Thursday, March 17, 2011

काय बाई सांगू? (क्या कहना)

क्या कहना'चा पूर्वार्ध पाहताना मनात सतत एक प्रश्न उमटत राहतो.
कुंदन शाहसारखा संवेदनशील दिग्दर्शकानं हा प्रेमत्रिकोणाचा विसविशीत, घिसापिटा पसारा का मांडला असावा? उत्तरार्धात या प्रश्नाचं उत्तर मिळतं... अगदी खणखणीत नसलं, तरी माफक समाधानकारक.
`क्या कहना' हा नेहमीचा प्रेमत्रिकोण नाहीच; ही एका कुमारी मातेची कहाणी आहे, हे उत्तारार्धात स्पष्ट होतं. ही कथा बरीच धाडसी, बंडखोर, प्रेक्षकाला विचारप्रवृत्त करणारी, कुमारी मातेला ती अजाण आहे, असहाय्य आहे, म्हणून समाजानं `मोठय़ा मनानं' लग्नाविना गरोदर राहण्याचा तिचा घोर अपराध पोटात घालावा, अशी भीक मागणारा हा सिनेमा नाही. `मूल जर आईच्या उदरात वाढत असेल, ती त्याला जन्म देत असेल आणि (बापानं जबाबदारी नाकारल्यास) त्याच्या लालनपालनाची जबाबदारी पार पाडण्याची तिच्यात हिंमत असेल, तर मुलाचा बाप कोण हा प्रश्न फजूल आहे, त्याची वास्तपुस्त समाजानं करत बसायची गरज नाही. तिला एक नॉर्मल बाई, आई म्हणून सहजपणे स्वीकारायला हवं, असं ठणकावून सांगू पाहणारा हा सिनेमा आहे.
मात्र, इतका जालिम जमालगोटा आपल्या समाजाच्या थेट पचनी पडणं कठीण आहे, हे लक्षात घेऊन की काय, कथा- पटकथालेखिका हनी इराणी आणि दिग्दर्शक कुंदन शाह यांनी हा डोस कौटुंबिक, भावुक आणि प्रसंगी बटबटीत नाटय़ाच्या साखरगोळीतून देण्याची चलाखी केली आहे... बहुधा महिला प्रेक्षकवर्ग डोळ्यांसमोर ठेवून. बायकांनी हा सिनेमा पाहावा आणि एकमेकींना नायिकेबद्दल `काय बाई (आहे ही म्हणून) सांगू', असं कौतुकानं सांगावं, अशी साधारण मांडणी दिसते.
ही कहाणी आहे प्रियाची (प्रीती झिंटा). शाळेतून कॉलेजात पदार्पण करण्याच्या उत्फुल्ल, उत्साही वयातली प्रिया ही आईबापांची लाडकी लेक, भावंडाची लाडकी बहीण आणि लहानपणापासून तिच्यावर अस्फुट प्रेम करणाऱया लाजाळू अजयच्या (चंद्रचूड सिंग) स्वप्नांची राणी, (प्रियाच्या लेखी मात्र तो फक्त अगदी जवळचा मित्र आहे.) अखंड बडबड, उत्साहानं फसफसणारं व्यक्तिमत्व आणि निर्भीड स्वभाव, ही तिची वैशिष्टय़ं.
कॉलेजात प्रियाची गाठ पडते राहूल (सैफ अली खान) या बडय़ा घरच्या बिगडय़ा बेटय़ाशी, रोज नवनव्या पोरी घुमवणारा राहुल प्रियावर आशक होतो. प्रियाही त्याच्या रुबाबदार आणि इन्टेन्स भासणाऱया व्यक्तिमत्त्वावर भाळते. त्याच्या प्रेमाच्या भरवशावर आणि तरुणाईच्या वेडय़ा आवेगात ती त्याच्याशी विवाहपूर्व शरीरसंबंध येऊ देते.
या संबंधातून तिला दिवस जातात. राहुलचं आपल्यावर प्रेम आहे, तो आपल्याशी लग्न करणार आहे, हा तिचा विश्वास केवळ एक भ्रम सिद्ध होतो. आपण प्रियाबरोबर निव्वळ मौजमजा केली. तिच्याशी लग्नबिग्न करण्याचा आपला इरादा नव्हता. त्यातून ती गरोदर राहिली असेल, तर तिनं गर्भपात करावा, त्याचा खर्च आपण करू, अशी भूमिका तो घेतो.
या प्रेमप्रकरणानं भयानक मन:स्ताप भोगावे लागलेले प्रियाचे कुटुंबीयही, राहुल बधत नाही म्हटल्यावर, तिला गर्भपाताचाच सल्ला देतात. पण, आपण (एकतर्फी का असेना) निस्सीम प्रेमातूनच गर्भवती राहिलो आहोत, हे `पाप' नाही आणि जे घडलं त्यात जन्माला येणाऱया मुलाचा काही दोष नाही. त्याचा जन्मण्याचा जगण्याचा अधिकार का हिरावून घ्यायचा, या विचारानं प्रिया मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेते.
या निर्णयातून संभवू शकणाऱया सामाजिक बेअब्रूला भिऊन प्रियाचे वडील (अनुपम खेर) तिला घराबाहेर काढतात. पण, काही दिवसांतच प्रियाच्या निर्णयातला निडर युक्तिवाद पटलेली तिची आई (फरिदा जलाल) आणि भावंडं त्यांचं मन वळवतात. ते प्रियाला पुन्हा घरात घेऊन येतात, ती कॉलेजलाही जाऊ लागते तेव्हा तिच्या त्या छोटय़ाशा शहरात हलकल्लोळ होतो.
राहुलची कजाग आई (नवनीत निशान) स्वत:च्या सामाजिक स्थानाचा गैरवापर करून प्रियाची कोंडी करण्याचा प्रयत्न करते. प्रियाचे मित्र- मैत्रिणी आणि सगे सोयरे तिच्यावर- तिच्या कटुंबावर अघोषित बहिष्कार टाकतात. या कठीण काळात तिला भक्कम साथ मिळते ती कुटुंबियांची आणि प्रेमभावना करपून गेलेली असतानाही मित्रभावनेच बळावर तिला समजून घेणाऱया अजयची. सामाजिक रूढींना धुडकावणाऱया `नायिके'चा या सिनेमात अखेर विजय होतोच, हे सांगायला नको. आणि हे सांगितल्यावर सिनेमातल्या पुढच्या घटनाक्रमाचा अंदाज बांधणं कठीण नाही.
स्त्राe- पुरुष शरीरसंबंधाला सामाजिक मंजुरीचा (सोशल सॅन्शंन) परवाना बंधनकारक मानणाऱया समाजाला हा धाडसी विचार पटवून द्यायचा, तर नायिकेचा विजय अत्यावश्यकच ठरतो. पण, तो इतक्या भाबडेपणानं घडवण्याची गरज होती का, असा प्रश्न पडतो सिनेमा पाहताना.
एकीकडे लेखक- दिग्दर्शक प्रियाच्या कुटुंबाचं- एका सर्वसामान्य सुखवस्तू कुटुंबाचं, त्यातल्या ऊबदार नातेसंबंधीचं वास्तवदर्शी आणि हृदयस्पर्शी चित्र रेखाटतात, त्यात भडक भावनाटय़ाच्या आहारी न जाण्याचं पथ्य पाळतात. पण सिनेमाच्या केंद्रस्थानी असलेला तर्कशुद्ध विचार पोहोचवण्यासाठी मात्र त्यांना `फिल्मी' व्हावं लागतं, हे अजब आहे.
यात घरातून बाहेर काढल्यावर प्रियाला पूर्वी भेटलेल्या एका पारशी दाम्पत्याच्याच (देवेन वर्मा- डेझी इराणी) घरात आश्रय मिळण्याचा तसंच स्टेशनवर उभी असतानाच हृदपालट झालेले कुटुंबीय भेटण्याचा योगायोग आहे. राहुलनं लग्नाला नकार दिल्यावर दुविधेत पडलेल्या प्रियाला बाळकृष्णाच्या तसबिरीतून `माँ' अशी हाक ऐकू येण्याचा बटबटीतपणा आहे. कॉलेजमध्ये प्रियावर बेतलेलं हीन अभिरुचीचं नाटक आणि ते संपल्यावर प्रियानं संदेशवजा भाषण ठोकणं, हा या ठोकळेबाजपणाचा कळस आहे. आधी ते नाटक `एंजॉय' करणारे प्रियाच्या शहरातले नागरिक एका मिनिटात पालटतात, लगेच प्रियाच्या भाषणालाही टाळ्या वाजवतात, तिला कसलेच प्रश्न विचारत नहीत, हे पटण्याजोगं नाही. ते क्षणभर पटवून घेतलं तरी इतक्या सहजासहजी `प्रभावीत' होणाऱया समाजात प्रियाचा `संदेश' खऱया अर्थानं पोहोचतो- रुजतो का, हा प्रश्न उरतोच. आणि हाच प्रश्न व्यापक प्रमाणात या सिनेमाच्या प्रेक्षकवर्गालाही लागू होतो.
केवळ निस्सीम प्रेमातून घडलेली आगळीक स्वीकारून, आपल्या चुकीची सजा पोटातल्या निष्पाप जिवाला न देणारी, त्यासाठी समजाशी कुटुंबाशी झगडणारी प्रिया नि:संशय धाडसी आहे. पण, तिला `नायिका' बनवण्याच्या नादात लेखक- दिग्दर्शकांनी राहुलला अकारण खलनायक बनवून ठेवलं आहे.
मुळात हा सगळा सिनेमा घडतो, तो या एका व्यक्तिरेखेमुळे. आणि हीच व्यक्तिरेखा सगळ्यात भुसभुशीत आहे. राहुल- प्रियाच्या `प्रकरणा'त राहुलचं वर्तन संदिग्ध (खरंतर प्रेमविव्हळ भासणारं) ठेवून त्यानं लग्नाला नकार देण्यातला `धक्का'गडद करण्याचा धोपटमार्ग लेखक- दिग्दर्शकांनी अनुसरला आहे. प्रियाला नाकारताना थंड- कठोर युक्तिवाद करणारा राहुल पुढे ती गरोदर अवस्थेत कॉलेजात येऊ लागल्यावर मात्र विरघळतो. तिच्या पुन्हा एकदा (आणि आता खरोखरीच) प्रेमात पडतो. हे सगळं कुणाही माणासाच्या संदर्भात घडूही शकतं. पण राहुल तशा स्वभावधाटणीचा माणूस आहे का, हे लेखक- दिग्दर्शकांनी जाणीवपूर्वक अस्पष्ट ठेवलंय.
शिवाय प्रियानं गरोदर राहण्यासंदर्भात जशी तिची एक भूमिका आहे तशीच राहुलचीही एक भूमिका आहे आणि ती प्रियाइतकीच `व्हॅलिड' आहे, हे सिनेमात ठाशीवपणे व्यक्त होत नाही, कारण तो या सिनेमाचा `नायक' नाही. तो प्रियाला `घुमवतोय' हे प्रियाला कळत नाही, हा तिचा दोष झाला. मुलींच्या बाबतीत इतक्या बदनाम मुलावर भरवसा ठेवण्याची चूक तीच करते. शिवाय निव्वळ शारीर ओढीतून घडणाऱया शरीरसंबंधातून पुढे काय घडू शकतं, याची कल्पनाच नसण्याइतकी प्रिया लहान नाही. अशा वेळी, अगदी नवथर वयातले तरुण- तरुणीही समंजपणे योग्य ती `खबरदारी' घेतात. ती घेण्याचं भान प्रिया ठेवत नाही, हाही तिचाच दोष. (राहुल ते ठेवत नाही, कारण तो काही त्यातून गरोदर राहण्याची शक्यता नाही. शिवाय त्याचं काही तिच्यावर प्रेम नाही.)
खरा कटू भासणारा पण व्यावहारिक मुद्दा पुढे आहे. स्त्राe-पुरुषांनी प्रेमातून किंवा निखळ लैंगिक आनंदासाठी एकत्र येणं आणि मूल जन्माला घालण्यासाठी समजून- उमजून एकत्र येणं यात फरक आहे. प्रिया आणि राहुल यांच्यातल्या संबंधाला फक्त शारीर पातळीवरचा आणि (तिच्याकडून) प्रेमाच्या पातळीवरचा अर्थ आहे. त्यातून अपघातानं प्रिया गरोदर राहिल्यावर राहुल `मूल माझं नाहीच, माझी कसलीच जबाबदारी नही', असा कांगावा करत नाही. मात्र, केवळ तिच्या उदरात आपलं मूल आहे, म्हणून तिच्याशी लग्न करावं, ही जबरदस्ती त्याला नामंजूर आहे. त्याला प्रियामध्ये `पत्नी' दिसत नसेल, तर त्यानं लग्न करायला नकार देणंही योग्यच आहे, हे काही लेखक- दिग्दर्शक ठसठशीतपणे मांडत नाहीत.
त्याऐवजी, गरोदर प्रियाला पाहिल्यावर त्याचा घाऊक हृदयपालट घडवून त्याला पूर्णपणे हास्यास्पद बनवून टाकतात.
शिवाय, प्रियाचा निर्णय कितीही धाडसी आणि बंडखोरीचा वाटला, तरी तिच्याकडे टणकपणा आणि मनोबल आहे. त्याचबरोबर ती ज्या सामाजिक आर्थिक स्तरात जगते, तिथे तिला एकटीला मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी पेलण्याइतक्या आर्थिक सुस्थितीची संधी आहे, हे विसरता येत नाही.
अर्थात, प्रेक्षकाला एवढे प्रश्न पाडण्याची ताकद `क्या कहना'च्या कथाबीजात आहे, हेही नसे थोडके! कुंदन शाह यांनी कौटुंबिक जिव्हाळ्याचे, खुसखुशीत प्रसंग आणि काही नाटय़मय प्रसंग संयत पण प्रभावी हाताळणीनं गहिरे केले आहेत. वर उल्लेखलेले `फिल्मी' प्रसंग, प्रियाच्या भावाचं लांबलेलं लग्न, राहुलची आक्रस्ताळी आई यांच्याकडे डोळेझाक केली, तर बाकीचा सिनेमा आपल्या ओळखीच्या, सलास, मध्यमवर्गीय कुटुंबात घडतो आहे, असं प्रेक्षकाला वाटायला लावण्यात ते यशस्वी झाले आहेत.
 अनुपम खेर, फरिदा जलाल यांचा तगडा अभिनय, देवेन वर्मा- डेझी इराणी जोडीचा दिलखुलास वावर, सैफ अली खानचा संयत थंड भावाविष्कार आणि प्रीती झिंटानं व्यत्किमत्त्वात भिनवून घेतलेली प्रिया या सिनेमाच्या जमेच्या बाजू. चंद्रचूडच्या भूमिकेतच फारसा दम नाही. राजेश रोशनच्या संगीतातील शीर्षकगीत, `जानेमन जानेजाँ', `देखिये जानेमन' आणि `ओ सोनिये' ही गाणी श्रवणीय आहेत. तांत्रिक बाजू ठीकठाक.


(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment