गालिचावर
अस्ताव्यस्त पसरलेले मोठ्या आकाराचे फोटो..
त्या फोटोंच्या नैसर्गिक
कोलाजमधून भुरळ घालणारे चित्रपट कलावंतांचे चेहरे.. क्षणभरासाठी मुखवटा दूर
झाल्यासारखे.. निर्मळ.. त्या फोटोंच्या मध्यभागी गालिचावरच विराजमान एक
तरुण चित्रपट अभ्यासक, आस्वादक, लेखक.. ते फोटो पाहताना त्याच्या चेह-यावर काय भाव उमटतायत, हे सोफ्याकडेला उभं राहून अतिशय एकाग्रतेनं, मिष्कील
उत्सुकतेनं पाहणारे उत्सवमूर्ती गौतम राजाध्यक्ष.. फोटो पाहणा-या युवकाच्या चेह-यावर आपल्याला अपेक्षित भाव उमटला की त्यांचं खूष होणं.. तो विचारात पडला, तर यांचं चिंताक्रांत होणं आणि त्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं निगुतीनं व्यवस्थित, सांगोपांग, सविस्तर उत्तर देणं, असा मार्मिक प्रश्न सुचल्याबद्दल अपरंपार ओसंडून वाहणारं कौतुक व्यक्त करणं..
‘फेसेस’ या बहुचर्चित कॉफीटेबल बुकच्या पूर्वप्रसिद्धीवजा लेखाच्या निमित्ताने घडून आलेला परस्परकौतुकाचा सोहळा.
..ही गौतम राजाध्यक्षांची पहिली भेट होती यावर विश्वास न बसावा, असं हे दृश्य होतं.. तेही जेव्हा आपण गौतम राजाध्यक्षांबरोबर त्यांच्या घरात त्यांच्यासमोर बसलो आहोत, यावरही विश्वास बसणं कठीण होतं, त्या काळात.
गौतम राजाध्यक्ष ज्यांचे फोटो काढायचे त्यांना मोकळं कसं करायचे, याचा तो वस्तुपाठ होता. या माणसाला समोरच्या माणसाशी संवाद साधण्याची विलक्षण हातोटी होती.
‘तू बोलतोयस ते फार महत्त्वाचं आहे, ते मला मन लावून ऐकायचं आहे,’ अशी भावना ते समोरच्याच्या मनात इतक्या सहजगत्या निर्माण करायचे
आणि त्याला वात्सल्यपूर्ण भावमुद्रांची अशी काही चपखल जोड द्यायचे की समोरचा, आपलं वय काय, यांचं वय काय, आपली पात्रता किती, यांची थोरवी किती मोठी,
आपली यांची ओळख होऊन अवघी काही मिनिटं तरी झाली आहेत का, याचा विचार न करता भडाभडा बोलू लागायचा.. बिनधास्त. त्या सगळ्या गप्पाटप्पांमध्ये या काकांनी मनातल्या मनात (नटनट्यांच्या बाबतीत प्रत्यक्ष कॅमे-याने) किती फोटो टिपले असतील, याचा त्याला पत्ताही लागायचा नाही.
समोरच्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची निगेटिव्ह गौतमच्या मनात काही क्षणांत उमटून जायची, पण आश्चर्य म्हणजे तिच्यात त्या माणसातलं निगेटिव्ह काही कधी उमटायचंच नाही.. ‘प्रसिद्धी’साठी फोटो काढण्याच्या सरावामुळे असेल कदाचित,
पण गौतमनी काढलेल्या सर्व प्रकारच्या फोटोंमध्ये माणसांच्या अनगार्डेड मोमेंट्स आहेत ख-या; पण, आतल्या गाठी दिसत नाहीत.. त्यांचं कोवळं, निरागस माणूसपणच झगझगीतपणे समोर येतं..
हेही सहज-‘स्वाभाविक’च होतं म्हणा! जगण्याच्या प्रत्येक क्षणाचा छानसा उत्सव करून तो मस्त मजेत समरसून साजरा करणारा
गौतमसारखा स्नेहाळ, रसाळ, ममताळू माणूस इतरांमधला मरतुकडा ‘क्षुद्र जंतू’पणा कशाला टिपत बसेल कावळ्यासारखा?
..‘फेसेस’च्या
निमित्तानं झालेली भेट उभयपक्षी आनंददायी ठरलीआणि मग फोनवर गप्पांचा सिलसिला सुरू झाला. त्यातून एवढी भीड चेपली की तत्कालीन कार्यालयातल्या एका होतकरू मॉडेल युवकाला थेट गौतम राजाध्यक्षांच्या चरणी नेऊन घालण्याचं डेअरिंग अंगात आलं..
..हा अगोचरपणाच होता..
तो मॉडेल बनू पाहणारा मुलगा आपण साक्षात गौतम राजाध्यक्षांना भेटतो आहोत, या कल्पनेनं गार पडला होता.. गौतमना पाहताना ‘विठुमाऊली तू दीनांची साऊली’ असा श्रीविठ्ठलदर्शनप्राप्त वारक-याला साजेसा भाव त्याच्या चेह-यावर होता.. गौतमनी त्याला शांतपणे न्याहाळून, चालायला-बिलायला लावून सांगितलं काय
की ‘बेटा, तू काही मॉडेल बनू शकणार नाहीस..’ पण हे सांगितलं कसं, तर उपरोल्लेखित वाक्य बिलकुल न उच्चारता. ‘अरे, मला वाटलं होतं हा कुणाला घेऊन येतो? तू तर छान देखणा आहेस.. आइल टेल यू, यू हॅव गॉट द फेस (‘द’वर जोर)..
फक्त उंचीचा थोडा प्रश्न आहे, हल्ली लीन अँड लँकी मॉडेल्सची चलती आहे.. देव जाणे लोक काय बघतात त्या हडकुळ्यांमध्ये.. अं.. वजन मात्र तुला कमी करावंच लागणार.. एक्सरसाइझ करायला सुरुवात कर.. डाएट स्ट्रिक्ट.. एका महिन्यात मला अमुक इतकं वजन घटवून भेटलं पाहिजेस..
मग आपण मस्त फोटोसेशन करू.. मराठी मुलांनी आलं पाहिजे पुढे..’’ पत्रकारितेच्या अनियमित जीवनशैलीत पिचलेला तो युवक ही सगळी पथ्यं पाळून गौतमनी सांगितलेल्या ‘स्पेसिफिकेशन्स’चा होणं अशक्य होतं.. त्यामुळे मॉडेलिंगचं जग एका उत्कृष्ट मॉडेलला मुकणार, हेही स्पष्ट होतं.. झालंही तसंच.
पण, त्यापेक्षाही वेगळं आणि सुखदाआश्चर्यकारक असंही काही झालं.. त्या मुलाच्या डोक्यातलं मॉडेलिंगचं खूळ यथावकाश निघून गेलं, तरी गौतमशी त्याचा संवाद कायम राहिला, त्याच्यासाठी गौतम हे कायमच फादर फिगर, फ्रेण्ड फिलॉसॉफर गाइड होऊन राहिले.. पोर्टफोलिओ काढण्यासाठी आलेल्या कितीजणांना ‘कटवण्याचं’ काम गौतमना करावं लागलं असेल..
..फोटोमध्ये कॅमे-याच्या समोरचा माणूस दिसतो.. म्हणजे बहुतेक वेळा त्याने ठरवलेली पोझ दिसते, मुखवटा दिसतो.. आनंदी, विचारात बुडालेला, गंभीर, नुसताच देखणा वगैरे वगैरे.. क्वचित कधी मुखवटा दूर होऊन आतला माणूस दिसतो.. हे मुरब्बी फोटोग्राफरांच्या फोटोंमध्ये दिसतं..
पण, याच फोटोतून कॅमे-यासमोरच्या माणसाप्रमाणेच कॅमे-याच्या मागचा माणूसही लख्खपणे दिसणं हा चमत्कार झाला..
..गौतमच्या फोटोंमध्ये हा चमत्कार फांदीवर पक्षी बसावा इतक्या सहजतेनं घडायचा, तो उगाच नव्हे.
(प्रहार, १७ सप्टेंबर २०११)
No comments:
Post a Comment