Thursday, March 17, 2011

महेश-लक्ष्याचा माफक दंगा (धांगडधिंगा)महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही मराठीतील हिट- सुपरहिट जोडी. दोघांचा (अनुक्रमे दिग्दर्शक आणि विनोदवीर म्हणून) उदय एकाच वेळेचा, एकाच सिनेमातून (धुमधडाका) झालेला.
जवळपास पाचएक वर्षांनी `महेश आणि लक्ष्या'ची पडद्यावरची जोडी `धांगडधिंगा'मधून मराठी सिनेमात पुन्हा एकत्र झळकते आहे. `धुमधडाका'नंतरच तमाम `महेश- लक्ष्या' पटांची प्रमुख वैशिष्टय़ं सिनेमात कायम आहेत.
म्हणजे काय, तर याची सिनेमात या दोघांची नावं महेश आणि लक्ष्याच आहेत. याही सिनेमात लक्ष्या धांदरट, बावळट आणि घोळात घोळ घालणारा गोंधळ्या आहे, तर महेश हा त्याचा स्मार्ट, शूर, देखणा आणि सतत डाव्या तळहातावर उजवी मूठ आपटून `डॅम इट' म्हणणारा तारणहार- जिगरी यार आहे. लक्ष्यानं घातलेले घोटाळे आणि ते सोडवताना महेशचा पिट्टय़ा पडणं, हे साधारणं कथासूत्रही जुनीच परंपरा चालवणारं.
तरीही या सिनेमात काही गोष्टी नव्या आहेत. एक तर सिनेमात लक्ष्याला `ग्रामीण' पार्श्वभूमी दिलेली नाही. `महेश- लक्ष्या' या दोघांच्याही वयाचा विचार करून लक्ष्याला थेट विवाहित- एक मुलाचा बाप बनवलंय, तर महेश महत्त्वाकांक्षेपोटी (म्हणजे त्याचं लग्नाचं वय उलटून गेल्यानंतरही) अविवाहित राहिल्याचं दाखवलंय या सिनेमात.
`धांगडधिंगा' ही आहे एक `कोर्टरूम कॉमेडी.' कारण महेश- लक्ष्या हे इथं वकील आहेत. दोघे एकत्र प्रॅक्टीस करतात. केसेस हमखास हरण्याबद्दलच दोघांची ख्याती. त्यात लक्ष्या एक नंबरचा थापाडय़ा, बार रुममधल्या पत्त्यांचा डाव चीटिंग करून पैसे उकळणारा. बायकोशी (प्राजक्ता कुलकर्णी), मुलाशी (मा. किन्शुक वैद्य), नाटय़वेडय़ा घरमालकाशी (रवींद्र बेर्डे), महामाया सासूशी (नयनतारा), गळेपडू वकिलीण मिस मोनिका उफाडेशी (किशोरी अंबिये)... सगळ्या- सगळ्यांशी खोटं बोलून वेळ मारून नेणारा.
बापाच्या थापांना वैतागलेला त्याचा मुलगा विकी एका वाढदिवसाच्या वेळी `वडिलांना एक महिनाभर खोटं बोलताच येऊ नये, `अशी' इच्छा रेकी' देतो आणि लक्ष्याची अक्षरश: पाचावर धारण बसते. म्हणजे तो खोटं बोलायला जातो, तेव्हा तोंड पार पिळवटून निघतं आणि एकही अक्षर बाहेर पडत नाही. त्याची इच्छा नसताना त्याची खरं मतं मात्र स्पष्टपणे व्यक्त होतात आणि त्याची ठायी ठायी पंचाईत होते.
या पंचायतीतून होणारा घोळ, त्यातून रंगणारं कोर्टातलं आणि कुटुंबातलं नाटय़ हा `धांगडधिंगा'चा मुख्य सरंजाम, महेशनं लक्ष्याला वाचवणं आणि त्याचं सरकारी वकिलीणबाईशी (वर्षा उसगावकर) प्रेमप्रकरण, हे जोडकथानक.
पटकथा- संवादकार शिवराज गोर्ले यांनी `धांगडधिंगा'मध्ये `महेश- लक्ष्या'पटांचा मूळ सांगाडा कायम ठेवून त्याच्यावर कौटुंबिक हास्टपटाची इमारत रचली आहे. महेशच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणे `धांगडधिंगा'मध्ये तांत्रिक क्लृप्त्या आणि चमत्कृतींना वावच नाही, पण कल्पनारंजनाची (फँटसी) मात्र योजना आहे. `महेश- लक्ष्या `पटांमधल्या सर्व संघर्ष, ताणतणाव, नाटय़ आणि विनोदनिर्मिताला बालसुलभतेचं एक परिमाण असतं. (ते काहींना `बालिश' किंवा `पोरकट' वाटू शकतं.) त्यानुसार इथलं पत्ते कुटणाऱया वकिलांचं चित्रण, खटल्यांमधले मुद्दे, अतिप्रभावी `इच्छा रेकी' आणि अगदी खलनायकाचा भेसूरपणाही तकलादू वाटतो. पण, मुळात इथे विनोदनिर्मितीसाठीची घटनांची उतरंड, यापलीकडे घटनाक्रमाला फारसा अर्थ नाही. त्यामुळे त्या- त्या सिच्युएशनमधून निर्माण होणारा विनोद गपगुमान आस्वादायचा, हे प्रेक्षकांचं मुख्य काम.
`धांगडधिंगा'मध्ये मध्यंतरापर्यंत पात्रांची ओळखच सुरू असते. (मध्यंतराची पाटीच `आता धांगडधिंगा सुरू' अशी आहे.) या भागात कथानकाच्या पातळीवर फारसं काही घडत नसलं, तरी वेगवान हाताळणी, चटपटीत मांडणी, चुरचुरीत संवाद आणि मुरब्बी सह- कलाकारांचा (विजय चव्हाण, विनय येडेकर, जयवंत वाडकर, किशोर नांदलस्कर, प्रदीप कबरे, किशोरी अंबिये, रवींद्र बेर्डे आणि अंबर कोठारे) हातखंडा अभिनयाविष्कार, यामुळे तो कंटाळवाणा होत नाही. उत्तरार्धातही अगदी `धांगडधिंगा' म्हणावं इतक्या थयथयाटी घटना काही घडत नाहीत, पण लक्ष्याच्या खरं बोलण्यातून उद्भवणारे घोटाळे माफक दंगा घडवून आणतात.
लक्ष्याच्या घरात त्याच्या खोटारडेपणातून आणि नंतर त्याच्या सत्यवचनी बाण्यातून उद्भविणारे पेचप्रसंग हा `धांगडधिंगा'मधला सर्वात हास्यस्फोटक भाग. घरमालकाला `नटसम्राट'बनवून भाडं बुडविणारे लक्ष्या- तारा हे नवरा- बायको, लक्ष्याशी लग्न केल्याबद्दल लेकीचा जीव खाणारी कजाग सासू अरुंधती (नयनतारा), तिच्यावर डाफरण्यासाठी आफ्रिकेतल्या काकाचं सोंग काढून येणारा लक्ष्या हा कथाभाग मजा आणतो. तसंच मजा आणतं लक्ष्याचं चटकन खरं बोलून जाणं आणि खोटं बोलताना पिळवटणं.
एरवीच्या विनोदी सिनेमांमध्ये अगदी साचेबंद स्वरुपाच्याच भूमिकांमध्ये अडकणाऱया लक्ष्याला महेशच्या सिनेमात नेहमीच काही तरी वेगळं करायला मिळतं आणि इथे लक्ष्या खुलतोही झकास. `धांगडधिंगा' मध्येही लक्ष्यानं चुकून खरं बोलून जाणं, ते बोलल्याबद्दलचा पश्चात्ताप, थाप मारून सारवासारव करायला गेल्यावर वळणारी बोबडी आणि पिळा सुटल्यावर पुन्हा चटकन उमटणारं सत्यवचन, हा सगळा प्रकार चेहऱयातून- शरीरातून कमालीच्या वेगानं उमटवलंय. त्याच्या अन्य `अदा' ही इथे खूपच सुसह्य झाल्या आहेत. बाकी उत्स्फूर्त पंचेस आणि ऍडिशन्स भासणाऱया संवादांच्या टायमिंगमध्ये लक्ष्याचं तोंड कोण धरणार?
महेशनं लक्ष्याला `सपोर्टिव्ह' भूमिका नेहमीच्या पठडीत सहजतेनं वठवली आहे. वर्षा उसगावकर छोटय़ाशा भूमिकेत तडफ दाखवते. टपोरी रझ्झाक खान आणि अलका आठल्ये यांची विशेष उपस्थिती लक्षात राहणारी. केवळ एका किस्सावजा प्रसंगात दुहेरी हजेरी लावणारे दिलीप प्रभावळकर अफलातून कायिक अभिनयातून बहार उडवून देतात. प्राजक्ता, मा. किंशुक वैद्य आणि नयनतारा या त्रयीनं लक्ष्याचं कुटुंब झक्क साकारलंय. प्राजक्ता लक्ष्याच्या झंझावातात भक्कम उभी राहते आणि बरोबरीची कामगिरी बजावते. किंशुक या मुलाकडून फिल्मी गोडव्याची उधळण करून घेण्याचा हव्यास दिग्दर्शक महेशने टाळला आहे, हे उत्तम. त्याची निरागसताच `इच्छारेकी'सारखी फालम्पोक कल्पना प्रेक्षकांच्या पचनी पडते. नयनतारा यांची ठसकेबाज सासू त्यांच्या पूर्वलौकिकाला साजेशी. नवा खलनायक मात्र अगदीच फुसका नाटकी वठला आहे.
मराठी सिनेमाला एकेकाळी तांत्रिक झळाळी मिळवून देणाऱया दिग्दर्शकाचा हा सिनेमा असल्यानं छायालेखन (समीर आठल्ये), संकलन (संजय दाबके) आदी तांत्रिक बाजू चकाचक आहेत. दोन्ही नायक- नायिकांना प्रत्येकी एक प्रणयगीत आणि महेशच्या सिनेमाचा अविभाज्य घटक असणारं `पॅरडी साँग' याबरोबर लबाड कोल्ह्याचं एक बालगीत सिनेमात आहे. प्रवीण दवणे यांनी लिहिलेली आणि अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेली ही चारही गाणी हिंदी वळणाची आणि थिएटरात श्रवणीय
डोक्याला कसलाच ताप न देणारा हा महेश लक्ष्याचा माफक दंगा `महेश-लक्ष्या'पटांना सरावलेल्या आणि चाहणाऱया प्रेक्षकवर्गाच्या पचनी पडेल.

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment