Sunday, March 27, 2011

अदृश्य माणसाचा फक्त `दृश्यपट' (हॉलो मॅन)


`कोलंबिया फिल्मस'च्या `हॉलो मॅन' मध्ये मानवी आकाराच्या अक्षरश: निर्वात भासणाऱया पोकळीची, विस्मयकारक दृकचमत्कृती अदृश्य माणसाचं यथातथ्य दर्शनच घडवते. पण, (इतर अनेक हॉलिवुडपटांप्रमाणे) हाच चमत्कार- ही निव्वळ `पोकळ माणसा'ची गोष्ट नाही, तर प्रामुख्याने माणसाच्या `पोकळ'पणाची गोष्ट आहे, या आशयावर बोळा फिरवते.
माणसाला अदृश्य होण्याची किमया साधली तर, या कल्पनेने, काय मज्जा होईल किनई पासून काय उत्पात घडेल इथपर्यंत अनुक्रमे बालवाङमयापासून विज्ञान काल्पनिकांपर्यंत जागतिक साहित्यात भरपूर साहित्य प्रसवलं आहे. याच भुरळ घालणाऱया कल्पनेवर आधारलेल्या एच.जी.वेल्स यांच्या `द इन्व्हिजिबल मॅन'चं थोडं साफसूफ केलेलं रूप म्हणजे `हॉलो मॅन'.
इथे सेबॅस्टियन केन (केविन बेकन) हा तरूण, प्रकांड बुद्धीमत्ता लाभलेला शास्त्रज्ञ अमेरिकन लष्करासाठी सजीवांना अदृश्य करणारं `औषध' शोधतो आहे. त्याच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या पथकातील लिंडा मॅके (एलिझाबेथ शू) ही त्याची माजी प्रेयसी. म्हणजे तिनंच त्याच्याशी असलेलं नातं तोडून टाकलं. तिच्यासाठी आता तो फक्त एक सहकारी आहे. त्याचा मात्र अजून तिच्यात जीव गुंतलाय. याच टीममधल्या मॅट केन्सिंग्टन (जॉश ब्रॉलिन) ाय सहकाऱयामध्ये तिनं जोडीदार शोधलाय. पण, सेबॅस्टियनला हे सहन होणार नाही म्हणून त्यांनी हे नातं गुपित ठेवलंय.
सिनेमा सुरू होतो तेव्हा सेबॅस्टियनला सजीवांना अदृश्य करण्याची सिद्धी आधीच गवसलेली आहे. आता तो अदृश्य सजीवांना पूर्वरूप देण्याची सिद्धी शोधताना दिसतो. ती त्याला गवसते. एका अदृश्य करण्यात आलेल्या माकडिणीवर या नव्या लशीचा प्रयोग यशस्वी होतो.
मात्र, लष्करी अधिकाऱयांबरोबरच्या बैठकीत सेबॅस्टियन प्रयोग संपूर्ण यशस्वी झाल्याची माहिती देत नाही. त्याला संपूर्ण प्रकल्प लष्कराच्या हाती जाण्याच्या आधी माणसावर हा प्रयोग करून पाहायचा आहे. त्यासाठी तोच स्वयंसेवक म्हणून तयार होतो. त्याचे सहकारी भीतभीतच त्याच्यावर हा प्रयोग करतात.  
तो अदृश्य होतो. अदृश्य असताना या स्वत:ला आरशात पाहावे न लागण्याचे फायदे त्याच्या लक्षात येऊ लागतात. त्यातच, पूर्वरुप देणाऱया लशीचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. तो अदृश्यच राहतो. त्यामुळे, त्याचे सहकारी दु:खी होतात. पण, स्वत: सेबॅस्टियन मात्र आनंदात असतो. अत्यंत चंचल, अस्थिर मन, जीनीयसची अंगभूत अस्वस्थता, आणि प्रेयसीच्या दुरावण्यातून फुलू लागलेला खुनशीपणाचा अंगार यांना अदृश्यताकारक लशीतून घडणाऱया हानीकारक जैविक बदलांची जोड मिळते आणि सेबॅस्टियन बिथरतो. अदृश्य असण्याचा गैरफायदा घेऊ लागतो. निसर्गक्रमात किंचित ढवळाढवळ करण्याची ताकद मिळाली म्हणजे आपण देवच झालो, असा त्याचा भ्रम होतो.
