Tuesday, March 8, 2011

महाराज!


असं होण्याआधी ही लेखणी का नाही झडली? जी लेखणी दिवसरात्र एक करून टीव्हीवरच्या सगळ्या मालिकांवर बाल वॉशिंग्टनच्या कु-हाडीप्रमाणे तुटून पडत होती, तिच्यावर हा प्रसंग ओढवावा! त्याच लेखणीने चक्क एका मालिकेचं कौतुक करण्याची वेळ यावी! हा हन्त हन्त...

पण, इलाज नाही. या सुधारकी मालिकेची कामगिरीच तशी लक्षणीय आणि धाडसी आहे.

सध्या टीव्हीवर 'अंधश्रद्धेचा सुकाळू' झालेला आहे... कुठे दिवसरात्र कुणा स्वयंसिद्ध बुवा-बापू-महाराजांची किंवा तुपकट अम्मा-योगिनींची अगम्य आध्यात्मिक प्रवचनं सुरू आहेत. कुठे भल्या सकाळी 'पायजेल त्या देवाच्या' काकडारतीचं लाइव्ह दर्शन सुरू आहे. कुठे रोज सकाळी 'आजचा दिवस कसा जाईल', याचं होरारत्नांकडून भविष्य सांगितलं जातं. कुठे टॅरो कार्डांची तीनपत्ती सुरू असते, तर कुठे कथित 'अंकज्योतिषी' राजरोस 'आकडे' लावत असतात. कुठे 'विज्ञान हे सज्ञान माणसाचं अज्ञान होऊ देऊ नये' असं म्हणत 'अज्ञान हेच विज्ञान' करून दाखवण्याचा खेळ 'हसत खेळत' सुरू असतो. बाकी अमक्या सणाला तमक्या देवाच्या मंदिरात लाखो भाविकांची कशी गदीर् उसळली, तमक्या उत्सवात कुणाच्या पुण्यपावन हातांनी कोणत्या मूतीर्वर कशाकशाचा अभिषेक झाला, वगैरे लाइव्ह 'बातम्या'ही सुरू असतातच. अशात अंधश्रद्धेवर कठोर प्रहार करणारी ही मालिका म्हणजे भांगेत तुळसच. गंमत म्हणजे समाजप्रबोधनपर मालिका असूनही ती लोकप्रिय आहे. (म्हणजे लोकांचं 'प्रबोधन' पुरेसं झालेलंच नाही की काय!)

काय आहे या मालिकेत?

ही एका सुखांना आवाहन करणाऱ्या कुटुंबाची कहाणी आहे. साहजिकच इथे सगळा दु:खाचा पसारा आहे. सतत सगळी माणसं कशाने ना कशाने दु:खी असतात. (इथे कास्टिंग करणाऱ्याचं कौतुक करायला हवं. सदैव रडव्याच दिसणाऱ्या बायका आणि वैतागलेले दिसणारे पुरुष त्यांनी वेचून निवडले आहेत.) या घरात सुख कसं येईल म्हणा. इथला कुटुंबप्रमुख सदैव एका आरामखुचीर्त बसून पुस्तकं तरी वाचीत असतो किंवा सतत कुठल्यातरी काल्पनिक महाराजांशी हवेतल्या हवेत बोलत असतो. र्कत्या पुरुषाची डॉक्टरी बंद पडते, तर लगेच त्याच्या बायकोवर दुसऱ्याच्या घरात लादी-भांडी करण्याची वेळ येते (आणि तुम्ही लेकाला एमबीबीएस करण्यासाठी रक्ताचं पाणी करताय ना!) मग तो डॉक्टर काय म्हणे किडनी रॅकेटमध्येच सहभागी व्हायचं ठरवतो... असे सतत या कुटुंबावर दु:खाचे पहाड कोसळत असतात आणि कुटुंबप्रमुख महाराजांना सांगत असतो, ''मला ठाऊक आहे महाराज. तुमचं लक्ष आहे महाराज. तुम्ही काही वाईट होऊ देणार नाही महाराज. अशीच तुमची कृपादृष्टी (?) ठेवा महाराज.''

आता उघड्या डोळ्यांनी तुम्ही ही मालिका पाहात असाल, तर तुम्ही त्यातून कोणता संदेश घ्याल?

कोणत्याही महाराजांवर भरवसा टाकण्याऐवजी स्वत: आरामखुचीर्तून उठावं आणि कामाला लागावं, हाच ना?

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment