Tuesday, May 12, 2020

ये जो देस है तेरा, स्वदेस है तेरा...देशभरात १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या दिवसांना देशभक्तीला उधाण येतं... स्वच्छ पांढरे कपडे परिधान करायचे, तिरंगी टोप्या घालायच्या किंवा स्कार्फ परिधान करायचे आणि तिरंगा झेंडा हातात घ्यायचा, खिशाला लावायचा किंवा गाडीवर लावायचा. सोसायटीत, शाळेत झेंडावंदनाला उभं राहायचं. राष्ट्रगीतानंतर जोरातजय हिंदम्हणायचं आणि मग सुटी साजरी करायची, हा अनेकांचा परिपाठ असतो... 

या दिवशी देशप्रेमाने मन उचंबळून आलेलं असतं... गल्लोगल्ली मनोज कुमारच्या सिनेमातली वर्षातून एकदाच वाजणारी गाणी वाजत असतात, विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमातसुनो गौर से दुनियावालो, बुरी नजर ना हम पे डालोवर छोटी मुलंमुली एकदम जोशपूर्ण नृत्य करतात आणि सगळ्यांना कृतकृत्य वाटतं...

...हे सुरू असताना दुसरीकडे काही माणसांनी ना स्वच्छ कपडे घातलेले असतात, ना त्यांच्या हातात तिरंगा असतो, ना ते ध्वजवंदनाच्या सोहळ्याला हजर असतात. ही माणसं आपापली कामं करत असतात. सफाई कामगार, पोलीस, अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी, डॉक्टर, व्यावसायिक...ही सगळी मंडळी आपापलं काम निष्ठेने करत असतात. देशप्रेम दाखवण्यासाठी वेगळं काहीतरी करायला हवं, असं त्यांना वाटत नाही. आपापलं काम निष्ठेने करणं, सचोटीने करणं, हीच त्यांच्यादृष्टीने देशसेवा असते...

...इथे कोणाचं देशप्रेम कमी किंवा जास्त ठरवण्याचा विषय नाही... जे झेंडावंदन करतात, ते काही एरवी सचोटीने काम करत नसतात, असं नाही... फक्त राष्ट्रीय सणाच्या दिवशी ते साजरे करणंएवढाच देशभक्तीचा अर्थ नसतो, इव्हेंटबाजीच्या पलीकडे काही गोष्टी कराव्या लागतात, तेव्हा खरं देशप्रेम सिद्ध होतं, एवढंच लक्षात घ्यायला हवं.

आपल्या देशातल्या देशभक्तीपर सिनेमांमध्येही असे दोन ठसठशीत प्रवाह दिसून येतात... एक आहे देशभक्ती साजरी करणाऱ्या सिनेमांचा. दुसरा आहे भाषणबाजी, दाखवेगिरी यांना फाटा देऊन देशावर प्रेम म्हणजे देशाच्या विविधतेवर, देशातल्या सर्व घटकांवर प्रेम हे सांगणाऱ्या संवेदनशील सिनेमांचा प्रवाह. आमचा देश किती भारी, किती शूर, किती जिगरबाज, हे दाखवणारे काही सिनेमे असतात, काही सिनेमे देशातल्या ठसठसत्या समस्यांवर नेमकं बोट ठेवून हे सुधारून देशाला महान बनवू या, असं सांगतात. यातले कोणते सिनेमे लोकप्रिय असतात, ते सांगायला नकोच.

देशभक्तीपर सिनेमे असं म्हटल्यावर आपल्याला काय आठवतं?... एका पिढीला आठवतं ब्रिटिशांच्या काळात अशोक कुमारच्याकिस्मतया गुन्हेगारीपटात वाजलेलंदूर हटो दुनियावालों हिंदुस्तान हमारा है...’, एका पिढीला आठवतो, भारत-चीन युद्धावरचाहकीकत,’ नंतरच्या पिढीला आठवतात मनोज कुमारचेपूरब और पश्चिम, उपकार, क्रांती,’ मधल्या एका पिढीला आठवतो, ‘बॉर्डर,’ कुणाला आठवतो, हाताने हातपंप उखडणाऱ्या सनी देओलचागदर,’ आताच्या पिढीच्या लक्षात राहतो, ‘हाऊज जोशअसं विचारणारा उरी : सर्जिकल स्ट्राइककिंवा अक्षय कुमारचाकेसरी.’ त्याचबरोबरतिरंगा,’ ‘ऐलान जंग,’ ‘हिंदुस्तान की कसम’, ‘कर्मावगैरे देशभक्तीपर सिनेमांची लोकप्रियता काही कमी नाही

या सगळ्यांमध्ये साम्य काय

हे सगळे युद्धपट किंवा लष्करी, गुप्तचर संघर्षपट आहेत. कोणीतरी एक शत्रू भारताला उद्ध्वस्त करण्यासाठी सज्ज झाला आहे आणि भारताचे जाँबाज वीर त्याच्याशी जबरदस्त झुंज देतात, अशी साधारण सगळ्या सिनेमांची रचना असते. सगळ्या रोमांचक शौर्यगाथा असतात. त्या पाहून प्रेक्षकांना स्फुरण चढतं

असं स्फुरण चढण्यात काही वाईट आहे का

काहीच नाही

आपल्या देशाच्या जवानांच्या शौर्याच्या गाथा प्रेक्षकांना कळायला नकोत का
कळायलाच हव्यात

सीमेवर जवान लढतायत म्हणून आपण इथे निवांतपणे जगू शकतो, हे देशवासीयांना समजायला नको का

समजायलाच हवं

पण, हा देशभक्तीचा हा एक सोपा आणि सिनेमात अनेकदा स्वस्त आणि हास्यास्पद होणारा आविष्कार आहे. देशाचा कोणीतरी शत्रू आहे आणि आपल्या देशात जे काही वाईट घडतंय ते या शत्रूमुळेच घडतंय, अशा प्रकारची ही फिल्मी मांडणी आहे. अशा सिनेमांच्या प्रेक्षकाला प्रत्यक्षात काही करायचं नसतं. जे काही करायचं ते पडद्यावरच्या नायकांनी केलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षक स्वत:ला त्यांच्या रूपात पाहून अडीच तासात शत्रूचा नि:पात केल्याचं समाधान मिळवून बाहेर पडतो... त्यानंतर तो रस्त्यावरचे वाहतुकीचे नियम मोडायला, बेशिस्तीने वागायला, इथे तिथे कचरा टाकायला तयार होतो. देशभक्तीचं स्फुरण चढलं म्हणून दुकानदार मापात मारून आपल्याच देशबांधवांना लुबाडणं कमी करत नाही, सीमेवर जवान लढतायत म्हणून पुढाऱ्यांपासून मोक्याच्या जागेवर बसलेल्या अधिकाऱ्यांपर्यंत कोणीही लाच खाणं सोडून देत नाही. चिरीमिरी दिल्याशिवाय जिथे कामं होतात, असं देशभक्तांचं ऑफिस तयार होत नाही. देशभक्तीपर सिनेमे पाहिल्यानंतरही लोक देशबांधवांमध्ये जात-धर्म-पंथ-खानपानाच्या नावाने भेदभावही करतात आणि त्याआधारे एकमेकांचे जीवही घेतात...

सिनेमा हा एक व्यवसाय आहे.

लोकांना काय बघायला आवडेल, ते पाहून पुड्या बांधण्याचा व्यवसाय.

इथे हमखास खपणाऱ्या मालामध्ये देशभक्ती हा एक माल आहे.

सिनेमात मध्येच हिट अँड हॉट सिनेमांची लाट येते, प्रणयपटांची लाट येते, अॅक्शनपटांची लाट येते, विनोदपटांची लाट येते, मल्टिस्टारर सिनेमांची लाट येते, त्याचप्रमाणे देशभक्तीपर सिनेमांची लाट येते. एक सिनेमा यशस्वी होतो, मग सगळे त्या प्रकारचे सिनेमे तयार करत सुटतात, हे याचं मुख्य कारण असतं. जेव्हा लोकांना देशभक्तीचा ओव्हरडोस होऊ लागतो, तेव्हा ही लाटही ओसरते.

भारतीय सिनेमाने ब्रिटिशांचा प्रतिकार करण्याची भावना चित्रपट्टीवर आणली ती व्ही. शांतारामांच्या स्वराज्याचे तोरणया सिनेमाच्या रूपाने. शिवाजी महाराजांनी तोरणा गड जिंकल्याच्या घटनेवर आधारलेल्या या सिनेमाच्या नावालाच ब्रिटिशांनी आक्षेप घेतला होता. ‘स्वराज्यहा शब्द त्यांनी बदलायला लावला. सिनेमाचं नावउदयकालअसं ठेवलं गेलं. ‘किस्मतमध्येदूर हटो दुनियावालो हिंदुस्तान हमारा हैया गाण्याबद्दल गीतकार प्रदीप आणि संगीतकार अनिल बिस्वास यांच्यावर अटक वॉरंट बजावलं गेलं, तेव्हा ते फरारी झाले आणि या गाण्यात जर्मन हो या जापानीअसादुनियावालोंचा उल्लेख आहे. म्हणजे आम्ही ब्रिटिशांच्या वतीने शत्रूराष्ट्रांना उद्देशून हे गाणं लिहिलेलं आहे, अशी मखलाशी केली गेली

सिनेमावाल्यांच्या या धंदेवाईक दृष्टिकोनामुळे की काय, तेव्हाची राजकारणी मंडळी तथाकथित देशभक्तीपर सिनेमाकडे संदेहानेच पाहायची. व्ही. शांतारामांनी जेव्हा संत एकनाथांवरच्या सिनेमाचं नाव महात्माठेवलं तेव्हा महात्मा गांधींचा प्रचार होईल या भीतीने ब्रिटिशांनी त्यावर बंदी घातली. मात्र, तेव्हाचे काँग्रेसचे अध्यक्ष कन्हय्यालाल मुन्शी यांनी शांतारामबापूंना लिहिलेल्या पत्रातमहात्माजींच्या माहात्म्याचा धंदेवाईक लाभ उठवण्याचाच हा प्रयत्न आहे,’ अशा स्पष्ट शब्दांत या सिनेमाला पाठिंबा द्यायला नकार दिला गेला होता.

जगभरात युद्धपट किंवा युद्धगर्जनापट हे प्रचाराचं साधन म्हणूनच वापरले जातात. त्यामुळेच ब्रिटिश किंवा अमेरिकन युद्धपटांमध्ये जर्मन सैनिक किंवा रशियन अधिकारी मूर्ख दाखवले जायचे. आपल्याकडे पाकिस्तानी अधिकारी उल्लूमशाल आणि पाकिस्तानी सैनिक आळशी दाखवले जातात. १८५७च्या उठावाने देश एकत्र केला आणि त्याच्यात स्वातंत्र्याची भावना चेतवली, असं सांगताना हा मुळात संस्थानिकांचा संस्थानं वाचवण्याचा लढा होता. त्याच दक्षिण भारताशी काही संबंध नव्हता आणि या लढ्यात पंजाब किंवा शीख रेजिमेंट ब्रिटिशांच्या बाजूने लढत होती, हे दाखवलं जात नाही. ज्या सरगढीच्या लढाईवर अक्षय कुमारचा केसरीबेतलेला आहे, त्यात शीख फौजा ब्रिटिश साम्राज्याच्या रक्षणासाठी अफगाण फौजांशी लढत होत्या, हे कधीच अधोरेखित केलं जात नाही. आपण सैनिकांच्या शौर्यगाथांवरचे सिनेमे पाहतो, पण राजनैतिक आणि गुप्तचरांच्या पातळीवरच्या भयंकर अपयशातून ते शौर्य गाजवण्याची वेळ आली होती, याकडे कानाडोळा केला जातो.

सीमेवरचा जवान लढतो म्हणून आपण सुरक्षित असतो, त्याचप्रमाणे कोणतीही सुरक्षासाधनं घेता आपला सफाई कामगार गटारांमध्ये उतरतो आणि ती साफ करतो म्हणून शहरं जिवंत राहतात, याकडे आपलं लक्ष कधी जात नाही. देशाच्या वेगवेगळ्या यंत्रणांमध्ये असंख्य लोक स्क्रू आणि नटबोल्टप्रमाणे जीव ओतून काम करत असतात, म्हणून देश नावाचं हे यंत्र अव्याहत चालत असतं. त्याची जाण आपण कुठे ठेवतो? बाकी सोडा, ज्या जवानांच्या नावाने लोक उमाळे काढतात, त्याला घरी जाण्यासाठी रेल्वेत संडासशेजारी वळकटीवर बसून प्रवास करावा लागतो, त्याला उठून कोणी आपली जागा देत नाही.

सैन्यातला जवान आपल्याला सैन्यातच बरा वाटतो. तो नागरी जीवनात येऊन सैन्यातली शिस्तीची, देशभक्तीची मूल्यं शिकवायला लागला, तर त्याचं काय होतं, ते नाना पाटेकरांनी प्रहारमध्ये किती प्रत्ययकारी पद्धतीने दाखवलं आहे. देशाचा सर्वात मोठा घात करणारे शत्रू देशाच्या बाहेर नाहीत, ते देशाच्या आत आहेत. गरिबी, उपासमार, निरक्षरता, अंधश्रद्धा, धर्मांधता, उच्चनीच भेदभाव, जातिभेद, धर्माधर्मांमध्ये आगी लावून त्यावर राजकीय पोळी भाजणारे नेते, देशाच्या अर्थव्यवस्थेला भगदाडं पाडून राजकारण्यांच्या सहकार्याने परदेशी पळणारे उंदीर, देशाला भ्रष्टाचारी नंबर वन बनवणारे लोक, देशाची राष्ट्रीय संपत्ती आपल्याच वडिलांची आहे असं समजून लुटणारे लोक, हे काही कोणी परक्या भूमीवरून येणारे शत्रू नाहीत. हे आपल्यातलेच शत्रू आहेत. त्यांचा नि:पात करायचा, तर निव्वळ प्रेक्षक बनून, टाळ्या पिटून बाहेर पडता येत नाही. आपल्यापासून सुरुवात करावी लागते. त्यामुळे असे सिनेमे लोकप्रिय होत नाहीत, बोअरिंग वाटतात.

आशुतोष गोवारीकरच्यालगानमध्ये ब्रिटिशांवर विजयाची रोमहर्षक गाथा होती, तिला अस्पृश्यता निर्मूलनाची फोडणी होती, पण जेवढ्यास तेवढी. त्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष करून आमीर खानच्या शेवटच्या सिक्सरवर टाळ्या पिटणं सोपं होतं. तो सिनेमा सुपरहिट झाला. त्याच आशुतोषच्यास्वदेसमधला मोहन भार्गव मात्रमैं नहीं मानता के भारत दुनिया का सबसे महान देश हैअसं थेट म्हणतो. जोपर्यंत आपण सगळे एक होऊन, भेदाभेद बाजूला ठेवून देशासाठी काही करत नाही, तोवर आपला देश, क्षमता असूनही महान बनू शकणार नाही, हे सांगतो. ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांतून एका छोट्या गावात वीज आणतो, त्यातली सकारात्मक, संरचनात्मक देशभक्ती आपल्याला आवडत नाही, भावत नाही, तीउगाच डोक्याला शॉटवाटते. आपल्याला गावाने एकत्र येऊन मंदिरांचे जीर्णोद्धार करायची सवय असते, रस्ते, विहिरी, बांध बांधण्याचं काम सरकारच्या डोक्यावर बसून आपल्या पुढाकाराने करायला आपण एकत्र येत नसतो.

नाना पाटेकरांचा क्रांतिवीरथेट आपल्यालाच शिव्या देतो, ते आपण चवीने एंजॉय करतो, पण, त्यानेहिंदू का खून, मुसलमान का खूनहे एकच आहे, हे सांगितलेलं आपण काही फारसं मनावर घेत नाही. एम. एस. सत्यू यांच्यागर्म हवाया बलराज साहनींच्या अभिनयाने गाजलेल्या सिनेमात फाळणीनंतर पाकिस्तानात जाण्याऐवजी भारतातच राहण्याचा निर्णय घेतलेल्या कुटुंबाची कथा होती. तोच धागा अनुभव सिन्हाच्यामुल्कमध्ये पाहायला मिळतो. त्यातली देशभक्तीकितीजणांपर्यंत पोहोचते

अमित मसुरकरच्या न्यूटनमधला नायक आदिवासी भागात मतदानाच्या नावाखाली चालणारा फार्स होऊ देत नाही, तो मुक्त आणि खुल्या वातावरणात निवडणुका घेण्याचं घटनादत्त कर्तव्य करू पाहतो. त्याची देशभक्ती मोठी नाही का? आज अनुभव सिन्हाच्याच आर्टिकल १५मधला तथाकथित उच्च जातीचा पोलिस अधिकारी तथाकथित खालच्या जातीच्या लोकांवर झालेल्या अत्याचारांचा तपास करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो, हा देशाला योग्य वाटेवर पुढे नेण्याचा प्रयत्न नाही का?

सतत एका शत्रूच्या नावाने घोषणा देऊन, त्याचा द्वेष करून त्या शत्रूला अकारण मोठं करण्यापलीकडे आपण काय साधतो? त्याची रेष छोटी करण्याचा एकच मार्ग असतो... आपली रेष मोठी करणं... तो मार्ग दाखवणाऱ्या अधिक गहिऱ्या अर्थाने देशभक्तीपर असलेल्या सिनेमांना आपण आश्रय दिला पाहिजे आणि त्या सिनेमांचे संदेश समजून आपल्यापासून देश सुधारण्याची सुरुवातही केली पाहिजे...

...मग स्वदेसाबद्दल प्रेम वाटण्यासाठी १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीची वाट पाहावी लागणार नाही आणि कुठे जाऊन तिरंगा फडकवावा लागणार नाही... तो आपल्या मनातच सदैव दिमाखाने फडकत असेल.