कातडय़ाचा मास्क आणि त्यावर अंगभर कपडे घालून, रात्रीच्या अंधारात प्रयोगशाळेबाहेर पडून सेबॅस्टियन सैतानी कारवाया करू लागतो. त्यातून त्याला लिंडा आणि मॅटचं गुपितही कळून जातं, मग, तो पिसाळतोच. आपल्या सगळ्या सहकाऱयांना ठार मारून, प्रयोगशाळा उदध्वस्त करून अदृश्यरुपात बाहेर पडण्याचा, जगात हलकल्लोळ उडवून देण्याचा बेत तो आखतो.
त्याची बुद्धिमत्ता आणि अदृश्य असण्याचं वरदानं यांच्याशी लिंडा आणि मॅट कसा लढा देतात, याची कहाणी म्हणजे `हॉलो मॅन.'
अदृश्य माणूस रुपेरी पडद्यावर `साकारण्या'चे प्रयोग जगभर झाले आहेत. आपल्याकडेही `मिस्टर एक्स इन बाँबे' आणि `मिस्टर इंडिया'मध्ये हा खेळ झालाचपण, अदृश्य माणसाची रेष अन् रेष, जिवंत- हालतीबोलती करण्याचा सर्वाधिक यशस्वी प्रयोग `हॉलो मॅन'मध्ये दिसतो. आधी माकडाचं टप्प्याटप्प्यानं अदृश्यरुपातून पूर्वरुपात येणं आणि नंतर सेबॅस्टियनचं टप्प्याटप्प्यानं अदृश्य होणं, या श्वासरोधक दृश्यांमध्येच विशेष दृक्परिणामकारांनी केलेला अभ्यास आणि मेहनत दिसते. पुढे सेबॅस्टियनला अदृश्य तर ठेवायचं, पण कॅमेरा माध्यमाच्या सोयीसाठी तो दिसला तर पाहिजे, या गुत्थीतून मार्ग काढत पटकथाकार अँड्रय़ू मार्लो यांनी केलेली चतुर रचना दिसते.  
कधी सेबॅस्टियन थर्मल क्लोज सर्किट कॅमेऱयाच्या साह्यानं दिसतो, कधी त्याच्या अंगावरचं पांघरूण पोकळीवर देहाकार धारण करतं, कधी तो कपडे घालतो, मास्क घालतो, कधी तो पाण्यातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्या अंगावरून तिथळणारं पाणी त्याच्या आकारास्तित्त्वाची जाणीव करून देतं. कधी तो खास चष्म्यांमधून दिसतो, कधी त्याच्या आवाजाच्या दिशेनं इतर पात्रं पावडर किंवा द्रवपदार्थ फवारून त्याची धूसर आकृती `मिळवण्यात' यशस्वी होतात, वगैरे, वगैरे, वगैरे.
पण, या `आम्ही अदृश्य माणूस कसा झकास दाखवतो पाहा'च्या `बाइस्कोपी' उत्साहात सेबॅस्टियनचं माणूस म्हणून पोकळ होत जाणं प्रभावी करायला पटकथाकार विसरतो आणि त्याची गरजच नसल्यासारखा सिनेमाचा प्रवास चालू राहतो
त्यामुळे, अशा प्रकारच्या हॉलिवुडपटांना सरावलेल्या प्रेक्षकाला आशयाच्या पातळीवर चकवेल, `जागवेल' असं काही घडत नाही. मराठी सिनेमा जसा बहुतेक वेळा `बोलपट'च होऊन जातो, तसा हा सिनेमा एकदम विरुद्ध जातकुळीचा, फक्त `दृश्यपट'च होऊन जातो.
या तंत्रातिरेकातून होणारी एक पंचाईतच त्या अतिरेकाला अधोरेखित करते. इथला `नायक नहीं खलनायक' सेबॅस्टियन ज्यानं साकारलाय, तो केविन बेकन नॉर्मल रुपात जेमतेम पंधरा- वीस मिनिटं दिसतो. पुढे तो अदृश्य रुपात. आता त्याच्या अभिनयाचं परीक्षण कसं करणार, डोंबल? 
सगळ्या तांत्रिक चमत्कृतींमध्येही त्याचा पायाभूत वावर असणारच, पण इतक्या तंत्राहारी अभिनयाचे मापदंड आखायचे कसे?
तेव्हा, `फक्त पाहा' अशाच शेऱयाला पात्र ठरणारा हा सिनेमा आहे, हे लक्षात ठेवून तो `फक्त पाहा'वा.
(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment