Sunday, March 27, 2011

मिशन उणे काश्मीर

`मिशन कश्मीर' या सिनेमाच्या नावावरून अशी गैरसमजून होऊ शकते की, हा काश्मीर प्रश्नावरचा सिनेमा आहे.
हा विधु विनोद चोप्राचा सिनेमा असल्यानं ही समजूत बळावूही शकते.
कारण विधु विनोद हा स्वत: विस्थापित काश्मिरी आहे आणि त्याच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीमुळे त्याच्याकडून काश्मीर प्रश्नाभोवती गुंफलेल्या, गंभीर सिनेमाची अपेक्षा करता येऊ शकते.
पण `मिशन कश्मीर' हा काश्मीर प्रश्नाचा वेध वगैरे घेणारा सिनेमा नाही. तो घडतो काश्मीरमध्ये. त्यात माणसं काश्मिरीयतबद्दल बोलतात. त्यातल्या गाण्यांना काश्मिरी लोकसंगीताची डूब आहे. सिनेमाच्या शीर्षकस्थानी असलेलं `मिशन कश्मीर' हे काश्मीरमधल्या अतिरेक्यांनी रचलेलं एख महाभयानक षड्यंत्र आहे. तरीही हा सिनेमा काश्मीर प्रश्नावरचा सिनेमा नाही.
काश्मीरची समस्या तोंडी लावण्यासारखी वापरणारा हा एक थरारक सूडपट आहे.
इथे अल्ताफ (हृतिक रोशन) हा काश्मिरी तरुण सूडभावतेनं पेटलाय. त्याचा रोष आहे इनायत खान (संजय दत्त) या पोलिस अधिकाऱयावर. कारण अल्ताफ आठ वर्षांचा असताना एक दहशतवाद्याविरुद्ध (पुरु राजकुमार) पोलिसांनी केलेल्या कारवाईत अल्ताफचे निरपराध आई-वडील-धाकटी बहीण मारले गेले आहेत. अनाथाश्रमातून त्याला इनायत खान आणि त्याची पत्नी नीलिमा (सोनाली कुलकर्णी) हे दत्तक घेतात. त्यांचा एकुलता एक मुलगा नुकताच एका अपघातात मरण पावलाय. अल्ताफच्या आगमनानं खान दाम्पत्याच्या आयुष्यातली मुलाची उणीव भरून निघू लागते; अल्ताफलाही `अम्मी-अब्बा' मिळाल्याचा आनंद होतो. पण तो फार काळ टिकत नाही.  
आपल्या आई-वडिलांवर गोळीबार करणारा बुरखेधारी पोलिस अधिकारी इनायत खानच होता, हे लक्षात आल्यावर अल्ताफ बिथरतो आणि इनायतच्या घरातून पळून जातो.
तो हिलाल (जॅकी श्रॉफ) या अफगाणी दहशतवाद्याच्या टोळीत वाढून मोठा होतो. कट्टर अतिरेकी झालेल्या अल्ताफावर हिलाल `मिशव कश्मीर' या काश्मिरात हाहा:कार उडवून देणाऱया कारवाईची जबाबदारी सोपवतो. ती पार पाडण्यासाठी आणि लगे हाथ आता काश्मीरचा पोलिस महासंचालक बनलेला इनायत खानचाही काटा काढण्यासाठी अल्ताफ श्रीनगरमध्ये येतो.
इथे त्याला बालपणी दुरावलेली मैत्रीण सूपी (प्रिटी झिंटा) भेटते. त्याच्यातली कोवळी प्रेमभावना जागी होते. एकीकडे तिच्यात मन गुंतलेलं असताना अल्ताफ तिचा दहशतवादी कारवाईसाठी प्याद्यासारखा वापर करून घेतो. `मिशन कश्मीर'साठी आणि इनायत खानचा खात्मा करण्यासाठी सज्ज झालेला अल्ताफ आणि त्याचं `मिशन कश्मीर' उद्ध्वस्त करून त्याला मार्गावर आणू पाहणारा इनायत खान यांच्यात संघर्ष सुरू होतो. मुलगा आणि नवरा यांच्याबद्दलच्या ओढीमध्ये हेलकावणारी नीलिमा, ज्याच्यावर निस्सीम प्रेम केलं त्याचं भरकटणं पाहणं नशिबी आलेली सूफी आणि अल्ताफला अंधारात ठेवून त्याच्याकडून भलतीच कामगिरी करून घ्यायला निघालेला हिलाल... या पात्रांच्या ताणतणावातून `मिशन कश्मीर' अपेक्षित शेवट गाठतो.
एक थ्रिलर किंवा सुडपट म्हणून पाहिला तर `मिशन कश्मीर' चोख मनोरंजन पुरवतो. सुमारे पाऊण सिनेमा तर काही वेगळे, अनोखे क्षणही पदरात टाकतो; पुढे काही वेगळं पाहायला मिळण्याची अपेक्षा निर्माण करतो. पण सिनेमानंतर दिग्दर्शक `क्लायमॅक्स'ची मोळी बांधायला घेतो आणि सालाबादप्रमाणे क्लायमॅक्सला या अपेक्षांवर बोळा फिरतो.
`मिशन कश्मीर'मध्ये पहिल्या फ्रेमपासून नजर बांधून घेते आणि शेवटापर्यंत खुर्चीला खिळवून ठेवते ती लेखक- दिग्दर्शक- तंत्रज्ञ- कलावंत यांची अप्रतिम सांघिक कामगिरी. तिची सुरुवात कथा पटकथा- संवादांपासूनच होते. अभिजात जोशी, सुकेतु मेहता आणि विक्रम चंद्रा या पटकथाकारांनी अतिशय बंदिस्त पटकथा रचलेली आहे. प्रत्येक प्रसंग अगदी नेमका आणि आटोपशीर केला आहे. अल्ताफची चित्रकला, त्या भीषण हत्याकांडानं पोळून निघालेल्या बालमनाला भेडसावणारी, तरुण वयातही पिच्छा न सोडणारी भयाण दु:स्वप्नं, नुकताच मरण पावलेला मुलगा आणि अल्ताफ यांच्या `अस्तित्वा'चे खान दाम्प्त्याच्या मनातले पडसाद, अशा कंगोऱयांना `मिशन कश्मीर' अनोख्या पद्धतीनं स्पर्श करतो. या भागाची पटकथा आणि दृश्यमांडणी (टेकिंग) अनेकदा प्रायोगिकतेकडे झुकते; पण ती दुर्बोध बनत नाही. मुख्य प्रवाहात प्रायोगिकता मिसळण्याचा बऱयापैकी यशस्वी प्रयत्न करते.
हा प्रयत्न `बऱयापैकी यशस्वी'च राहतो. कारण अल्ताफचं `नायक'पण सांभाळण्यासाठी त्याला भेडसावणाऱया दु:स्वप्नांचा अतिरेक होतो. जणू त्याच्या निरपराध कुटुंबाची अशी नृशंस हत्या झाली म्हणजे त्याचे पुढचे सगळे गुन्हे क्षम्यच मानायला हवेत. शिवाय `मिशन कश्मीर' सुरू झाल्यावर अल्ताफसारखा कडवा अतिरेकी पोलिसांचं, सुरक्षा दलांचं लक्ष वेधून घेणाऱया अवसानघातकी कारवाया कशा करू धजतो, त्याच्या कारवायांमधल्या व्यक्तिगत सूडाच्या संदर्भातल्या कोणत्या आणि `मिशन'च्या संदर्भातल्या कोणत्या, असे प्रश्न पडत राहतात. अल्ताफ- इनायत- नीलिमा आणि सूफी या प्रमुख व्यक्तिरेखा पटकथाकार- दिग्दर्शक यांनी पूर्वार्धात इतक्या स्पष्ट रेखाटल्या आहेत की, हा थ्रिलर त्यांच्यातल्या मानसिक आंदोलनांचा वेध घेत पुढे जाईल, असे वाटते. ती वाट तो अर्ध्यात सोडतो. व्यापक काश्मीर प्रश्नाकडेही वळत नाही आणि मग व्यक्तिगत सूडपट म्हणूनची वाटचाल तर फारच सरधोपट होऊन जाते. विशेषत: इनायत आणि अल्ताफ यांना समोरासमोर आणण्यात पटकथाकारांची झालेली दमछाक स्पष्टपणे जाणवते. तिथे सिनेमा सगळ्यांच्या हातातून सुटतो.
अर्थात, सांघिक कामगिरीमुळे इथवरचा आणि यापुढचा सिनेमा निश्चितपणे पाहवतो. यात विनोद प्रधान यांचं छायालेखन, नितीन देसाई यांचं कलादिग्दर्शन, स्वर्गीय रेणु सलुजा यांचं संकलन, ध्वनिमुद्रण आणि चित्रणोत्तर, विशेष दृक-श्राव्य परिणामांचा मोठा वाटा आहे. यातल्या बहुतेक तंत्रज्ञांना विधु विनोद चोप्रानं श्रेयनामावलीत सह- दिग्दर्शनाचं श्रेय दिलं आहे. दिग्दर्शकाची `व्हिजन' पडद्यावर यथातथ्य साकारण्यात ही मंडळी केवळ मोलाची कामगिरी करत नाहीत, तर बऱयाचदा सिनेमा तीच `घडवतात.' त्यांना श्रेय देऊन त्यांच्यावर अधिकृत जबाबदारी सोपविण्याचा हा अतिशय चांगला पायंडा आहे.
या कामगिरीनं `मिशन कश्मीर'ला दिलेलं रुप ही खास( जमल्यास डिजिटल ध्वनियुक्त) थिएटरात जाऊन अनुभवण्याची चीज आहे. एहसान- शंकर- लॉय यांच्या पार्श्वसंगीतानंही `मिशन कश्मीर'चा परिणाम दुणावलाय. `बुम्बरो, बुम्बरो' हे चालीसकट उचललेलं काश्मिरी लोकगीत सुनिधी चौहान, जसपिंदर नरुला आणि शंकर महादेवन यांनी खुलून गायलंय. नायिकेची बैठी अदा आणि नायकाच्या काश्मिरी लोकन्त्यासदृश `स्टेप्स' यामुळे चित्रीकरणही बहारीचं झालंय. `जिंदपोशे माल'मध्ये लोकसंगीत आणि पॉपचं फ्यूजन उत्तम जमलंय. `चुपकेसं सुन'मध्ये मुख्य गायिकेचा आवाज प्रेमाची कोवळीक नजाकतीनं व्यक्त करतो आणि आघाती कोरस नायकाच्या आयुष्याचा छिन्नपणा मांडतो. ही रचना (आणि टेकिंग) ढोबळ असलं तरी मजा आणतं. सोनाली कुलकर्णीवर आयुष्यातून त्यांच्या सख्ख्या मुलाचं पुसट होत जाणं आणि अल्ताफनं त्याची जागा घेणंही हे कल्पकतेनं दाखवलं आहे. `धुआँ धुआँ' या गाण्यावर श्रेयनामावली चित्रित झाली आहे.
संजय दत्तनं एरवी अशा जिगरबाज, कर्तव्यनिष्ठ नायकांच्या भूमिका ढिगानं केल्या आहेत; पण तरुण वय ते मध्यम वयापर्यंतचा प्रवास दाखवण्याची संधी त्याला क्वचित मिळाली असेल. त्यातही इनायतचं वय नुसतं कॅलेंडर वर्षांत वाढत नाही; तो अनुभवांनी पिकत जातो. हे संजयनं उत्तम दाखवलं आहे. त्याच्या करारीपणाला एका बापाच्या हळवेपणाची, `मुला'च्या काळजीची अव्यक्त छटा आहे. ती संजयनं फारच प्रगल्भतेनं खुलवली आहे. हृतिकचा अल्ताफ पदोपदी `फिजा'च्या अमानची आठवण करून देतो. अर्थात, इथे तो अधिक सुस्पष्ट भूमिकेत आहे. `नायका'च्या जबाबदाऱया तो लीलया पार पाडतो आणि त्याला पडद्यावर पाहणं हा आनंददायक अनुभव असतो, ही `नेहमीची यशस्वी' बलस्थानं झाली. आता त्याची यापुढची भूमिका या साच्यातली असणे त्याच्या कारकिर्दीसाठी हानिकारक ठरेल. सोनाली कुलकर्णीची नीलिमा संजय आणि हृतिक या दोन टोकांचा मेळ उत्तम सांभळते. नीलिमामधला जीवनविषयक भाबडा उत्साह चांगुलपणावरचा विश्वास, उत्साही वृत्ती ती झक्कपणे साकारते. तरुण वय ते मध्यम वय हा प्रवास तीही सहजगत्या पेलते. दिग्दर्शकानं उत्तरार्धात तिच्याकरवी काही भाषणबाजी करून घेतली आहे. सोनालीच्या सिन्सियर भावदर्शनामुळे ती फारशी खटकत नाही. जॅकी श्रॉफनं हिलालच्या भूमिकेत (संवादफेक, गेटअप यातून) काही रंग भरण्याचा प्रयत्न केलाय; पण मुळ भूमिकाच तोकडी आहे. त्याहून तोकडय़ा भूमिकेत, जेमतेम दोन- तीन प्रसंगांमध्ये पुरु राजकुमार छाप पाडून जातो. तो या सिनेमातलं सरप्राइज पॅकेज ठरेल. प्रिटी झिंटा नेहमीप्रमाणे अगदी सहज वावरते आणि भावदर्शनाला संधी देणाऱया एखाददुसऱया प्रसंगात चोख कामगिरी बजावते.
एकूणात, गेल्या काही महिन्यांमध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमांच्या तुलनेत फक्त निर्मितीमूल्यांची नव्हे, तर सिनेमाकलेची (दृक- श्राव्य अनुभवासंदर्भात) श्रीमंती दर्शविणारा `मिशन कश्मीर' एकदा पाहायला काहीच हरकत नाही.(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment