Sunday, March 27, 2011

रंगबिरंगा प्रेमतिरंगा (हर दिल जो प्यार करेगा)

कुठल्याही नव्या सिनेमाच्या पोस्टरवर- प्रोमोजमध्ये एक नायक- दोन नायिका किंवा एक नायिका- दोन नायक असं त्रांगडं दिसलं की, `हरे राम! पुन्हा प्रेमत्रिकोण?' असा हताश उद्गार मनात उमटतो.
तरीही आपण प्रेमत्रिकोणपट (बरा असेल तर) पाहायचं काही सोडत नाही. दर वर्षीच्या हिट सिनेमांमध्ये हमखास एखादा `लव्ह ट्रँगल' असतोच.
तीन माणसांनी एकमेकांत जीव गुंतवायचा, तो गुंता सोडवायच्या प्रयत्नात अधिकाधिक घट्ट करत न्यायचा आणि कुणा तीर एकाच्या `कुर्बानी'नं त्याचा तुकडा पाडून टाकायचा, असा हा हमखास यशस्वी खेळ. तो `हमखास यशा'ची मिनिमम गॅरंन्टी देतो, कारण प्रेक्षकही कळत- नकळत या गुंत्यात गुंततो. जिंकणारा जिथे हरतो आणि हरणारा जिथे जिंकतो, अशा या अजब खेळाची गोडीच तशी न्यारी.
`जिंकणाऱया' बरोबर प्राप्य `वस्तू' मिळवल्याचं सुख आणि हरणाऱयाबरोबर त्यागमय प्रेमाची उदात्तता अनुभवल्याचं ऑल्मोस्ट आध्यात्मिक समाधान, असा हा `होलसम' स्वप्नरंजनाचा मामला!
राजकंवर दिग्दर्शित `हर दिल जो प्यार करेगा' हा अगदी बेतीव प्रेमत्रिकोण आहे. चोख फॉर्म्युल्यानुसार बनवलेला. दोन्ही नायिकांची नायकाशी आणि प्रेक्षकही ओळख झाली की, सिनेमाचा शेवट काय होणार हे क्षणार्धात डोळे झाकून सांगता येईल, इतका चाकोरीबद्ध. तरीही डोळे उघडे ठेवून शेवटपर्यंत पाहण्याजोगा. अत्यंत साचेबंद कथाबाजीतून कथा- पटकथा- संवादकार रुमी जाफरी यांनी नावीन्याचा आभास देणारं, `इंटरेस्टिंग' असं काही घडवलंय आणि राजकंवर यांनी ते प्रेक्षणीय बनवलंय. `हम दिल दे चुके सनम'सारखा प्रेमडोहात बुचकळवून आतून ढवळून काढणारा अनुभव `हर दिल...' काही देत नाही. पण किनारेकिनारे फिरून, चार- दोन प्रेमशिंतोडे उडवून घेऊन `भिजलो- भिजलो' म्हणून आनंदणाऱया बहुसंख्य पब्लिकला तीन तास उलझवून ठेवण्याचं काम तो चोख बजावतो; `बच्चा भी खुश, बच्चे का बाप भी खुश्' टाइप घाऊक सुखान्त शेवटापर्यंत किमान पाहवतो.
`व्हाइल यू वेअर स्लीपिंग' या हॉलिवुडच्या प्रेमपटावर बेतलेल्या `चंद्रलेखा'या प्रियदर्शन दिग्दर्शित दक्षिणी चित्रपटावरून `प्रेरणा' घेतलेल्या `हर दिल...'चा प्रेमत्रिकोण काहीसा `हटके'ही आहे; कारण इथे एक नायिका इंटरव्हलपर्यंत कोमामध्येच- बेशुद्धावस्थेत असते.
हे घडतं असं की, गोव्याहून मुंबईत नायक बनण्यासाठी आलेल्या राजूसमोर (सलमान खान) एक अपघात होतो. अपघातग्रस्त गाडीतून तो पूजाला (रानी मुखर्जी) बाहेर काढून वाचवतो. तेव्हापासून ती कोमातच असते. घरच्यांना पसंत नसलेल्या कुणा रोमी नामक इसमाबरोबर गांधर्वविवाह करायला निघालेली असताना पूजाला हा अपघात झालेला असतो. हा रोमी सिनेमाभर उगवतच नाही. पूजाचे घरवाले राजूलाच रोमी समजतात. हे ओबेरॉय खानदान बरंच बडं असल्यानं राजूला संगीतक्षेत्रात ब्रेक मिळण्याची शक्यता निर्माण होते आणि त्यातून पूजाच्या घरातल्यांनाही मानसिक दिलासा मिळणार असल्यानं तो रोमी बनायला तयार होतो.
त्याची पंचाईत होते जान्हवीच्या (प्रिटी झिंटा) आगमनानंतर. ही ओबेरॉयच्या अकाऊंटंटची (परेश रावळ) मुलगी. पूजाची सख्ख्या बहिणीइतकी सख्खी मैत्रीण. पहिल्या भेटीतच राजू तिच्या प्रेमात पडतो. पण ती राजूला रोमी- म्हणजे जीजाजी समजत असल्यानं त्याचं प्रेमगाडं पुढे सरकत नाही. एका नाटय़मय प्रसंगातून जान्हवीला असलियत का पता लागून ते पुढे चालू लागतं, तर पूजा कोमातून जागी होते आणि गैरजागी (पक्षी : मूळ रोमीवर) केलेल्या प्रेमातूनही जागी होते. लगे हाथ योग्य जागी (पक्षी : राजूच्या) प्रेमातही पडते.
झाला तिढा?
आणि या तिढय़ातून नेहमीच्या पद्धतीनं मार्ग निघतोच...
... हा मार्ग काय निघणार याच्या `हिंटस्' पटकथाकार- दिग्दर्शकांनी जागोजाग पेरल्या आहेत. राजूला पूजाचा नवरा मानून तिच्या घरातले जे काही विवाहसंबंधित धार्मिक- रुढीगत विधीकृती करायला लावतात, त्याला जान्हवीचा `सहभाग'च परंपरापरिचित प्रेक्षकाला `हा नवरा कोणाचा?' याचा अंदेशा देऊन जातो. या प्रसंगांच्या स्लोमोशनी- नाटय़मय हाताळणीमध्ये `जुदाई'च्या राजकंवरचा `टच' जाणवतो. मुळात पटकथाकार रुमी जापरी यांनी पूजाचं कोमानिद्रिस्त असणं (त्यातही तिला सगळं ऐकू येतं, समजतं, फक्त ती स्वत: कसलीच प्रतिक्रिया देऊ शकते, अशी खास योजना), राजूला रोमी समजलं जाणं, या सिच्युएश्न्सचा उत्तम उपयोग करून घेतला आहे. अशा कथानकांत नायिकेच्या आगमनापर्यंतचा कथाभाग इंटरेस्टिंग करणं अवघड असतं
राजूला `लव्हेबल रास्कल' टाइप बालिश चक्रमपणा, `सिंगर' बनण्यासाठी त्यानं अबा (नीरज व्होरा) या मित्राबरोबर केलेल्या उचापती, अबाच्या मामाला (शक्ती कपूर) लावलेली दोन लाखाची शेंडी वगैरे डेव्हिड धवन स्टाइल (जाफ्री हे डेव्हिडभाऊंचे `पेट' लेखक आहेत हा योगायोग नाही.) टपोरी कथाभाग बऱयापैकी टाइमपास आहे. मात्र, तो `एन्जॉय' करण्यासाठी' किंचाळा, किंचाळा कोण अधिक किंचाळे तो' अशी स्पर्धा लावल्यागत केकाटणाऱया भडक- हिडीस हावभावयुक्त नीरज व्होरा आणि शक्ती कपूर यांना सहन (आणि क्षमा) करण्याची तयारी हवी, ही कल्पना देऊन ठेवलेली बरी.
दाक्षिणात्य सिनेमांमध्ये मूळ कथानकाशी फारसा किंवा सुतराम संबंध नसलेला एक लाऊड विनोदाचा ट्रक जोडण्याची पॉप्युलर पद्धत आहे. तीच जाफ्री आणि राजकंवर यांनी इथे वापरली आहे. असल्या ट्रककडून दर्जेदारपणाची अपेक्षा करणं हे शक्ती कपूरला `देवेन वर्मा बन' म्हणण्याइतकं फजूल आहे, हे ध्यानात ठेवून पाहिला, तर काही ठिकाणी हा ट्रक हसवूनही जातो.
एरवी नेहमीच्या चाकोरीतून जाणाऱया या कथानकात बरोब्बर इंटरव्हलला आणलेला एक धक्का आणि इंटव्हलनंतर दिलेला धक्केपे धक्काही धमाल आहे. रुपेरी प्रेमकथा `संगीतमय' असण्याचा रिवाज आहे आणि राजकंवर हा संगीताचा चांगला कान असलेला दिग्दर्शिक. त्याच्याकडूनच्या अपेक्षा `हर दिल...'चं संगीत पूर्ण करते. समीरनं सिनेमाचा आशय सांगणाऱया अर्थपूर्ण शीर्षकगीतापासून `एक गरम चाय की प्याली हो' सारख्या बडबडगीतापर्यंत वैविध्यपूर्ण गाणी लिहिली आहेत
हल्ली जबर फॉर्मात असलेल्या अनू मलिकनं ती यच्चयावत श्रवणीय (याचा अर्थ `थिएटरात श्रवणीय (याचा अर्थ `थिएटरात श्रवणीय' असा घ्यायचा) केला आहेत आणि नृत्यदिग्दर्शिका फरहा खाननं ती प्रेक्षणीय केली आहेत. अर्थात, शीर्षकगीताचा गोडवा आणि `ऐसा पहली बार हुआ है'ची गिटारझणत्कारी झिंग यांनी ही गाणी थिएटराबाहेरही श्रवणीय केली आहेत. सोनू निगमनं (रफी स्टायलीत) खुलून गायलेलं `आते आते जो मिलता है' हे(`तीसरी मंझील'च्या `दीवाना मुझसा नहीं'वर बेतल्यामुळे मस्त जमलेलं) गाणं कॅसेटमध्ये आहे, त्याची सिच्युएशनही सिनेमात आहे, गाण्याचा संदर्भही आहे, पण गाणं सिनेमात नाही. काही आठवडय़ानंतर ऍडेड अट्रक्शन म्हणून ते जोडून पुन्हा गर्दी खेचायची ही आयडिया की काय?
सर्व कलाकारांची उत्तम कामगिरी हा `हर दिल...'चा आणखी एक प्लस पॉइंट. सलमानच्या व्यक्तिरेखेत `हम दिल...'च्या समीरच्या छटा आहेत. तिथल्या `आकाशातल्या' बापासारखी इथे कुणी अदृश्य मिसेस कुटिन्हो त्याला मार्गदर्शन करते. राजचा कलंदरपणा दर्शवण्यासाठी तो सदासर्वकाळ अनेपेक्षित अंगविक्षेप, तोंड वेडावणे आणि तऱहेवाईक चित्कार वगैरे प्रकार करतो, पण जिथे आवश्यक तिथे अभिनयाची गरजही समर्थपणे भागवतो. प्रिटी झिंटा आणि रानी मुखर्जी या दोन्ही नायिका आधुनिक युवती सहजतेनं साकारतात आणि `क्लायमॅक्स'ला त्या (एकमेकींशी स्पर्धा न करता) आपापली जबाबदारी नेटकेपणानं पार पाडतात. परेश रावळ आदी सहाय्यक मंडळींची कामंही चोख.
श्रीमंत निर्मितीमूल्यं आणि उत्तम तांत्रिक कामगिरीची जोड लाभलेला हा `रंगबिरंगा प्रेमतिरंगा' पब्लिकला भावून बॉक्स ऑफिसवर काही काळ डौलानं फडकल्यास नवल नाही.

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment