Friday, December 16, 2011

नॉस्टॅल्जिया को मारो गोली...


गतकाळाबद्दल गळे काढणं हा माणसांचा आवडता छंद आहे...
सहसा, वर्तमानात करण्यासारखं काही उरलं नाही की माणसं भूतकाळात रमायला लागतात. अशा माणसांचं एक बरं असतं. निदान त्यांनी आयुष्यात निदान कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर काही केलेलं असतं. त्यांना तो काळ सुवर्णकाळ वाटावा, यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नसतं. पण, बहुसंख्य माणसं कोणत्याच काळात, वयाच्या कोणत्याही टप्प्यावर काहीही खास करत नाहीत. सतत सपक सपाट जगत राहतात. त्यांनासुद्धा (काहीही करता) गळे काढण्यायोग्य रम्य भूतकाळ कसा लाभतो, हे एक आश्चर्यच आहे. पण, फारसं आश्चर्य नाही म्हणा. कारण, यांची वर्तमानकाळाशी दुश्मनी असते. त्यांचा कोणताही वर्तमानकाळ त्यांच्या निष्क्रीयतेमुळे किंवा अडाणी मद्दडपणामुळे तापदायकच असतो. अशा करवादे काका-काकूंना साहजिकच भूतकाळ- तो उलटून गेलेला, इतिहासजमा झालेला असल्याने- सुरम्य वाटतो.
 खरंतर कोणाला कोणता काळ आवडावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न. त्यात इतरांना काही हरकत असण्याचं कारण नाही. पण, ही मंडळी आपला भूतकाळ आपल्याला आवडतो बुवा, एवढय़ावरच थांबत नाहीत. ज्याअर्थी तो आपला भूतकाळ आहे आणि ज्याअर्थी तो आपल्याला रम्य वाटतो आहे, त्याअर्थी जागतिक इतिहासातही तो आणि तोच काळ रम्य होता, हेच त्रिवार सत्य आहे; तेच सगळय़ा जगालाही बिनशर्त मान्य असलं पाहिजे, असा संतापजनक पवित्रा असतो या लोकांचा. बरं त्यांच्या या वाटण्यात तौलनिक विचार, वस्तुनिष्ठ मांडणी, सखोल अभ्यास वगैरे काही नाही. फक्त हेका. हे लोक शरीरानं वर्तमानकाळात जगत असले तरी मनोमन ऑक्सिजनचा श्वास घेतात तो त्यांच्या आवडत्या भूतकाळात आणि कार्बन डायऑक्साइडचा विखारी उच्छ्वास सोडतात तो अतीव नावडत्या वर्तमानकाळावर. यांच्या मनातल्या रेडिओवर कायम भूतकाळाचं स्टेशन टय़ून्ड असतं आणि त्यावर एकच कार्यक्रम सुरू असतो, `आपली आवड आणि आपली नावड.'
यांच्या हे लक्षातच येत नाही की आपण तरुण असताना अनेक गोष्टी सुंदर भासतात, कारण ते वयच तसं असतं. तेव्हा जे जे सुंदर वाटलं ते सुंदर असतंच असं नाही. मध्यमवयात एखादी स्थूल अर्धपिकली पुरंध्री जेव्हा आपल्याकडे पाहून ओळखीचं हसते, तेव्हा आधी गोंधळायला होतं आणि नंतर लक्षात येतं की एकेकाळी जिच्या अटकर बांध्याने कॉलेजच्या आपल्या एका वर्षाच्या अभ्यासाचा वांधा करून टाकला होता ती हीच. त्यावेळी मनात पहिली भावना खजील ओशाळलेपणाची येते की नाही, सांगा! हो म्हणा हो बिनधास्त, तिच्याही मनात `ज्याच्या सोनेरी केशकलापात आपण बोटं गुंतवण्याचं स्वप्न पाहिलं तो हा टकलू!' असेच भाव येतात. तारुण्यातला सौंदर्याचा साक्षात्कार हा बहुतेकवेळा `ब्युटी लाइज इन आइज ऑफ बिहोल्डर' या पद्धतीचा असतो, याचं भान या मंडळींना कोणत्याही वयात येत नाही हे विशेष.
हिंदी सिनेमा हा तारुण्यसुलभ भावनांना सफाईने हात घालून त्यावरच गल्ला गोळा करण्याचा धंदा. त्यामुळे हिंदी सिनेमावर असं गळेपडू आणि गळेकाढू लिहिणाऱयांची भरमार आहे, यात आश्चर्य नाही. स्मरणरंजन, स्मृतिरंजन अर्थात `नॉस्टॅल्जिया'च्या नावाखाली ब्लॅक अँड व्हाइट सिनेमांचे फोटो छापून पानंच्या पानं भरण्याची सोय आणि हुकमी हळहळे हुळहुळे वाचक या खासियतींमुळे वर्तमानपत्रवाल्यांनाही पानं भरण्यासाठी असं गतकाळू-टिपगाळू लेखन हवंच असतं
 यांच्यातली सर्वात कर्णकटु जमात आहे चित्रपटसंगीतावर लिहिणाऱयांची. हिंदी सिनेसंगीताच्या `सो कॉल्ड' सुवर्णकाळाचे गोडवे गाऊन घसे सुकवणारे आणि कान पकवणारे बेसुमार आहेत. यांचा गतकाळाबद्दलचा अप्रोच पुणेकरांसारखा असतो. म्हणजे, पुण्यातल्या माणसांबद्दल एका पुणेकराचंच (इतकं मार्मिक दुसऱया कुणाला सुचणार म्हणा) एक मार्मिक निरीक्षण आहे. त्याच्या मते पुण्यातली माणसं अशा टेचात वागत-वावरत-बोलत असतात की, ज्या थंड आणि आरोग्यदायी हवेसाठी पुण्याची ख्याती आहे, ती हवासुद्धा आपण त्या हवेत उच्छ्वास सोडतो म्हणूनच अशी थंड आणि आरोग्यदायी आहे, असं त्यांना वाटत असतं. तशीच या भूतकाळाच्या नावानं भयाभया रडत शाई गाळणाऱया सराईत नॉस्टॅल्जिया-लेखकांची गत असते. त्यांचाही वरकरणी आव असा असतो की इतक्या सुंदर गाण्यांच्या काळात आपला जन्म झाला, हे आपलं अहोभाग्य! पण, त्यांच्या अहंमन्य लेखनाचे पापुद्रे उचकटले की आतला खराखुरा भाव दिसतो. तो असा असतो की त्या काळात आपल्यासारखे थोर कानसेन गाणी ऐकत होते, म्हणूनच इतकी सुंदर गाणी तयार झाली!
खरंतर सिनेमातली गाणी हा एक अजबच प्रकार. सिनेमाच्या कथानकात मध्येच गाणी वाजणं, पडद्यावरच्या माणसांनी ती वेगळय़ाच माणसांच्या आवाजात गाणं, एकाच सिनेमात एकाच नायकानं तीन-चार गायकांच्या आवाजात गाणं, सार्वजनिक ठिकाणी मागे अचानक म्युझिक वाजू लागणं, इतर लोकांनी कामधंदे सोडून हिरो-हिरोइनीभोवती फेर धरून नाचणं, हा सगळाच आत्रंगी प्रकार आहे. जगात बहुश: फक्त भारतीय सिनेमात दिसणारा. एका फिल्म फेस्टिवलमध्ये एका इजिप्शियन सिनेमातले नट टिपिकल बेली डान्स टाइप ठेकेबाज अरेबियन म्युझिकवर एकदम गाणं गाऊ लागले, तेव्हा आडय़न्स हसून लोटपोट झाला होता. प्रेक्षकांत 95 टक्के भारतीय होते, हिंदी सिनेमांच्या गाण्यांवरच भरणपोषण झालेले, तरी त्यांना इतर देशातल्या वातावरणात आणि परभाषेत हे भयंकर विनोदी वाटत होतं.
असूंदेत विनोदी. ही आमची शैली आहे, आम्ही वापरणारच सिनेमात गाणी, असं हट्टानं म्हटलं तरी कोणत्याही सिनेमात गाणी का असतात, संगीत का असतं, गाणी जिथे असतात त्याच जागी का असतात, असा पुढचा प्रश्न येतो. सिनेमामध्ये त्या त्या प्रसंगानुरूप, त्यातल्या भावनांनुरूप गाणं यायला पाहिजे, तसं संगीत असलं पाहिजे, अशी एक साधी अपेक्षा असते. जिथे सिनेमाचा गद्य भाग भावपरिपोष करू शकणार नाही, असं वाटतं, तिथे गाणं ते काम करतं, ते कथानक पुढे नेतं, ते त्याचं मुख्य काम असतं- किमान असलं पाहिजे. मग सांगा, हरएक गाण्यात गोडवा भरलेला असलाच पाहिजे हा अट्टहास कशाला? `बाबू समझो इशारे हॉरन पुकारे पम पम पम' हे गाणं गोडबिड नाही, पण सिनेमात फिट्ट बसणारं आणि आपलं काम चोख करणारं गाणं आहे, त्याचं काय! अर्थात, जिथे अनेक संगीतकारांनाही आपण सिनेमासाठी संगीत देत आहोत, याचं भान उरत नाही आणि सिच्युएशन काहीही असो, ते एकसाची सुमधुर भावगीतांचा रतीब घालत राहतात तिथे अशावेळी त्यांच्याच कर्णमधुमेहकारक संगीतावर पोसलेल्या कानसेनांना काय दोष द्यायचा!
त्याही पुढे जाऊन समजा असंही मान्य केलं की काही नाही, माधुर्य हाच हिंदी फिल्मी गाण्यांच्या श्रेष्ठत्वाचा एकमात्र निकष आहे, तर मग बाबांनो, या गाण्यांवर असं भरभरून लेखन करताना एखादं गाणं नेमकं कशामुळे मधुर वाटतं, त्यातला वाद्यमेळ काय होता, त्यात काही खासियत होती का, चालीचं वैशिष्टय़ काय होतं, गायकानं काय विशेष भर घातली, याचं काही विश्लेषण कराल की नाही? एखादं गाणं का उत्कृष्ट आहे, याचा शोध यांच्यातला एकही हरीचा लाल घेत नाही, ते नेमक्या शब्दांत पकडून मांडत नाही आणि ते गाणं सत्राशेसाठ वेळा ऐकलेल्या माणसाला पुन्हा ऐकायला लावून त्यातली सौंदर्यस्थळं नव्यानं समजून घेण्याची आस निर्माण करत नाही. जो तो उठून कानाच्या पाळीला हात लावून `काय सज्जादची चाल... वा वा वा, काय साहिरचे शब्द... अहाहा, काय लताचा आवाज... स्वर्गीयच!' अशा शब्दचकल्या पाडत असतो. यातला `लताचा आवाज स्वर्गीयच' हे लहानपणापासून सतत ऐकल्यामुळे आमच्या गण्याला जेव्हा लताबाई हयात आहेत हे कळलं तेव्हा प्रचंड धक्काच बसला. गाण्याचं वर्णन म्हणजे जास्तीत जास्त काय, तर अमक्या गायिकेचा किनरा, कातर स्वर थेट काळजाला हात घालते, काळीज चिरते, मिठी छुरी चालवते... अरे, गायिका आहे की सुरमईच्या तुकडय़ा कापायला बसलेली कोळीण?
आपल्या काळात सगळं छान छान होतं, सगळे नट अभिनयनिपुण हेते (आवडता अभिनेता मनोजकुमार, असं एका भटक्या पत्रकार कम राजकीय पुढाऱयाच्या आवडीनिवडींमध्ये वाचल्याचं स्मरतंय- आलं आलं, इथेही स्मरण आणि रंजन आलंच.), आपल्या काळातल्या सगळय़ा नटय़ा सुंदर होत्या (त्यांच्यावर अभिनयनिपुण असण्याचं बंधन नाही, ती अट `शिथिलते'च्या व्यस्त प्रमाणात शिथिलक्षम), आपल्या काळातली सगळी गाणी सुरेल होती, असं लिहिण्याचं धाडस करणारी मंडळी निदान भाबडी तरी म्हणता येतील. कारण, त्यांच्या नजरेला इतर रंगच दिसत नाहीत. ब्लॅक आणि व्हाइट हेच त्यांच्या आयुष्यातले रंग. जे जे जुनं ते व्हाइट, जे जे नवं ते ब्लॅक, असा त्यांचा सरळसाधा हिशोब.
यांच्यात काही वासरांतल्या लंगडय़ा गायी असतात, त्या फारच भारी. यांना कधीच कोणीच ऐकलेली गाणी जाम आवडत असतात आणि त्यांच्या आठवणी काढून उसासणं (आणि खरंतर इतरांना जळफळवणं) हा यांचा मुख्य धंदा. म्हणजे गाणं जेवढं दुर्मीळ तेवढं सुरेल, स्वर्गीय. आता इतकंच सुरेख गाणं होतं तर ते दुर्मीळ कसं झालं, त्याबद्दल हे तिघेचौघे रसिकोत्तम सोडले तर इतर कुणालाही कसं काही माहिती नाही, हे प्रश्न पाडून घ्यायचे नाहीत. तर हे लोक कोणातरी एकाच्या घरी जमून अपेयपान आणि अभक्ष्यभक्षणाच्या साथीनं या दुर्मीळ गाण्यांचा आस्वाद घेतात. अपेयपानाचा आणि अभक्ष्यभक्षणाचा विशेष उल्लेख (कोणाचं खाणंपिणं काढू नये, हा संकेत मोडून) अशासाठी केलाय की या दोन कृती संयुक्तपणे केल्यावर माणसांच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात, बहकतात आणि त्या `तारुण्यसुलभ' होऊन जातात, हे पॉइन्ट्स टु बी नोटेड आहेत. अशा गाण्यांवर, त्यांच्या मैफलींवर मग हे लंबेचवडे लेख लिहितात. आता सांगा, ज्या गाण्याच्या जगातच तीन रेकॉर्डी शिल्लक असतात, त्यातल्या दोन यांच्याकडे आणि एक चोरबाजारातल्या कुठल्यातरी सत्तारभाई तांबेवाले वगैरे नावाच्या खास दुकानदाराकडे असतात, त्या गाण्याबद्दल लिहून उपयोग काय? यांनी लिहिलंय ते खरं की खोटं, किंबहुना यांनी लिहिलंय ते गाणं प्रत्यक्षात आहे की नाही, हेही वाचकाला ताडून बघण्याची सोय नाही, तिथे ते लिहून उपयोग काय? बरं, हे लोक ही गाणी ऐकून असे चेकाळतात की मध्यरात्री एखाद्या स्वरसम्राज्ञीला फोन करतात आणि सांगतात, ``हे गाणं कुणी गायलंय वळक वळक?''
ती ते खरखरीत गाणं ऐकून म्हणते, ``कुणी गायलंय हो? मला नाही ओळखता आलं.''
मग हे लोक पाताळविजयम सिनेमातल्या रावणासारखे खदाखदा हसून सांगतात, ``अगं तूच गायलंयस हे गाणं.'' (हे लोक स्वघोषित कानसेन असल्यामुळे आपल्या आजीच्या वयाच्या महागायिकेलाही `अगंतुगं' करतात बरं का फोनवर. जिव्हाळय़ाचं नातं ना हे!)
आता एखाद्यानं वयाच्या चौदाव्या वर्षापासून गिरण चालवली, तर त्यातून कधी कुठे किती पीठ पडलं, याचा काय आणि कसा हिशोब करणार? दहा-बारा हजार गाण्यांपैकी प्रत्येक गाणं कसं आठवणार? मग बाई आश्चर्यचकित होऊन विचारणार, ``काय सांगताय काय फणेकर? कोणत्या सिनेमातलं आहे हे गाणं? कुणाचं म्युझिक आहे हे?''
आता मात्र फणेकरांना आभाळ ठेंगणं की काय म्हणतात तसं होतं. ते घडाघडा सांगतात, ``अहो, नाइन्टीन फोर्टी थ्रीमध्ये (अशा संभाषणांत वर्षं नेहमी इंग्रजीत उच्चारायची असतात...) `डाकू का घोडा' नावाचं पिच्चर (...आणि सिनेमाला नेहमी पिच्चरच म्हणायचं असतं) आलं होतं ना पय्यप्पनचं, त्यात दिलावरखानच्या म्युझिकमध्ये काय तुफान गायला होतात तुम्ही.''
असा सगळा संवाद. जे गाणं आपण गायलंय हे त्याच्या गायिकेलाही आठवत नाही, जे कुणाला कधी ऐकायला मिळायची शक्यता नाही, ज्याचा संगीतकार तीन सिनेमांच्या वर टिकला नाही, ते गाणं असून असून किती अप्रतिम असणार? त्यावेळी गाणी ऐकणारे बाकी सगळे या गानरूपी हिऱयाचं मोल कळणारे गाढव होते आणि हेच तेवढे रत्नपारखी?
आता हा तीनच सिनेमांना संगीत देऊन अंतर्धान पावलेला दिलावरखान, दोनच सिनेमात नायिका असलेली कुणीतरी कुंदाबाला, एकाच सिनेमात `चमकून' पाकिस्तानात पळालेला अकबर हुसेन वगैरे इतिहासात जमा होण्याच्याच योग्यतेची माणसं यांच्या मनात इतिहासजमा होत नाहीत आणि मग त्यांच्याशी संबंधित सिनेमांच्या आणि गाण्यांच्या जंत्र्यांची भेंडोळीच्या भेंडोळी उलगडून आठवणींचं सूत कातण्याचा कार्यक्रम चालत राहतो. यात सूत कातणारा सनावळय़ाबहाद्दर असला तर मग विचारूच नका. यांचे लेख म्हणजे साधारणपणे असा- `1932 साली खुर्शीद आलमने पहिला सिनेमा केला. काही लोक सांगतात की 1934चा `खुदा के वास्ते' हा तिचा पहिला सिनेमा. पण, 32चा `नंगी तलवार' हाच तिचा पहिला सिनेमा. बेबी खुर्शीद या नावाने तिने हिरोइनच्या लहानपणीची भूमिका केली होती. `याद करो, फरयाद करो या मरो' हे बेहतरीन गाणंही तिने गायलं होतं. गंमत म्हणजे हे गाणं गाणारी बेबी तरन्नुमही खुर्शीदच्याच वयाची म्हणजे साडे तेरा वर्षांची होती. काही लोक सांगतात, तशी तरन्नुम 39 वर्षांची नव्हती. ती तरन्नुम दुसरी. ती बेगम तरन्नुम या नावाने गात असे. `चांद को छुपाओ' या सिनेमातलं तिचं टायटल साँग फार गाजलं होतं. हा सिनेमा के. दिवाकर या दिग्दर्शकाचा. कुणाला वाटेल हा साउथचा डायरेक्टर होता की काय. पण, के. दिवाकर म्हणजे दिवाकर कोरफडकर.''
 आपल्याला हे सगळं माहिती आहे. कबूल. आनंद आहे. पण, ते का माहिती आहे, हे माहिती आहे का? बरं नसूद्यात नसेल माहिती तर. पण, ते सगळं वाचकालाही माहिती असलं पाहिजे, असं काय मौलिक आहे त्यात? एका लेखात एका तेव्हाच्या सुपरस्टार नायिकेच्या `स्वीटी' नामक मांजरीला कसा पाचपर्यंत ताप चढला होता आणि मग तिच्या (पक्षी नायिकेच्या) जिवाची खूप उलघाल झाल्यामुळे दोन सिनेमांचं शूटिंग कसं रखडलं होतं, हे वाचल्याचं आठवतंय. अहो, जिथे ती सुपरस्टार नायिकाच आता कुणाच्या लक्षात नाही, तिथे तिच्या मांजरीची काय कथा? आपल्या डोक्यात आपण ट्रक भरलाच आहे कचरापट्टी माहितीचा, तर तो आणून आमच्या डोक्यांमध्ये ओतायला इथे काय डम्पिंग ग्राऊंड आहे का?
या सगळय़ा मंडळींचं सिनेमाशी संबंधित असणं सर्वस्वी वेगळय़ा प्रकारचं होतं. ते आजच्या काळात कितीही प्रत्ययकारी शब्दांमध्ये समजून घेता येणं कठीण आहे. या सर्वांच्या तरुणपणाचा काळ आजच्या हिशोबात भलताच सुशेगाद म्हणावा असा होता. सगळय़ा जीवनाची गती संथ होती. कानांवर आणि डोळय़ांवर ध्वनी-चित्रांचा आजच्याइतका स्वैर आणि मुबलक मारा नव्हता. टीव्हीचा पत्ताच नव्हता. अवाढव्य सिंगल स्क्रीन थिएटरांमध्ये मोठय़ा पडद्यावर दिसणारा, मोनो साऊंडमध्ये ऐकू येणारा सिनेमा हे दृकश्राव्य मनोरंजनाचं एकमेव साधन आणि सामुदायिक भावजीवनातले सगळे दुवे जोडणारा एकमेव दुवा. एकीकडे देव आनंदचा केसाचा कोंबडा तर दुसरीकडे गुरुदत्तची आत्मघाती, संवेदनशील, हळवी उलघाल अशी तरुणाईच्या बाह्य आणि आंतरिक घडामोडींवर सर्वोच्च प्रभाव टाकणारी दोन्ही टोकं सिनेमाच्याच आंदोळण्यानं जोडलेली. तेव्हाची सिनेमातली गाणी हेच तेव्हाचं सुगम संगीत आणि लोकसंगीत. ते जिभेवर रुळायला सोपं आणि पचायला हलकं, शिवाय तारुण्यसुलभ हुरहुरी निर्माण आणि व्यक्त करण्याचं दुहेरी काम या संगीतातून व्हायचं.  
सिनेमांमधली गाणी ऐकायची तर सिनेमाच पाहायचा किंवा रेडिओ ऐकायचा. रेडिओवर मोजकीच स्टेशन्स, मोजक्याच वेळात मोजकेच कार्यक्रम. त्यांत सतत वाजणारी ही गाणी. त्या काळात हिंदी सिनेमाचा एकूण जीव छोटा होता. कलावंतांपासून गीतलेखन, संगीतरचना, पार्श्वगायनापर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये माणसं मोजकी. त्यामुळे, पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या कलावंतांशी `मैत्र जिवाचे' जुळणं सहजशक्य होतं. त्याला देशाच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीपासून सिनेतंत्राच्या स्थितीगतीपर्यंत अनेक कारणं होती, याचं सम्यक भान या लेखकांमध्ये आढळतच नाही. ते आपले सगळी कुपोषित किंवा नपोषित अभावग्रस्तता सिनेमा थिएटरच्या अंधारात बुडवायला घेऊन गेले आणि तिथला अंधारच डोक्यात भरून घेऊन आले.
