Thursday, March 17, 2011

मराठी में बनेला पयलाच ऍक्शन फिलिम (षंढयुग)


कॉलेजमध्ये परीक्षा सुरू असताना कॉपी पकडणाऱया परीक्षिकेला गुंड विद्यार्थी चाकू दाखवतो.
कॉलेजमधल्या निवडणुकीच्या वेळी बाहेरच्या गुंडाच्या मदतीनं मवाली मुलं गोंधळ घालतात. मारामारीत एकाला भोसकून ठार मारलं जातं.
शरण आलेल्या माफिया डॉनला भ्रष्ट पोलिस अधिकारी खोटी चकमक घडवून ठार मरतो.
प्रामाणिक नायक भ्रष्ट वकिलाला न्यायालयाच्या आवारात पेटवून देतो.
धनिक पुंडाच्या भाडोत्री दादाला नायक जहाजचा नांगर खुपसून ठार मारतो.
पैशाच्या-ताकदीच्या कैफानं पोळासारखा उन्मत्त झालेल्या गुंड पोराला नायक गुडघ्यात गोळय़ा मारून कायमचा अपंग करून टाकतो.
भ्रष्ट पोलिस अधिकाऱयाच्या जाहीर सत्कारातच नायक त्याला गोळय़ा घालून ठार मारतो. सत्कारस्थळाच्या आवारात खलनायकाला कुत्र्यासारखं झोडणाऱया नायकाला पोलिस धरून पकडून ठेवतात तेव्हा नायक त्याला एकच अशी लाथ घालतो, की खलयनायक थेट शिवाजी महाराजांच्या पुतळय़ावर भिरकावला जातो. महाराजांच्या पुतळय़ाची तलवार त्याच्या पाठीपोटातून आरपार घुसते आणि त्याचा `वध' होतो.
अनिल काकडे निर्मित- दिग्दर्शित `षंढयुग'मध्ये हे प्रसंग मराठी भाषेत घडतात, एवढंच काय ते वेगळेपण. बाकी सगळा जामनिमा हिंदी सिनेमाचाच आहे.
याचा अर्थ मराठीत कॉलेजं नाहीत, गुंड विद्यार्थी नाहीत, ती मारामाऱया करीत नाहीत, मराठी आणसांना कुणी खलनायक छतळत नाही, असा बिलकुल नाही. आपल्या महाराष्ट्रात- मुंबईत असा हिंसाचार खूप होतो. त्यावर मराठी सिनेमा काढण्याची कल्पनाही निश्चितच वेगळी आहे. त्यामुळे, मराठीतला पहिला खराखुरा `ऍक्शनपट' काढल्याचं श्रेयही निर्विवादपणे काकडेंना द्यायला हवं; पण `षंढयुग' पाहून बाहेर पडताना मराठी सिनेमा पाहून बाहेर पडल्यासारखं वाटत नाही, याचं काय?
काकडेंनी ऍक्शनपट काढण्यासाठी निवडलेलं कथानक हिंदीतल्या कोणत्याही ऍक्शनपटापेक्षा तसूभरही वेगळं नी. कॉलेजच्या राजकारणात ओढला गेलेला सालस तरुण मारामारी- रक्तपाताला सतत विरोध करतो. त्याच जिवलग मित्र त्याच्या डोळय़ादेखत गुंड मुलाकडून मारला जाते; पण या गुंडाचा उद्योगपती बापत काळय़ा साम्राज्याचा शहेनशहा, तो धाकपटशाच्या मार्गानं साक्षीदारांवर दहशत बसवून आपल्या मुलाची निर्दोष मुक्तता करवून घेतो. अन्यायाच्या या अतिरेकानं उद्ध्वस्त झालेला नायक मग एका उमद्या मनाच्या माफिया डॉनच्या मदतीनं सर्व खलनायकांचा क्रमाक्रमानं नि:पात करतो.
सनी देओल, सुनील शेट्टी, अजय देवगण, अक्षयकुमार वगैरे हिंदीतल्या ऍक्शनवीरांच्या सिनेमांमध्ये यापेक्षा वेगळं काय घडतं? `सुबह', `चुनौती', `कॅम्पस' वगैरे टीव्ही मालिकांमध्ये हेच पाहात आलोय आपण.
`षंढयुग'मध्ये तेच घडतं यापेक्षा ते तशाच पद्धतीनं घडतं, हे अधिक खेदजनक आहे. पात्रं मराठीत बोलतात म्हणून हा सिनेमा मराठी म्हणायचा तर हिंदीत डब केलेल्या `जुरासिक पार्क'ला हिंदी सिनेमा म्हणावं लागेल.
मराठी भाषिक प्रेत्रकाला मराठी सिनेमाकडून हवा असतो तो मराठीपणा. समोर जे घडतंय ते मराठी मातीत घडतंय, हे पटवून देण्यात `षंढयुग'चे कथा- पटकथा- संवादकार रमेश कोकणी कमी पडले आहेत. तयाची पात्रं `वर्दी', `कफन',`गुंडागर्दी' अशा हिंदी शब्दांचा, हिंदी वळणाच्या मराठी वाक्यरचनांचा भरणा असलेलं कमालीचं अलंकारिक मराठी बोलतात. पण हिंसाचारची मराठी भाषा ही आहे का?
आपल्या आसपास (मराठी) घडलेली साधी धक्काबुक्की किंवा किरकोळ मारामारी आठवून पाहा. शारीरिक हिंसेबरोबरच `', `', `'च्या बारखडीतल्या अपशब्दांमधून घडणाऱया शाब्दिक हिंसेला त्यात प्रचंड महत्त्व असतं. आता सिनेमामध्ये शिव्या द्यायच्याच पूर्ण बंदी. मग हिंसेमध्ये `फोर्स' कुठून येणार? हिंदीतही वास्तवात अशा प्रसंगी अपशब्दांचा मारा होतो; पण, हिंदी सिनेमांनी सिनेमातल्या हिंसेची शिव्याविरहित परिभाषा (कुत्ते, कमीने, सुअरकी औलाद, मै तेरा खून पी जाऊंगा वगैरे.) गेल्या अनेक वर्षात विकसित केली आहे. ती वर्षानुवर्षे ऐकून प्रेक्षकांच्या पचनी पडली आहे. रूढ झाली आहे. त्यामुळे, तिथे हिंसक प्रसंगांची परिणामकारकता उणावत नाही.
मराठी मात्र पहिलाच ऍक्शनपट असण्याचा तोटा `षंढयुग' ला झाला आहे. ही हिंसा पाहताना हिंदी सिनेमाच पाहतो आहोत, असं प्रेक्षकाला वाटत राहतं; कारण ऍक्शनदृश्यंही हिंदीतल्यासारखीच. (ती वेगळी कशी करणार, असा पश्न पडलेल्यांनी `विरासत'मधलं दक्षिणी च असलेलं लाठय़ाकाठय़ांचं ऍक्शनदृश्य आठवून पाहावं.) इतकंच नाही, तर दिग्दर्शनाची संपूर्ण शैलीच अतिपरिचित हिंदी घाटणीची आहे.
गुंडांचा उघडय़ा जीपमधून फिरणारा ताफा, ती जीप रस्त्यावरून भरधाव वेगानं येत असताना वाटेत मडकेवाल्याच्या हातगाडीचा चक्काचूर होणं, संतप्त खलनायकानं पुढय़ातलं ताट भिकावून देणं, गरगर फिरणाऱया पंख्याखाली घरातले दिवे घालवून विमनस्क बसलेला प्रामाणिक पोलिस इन्स्पेक्टर, पोलिस काठेडीत आरोपीकडून गुन्हा वदवून घेण्याचा कार्यक्रम सुरू असताना स्वयंपेरणेने हलणारी बल्बची लॅपशेड, गुंडांनी भोसकलेला जमखी मित्र मरणाच्या दारात पडला असताना मदतीसाठी आक्रोश करणारा नायक (टॉप अँगलही तसाच), निर्जन स्थळी समोरासमोर गाडय़ा आणून त्यांच्या हेडलाईस्च्या प्रकाशात होणारी माफिया गुंडांची भेट, रागानं घुसमटणाऱया खलनायकानं घरातल्या बारवर गोळीबार करून दारूच्या बाटल्या फोडणं, सिग्रेटचा चटका देऊन टेबलावरच्या मुंगळय़ाला ठार मारणं, चार-दहा पेलिसांनाही न आवरणारा `क्लायमॅक्स'मधला नायक... ही दृश्यं (खरंतर `प्रतिमा'' डोळय़ांपुढे आल्या तेव्हा त्यात प्रतिकात्मक, कलात्मक सौंदर्य होतं; पण पुढे अतिवापरानं या प्रतिमा घासून-घासून गुळगुळीत झालेल्या आहेत.
त्यांना जेड आहे कोकणींच्या अलंकारप्रचुर जडजंबाळ भाषेची. नायिका नायकाला विचारते `कुठे निघालास?' तो `अमक्याचा मुडदा पाडायला', असं सरळ उत्तर देत नाही. तो एम.एल.ला सब्जेक्ट मराठी घेतल्यासारखा `अंध:काराचं साम्राज्य संपवायला. सत्याच्या सूर्यावरचं झाकोळ दूर करायला', असलं काव्यमय उत्तर देतो. अन्यायाचा अंधार, सत्याचा सूर्य, हिजडय़ांचं युग, शिखंडी झालेला न्याय, अत्याचारी शेषनाग वगैरे उपमा, उत्प्रेक्षा, प्रतिमा, रूपकांची भाषा `षंढयुग'ला पार `बोल'पट करून टाकते. ऍक्शनपटाला तर हे फारच मारक. त्यात आपल्या विलक्षण शब्दबंबाळ संवादांच्या प्रेमात पडलेला पकथाकार पुढच्या प्रसंगात कुठल्या ना कुठल्या पात्राला ते संवाद आठवायला लावून त्याच्या मनात (आणि प्रेक्षकांच्या कानात) घुमवत ठेवतो.
भाषेचा वांधा कमी करण्यासाठी की काय, बाबू पठाण (कै. यशवंत दत्त) या (`जंजीर' स्टाईल) दिलेर गुंडाच्या हिंदीभाषिक पात्राची नेमणूक आहे. गंमत म्हणजे, या मराठी सिनेमात प्रेक्षकांची दाद वसूल करतात ते बाबू पठाणचे हिंदी संवाद.
अजिंक्य देव, यशवंत दत्त, अशोक शिंदे आणि मोहन जोशी यांचा उत्तम अभिनय ही `षंढयुग'ची जमेची बाजू, अजिंक्य `ऍक्शन हीरो'च्या भूमिकेत साजून दिसला आहे आणि भावनिक दृश्यांमध्ये संयत अभिनय करून त्यानं ही भूमिका आक्रस्ताळी होऊ दिलेली नाही. यशवंत दत्त यांनी पठाणाच्या भूमिकेची शारीरभाषा अचूक पकडली आहे. मोहन जोशींनी खलनायकाची हातखंडा भूमिका टेचात साकारली आहे. अशोक शिंदेनं राजा निकमचा मस्तवालपणा सुरेख दाखवलाय. नायिका निशिगंधा वाडला फारसा वाव नाही. कुलदीप पवारांचा प्रामाणिक इन्स्पेक्टर नाटकी आरडाओरडा करतो. भ्रष्ट वकिलाच्या भूमिकेत टेक्सास गाडकवाड यांच्या चेहऱयावर संवादआधी `एक्स्प्रेशन येतं. स्नायूंच्या चमत्कारिक हालचालीमधून आधी चेहरा `बोलतो' मग संवात फुटतात. या विलक्षण अभिनयशैलीतून एरवी सिनेमात औषधालाही नसलेल्या हास्यरसाचा अनपेक्षित परिपोष होतो.
अनिल काकडे हे सहाय्यकपदाचा धडा गिरवून दिग्दर्शक झालेले असल्याने सिनेमाची तांत्रिक भाषा त्यांना उत्तम समजते. पहिल्याच निर्मितीत कथानकात वाव नाही म्हणून विनोद आणि गाणी टाळण्याचं धाष्टय़ंही त्यांनी दाखवलंय. चारुदत्त दुखंडे यांचं छायालेखन, . जब्बार यांची साहसदृश्य आणि एम.एस.शिंद यांच्या संकलनानं `षढयुग'ला ऍक्शनपटाचा `लुक' दिला आहे. सिनेमाचं `तंत्र' अवगत असलेल्या काकडे यांच्या टीमला मराठी सिनेमाचा `मंत्र'ही गवसला, तर मराठीत उत्तम दर्जाची कलाकृती ही टीम देऊ शकेल, एवढा विश्वास `षंढयुग' देऊन जातो.

No comments:

Post a Comment