Friday, November 22, 2013

एक हिंदुस्तानी, सहा भारतीय आणि एक अनिवासी

काही सिनेमे धूमधडाक्यात लागतात, महिन्या-पंधरा दिवसांत 100, 200, 300 कोटींचा गल्ला गोळा करतात...
सहा महिन्यांनंतर त्यांचं नावही लोकांना आठवावं लागतं आणि वर्ष-दोन वर्षांनी ते सामूहिक विस्मृतीत जमा होतात.
काही सिनेमे लागतात, तेव्हा पडतात; नंतर धो धो चालतात. काळाच्या पुढचे सिनेमे असा त्यांचा उदोउदो होतो.
काही सिनेमे गल्लापेटीवर पार आपटतात, पण समीक्षकांच्या आणि जाणकारांच्या स्मरणरंजनातून जिवंत राहतात. त्यातून त्यांना कल्ट फॉलोइंगही मिळतं. यांना लोक क्लासिक म्हणून ओळखतात. त्यांचं नाव सगळय़ांना माहिती असतं, पाहिलेल्यांची संख्या कायम हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच राहते...

गोवामुक्तीच्या लढय़ाचा संदर्भ असलेला `सात हिंदुस्तानी' हा या सगळय़ांपेक्षा वेगळा सिनेमा आहे... तो आला तेव्हा फ्लॉप झाला, त्याला कोणी क्लासिक मानत नाही, तो तेव्हा कोणी पाहिला नव्हता, आजही कोणी पाहात नाही आणि तरीही त्याचं नाव आणि संदर्भ हिंदी सिनेमाच्या दर्दी प्रेक्षकाला विसरता येणार नाही... हा सिनेमा भलत्याच कारणाने अजरामर होऊन बसलेला आहे... हिंदी सिनेमातल्या आजवरच्या सर्वात मोठय़ा महानायकाचं अपघाती पदार्पण या सिनेमातून झालं होतं... आजही या सिनेमाच्या पोस्टरांवर त्याचा नंतर मोठा करून मध्यभागी लावलेला फोटो दिसतो...  
हा सिनेमा अमिताभ बच्चनचा दुसरा सिनेमा असता, तरी त्याचा फारसा कुठे उल्लेख झाला नसता...
या सिनेमात अमिताभ बच्चन नसताच, तर तो काळाच्या उदरात केव्हाच गडप झाला असता... के. ए. अब्बास यांच्या इतर बहुतेक सगळय़ा सिनेमांच्या वाटय़ाला जे चौफेर अपयश आलं, तेच `सात हिंदुस्तानी'च्या वाटय़ाला आलं असतं...
ख्वाजा अहमद अब्बास हे नाव हिंदी सिनेमाच्या इतिहासात आजही घेतलं जातं ते त्यांनी स्वतः काढलेल्या, दिग्दर्शित केलेल्या सिनेमांसाठी नाही... शहर और सपना हा त्यांचा एकमात्र व्यावसायिक यशस्वी सिनेमा... तोही आज कोणाच्या खिजगणतीत नाही, तर धरती के लाल, दो बूंद पानी, बंबई रात की बाहों में, नक्षलाइट वगैरे त्यांच्या आल्या-गेल्या सिनेमांची याद कोणाला राहील. अब्बास हे सर्वपरिचित आहेत ते राज कपूरच्या चित्रपटांचे लेखक म्हणून. आवारा, श्री 420 चे लेखक म्हणून. अब्बास हे फक्त नावाचेच मुसलमान. त्यांचा सगळा पिंड बंडखोर कम्युनिस्टाचा. त्यांच्या कॉलेजात म्हणे एकदा एक दिपोटी आला आणि त्याने इंग्रजांचं राज्य कसं परमदयाळू आहे, त्याने किती सुधारणा केल्या आहेत, अशी टेपच लावली. इंग्रजांनी काय काय सुखसुविधा निर्माण केल्या याची जंत्री सांगताना तो सांगू लागला, इंग्रजांनी बनवले शफाखाने (हॉस्पिटल्स), डाकखाने (टपाल कार्यालयं)... विदय़ार्थ्यांमधून अब्बास ताडकन उद्गारले, `कैदखाने!...' तो त्यांना स्फुरलेला पहिला खटकेबाज संवाद असावा. 
पत्रकारितेतून सिनेमालेखनात आलेल्या आणि कट्टर साम्यवादी विचारांच्या अब्बासांवर नेहरूंच्या स्वप्नाळू हिंदुस्थानाच्या स्वप्नाचा मोठा पगडा होता. त्या सगळय़ाचं अजब कॉकटेल त्यांच्या व्यक्तिमत्वातही झालेलं दिसतं आणि त्यांच्या लेखनातही. एकीकडे राज कपूरसारख्या मुख्य प्रवाहातल्या तद्दन कमर्शियल मांडणीच्या सिनेमाकाराला त्याच्या सिनेमांचं आर्ग्युमेंट आणि त्यानेच साकारलेल्या नायकाला व्यक्तिमत्त्व देताना नाच-गाणी, मेलोड्रामा, योगायोग वगैरे सगळय़ा फिल्मी मसाल्याची रेलचेल करण्यात कोणतीही कसर न सोडणार्या अब्बास यांनी त्या सगळय़ा सिनेमांमधून त्यांचं साम्यवादी तत्वज्ञान मांडण्याची संधी कधी सोडली नाही. राज कपूर यांचा नायक `सोविएत' रशियामध्ये अमाप लोकप्रिय झाला, हा काही योगायोग नव्हता, ती लोकप्रियता खरंतर अब्बासांची लोकप्रियता होती, त्यांच्या कम्युनिस्ट कंटेंटची लोकप्रियता होती. अब्बास या लोकप्रियतेवर स्वार होऊन राज कपूरच्या सिनेमांचीच नक्कल असलेले सिनेमे त्याला किंवा इतरांना घेऊन काढू शकले असते आणि स्वतःही मोठे सिनेमाकार बनू शकले असते. पण, या माणसाच्या व्यक्तिगत सिनेमाच्या संवेदना अगदीच वेगळय़ा होत्या. त्यांना संपूर्णतया यथार्थवादी आणि आदर्शवादी सिनेमे काढायचे होते. असे सिनेमे काढण्याचं धारिष्टय़ कोणताही कमर्शियल निर्माता करणार नाही, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे सिनेमाशीच लग्न लागलेल्या या सद्गृहस्थाने अख्खं आयुष्य एकाहून एक कमर्शियल सिनेमे लिहून पैसे कमावले आणि ते सगळे आपल्या आदर्शवादी सिनेमांमध्ये खर्च करून टाकायचे, यात घालवून टाकलं. `बॉबी'सारखा तद्दन बाजारू सिनेमा तुम्ही लिहिलातच कशाला, असं जेव्हा तेव्हाच्या एका प्रख्यात समीक्षकाने त्यांना दरडावून विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की `दो बूंद पानी' आणि `शहर और सपना' काढण्यासाठी पैसे मिळावेत, म्हणून... 
सगळय़ात हृदयद्रावक गोष्ट ही आहे की इतके लोकप्रिय सिनेमे लिहून, राज कपूरला व्यक्तिमत्त्व देऊनही व्यावसायिक यशाची कस्तुरी आपल्या निर्मितीला आणि दिग्दर्शनाला अप्राप्य असणार आहे, याची कल्पना अब्बास यांना असणारच; पण, अपयशी का होईना, एखादा `क्लासिक' सिनेमा आपल्या नावावर असावा, असं त्यांना कधी ना कधी वाटलं असेल. तेही त्यांना अप्राप्यच राहिलं.
`सात हिंदुस्तानी' किंवा अब्बासांचा इतर कोणताही सिनेमा क्लासिक बनण्याच्या जवळपास फिरकू शकला नाही, याचं कारण `सात हिंदुस्तानी'मध्येही समजतं. जो सामाजिक जाणिवांच्या दृष्टीने अतिशय सजग दिग्दर्शक असतो, तो जर लेखकही असेल, तर सिनेमातून तो भाषण ठोकायला लागतो. लोक सिनेमा पाहायला आलेले असतात, त्यांना भाषणबाजी आवडत नाही. जेव्हा लेखक अब्बासांना वसंत साठेंसारख्या सहलेखकाची जोड असायची आणि राज कपूरसारखा दिग्दर्शक त्यातून वेचक तेच निवडून घ्यायचा, तेव्हा त्यांचे सिनेमे आटोपशीर, प्रमाणबद्ध आणि मुख्य म्हणजे प्रचारकी थाट टाळलेले असायचे. अब्बास स्वतःच लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक असायचे, तेव्हा ते अनेक सामाजिक प्रश्नांवर एकाच कथानकात भाष्य करायला जायचे आणि मग सगळी मांडणी भाबडी होऊन जायची. शिवाय, चांगला लेखक हा चांगला दिग्दर्शक होऊ शकेलच असं सांगता येत नाही, हे अब्बास यांच्या बाबतीत खरं होतं. सिनेमाच्या तांत्रिक अंगांच्या बाबतीत ते बरेचसे ढिले होते. त्यामुळे त्यांच्या जवळपास सगळय़ाच सिनेमांवर हौशीपणाची छाप दिसून येते...
... ती `सात हिंदुस्तानी'मध्येही आहे, अगदी अमिताभच्या अभिनयातही. कारण साधं आहे. कितीही गुणवान असला तरी अमिताभ त्या सिनेमात न्यूकमर होता, तो त्याचा पहिला सिनेमा होता आणि त्याच्या गुणांना पैलू पाडण्याची क्षमता अब्बास यांच्यात नव्हती, सात नायक असलेल्या सिनेमात ती त्यांची प्रायॉरिटीही असण्याची शक्यता नाही. त्यामुळे या सिनेमात अमिताभची डायलॉग डिलिव्हरीही त्याआधी शेरवुड कॉलेजात त्याने केलेल्या इंग्रजी नाटकांमधल्या संवादफेकीसारखीच कृत्रिम आहे...
हा सिनेमा अमिताभला कसा मिळाला, याच्या अनेक कहाण्या प्रचलित आहेत. बच्चन कुटुंब हे कायम नेहरू घराण्याच्या सावलीत वाढलं. नेहरूंच्या कृपाछायेमुळे हरिवंशरायांसारख्या सालस प्रोफेसराला परदेशात नेमणुका मिळाल्या. मात्र, अमिताभच्या उदयापर्यंत हे घराणं परप्रकाशितच होतं. सामाजिकदृष्टय़ा ते ज्या वर्तुळात होते, त्या वर्तुळात राहण्याइतकी त्यांची आर्थिक स्थिती संपन्न नव्हती. त्यात मुलांना बोर्डिंग स्कूल वगैरे श्रीमंती थाटाच्या जीवनशैलीशी त्यांची खेचाखेच सुरू असायची. त्यामुळे कोलकात्यात सुखासुखी मिळत असलेली नोकरी सोडून अमिताभने सिनेमात करीअर करायचा निर्णय केल्यानंतर प्रसंगी मुंबईच्या रस्त्यांवर टॅक्सी चालवण्याचीही तयारी ठेवली होती. इथे ओळखीचं कोणी नव्हतं. असं म्हणतात की ज्या टॅलंट हंट स्पर्धेतून राजेश खन्ना हिंदी सिनेमात आला, त्या स्पर्धेत अमिताभही होता, पण प्रभाव पाडू शकल्याने बाद झाला होता. त्याची उंची आणि त्याचा आवाज (हो हो आवाज) यामुळे त्याला कोणी भूमिका देत नव्हते. अमिताभ असं सांगतो की त्याने दिल्लीतून अब्बास साहेबांना पत्र लिहिलं आणि त्यांनी पाचारण केलं, म्हणून तो सात हिंदुस्तानीमधला एक हिंदुस्तानी बनला. काही मंडळींचं म्हणणं असं आहे की अब्बास हे नेहरूवादी असल्यामुळे नेहरूंच्या आणि गांधी घराण्याच्या जवळचे होते. हरिवंशराय आणि तेजी बच्चन यांच्याशीही त्यांचा परिचय होता. या दोघांच्या सुपुत्राला आपल्या सिनेमात संधी दय़ा, अशी चिठ्ठी तत्कालीन पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधींनी दिली म्हणून त्यांनी अमिताभला संधी दिली. 
गंमतीची गोष्ट म्हणजे अमिताभने या सिनेमात जी मुस्लिम शायराची व्यक्तिरेखा साकारली आहे, ती त्याला मिळाली टिनू आनंदमुळे. टिनूची या भूमिकेसाठी निवड झाली होती. नेमक्या त्याच वेळेला सत्यजित राय यांचा सहायक दिग्दर्शक बनण्याची संधी त्याला मिळाली आणि तो तिकडे गेला. ही भूमिका अमिताभला मिळाली. अमिताभ यानंतर 18 फ्लॉप सिनेमे देऊन का होईना, सुपरस्टार झाला. टिनू ना अभिनेता म्हणून यशस्वी झाला, ना `शहेनशहा'चा अपवाद वगळता दिग्दर्शक म्हणून. सत्यजित राय यांच्याकडे उमेदवारी करून त्याने `शहेनशहा' काढावा, हाही एक विनोदच. पण, टिनूची नियतीही या सिनेमाशी जोडलेली राहिलीच. या सिनेमातली एकमेव नायिका शहनाज (अभिनेते आगा यांची मुलगी आणि जलाल आगाची बहीण) हिच्याशी त्याचे भावबंध जुळले आणि तो तिच्याशी विवाहबद्ध झाला.
