Thursday, March 17, 2011

अर्रर्रर्र नेम चुकला... (शिकारी)


सावज टप्प्यात आहे... शिकारी सज्ज, सुसज्ज, अचूक नेम धरून बसलेला आहे आणि बार टाकताना अगदी थोडा, क्षणार्धाचा उशीर झाला की काय होतं? सगळी मेहनत पाण्यात जाते. सावज डोळ्यांदेखत पसार होतं किंवा कधीकधी शिकाऱयालाच सावज बनवून टाकतं.
`शिकारी' सिनेमाची गत काही वेगळी नाही. एरवी नेहमीच्या बऱयाच व्यावसायिक सिनेमांपेक्षा वेगळ्या कथानकावरचा थरारक थिलर केवळ निर्मितीअवस्थेत रेंगाळल्यामुळे प्रभावहीन झाला आहे. सिनेमाशी संबंधित सर्व माणसांचा तो अर्ध्यात कुठेतरी असताना त्यातला रस संपला असावा, असं या सिनेमाची मांडणी (विशेषत: क्लायमॅक्स) पाहताना जाणवतं.
सिनेमा सुरू होतो तेव्हा ओम श्रीवास्तव (गोविंदा) हा एक खतरनाक कैदी तुरुंग फोडून पसार होतो. तो वेषांतर करून, महेंद्रप्रताप सिंघानिया या नावानं दक्षिण आफ्रिकेत जातो. तिथल्या वीरेंद्रसिंग रावळ (निर्मल पांडे) या सर्वात श्रीमंत व्यावसायिकाशी पंगा घेतो. त्याच्याबरोबर शिकारीला जाऊन त्याचीच शिकार करतो. नंतर मूळ रुपात येऊन त्याच्या बहिणीला- राजेश्वरीला (करिश्मा कपूर) पटवतो. तिला आणि वीरेंद्रच्या विधवा पत्नीला- सुमनला (तबू) वीरेंद्रचा खुनी शोधण्याच्या प्रयत्नांत मदत करण्याच्या मिषानं आपल्यापर्यंत पोहोचणारे पुरावे सफाईनं नष्ट करत जातो. त्याची खरी ओळख पटवू शकतील अशा साक्षीदारांनाही तो एकापाठोपाठ एक ठार मारत जातो.
पण, सगळी सावधगिरी बाळगूनही एका क्षणी त्याचा पर्दाफाश होतोच. सुमन ही एकेकाळची ओमची प्रेमिका होती आणि ओमचं सदैव तिच्यावर प्रेम होतं, हा शेवटी होणारा उलगडा लक्षात घेतला तर सिनेमाची `बाजीगर' पद्धतीची रचना समजून जाईल आणि शेवटसुद्धा.
राजीव कौल आणि प्रफुल्ल पारेख यांनी सिनेमाची थ्रिलरसदृश रचना पूर्वार्धात बऱयापैकी एक्सायटिंग केली आहे. ओमचं वेषांतर, विरेंद्रसिंगचा खून, त्याच्या चौथ्याला मूळ रुपात साळसूदपणे हजर होणं, राजेश्वरीशी जवळिकीचा प्रयत्न, राजेश्वरीला एका क्षणी- ओम हाच खुनी असल्याचं कळणं, तिला ओमनं अचूक युक्तिवादातून गंडवणं, ओमला `ओळख'णाऱया राजेश्वरीच्या काकाचा (किरण कुमार) खून करताना ओमची उडालेली हबेलहंडी, सर्वांसमोर बिंग फुटू नये म्हणून त्यानं केलेलं नाटक, त्यातून मेलेला काका जिवंत होणं... वगैरे कलाटण्यांवर कलाटण्या प्रेक्षकाला खुर्चीला बांधून ठेवण्याच्या वकुबाच्या आहेत. शिवाय, जॉनी लिव्हर आणि रझ्झाक खान यांचा या खुनांशी समांतर जोडलेला लाफ्टरचा ट्रकही कथेत मिसळून जातो.
त्यात सगळ्यात मोठा वाटा आहे तो ओमच्या व्यक्तिमत्त्वाला दिलेली थंड रक्ताच्या खुन्याला साजेशा क्रौर्याचा, निष्ठुर कार्यक्षमतेचा. त्याचा सगळा वावर एका व्यावसायिक गुन्हेगारानं दुसऱया `गद्दार' व्यावसायिक गुन्हेगाराचा काटा काढण्यासाठी आखलेल्या चतुर, कठोर योजनेसारखा वाटतो. तो एक रक्ताला चटावलेला सराईत खुनी वाटतो. त्याचं दमेकरी असणं, थकलेले श्वास घेणं, मात्र सिनेमात थरार उत्पन्न करणारी ही समजूतच अखेर सिनेमाच्या परिणामाची शिकार करते.
शेवटच्या काही क्षणांत ओमनं हा सगळा उपद्वयाप सुमनवरच्या वेडय़ा प्रेमापोटी केला होता, हे उलगडतं, तेव्हा सगळा सत्यानाश होतो आणि उशिरा पडलेला हा बार फुसकाच होता, असा साक्षात्कार होतो. एकतर विरेंद्रनं ओमच्या कुटुंबावर केलेल्या अत्याचारांचा सगळा प्रकार अविश्वसनीय आणि भडक आहे. शिवाय सुमन या सगळ्या प्रकारात शेवटपर्यंत गप्प का राहते, ओमला पाहिल्यावर तिच्यात काहीच कसं जागतं नाही वगैरे प्रश्न पडतात. मुख्य म्हणजे ओमच्या सगळ्या व्यक्तिमत्त्वाचा पायाच निघून जातो.
क्लायमॅक्समध्ये पारच फसणाऱया या सिनेमात गोविंदाची नेहमीपेक्षा वेगळी आणि झकास कामगिरी, त्याला करिश्मा, तबू यांनी दिलेली उत्तम साथ या जमेच्या बाजू आहेत. बाकी दिग्दर्शनापासून संगीत, छायालेखनापर्यंत निर्मितीच्या अन्य बाजूंमध्ये सातत्याचा अभाव दिसतो.
तरीही थराराची मजा आवडणाऱया प्रेक्षकांना काही प्रभावी प्रसंगांसाठी या सिनेमाकडे वाट वाकडी करायला हरकत नाही.

1 comment:

  1. Mukesh... mala ha cinema avadla hota ani if u could remember, tu to baghun alyanantar aplyat bolana dekhil zala hota karan maza adhich baghun zala hota.. me tevha MT madhye trainee hoto.. my goodness... 12 years have passed since then!!

    ReplyDelete