Saturday, March 5, 2011

`स्व'च्या शोधात सिनेमाचा `देस'


गावखात्यातच जमा होणाऱया एका शहरातलं थिएटर... `थेटर' म्हणण्याजोगं... 15 रुपयांपासून तिकीट, 35 रुपयांचा व्हीआयपी क्लास!... एसी नाही; पंखे आहेत, पण स्थितप्रज्ञ अवस्थेतले... अशा ठिकाणी जमतो तो मल्टिप्लेक्सवाला `ऑडियन्स' नसतो... हे असतं पब्लिक... `आम पब्लिक'; त्यात कॉलेजला बुट्टी मारून आलेल्या तरुण तरुणींचा भरणा अधिक...
सिनेमा सुरू होतो... पाश्चात्यपटांच्या भ्रष्ट नकला, रिमिक्स ऑडिओ- व्हिडिओ, फडकती झटकेबाज गाणी, आक्रस्ताळी मालिका यांच्या `फास्ट फुड'वर पोसलेल्या आजच्या तरुणांच्या रुचीला (तिला `अभिरुची' म्हणणं कठीण) मानवणार नाही इतक्या संथगतीत, तब्येतीत, डिटेलवार पुढे सरकणारा सिनेमा... ही तर पैशे मोजून मनोरंजन वट्टात विकत घ्यायला आलेल्या पब्लिकचं डोकं आउट करण्याचीच लाइन... आता पब्लिक पिक्चरला `हूटआउट' करणार, शाहरूखच्या, आशुतोषच्या मातुल- पितुल घराण्यांचा उद्धार होणार, पडद्यावर काहीतरी फेकलं जाणार, किमान इंटव्हलच्या आत निम्मं थिएटर रिकामं होणार, हे तर नक्की!...
...पण, सिनेमाभर तसं काहीच घडत नाही... इंटरव्हलनंतर एकदा थेटरातलीच लाइट जाते तेव्हा, `अरे, मोहन को बुलाव', `जनरेटर शुरू करो', `नहीं, उसमे बीस मिनट लगेगा' अशा सिनेमाच्या कथानकावर आधारित कॉमेंट्सनी थिएटर दणाणते... पण, तेवढंच! सिनेमा सुरू असताना एकही टवाळ कॉमेंट होत नाही, पचायला अवघडातलं अवघड असं दृश्यही पब्लिक `पिनड्रॉप सायलेन्स'मध्ये पाहतं... सिनेमाबद्दल जे काही मत होतं, ते संपूर्ण सिनेमा पाहूनच व्यक्त केलं जातं...
हा चमत्कार आहे...
...हे किती अद्भुत आहे, ते ज्यांनी `फर्स्ट डे फर्स्ट शो'ला एखादा सिनेमा `पडताना' पाहिला असेल, त्यांनाच समजू शकेल. भारतीय पब्लिकसोबत, त्यांना न भावणारा सिनेमा पाहताना कायकाय भोगावं- ऐकावं लागतं, याचा धन्य धन्य वाटवणारा अनुभव ज्याला असेल, तो आशुतोष गोवारीकरला कडक सलाम ठोकेल...
आणि आशुतोष आज अशा अनेक सलामांच्या मानवंदनेचा मानकरी आहे...
...एका प्रचंड यशानंतर ते कॅश करून सात पिढय़ांची सोय लावण्याचा शॉर्टकट न स्वीकारता त्यानं, प्रसंगी त्याला खड्डय़ात घालेल असा बिकट मार्ग निवडलाय. आपल्या सिनेमातून जे तो सांगू पाहतोय, तेच त्यानं हा सिनेमा काढून आधी स्वत:करून दाखवलंय...  
त्याचा `स्वदेस' हा `लगान' नाही... ही तर त्यापुढची पायरी आहे, त्यापलीकडचा धोका आहे. `लगान'चा सर्व वेगळेपणा गृहीत धरूनही गाभ्यात तो एक फॉर्म्युलापट होता... हमखास यशाच्या सर्व क्लृप्त्या यशस्वीपणे राबवणारा... तसा `स्वदेस'मध्येही, हिंदी सिनेमातच सापडावा असा अतिसंवदेनशील, अतिभावुक, अतिआदर्शवादी `हीरो' आहे, एक प्रेमकहाणी आहे, ऑल्मोस्ट फिल्मी गाव आहे. सुरचित `मॉब सीन्स'मधून उभे केलेले गावकरी आहेत, गावाचा एक ढोबळ प्रश्न आहे आणि त्याची चुटकीसरशी सोडवणूकही आहे... पण, तरीही `स्वदेस'मध्ये व्यावसायिक हिंदी सिनेमाच्या पडद्यावर अननुभूत असं काहीतरी आहे... त्याचा आव व्यावसायिकतेची चौकट मोडून क्रांती घडवण्याचा नाही... (तसं करणाऱया सिनेमावर `आर्ट फिल्म'चा शिक्का बसतो आणि त्याचा `ऑडियन्स' मर्यादित होतो; कारण, `पब्लिक' तिकडे ढुंकूनही पाहात नाही)... `स्वदेस'चा क्रांतीपेक्षा उत्क्रांतीवर अधिक विश्वास आहे... आणि म्हणूनच व्यावसायिक हिंदी सिनेमाच्या उत्क्रांतीतला तो एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे...
या उत्क्रांतीची पूर्वपीठीका अस्वस्थ करणारी आहे. `मी, माझा, माझ्यापुरता' अशा घातक व्यक्तिवादाचा झंझावात या देशाची सगळी सांस्कृतिक पाळंमुळे हादरवत असताना संस्कृतीचे होलसेल ठेकदार, इतक्या खोलातला विचार करण्याचीच सवयच नसल्यानं सगळ्या समाजाला प्रतीकवादी फालतूपणात आणि बुवाबाजीधार्जिण्या बंडल अध्यात्माच्या गर्तेत नेऊन लोटताहेत...
ग्लासातल्या पिण्याच्या पाण्याच्या थेंबाचाही अपव्यय न करणारा महात्मा इथला राष्ट्रपिता आहे आणि इथली माणसं उसासारखा राक्षस पोसण्यासाठी धरतीचं काळीज फोडून आपल्याच पुढच्या पिढय़ांमधल्या `वॉटर वॉर'ची पायाभरणी करताहेत? सर्वाच्या वापराची लॅण्डलाइन कशाला? प्रत्येकानं स्वतंत्र मोबाइल बाळगा; सर्वांसाठी एक टीव्ही हॉलमध्ये, शिवाय प्रत्येकाच्या बेडरुममध्ये वेगळा टीव्ही... रोज नवी वस्तू वापरा, वापरा आणि फेका, आसपास पाहू नका, स्वत:चा आणि फक्त स्वत:चाच विचार करा, खा प्या, नाचा, गा, धम्माल करा...  
आता हा चंगळवादी व्यक्तिवाद बरा की वाईट, याची चर्चा जाऊद्या; मुळात ही अगदी एखाद्या देशाच्या भौतिक प्रगतीची निशाणी मानली, तरी इतकी चंगळ करण्याइतका हा देश सर्वागीण प्रगत झाला आहे? की काही मोजकी माणसंच प्रगत, समृद्ध झाली आहेत आणि तीच उर्वरित देशाची लक्तरं कुणाच्या नजरेला पडू नयेत म्हणून ही वरवरची भरजरी कलाकुसर करताहेत?
इथल्या दबलेल्या वर्गालाही स्वत:चाच हुंदका ऐकू नये इतके सर्व माध्यमांतून `खा प्या, मजा करा, नाचा' चे ढोल पिटले जात आहेत? एक माणूस येनकेनप्रकारेण प्रगत, समृद्ध झाला की सगळा देश एका माणसानं प्रगत, समृद्ध झालाच, हे कावेबाज गणित यशाचं मान्यताप्राप्त समीकरण होत चाललंय. तो इसम स्वत:च्या पात्रतेच्या बळावर समृद्ध झाला की, त्यानं आसपासच्या अनेकांची समृद्धीची शक्यता हिरावून घेऊन स्वत:चं उखळ पांढरं केलं, याचं मोजमाप आपण कधी करणार?
...हे सगळे प्रश्न `स्वदेस' निरपेक्ष आणि चिरंतन आहेत. `स्वदेस'चं महत्त्व असं की त्यानं, असे प्रश्न पडणं हेच मुळात मनोरुग्णतेचं लक्षण ठरत असलेल्या काळात हे प्रश्न उभे करण्याचं धाडस दाखवलं आहे. एकीकडे परंपरा आणि संस्कारांच्या नावाखाली तमाम बुरसटलेल्या विचारांच्या दामटणीसाठी() एकवटणारा `देस' आणि दुसरीकडे यशाची शिखरं काबीज करूनही `स्व'च्या पलीकडे काहीच न पाहणारा यशस्वी माणूस यांची ही गोष्ट आहे. ती कोणताही कृतक नाटय़मय आवाहनबाजपणा न करता पाहणाऱया प्रत्येकाची गोष्ट होऊन जाते... 
कारण या देशातला प्रत्येकजण या चिरफाळलेल्या `स्व'देसचा हिस्सा आहे... आणि या दोघांना एकमेकांशी जोडून घेण्याचा सर्वात उत्तम असा मध्यममार्ग `स्वदेस' दाखवतो आहे. या मातीत जन्मून मोठा झालेल्या प्रत्येक यशस्वी माणसानं आपल्यापुरता विचार करण्याची सवय सोडून आसपास पाहावं... चंगळींच्या झगमगाटी बॅनरांपलीकडे पसरलेलं खूप खोल अंधाराचं साम्राज्य त्याचे डोळे उघडेल. मग, त्यात एखादा दिवा, एखादी पणती आपण लावू शकतो का, याचा विचार करावा. आणि मुख्य म्हणजे, तात्काळ तशी कृती करावी, एवढा साधा संदेस आहे या साध्या सिनेमाचा.
पण, त्याचं साधं असणं आज अनेकांसाठी अतिशय अवघड झालंय. व्यावसायिक फॉरमॅटचेच काही घटक आणि चक्क इथला सुपस्टार यांचा सुबुद्ध वापर करून खऱया ग्रामीण भारताचं, तिथल्या उघडय़ावाघडय़ा दारिद्रयाचं दर्शन घडवणारा हा सिनेमा चुकून उचलला गेलाच, तर मग, टय़ुलिपच्या परदेशी बागा, सरसों के एतद्देशीय खेत, एनआरआयांच्या दूरस्थ देशप्रेमाचे भाबडे उमाळे, पाकिस्तानद्वेष यांच्या दावणीला बांधून अनादिअनंतकाळ देशभक्ती दोहणाऱयांची दुकानं बंद होतील. म्हणूनच इंडस्ट्रीतल्या काही विकाऊ तज्ञांनी रिलीजच्या संध्याकाळी (दुसरा शो पूर्ण होण्याच्याही आधी) `पडला रे पडला'च्या जाहीर हाकाटय़ा पिटून स्वत:चं हसं करून घेतलंय
`स्वदेस' हा मुळातच `लगान'सारखा धो धो चालणारा सिनेमा नाही, त्याच्या `यशा'चे मापदंड वेगळे असायला हवेत, हे लक्षात न घेता त्याच्या यशापयशाची चुकीची गणितं मांडून दाखवण्याचा खेळही एका लॉबीनं जोरात सुरू केला आहे...
...म्हणूनच आता आपण, `वुई द पीपल', `हम लोग' काय ठरवतात, ते महत्त्वाचं आहे. तिन्हीत्रिकाळ `सरसों दा साग, मक्के दी रोटी आणि गाजर का हलवा' खाऊन बद्धकोष्ठित झालेल्या या देशातल्या सिनेमा `रसिका'च्या जाणिवांवर चढलेलं मांद्य झडवण्यासाठी `स्वदेस'रुपी मधुर चवीच्या, सौम्य रेचकाचा डोस घेणं अत्यावश्यक आहे, ते आपल्या `राष्ट्रीय प्रकृती'च्या हिताचं आहे...
यापुढचा `डोस' सौम्य असणार नाही... तो सिनेमातूनच मिळेल, अशी गॅरंटीही नाही...


(महाराष्ट्र टाइम्स)

4 comments:

  1. you wrote great reviews...
    please give me link of reviews of 2 movies..
    3 idiots and Rocksingh salesman of the year

    ReplyDelete
  2. Sir, This was the best. I have watched and still watching this movie again and again. This is one of the milestones in Hindi Cinema's journey. On television a lot of stupid movies are shown again and again, but this movie is very rarely telecasted. I don't know why? Do the masters of Hindi film industry are still afraid as they think this movie wll change SRK's image of loverboy on which they have invested 100s of crores? If yes, then this is one of the success of it.

    ReplyDelete
  3. उत्तम पुनरावलोकन आणि तंतोतंत न्याय देणार लेख

    ReplyDelete