सिनेमाचं नाव रणसूचक, नायकाचं नाव रणमर्दाचं आणि तो कर्तव्यकठोर पोलिस अधिकारी... ही माहिती मिळाली की सिनेमात काय- काय घडणार याचा अंदाज प्रेक्षकाला श्रेयनामावली सुरू होण्याच्याही आधीच येतो.
महेश मांजरेकर लिखित- दिग्दर्शित `कुरुक्षेत्र' यातला एकही अंदाज खोटा पाडत नाही. उलट सराईत प्रेक्षकाचे यच्चयावत सर्व आडाखे शंभर टक्के बरोबर निघत जातात तो पाहताना. म्हणजे इथल्या एसीपी पृथ्वीराज सिंहची (संजय दत्त) गावदेवी पोलिस ठाण्यात बदली होते, तेव्हा तिथले सगळे अधिकारी पृथ्वीराजच्या भीतीनं हप्तेबाजी बंद करतात. एकच हवालदार गोपी (सयाजी शिंदे) त्याला न घाबरता हप्ताही खातो, डय़ुटीवर दारूही पीत राहतो आणि सदोदित `सरकारी पगारात पोलिसांचं कसं भागत नाही', याची `परखड' टाळ्याखेचक टेप लावतो. हे पाहिलं की, पुढे तो पृथ्वीराजचा आदर करू लागणार आहे आणि मोक्याच्या क्षणी त्याच्या उपयोगी पडणार आहे, हे तडक कळून जातं.
पृथ्वीराजची बायको (महिमा चौधरी) आपल्या- नोकरीशीच लग्न लागलेल्या- नवऱयावर चिडते, डाफरते, तेव्हा उत्तरार्धात तिला नवऱयाच्या महानपणाचा साक्षात्कार घडून तीच त्याला भक्कम साथ द्यायला उभी राहणार, हे आपसूकच समजतं.
हिंदी सिनेमात नायकाची बहीण दिसली, की पुढे तिचं (अर्थात सिनेमात हो!) काय होणार हे कळायला वेळ लागत नाही. अनेक सिनेमांत नायकांच्या बहिणींचं पहिलंच दर्शन सांगून जातं. की हिच्यावर पुढे बलात्कार (किंवा किमान तसा प्रयत्न) होणार आहे. पृथ्वीराजची बहीण (राधिका राणा) पाहिली की साडेतीन सेकंदात हा अंदाज येऊन जातोच. शिवाय पृथ्वीराजच्या ठाण्यात एक चिकणा ज्युनियर अधिकारी (सलील अंकोला) आहे, म्हटल्यावर तो या बहिणीला भेटला की `प्रकरण' जुळणार, हेही कळून जातं.
कुठल्याही ठाण्याचा चार्ज घेतला की, अशा पोलिसपटांचा नायक त्याच्या हद्दीतले बेकायदा धंदे मोडून काढतो. तसाच इथे पृथ्वीराजही कुणा इक्बाल पसीनाचे (मुकेश ऋषी) गैरधंदे उद्ध्वस्त करतो. त्याला पोलिस ठाण्यात बोलावल्यावर घडणारा `जंजीर' छाप `खुर्ची'प्रसंग आणि या पसीनाची हैद्राबादी बोली एकेली, की मनात शंका किणकिणू लागते... हा `जंजीर'च्या शेरखान पठाणाचा अवतार तर नव्हे. पुढे हाही पृथ्वीराजच्या कामी येणार तर!
हा पृथ्वाराज एका हॉटेलात एका मध्यवर्गीय मुलीवर (राखी सावंत) झालेल्या नृशंस बलात्काराचा छडा लावायला, निघतो, तेव्हा पकडून आणलेला बलात्कारी इसम (गणेश यादव) पृथ्वीराजवर ज्या पद्धतीनं भुंकतो, ते पाहता हे बडय़ा घरचं बेणं असणार, ही टीप मिळते. तो डायरेक्ट मुख्यमंत्र्याचाच (ओम पुरी) मुलगा निघतो.
म्हणजे निम्मी स्टोरी समजली.
अत्यंत शुद्ध- स्वच्छ हिंदीमध्ये, नम्रपणे बोलणारा, सत्याची बाजू घ्यायला धावणारा विरोधी पक्षनेता (शिवाजी साटम) दिसला, की हा गडी बाराचा आहे, हा पृथ्वीराजचा केसानं गळा कापणार, ही टोटल लागून जातेच.
आता हे सगळेच्या सगळे अंदाज एकशे एक टक्के बरोबर निघतात म्हणटल्यावर `कुरुक्षेत्र'मध्ये उतरं काय?
उरतं ना थोडाफार, एकतर नायक अधेड वयाचा, गंभीर प्रकृतीचा, विवाहित... म्हटल्यावर रोमँटिक गाण्यांचा स्कोप संपला, तेव्हा त्याच्या बायकोला फ्लॅशबॅकमध्ये, परदेशांत, कमी कपडय़ांत घालवून एक `सेन्शुअर' की काय म्हणतात, तसंल गाणं आणि दुसरं लग्नातलं `छेडछाडगीत' घडवण्यात आलंय. शिवाय मुंबईच्या अंडरवर्ल्डवरचा सिनेमा म्हणजे लेडीज बार, डान्स बारच्या कडक साँग आयटमविना अधुराच, तेव्हा सुमन रंगनाथनचा तसा एक उन्मादक नाच. तो कमी पडेल या भीतीनं किंवा एकाच तिकिटात डब्बल मजा देण्याच्या उद्देशानं घुसवलेला कश्मिरा शाहचा दुसरा उन्मादक नाच.
पुन्हा हा सगळा नाचगाण्यांचा भाग मूळ कथेच्या गांभीर्याशी विसंगत- विजोड वाटतो, ही तक्रार करायला काही जागा नाही.
कारण, मुळात कथा- पटकथाकार आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरनं कथानकाच्या आशयाचं गांभीर्य जपलंय कुठे? त्याचा हा कडक एसीपी- एकही पैसा न खाणारा, पगारातले पैसे गरजू शिपायांमध्ये वाटणारा वगैरे- त्याच्या बहिणीच्या वाढदिवसाची पार्टी इतकी जंगी दिसते, की एसीपींना पगाराच्या कैकपट विशेष `भगिनीजन्मदिन भत्ता' मिळतो की काय, अशी शंका येते. कुठल्याही गुन्हेगाराला एकच न्याय, वगैरे बकवास करणारा हा एसीपी शेवटी बहीण- बायकोच्या सुरक्षिततेसाठी इक्बाल पसीनाच्या दारात जातो. तिथेच त्याच भ्रष्टाचारविरोधी कर्तव्यनिष्ठेची कहाणी संपून समान्य सूडकथा सुरू होते.
शिवाय सगळ्या सिस्टीमला सडवलं ते राजकारण्यांनीच, वगैरे सर्वांच्या सोयीचं टिपिकल दळण आहेच सिनेमात. मुख्यमंत्र्याच्या मुलावर बलात्काराचा आरोप झालेला असताना प्रसारमाध्यमं- सामान्य जनता वगैरे ठार झोपलेले आहेत. अशी पटकथेच्या सोयीची रचना आहे. म्हणजे सगळा तोचतोच मामला.
तो पाहुन प्रेक्षकच `ग्लानिर्भवति' होऊन जातो. त्याला अधूनमधून जाग आणतात ते के.के. सिंग यांचे लवंगीसारखे स्फोटक, लाह्यांसारखे तडतडणारे बिनधास्त संवाद, सयाजी शिंदेनं झकास साकारलेला भावखाऊ गोपी, ओम पुरीची ताकद दाखवून देणारा शिवराळ - रांगडा सीएम, संजय दत्तच्या अभिनयातल्या सुधारणेवरचा विश्वास द्विगुणित करणारा पृथ्वीराज आणि महिमा चौधरी, शिवाजी साटम यांच्याबरोबर किशोर नांदलस्कर, गणेश यादव आणि अगदी छोटय़ा पण लक्षवेधी भूमिकेतला मंगेश यांनी दिलेली भक्कम साथ.
No comments:
Post a Comment