Monday, March 14, 2011

`बँग बँग' हरवली `गँग'


काळाचा महिमा अगाध आहे, हे पटत नसेल, तर `गँग' पाहावा. अकरा वर्षांपूर्वी मुहूर्त झालेला हा सिनेमा वेळेत पूर्ण होऊन प्रदर्शित झाला असता, तर कदाचित एक `दंगा' सिनेमा ठरला असता. मुंबईतल्या माफियापटांच्या वाटेतल्या एका मैलाच्या दगडावर `गँग'चं नाव कोरलं गेलं असतं. पण, `परिंदा', `अंगार', `सत्या' यांच्या वाटावळणांनी खूप पुढे गेलेल्या हिंदी सिनेमाच्या प्रवासात आता `गँग'चं स्थान फक्त `दिवंगत मजहर खानचं कसंबसं पुरं झालेलं स्वप्न' एवढंच राहिलं आहे. कारण, आधीच्या या सिनेमांनी विस्तारलेल्या गुन्हेगारीपटांच्या आशयापलीकडे झेप घेणारं काहीच त्यात नाही. त्यामुळे `गँग'चा  परिणाम उणावतो.
जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, कुमार गौरव आणि जावेद जाफ्री यांना एकत्र आणणं, हा अकरा वर्षांपूर्वी `कास्टिंग कू' ठरला असता. परस्परांहून हे कॉकटेल आजही काही कमाल दाखवतंच.
`गँग'मध्ये `गँग'या शब्दाची उत्पत्ती होते ती या चार मित्रांच्या नावांच्या आद्याक्षरांतून, गंगाधर, ऊर्फ गंगू (जॅकी श्रॉफ) हा एका मराठी कामवालीचा (उषा नाडकर्णी) मुलगा. अब्दुल (नाना पाटेकर) हा रस्त्यावर वाढलेला सराईत पाकीटमार. निहाल सिंग (कुमार गौरव) याचाही काही आगापिछा नाही. या सगळ्यांना एका धाग्यात गुंफून घेत ती गॅरीची (जावेद जाफ्री) बडबडी बहीण टिन्नी (शगुफ्ता अली). झोपडपट्टय़ांमध्ये, उपनगरांच्या बैठय़ा चाळींमध्ये पसरलेल्या मुंबईच्या कॉस्मोपोलिटन बकालीचे हे प्रतिनिधी. मुळातले मित्र तिघेच. गंगू, गॅरी आणि निहाल. यथातथाच शिक्षण, आसपासचं भयाण वातावरण, बेकारी यामुळं अस्वस्थ. गंगूला सनमचं (जुही चावला) प्रेम जिंकून तिच्यासाठी, आईसाठी छोटंसं घर बनवायचंय. गॅरीला मायकल जॅक्सनसारखा निष्णात नर्तक- गायक बनायचंय आणि निहालला दिव्याबरोबर (एकता) लग्न करून संसार थाटायचाय. त्यांची कष्टाची तयारी आहे, पण संधी नाही, मार्ग नाही.
अपघातानंच या त्रिकुटात शिरलेला अब्दुल त्यांना मार्ग दाखवतो, तो थोडय़ा श्रमात पैसा कमावण्याचा... अर्थातच बेईमानीचा. त्यातून त्यांना पैशाबरोबर `भाई' लोकांना मिळणारा मानमरातबही मिळू लागतो. त्यांच्या उत्कर्षाबरोबर दगडू काण्या (गुलशन ग्रोव्हर) या प्रस्थापित गुंडाची वट कमी होते. गँगला त्याच्याशी पंगा घ्यावाच लागतो. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायानं चौघे लाला खान (मुकेश खन्ना) या `सरळमार्गी' डॉनच्या आश्रयाला जातात. मांडवळी करून देण्याच्या लालाच्या व्यवसायातून या चौघांची फारशी बरकत होत नसल्यानं ते ड्रग्ज, वेश्याव्यवसाय वगैरे `गैर'धंदे करणाऱया भय्याजीच्या (इम्तियाज खान) पदरी रुजू होतात. दरम्यान, अपमानाचा बदला घेण्यासाठी दगडू टिन्नीची हत्या घडवतो. लाडक्या बहिणीच्या मृत्यूनं पिसाटलेली गँग दगडूवर हल्लाबोल करते. त्यात गँगच्या या वाईटातून अधिक वाईटाकडे सुरू असलेल्या, प्रवासाला सतत हरकत घेणारा- दोस्तीपायी फरपटणारा- गंगूच गजाआड होतो.
पाच वर्षांनंतर तो तुरूंगातून बाहेर येतो, तेव्हा त्याच्या मित्रांचा नक्षाच पालटलेला असतो. बंगला, गाडय़ा, बक्कळ पैसा अशी चांदीच झालेली असते गँगची. ही सर्व कमाई सफेद असल्याचं सफेद झूठ फार काळ टिकत नाही. आपल्या मित्रांनी भय्याजीशी हातमिळवणी करून ही माया जोडली आहे, हे गंगूला कळतं, तेव्हा तो अलग होतो. उरलेल्या तिघांचंही `कामा'तून मन उडतं. ते या जाळ्यातून सुटू पाहतात. पण, तोवर फार उशीर झालेला असतो. गँगच्या दुश्मनांबरोबरच गँगचाही सर्वनाश अटळ असतो.
आजच्या प्रेक्षकाला फारशा नव्या नसलेल्या या कथानकात मजहर खाननं कथा- पटकथाकार शमशेर खान बलूच आणि संवादलेखक मुश्ताक मर्चंट, एम.एम.फारुकी (लिलिपुट) यांच्या साथीनं पूर्वार्धात बरीच धमाल उडवली आहे. गंगूची सनमला `पटवण्या'ची अजब स्टाईल, त्याची अब्दुलशी अपघाती भेट, गँगकडून हप्ता वसूल करणारा बेरकी हवालदार (टिनू आनंद), त्याला गँगनं शिकवलेला धडा, गँगची पहिली कामगिरी या प्रसंगाची विक्षिप्त विनोदी ढंगानं केलेली हाताळणी मजा आणते. उत्तरार्धात आसपास ही कथा (आता) नेहमीच्या (झालेल्या) वळणावर जाते आणि क्लायमॅक्सला गोळीबाराच्या `बँग बँग'मध्ये हरवते. तरीही मजहरचं कसब तिला किमान प्रेक्षणीय बनवतं.
त्यानं कलादिग्दर्शक बिजॉन दासगुप्ता यांच्या साह्यानं झोपडपट्टया, पडक्या हवेल्या, उजाड परिसर, तरतऱहेचे छोटे कारखाने यांतून पसरलेली, गटारांच्या वासाची विद्रुप मुंबई धुंडाळून काढली आहे. छायालेखक नदीम खान यांनी श्वास रोखून धरायला लावील, अशा वास्तवाभासी शैलीत मुंबईचं हे रक्तपिपासू रुप टिपलंय. बंदिस्त चित्रणात- विशेषत: भय्याजीचा समावेश असलेल्या दृश्यांत- त्यांनी काळोखच काळोख पसरवून काळीज गोठवून टाकणारा अनुभव दिलाय. गँगच्या वरपांगी श्रीमंतीमधला भकासपणाही दृश्यरुपातून जाणवावा, ही नदीम खान यांची कमाल आहे.
सर्व प्रमुख कलावंतांच्या उत्तम भावविष्कानं हा अनुभव गहिरा केला आहे. मैत्रीत फसलेला जॅकीचा गंगू, सडकछाप, व्यवहारी तत्वज्ञान मांडणारा, बाहेरून निबर आतून हळवा असा नानाचा अब्दुल आणि निहालच्या थंड, भावहीन चेहऱयामागचे उद्रेकही त्याच चेहऱयातून पोहोचवणारा कुमार गौरव यांनी अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. तुलनेतं कमी वाव असला, तरी जावेदचा गॅरीही संधी मिळेल तिथे बॅटिंग करून जातो. शगुफ्ता अलीनं टिन्नीची व्यक्तिरेखा मस्त खुलवली आहे. उषा नाडकर्णीची मराठमोळ्या ठसक्याची आईही फर्मास. त्यामानानं खलनायकांची गँग मात्र रुटीन छापाची आहे. मजहरच्या टेकिंगमुळे इम्तियाजचा भय्याजी सुरुवातीला थरकाप उडवतो. पण, नंतर मात्र काळोखाचा, `वियर्ड' क्लोजअप्सचा अतिरेक या व्यक्तिरेखेला ढासळवून टाकतो. जुही आणि एकता यांना वावच नाही. त्यातल्या त्यात एक-दोन प्रसंगांमध्ये एकता `अभिनेत्री' पण सिद्ध करायची संधी साधते.
अनू मलिकनं `छन छन मेरी पायल बोले' हे पैसावसूल ठेक्याचं गाणं दिलंय. अहमद खाननं केलेल्या आजच्या काळाशी सुसंगत वेगवान नृत्यदिग्दर्शनामुळं कथानकात घुसवलेलं हे गाणं उपरं वाटत नाही. गँगच्या मानसिकतेला चपखल शब्दकळा देणाऱया `मै जो हूँ, मैं वो हूँ' मधली `इट्स माय लाईफ'ची आठवण करून देणारी गुर्मी मस्तच. रवी दिवाण यांची ऍक्शन, अफाक हुसेन यांचं संकलन यांचाही `गँग'च्या परिणामात वाटा आहे. संदीप चौटाच्या पार्श्वसंगीतानं सिनेमा बांधून घेतला असला, तरी त्यावर `सत्या'ची मोठी छाप आहे. प्रसंगाच्या रसपरिपोषाचं निहितकर्तव्य सोडून अनेकदा तो स्वतंत्र संगीतरचना ऐकवण्याचा हव्यास करतो, ते प्रसंगांना मारक ठरतं. शिवाय पार्श्वसंगीत काही ठिकाणी अनावश्यक आणि सर्व सिनेमाभर लाऊड झालंय.
`गँग' पाहिल्यावर या सिनेमाबरोबरच प्रेक्षकही अभागी असल्याची जाणीव होते. सिनेमाची भाषा अवगत असलेला एक जबरदस्त दिग्दर्शक पहिल्या सिनेमाच्या प्रदर्शनाआधीच काळाच्या पडद्याआड गेला, याची चुटपूट लागून राहते.

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment