्ग त्याला भरभरून प्रतिसाद देतो आहे. 30-40 लाखांच्या बजेटमध्ये बनलेला सिनेमा जवळपास दोन कोटी रुपयांच्या बिझनेसची टेबलवर गॅरंटी देतोय, म्हणजे पाहा.
या पट्टय़ातला (आणि उत्पन्नगटातला) प्रेक्षक दोन प्रकारचे सिनेमे पाहतो. सहकुटुंब पाहायचे `राजश्री'छाप कौटुंबिक रडारडपट अर्थात महाभारत- रामायणाच्या आधुनिक आवृत्त्या आणि एकटय़ानं किंवा यार दोस्ताबरोबर पाहायचे दादा कोंडके छाप द्वयर्थी विनोदांचे, गच्च नायिकांचे रांगडे विनोदपट... या दोन्हींची गरज भोजपुरी सिनेमा भागवतो आहे. खासकरून मराठीप्रमाणेच भोजपुरी भाषाही चांगलीच `लवचिक' असल्यानं द्वयर्थी सॉफ्ट पॉर्न सेक्स कॉमेडींचे तर पीक आले आहे...
या निमित्तानं हिंदी सिनेमाला ग्लोबल म्हणून पाहणाऱया मंडळींच्या (धंदा सोडून) काही लक्षात येणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. कारण, भोजपुरी सिनेमा जिथे चालतो, तिथेच `लगान' ही भरभरून चालला होता आणि `बंटी और बबली'ही! या सिनेमांमध्ये काय होतं, हे अभ्यासलं तर हिंदीवाल्यांना `भोजपूर एक्स्प्रेस'वर झुंबड उडवण्याचं कारण उरणार नाही.
(महाराष्ट्र टाइम्स)
Mukesh ,
ReplyDeletelekh nehmipramne masta zalay...Tu , shrikant , abhijit [ aata nahi aahe to ] Aruna tai ,Rekha tai , A MIshra ....he sarva jan sinemabaddal lihitaat..lihit hote mhanun eka akhyya pidhichya cinemachya janiva samrudhha zalyat...
thanks to you all