हिंदी सिनेमा प्रत्येक टप्प्यावर बदलत गेला. म्हणजे तो बिघडत गेला आणि आता रसातळाला पोहोचलाय, असा अर्थ होत नाही. मास्टर विठ्ठलांच्या काळातला सिनेमा आणि राज कपूर, गुरु दत्तचा सिनेमा यांत फरक आहे. शम्मी कपूर, राजेंद्र कुमार यांच्या काळात तो आणखी बदलला. धर्म़ेंद्र, जितेंद्रचा टप्पा त्याहून वेगळा. राजेश खन्नाची कारकीर्द त्यापुढची, नंतर अमिताभयुग, अनिल कपूर-जॅकी-संजय दत्तमार्गे तीन खानांची टेकडी पार करून आता रणबीर, इम्रान, शाहिद यांचा काळ आलाय. ही सगळी नावं तथाकथित मेनस्ट्रीम सिनेमांतल्या बाप्यांची. मधुबाला, नूतन, वहिदा, मीनाकुमारी, हेमामालिनी, रेखा, मुमताज, माधुरी दीक्षित, शबाना, स्मिता वगैरे अभिनेत्रींनी उजळवलेले कालखंड समांतर चालतातच. शिवाय अमोल, नसीर, ओम, फारुख यांचा समांतर सिनेमा. दक्षिणेच्या प्रादेशिकतेतूनही हिंदीत रिमेकच्या ढुशा मारणारा टिपिकल मद्रासी सिनेमा, बुद्धिगामी बंगाली-मल्याळी सिनेमाचे प्रभाव, ग्राम्य भोजपुरी सिनेमा
 ही सगळी जंत्री सांगायचं कारण एवढंच की सिनेमा नावाच्या तंत्रकलेच्या वापरात, त्यातून साध्य करण्याच्या परिणामात, त्यातून व्यक्त होणाऱया आशयात असंख्य बदल घडले. त्या बदलांचं `धबाबा तोय' आदळूनही काही दगड कोरडेठाकच राहिले. ज्याची त्याची सुई एकेका काळाच्या रेकॉर्डीत अडकलेली. जो मा. विठ्ठलाच्या चरणी लीन, तो म्हणतो राज-देव-दिलीप ही कसली त्रिमूर्ती, आमच्या सैगलची सर कुणालाच नाही. जे दिलीपच्या भजनी लागले त्यांना मनोजकुमारपासून इम्रान खानपर्यंत सगळे त्याचीच पुअर नक्कल करतात, असंच वाटत राहतं. देव आनंदबद्दल कुणाला वेगळं काही वाटायची गरजच नाही. त्याच्या सर्वश्रेष्ठ फॅनला देव आनंद खरोखरच चिरतरुण आहे असं आजही वाटतं. या फॅनचं नावही देव आनंदच आहे, हा योगायोग नाही. धर्म़ेंद्र, जितेंद्र, राजेश खन्ना यांच्या नावानं कुणी इतके उसासे टाकत नाही पण अमिताभच महानायक मानणारे ना पुढच्यांना भाव देत ना मागच्यांना. `लेकिन' नावाच्या सिनेमाची नायिका कशी एका काळातल्या एका क्षणात अडकून पडलेली असते, तशी यांची कहाणी. प्रत्येकजण आपापल्या काळाचा बंदी.
बरं तुमच्या रेकॉर्डी अडकल्यात ना गतकाळात तर अडकूद्यात. 1936 साली कुणा आशा फातर्पेकरणीनं गायलेलं `जीवन डोर तुम्हारे संग' हे अवीट गोडीचं गाणं हेच तुमचं जीवनगाणं होऊन गेलंय, असूद्यात. आपल्या भसाडय़ा आवाजात ते यथाशक्ती, यथामती गात राहा. ऐकणारे ऐकतील. काय करतील बिचारे. पण, आपल्या भूतकाळाची रेषा सर्वात मोठी आहे, असं सांगण्यासाठी वर्तमानकाळाची रेषा खोडायला कशाला जाता? काय आजकालचे सिनेमे, काय आजकालचं संगीत, काय आजकालचे गायक, काय आजकालची गाणी, अशा दुगाण्या कशाला झाडता?
समजुतीचं काय आहे, ती असते किंवा नसते. देवानं काहींची झोळी भरली नसेल, तर त्यांचा तरी काय दोष? पण, आपल्याला काही समजत नाही, हे तरी समजायला हवं ना? ज्या विषयावर लिहायचं त्याची किमान माहिती असली पाहिजे. ज्या सिनेमावर, संगीतावर, नटांवर, गायकांवर बोलायचं, ते ऐकले-पाहिले पाहिजेत. आपण कसे विलक्षण तुसडे आहोत आणि त्याबद्दल जगानं आपल्याला चपलेनंच कसं मारलं पाहिजे, हे हे स्वत: लिहिणार आणि मग पुढे- `ती प्रियंका चोप्रा काळी की गोरी ती मला माहिती नाही. सावळी आहे, असं ऐकून आहे. (हा बाराशे बहात्तराव्यांदा केलेला जोक आहे बरं का) मी तिचा एकही सिनेमा पाहिलेला नाही. (त्यानं तिचं काहीही बिघडत नाही काका? फणेकर काकांना तू ठाऊक नाहीस का? मग तुझ्या मानधनातून पाच लाख कट, असं तिला कुणी निर्माता सांगत नाही. फणेकर काकांकडून सर्टिफिकेट आणल्याशिवाय तुमच्या घरी दूध टाकणार नाही, असं दूधवालाही तिला सांगत नाही.) पण, तिला पाहून मला चिचुंद्रीची आठवण येते. (तिचा सिनेमा पाहता तिला पाहिलंत कुठे? कोपऱयावरच्या वाण्याकडे? सआपल्याला जी ठाऊक नाही, तिच्याबद्दल लिहाच ना गडे, असा आग्रह करणाऱया वाचकांनी फेर धरलाय का तुमच्याभोवती? आणि चिचुंद्रीच कशी आठवते? तुम्ही कोणत्या बिळात राहता?)' किंवा संगीतक्षेत्राबद्दल लिहिताना `रेखा भारद्वाज नावाची कुणी गायिका आहे? कमाल आहे. मग उद्या हिमेश रेशमिया नावाचा गायक आहे, असंही मला कुणी सांगेल. मला तर ऐकून वाटलं की त्याला फक्त नाकच आहे. (हा 1497व्या वेळी केलेला सेम जोक, बरं का?)'
काका, तुम्हाला बराक ओबामा ठाऊक आहे का?
आहे होय? बरं झालं. नाहीतर त्याला बिचाऱयाला अमेरिकेचं अध्यक्षपदच सोडावं लागलं असतं ना तो तुम्हाला ठाऊक नाही म्हटल्यावर आणि रस्त्यावरच आलं असतं त्याचं कुटुंब. `माय नेम इज खान'मधल्या शाहरुखसारखं `कॅन टॉक ऑन एनीथिंग' असा बोर्ड घेऊन उभं राहावं लागलं असतं त्याला नाक्या नाक्यावर.
अहो, तुम्हाला ना आजचा काळ माहिती ना त्यातले लोक. मग त्यावर मल्लीनाथी करण्याचे उद्योग करून कशाला हसं करून घेता स्वत:चं. तुमचा पडद्यावरच्या भावगीतांचा जमाना केव्हाच संपला. आता सिनेमा बदललाय. तो प्रेमाच्या हिल स्टेशनी कहाण्या सांगत नाही किंवा प्रेमभंगी हृदयांचे दर्द पिळवटत नाही. आजच्या सिनेमात नायक-नायिका नसतात- मुख्य व्यक्तिरेखा असतात. कोणी शंभर टक्के सद्गुण पुतळा नसतो, कुणी दुर्गुणसम्राट खलनायक नसतो. कटआउटवरच शोभणाऱया लार्जर दॅन लाइफ नटनटय़ांना माणसांत आणण्याचा प्रयत्न करतोय आजचा सिनेमा. त्यात गाणीच नसतात किंवा असली तर ती पडद्यावर गाण्याचा वेडगळपणा सगळी पात्रं करतील, असं नसतं. याचा अर्थ नायक-नायिका-खलनायक यांच्या `चांदोबा'च्या गोष्टी सिनेमारूपाने निघतच नाहीत, असं नाही. पण, त्यांचं प्रमाण हळुहळू कमी होतंय. त्यांतही गाणी-नाच सगळं असतं पण आयटम साँगच्या स्वरूपाचं. तिथे भावगीतांना स्कोप नाही. आमिरचा आवाज उदित नारायण, शाहरुखचा आवाज अभिजीत, हे या इंडस्ट्रीतले शेवटचे नायकांचे `आवाज'. आता कुणी कुणाचा आवाज नाही. जिथे आहे तिथे उत्तम संगीत तयार होतंच. उत्तम गाणी गायली जातातच. फक्त हा अमक्याचा आवाज, तो तमक्याचा आवाज, ही स्वरसम्राज्ञी वगैरे भानगडी नसतात. एकावेळी कमीत कमी 25 टॅलेंटेड माणसं गाणी लिहीत असतात, 50 संगीत देत असतात आणि 150 फ्रेश, टवटवीत आवाज गाणी गात असतात. तुम्हाला `ससुराल गेंदा फूल' गाणारी रेखा भारद्वाज माहिती नसेल, तर क्लिंटन सेरेजो, ऍश किंग, सोनल मोहपात्रा, शिल्पा राव, हंसिका अय्यर, जावेद अली, कुणाल गांजावाला (नको नको, या नावावर विनोद नको. आम्ही `गलत मेहमूद'चा तुम्हीच सांगितलेला विनोद केलाय का?), तोची रैना, पापोन, शाहिद मल्ल्या, आकृती कक्कर, अनुष्का मनचंदा, ही सगळी नावं तुम्हाला ठाऊक असण्याची शक्यताच नाही. पण, तुम्हाला ठाऊक नसूनही ही माणसं अस्तित्वात आहेत. आपल्यापरीनं चांगलं गातात. प्रत्येकाच्या नावावर एक तरी सणसणीत गाणं आहे आणि सांगण्यास अत्यंत आनंद होतो की ही नावांची यादी एकूण नावांच्या एक दशांश सुद्धा नाही. श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, केके, शान, राहत फतेह अली खान, सोनू निगम, मोहित चौहान ही नावं जर ठाऊकच नसतील तुम्हाला तर काका आपल्याला ठाणे जवळ पडेल की येरवडा, याची चौकशी करा. हे सगळे काही मधाच्या पोळय़ातून काकवीत लोळवून खडीसाखरेत घोळलेल्या आवाजासारखे ग्ग्ग्ग्गोड आवाज नाहीयेत. कदाचित मूड कोणताही असो, नायक-नायिका कुणी असोत, शब्द काहीही असोत, प्रकार कुठलाही असो- सगळीच्या सगळी गाणी आम्हीच गाणार, असा आप्पलपोटेपणा करण्याइतकी `प्रतिभा'ही नसेल त्यांच्यात. पण, प्रत्येकाच्या आवाजाला स्वत:चा काही बाज आहे, काही स्वभाव आहे, काही कॅरेक्टर आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे अतीव मेहनती, गुणी कलावंत आहेत. दिल लगा के गातात.
ही तरी फारच सुपरिचित गायनचौकटीत गाणाऱयांची नावं झाली.
बँडमास्टर रंगीला आणि रसीला ही नावं ऐकलीयेत कधी?
त्यांनी गायलेलं गाणं नक्कीच ऐकलं असणार, त्याच्या नावानं कपाळही बडवलं असणार. पण पुन्हा ऐका.
तौबा तेरा जलवा, तौबा तेरा प्यार
तेरा इमोशनल अत्याचार
आणखी एक नाव. राजबीर.
त्याच्या पोरसवदा आवाजातलं सूर सोडून भटकणारं, दमसासासह ऐकू येणारं गाणं तुम्ही खरोखरंच ऐकलं असण्याची शक्यता फार कमी आहे... हे आहे `ओय लक्की लक्की ओय'मधलं
तू राजा की राजदुलारी मै सिर्फ लंगोटे आळा सूं
भांग रगडके पिया करूं मै कुंडी सोटे आळा सूं
(अगं पार्वती) तू राजाची लाडकी कन्या, मी लंगोटीबहाद्दर, भांग पिणारा, सोटा घेऊन फिरणारा रासवट (शंकर) आहे, असं सांगणारं हे गाणं अंगावर काटा आणतं.
तुमच्याही अंगावर आणेलच ते काटा.
पण, एक अडचण आहे. बँडमास्टर रंगीला आणि रसीला (ही या दोघांची खरी नावं आहेत की नाही, हेही कुणाला ठाऊक नाही) हे हिमाचल प्रदेशाच्या कुठल्यातरी आडगावात राहतात. राजबीर हा तर कोण, कुठला याचा पत्ताच नाही.
त्यामुळे, या गायकांना मध्यरात्री फोन करून गाणं आवडल्याचं तुम्हाला कळवता येणार नाही.
एक लक्षात घ्या काका, कोणतीही रेकॉर्ड जेव्हा `गतस्मृतींना उजळा' देण्यासाठीच बनवली जाते तेव्हा तिच्यात `गुणवत्तेशी अपरिहार्य तडजोड' केलेली असणार, ही काळय़ा दगडावरची रेघ. तुम्ही कितीही `अहाहा, ओहोहो' करा हो, अशा रेकॉर्डीतून फक्त `खरखर' ऐकू येत असते, हे त्रिवार सत्य आहे.
तेव्हा काका, किती काळ लाँग प्लेइंग रेकॉर्डीत सुई अडकवून बसणार? आता आयपॉडवर या. तुम्हाला कोणीही काहीही बोलणार नाही. गॅरंटी आपली!

(प्रहार, दिवाळी २०११)

4 comments:

 1. Yaa lekhaabaddal dahaa gaave inaam.
  kaahee varshaannee Mukesh Majakaraanche lekhahee aweet godeeche vaatoo laaagateel. Waachak.

  " ahaahaa , kyaa lekhyaahai" mhanateel.

  ReplyDelete
 2. second thought:
  To re-publish old articles, to write about yester year cinema is also nostalgia.

  ReplyDelete
  Replies
  1. ही त्या लेखकांना दिलेली सलामीच आहे.

   Delete