या सिनेमात जलाल आणि शहनाझ ही दोन्ही भावंडं होती, उत्पल दत्त होते, `चेम्मीन' या गाजलेल्या मल्याळी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा अभिनेता मधु होता, मेहमूदचा भाऊ अन्वर होता... प्रयोगशीलतेबाबत व्ही. शांतारामांचा आदर्श अब्बास यांनी ठेवला असावा. शांतारामांनी `शेजारी' आणि `पडोसी' हे सिनेमे काढताना हिंदूच्या भूमिकेत मुसलमान आणि मुसलमानाच्या भूमिकेत हिंदू असं गिमिक केलं होतं. अब्बास यांनी या सिनेमात ते गिमिक आणखी पुढे नेऊन बंगाली उत्पल दत्त यांना पंजाबी माणसाची व्यक्तिरेखा, हिंदू अमिताभला मुस्लिम शायराची व्यक्तिरेखा, मुस्लिम शहनाझला ख्रिस्ती मारियाची व्यक्तिरेखा असला अचाट प्रयोग केला होता. हा सिनेमाच मुळात जात, धर्म, भाषा आणि प्रांत यांच्या बंधनांपासून मुक्तीचा संदेश देणारा होता. त्याची (म्हणजे अब्बास यांच्या भाषणबाजीची) सुरुवात कास्टिंगपासूनच झाली होती...
`सात हिंदुस्तानी'ची कथा काय, असं हा सिनेमा न पाहिलेल्या कोणालाही विचारलं तरी तो त्याचं उत्तर देऊ शकतो. पोर्तुगीजांच्या अमलातून गोवा मुक्त करण्याच्या लढय़ात सात हिंदुस्तानी तरुण सहभागी होतात, त्यांची गोष्ट, हे ते उत्तर. पण, हे अर्धवट आणि सोयीस्कर उत्तर आहे. एवढीशी गोष्ट सांगण्याकरता अब्बासांनी या सिनेमाचा घाट घातला नव्हता. अतिशय भाबडय़ा आणि क्रूड अशा कास्टिंगच्या त्यांच्या प्रयोगामागेही काही वेगळा विचार होता. तो या सिनेमाच्या केंद्रस्थानी आहे आणि गोव्याचा स्वातंत्र्यसमर हा पार्श्वभूमीला असलेला विषय आहे. हा काही त्या मुक्तीलढय़ावरचा सिनेमा नाही, हा त्यापलीकडच्या मुक्तीलढय़ावरचा सिनेमा आहे.
सिनेमातली एकमेव नायिका मारिया ही सहाजणांना पत्रं लिहित असल्याच्या प्रसंगातून सिनेमा सुरू होतो. ती आजारी आहे, मृत्यूच्या दारात आहे आणि तिला मरणाआधी आपल्या या सहा कॉम्रेडांना भेटायचं आहे. त्यांच्या साथीने तिने एकेकाळी गोव्याच्या मुक्तीलढय़ात एक गुप्त मोहीम पार पाडलेली असते. देशाच्या वेगवेगळय़ा प्रांतांमध्ये असलेल्या या मित्रांना बोलावून एका अरण्यात निमलष्करी प्रशिक्षण घेऊन गोव्यात घुसखोरी करून पोलिस स्टेशनांवर स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवायचा आणि गोव्यातल्या नागरिकांच्या स्वातंत्र्याकांक्षेला बळ दय़ायचं, चिथावणी दय़ायची, अशी ती मोहीम असते. ही मोहीम पार पाडल्यानंतर पोर्तुगीजांनी त्यांना पकडून, छळून गोव्याच्या हद्दीबाहेर फेकून दिलेलं असतं... हा झाला फ्लॅशबॅक. तिने आणि तिच्या मित्रांनी जात, धर्म, भाषा आणि प्रांताचे भेद बाजूला ठेवून एक हिंदुस्तानी म्हणून हिंदुस्तानासाठी केलेल्या त्यागाची कहाणी. पण, मारिया जेव्हा त्यांना पत्र लिहिते तेव्हा मात्र हे सगळे मित्र आपापल्या प्रांतातल्या विभाजनवादी चळवळींमध्ये अग्रेसर असतात. कोणी भाषेच्या आधारावर आपल्याच सरकारशी लढत असतो, कोणी प्रांताच्या. तामिळनाडूमधला हिंदीविरोधी लढा, पंजाबचं हरयाणा, हिमाचल, पंजाब असं त्रिभाजन, उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या हिंदीवादी चळवळी यांच्यात तिचे मित्र सहभागी झालेले असतात. महाराष्ट्रीयांसाठी गैरसोयीचा विषय म्हणजे या सिनेमात संयुक्त महाराष्ट्राचा लढाही `विभाजनवादी' म्हणून आकळला गेला आहे. नेहरूंच्या प्रांतविहीन एकात्म देशाच्या स्वप्नात ही भाषक अस्मितांना फुंकर घालणारी भाषावार प्रांतरचना बसणारी नव्हती. हे सगळे मित्र जेव्हा गोव्यात पोहोचतात, तेव्हा मारिया मरण पावलेली असते. पण, तिच्यामुळे त्या सर्वांना आपण सर्वांनी सात हिंदुस्तानी बनून केलेल्या संघर्षाची आठवण होते आणि हे सगळे पुन्हा फुटीरवादी चळवळींमध्ये सहभागी न होण्याची शपथ घेतात...
...हे कथानक वाचल्याबरोब्बरच हे समजतं की हे आधी आर्ग्युमेंट ठरवून त्यानुसार बेतलेलं कथानक आहे. ती कृत्रिमता त्याच्यामध्ये आहेच. सिनेमामध्ये तर हाताळणीतही तांत्रिक त्रुटी, भाबडेपणा, सोपेपणा, भाषणबाजी, हौशी पद्धतीचा अभिनय ही अब्बास यांच्या सिनेमाला साजेशी वैशिष्टय़ं आहेत. पण, मुळात हे कथानक प्रसरणशील आणि प्रवाही कालाच्या एका टप्प्याचं अतिशय बंदिस्त आकलन मांडणारं कथानक आहे. आज भाषावार प्रांतरचनाही लोकांच्या आशाआकांक्षा आणि अस्मितांच्या अपेक्षांना पुरेशा पडत नाहीयेत. एकाच भाषेच्या राज्यांचीही शकलं पडल्याने भाषावार प्रांतरचनेच्या कल्पनेचे तीन तेरा झालेले आहेत. अब्बास यांना आणि त्यांच्यावर प्रभाव टाकणार्या नेहरूंना असं वाटलं होतं की भारतीय समाज त्यांच्याइतकाच भाबडा आणि स्वप्नाळू आहे, प्रगतीशील आहे. तो आपल्या जुन्या ओळखी भारतीयत्वाच्या ओळखीत विसर्जित करून टाकेल. प्रत्यक्षात या बनेल समाजाने एकेकाळच्या सगळय़ा सुधारक पावलांवरून मागे फिरून अस्मितावाद कवटाळला आहे. जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा यांच्या ओळखी आधीपेक्षाही जास्त प्रबळ होऊन बसलेल्या आहेत. हा देश `भारतीयां'नी भरलेला आहे, पण त्यांचं भारतीयत्वही या ओळखींच्या नंतर येतं, त्याआधी येत नाही; मग अब्बास यांना अभिप्रेत असलेला `हिंदुस्तानी'पणा तर फार म्हणजे फारच दूर राहिला... त्यांच्या या सिनेमातले सात नायक वास्तविक आयुष्यात आपापल्या भाषेच्या, प्रांताच्या चाकोरीतच बद्ध राहिले... उत्पल दत्त यांचा काहीसा अपवाद. आणि त्यांच्या ज्याच्यामुळे हा सिनेमा आजही स्मरणात आहे, तो अमिताभ बच्चन तर कागदोपत्री का होईना, कायदय़ाने भारतीयही राहिला नाही, फार कर भरावे लागतात म्हणून तो अनिवासी भारतीयसुद्धा बनायला तयार झाला...
अब्बास यांचं स्वप्न अपयशी तर ठरलंच... पण, अश्वत्थाम्याच्या जखमेसारखं `अमिताभचा पहिला सिनेमा' म्हणून चिरंतन भळभळणंही त्या स्वप्नाच्या नशिबी आलं...




(पूर्वप्रसिद्धी : गोवादूत दिवाळी अंक २०१३)