Tuesday, March 8, 2011

बोल्ड हेच ब्युटिफुल


अर्रर्र... चक् चक्!! .. असं होईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. वंगकन्या बिपाशा बसू पडद्यावर आली तेव्हा मादक सौंदर्याच्या प्रदर्शनाचा देशी (म्हणजे गिनीजवाला नव्हे , तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सवाला) उच्चांक गाठला गेला , आता आपण सुखानं डोळे मिटायला मोकळे अशी कृतकृत्य भावना झाली होती आपली! पण , एका वर्षातच बिपाशा साक्षात विधवेच्या पेटंट सफेद वेषातल्या निरुपा रॉयसारखी सोज्वळ , सात्विक वगैरे भासू लागली ना! छे , छे , बिपाशानं दाखवण्यासारखं काहीही झाकणारे कपडे घालायला सुरुवात नाही केलेली. हा चमत्कार घडवलाय ' ख्वाहिश ' फेम मल्लिका शेरावतनं.

'17 चुंबनदृश्यं आणि अनेक गरमागरम प्रसंग पाहा... ' ही परवाच प्रदर्शित झालेल्या ' ख्वाहिश ' ची अलिखित जाहिरात आहे. त्यात मल्लिकानं साडीत , बिनसाडीत , बिकिनीत , डिझायनर अंतर्वस्त्रांत इतकं अतोनात अंगप्रदर्शन केलंय की आता पुढच्या सिनेमात दाखवायचंच झालं तर अभिनय कौशल्यच दाखवावं लागेल तिला! सिनेमा झळकण्याआधीच ती अशी हॉट प्रॉपटीर् झालीये की , वृत्तपत्रं , मासिकं , म्युझिक चॅनल्स तर सोडाच , ' बीबीसी ' लाही या बयेची मुलाखत घ्यावीशी वाटली...
 

हरयाणातल्या रोहतकची ही कमनीय जाट कुडी रीमा लांबा या आपल्या जन्मनाव-आडनावानं काही उत्पादनांच्या जाहिरातींत झळकलीये. आईवडिलांच्या प्रखर विरोधाला न जुमानता मुंबापुरीत येऊन दाखल झालेल्या या बिन्धास्त बालेनं अमिताभबरोबर बीपीएल टीव्हीची आणि शाहरुखबरोबर सँट्रो कारची जाहिरात केलीये. ' संगसंग हो तुम ' या गाण्याच्या व्हिडिओमध्येही तिच्या मादक अदांचे लक्षणीय-प्रेक्षणीय जलवे दिसले आहेत. गौतम राजाध्यक्ष आणि आशा भोसले यांच्या सल्ल्यानं ती रीमाची मल्लिका झाली... कारण तिची ख्वाहिशच मुळी लाखो दिलांची मलिका होण्याची आहे ना!

या फटाकडीला मॉडेलिंगच्या काळातच सिनेमाच्या ऑफर्स येतच होत्या. पण , तिला म्हणे , ' प्रतिभेला वाव ' देणाऱ्या भूमिकेतूनच पदार्पण करायचं होतं. मात्र ' ख्वाहिश ' मध्ये तिच्या प्रतिभेचं दर्शन घडण्याआधीच घडलं ते तिचं देहदर्शन.
त्याबद्दल छेडलं की ती ताडकन स्टँडर्ड उत्तर देते , ' बोल्ड दृश्यं कथेची गरज म्हणून आली आहेत. आणि आजकाल कोणती नटी अंगप्रदर्शन करत नाही. मी काही समाजसुधारक नाहीये. इथे काम करायला आलेय ; ते असं चालतं , त्याला मी काय करू ? आज तुमच्या घरातल्या , टीव्हीवर यापलिकडचंही बरंच काही राजरोस दाखवलं जातं. मग थिएटरात ते पाहण्यात अडचण काय ?'
 

अश्लील , अश्लील म्हणून झोडपणाऱ्या पब्लिकला तिचा एक बिनतोड सवाल आहे , ' सिनेमाचा नायक हिमांशू नुसत्या अंडरवेअरवर दिसतो सिनेमात , तेव्हा त्याला तुम्ही ' माचो मॅन ' वगैरे म्हणणार आणि मी (अर्थातच) त्याहून अधिक कपड्यांत दिसले तरी ' चालू गर्ल ' ठरणार ? हा खासा न्याय आहे.
 

बाकी , ' ख्वाहिश ' च्या भूमिकेवर मात्र ती बेहद्द खूश आहे. या बोल्ड प्रेमकथेत ही बिन्धास्त (आणि मराठमोळी!) कॉलेजकन्यका आईवडिलांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह करते. नवऱ्याची निव्वळ शारीरिक ओढ आणि तिची मातृत्त्वाची ओढ , यातून निर्माण होणाऱ्या ताणतणावांची ही गोष्ट आहे. म्हणूनच मल्लिका तणतणते , ' नायिका लग्न करून हनीमूनला गेल्यावर तिथे काय बुरखा घालून फिरेल का ?'
 

आणि एक पक्कं लक्षात ठेवा , लोक भले बोल्ड दृश्यं , चुंबनं वगैरे पाहण्यासाठी थिएटरात येवोत , बाहेर पडताना मात्र चर्चा करतील ती माझ्या भूमिकेची , व्यक्तिरेखेची आणि माझ्या अभिनयाची. '
उत्तम! आपले सदाबुभुक्षित प्रेक्षक ' प्रोमोज् में इतना , तो पिक्चर में कितना ' या विचारानं ' ख्वाहिश ' ला गर्दी करतीलच. आता मल्लिकाच्या अभिनयाची चर्चा करत बाहेर पडण्यासाठी ' सुजाण रसिकां ' नाही उजळ माथ्यानं थिएटरांत शिरण्याची सोय झाली.


(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment