शम्मी कपूरचे गाजलेले चित्रपट सांगा म्हटले तर अनेक सांगता येतील. त्याच्या गाजलेल्या भूमिका विचारल्या तर मात्र ‘प्रोफेसर’, ‘ब्रह्मचारी’, ‘तीसरी मंझिल’च्या पुढे अडखळायला होईल. साहजिक आहे. कोणत्याही भूमिकेच्या अंतरंगात शिरून त्या व्यक्तिरेखेचे अतिसूक्ष्म कंगोरे अभिनयातून दाखवण्याच्या फंदात शम्मी कपूर कधीही पडला नाही. कारण, वाट्टेल ते करून देखण्या, अहंमन्य, श्रीमंत, फटाकडय़ा आणि कोपिष्ट नायिकेच्या अंतरंगात शिरण्याची घाई त्याला असायची. भूमिकेच्या अंतरंगात शिरण्याची तर त्याला गरजच नव्हती. कारण, सर्व काळ तो ‘शम्मी कपूर’चीच भूमिका करत असायचा.
अर्थात, ही व्यक्तिरेखा सापडण्यासाठीही त्याला चार वर्षे वाया घालवावी लागली होती. वडील पृथ्वीराज कपूर आणि भाऊ राज कपूर असताना शम्मी कपूरचा ‘संजय कपूर’च व्हायचा; किंबहुना, तसा तो झालाच होता. चित्रपटसृष्टीतील दोन वटवृक्षांच्या सावलीत हे रोपटे खुरटत चालले होते. राज कपूरचा भाऊ आहे, तर त्याला राजसारखीच व्यक्तिरेखा द्या, तसेच त्याचे रुपडे दिसू द्या, असा बथ्थड ‘सेफ गेम’ चित्रपटसृष्टीने 1953 ते 1957 असा चार वर्षे खेळून पाहिला. त्यात निर्मात्यांचे हात पोळले आणि शम्मीच्या माथ्यावर ‘फ्लॉप स्टार’चा शिक्का बसला.
मधुबालेपासून चांद उस्मानी, सुरय्या, श्यामा यांच्यापर्यंत विविध नायिकांसोबत मिशीधारी शमशेरराज कपूरने 19 चित्रपटांत शामळू, मवाळ, प्रेमविव्हळ नायक रंगवला.
त्याचे थोरले बंधु राज, दिलीप कुमार आणि देव आनंद या त्रिमूर्तीने मिळून हिंदी चित्रपटसृष्टीतील नायकाची संकल्पना व्यापून ठेवली होती. इतरांना या त्रयीच्या बहिरंग किंवा अंतरंगाची नक्कल करण्यापलीकडे काही काम नव्हते.
1957 साली पहिलटकर दिग्दर्शक नासिर हुसेनच्या ‘तुमसा नही देखा’मध्ये मिशांना चाट देऊन, एल्व्हिस प्रिस्लेटाइप कल्ले ठेवून बागडताना शमशेरराज कपूर पहिल्यांदा ख-या अर्थाने ‘शम्मी’ कपूर झाला. हिंदी सिनेमाच्या नायकाला उर्मट, धसमुसळा, निलाजरा आणि स्टाइलबाज बनविण्याचे महत्कार्य त्याने पार पाडले. 1959च्या ‘दिल देके देखो’च्या यशाने या नव्या ‘रिबेल स्टार’ला स्थैर्याची ग्वाही दिली.
1961 मध्ये त्याने ‘जंगली’मध्ये सायराबानूच्या सोबतीने बर्फात कोलांटय़ा घेत ठोकलेली ‘याहू’ ही सुप्रसिद्ध आरोळी त्याला त्या दशकाच्या पूर्वार्धाचा ‘सुपरस्टार’ बनवून गेली. ‘याहू’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ ‘उर्मट, उनाट, अशिष्ट’ असा आहे. जगभरात कोणत्याही काळातील तारुण्याला ही विशेषणे लागू पडतात आणि साजूनही दिसतात.
नुकत्याच संपलेल्या स्वातंत्र्यलढय़ाचा जाडाभरडा शुष्ककोरडा हँगओव्हर ज्यांच्या मनांवरून ओसरला नव्हता, अशा- तथाकथित मूल्ये आणि सुसंस्कारांच्या ओझ्याखाली गुदमरलेल्या- तरुणाईला शम्मीच्या नायकाने गदागदा हलवून जागे केले. ‘बदतमीज’, ‘जानवर’, ‘जंगली’ ही त्याच्या चित्रपटांची शीर्षकेही बंडाचा झेंडा रोवणारी होती.
मोहम्मद रफींचा आवाज, ओ. पी. नय्यर, शंकर-जयकिशन, आर. डी. बर्मन यांचे संगीत, वेगवान -हिदमवर अंगांगाला झटके देत बेफाम नाचण्याची ‘युनिक’ घुसळशैली, नासिर हुसेन, सुबोध मुखर्जी, विजय आनंद यांच्यासारखे दिग्दर्शक असा सरंजाम जमवून शम्मीने साठच्या दशकात एकच धमाल उडवून दिली.
मात्र, याच दशकाच्या अखेरीस शम्मीचा अवाढव्य ‘कपूर’ व्हायला सुरुवात झाली आणि तो नायक म्हणून अस्तंगत झाला, काळाची पावले ओळखून वयस्क भूमिकांकडे वळला. ज्या सायराबानूचा तो 1961 साली तो पहिला नायक होता, तिच्याच वडिलांची भूमिका त्याने एक तपानंतर ‘जमीर’मध्ये खळखळ न करता साकारली.
‘मनोरंजन’ आणि ‘बंडलबाज’ या दोन पडेल चित्रपटांनंतर तो पुढे कधीच दिग्दर्शनाच्या वाटेला गेला नाही. चित्रपटसृष्टीच्या प्राधान्ययादीतून तो हळुहळू फेडआऊट होत गेला.
आताच्या तरुण पिढीला तर व्हीलचेअरशी जखडलेला, दाढीधारी, अवजड शम्मी कपूरच ठाऊक होता, पण, तोही इंटरनेट-सॅव्ही, जिंदादिल म्हातारा म्हणून. वयाने आणि किडनीच्या दुर्धर आजाराने त्याचे शरीर पिंजून काढले होते, पण मनाने तो ना कधी खचला, ना खट्ट झाला. शम्मी कपूरची भूमिका तो अंतापर्यंत समरसून जगला.
(प्रहार, १५ ऑगस्ट, २०११)