Monday, September 19, 2011

अभिजात आस्वादक (गौतम राजाध्यक्ष)

ग्लॅमरच्या जगातील श्रेष्ठ छायाचित्रकार ही गौतम राजाध्यक्ष यांची मुख्य ओळख असली, तरी त्यांच्या अभिजात आस्वादक व्यक्तिमत्त्वाचा तो एक छोटासा पैलू होता. गौतम यांच्या सखोल मर्मग्राही वृत्तीचे प्रतिबिंब त्यांच्या छायाचित्रणातही पडले होते. जाहिरात विश्वात छायाचित्रकार म्हणून सुखाची कारकीर्द घडत असताना चित्रपट कलावंतांची छायाचित्रे काढण्याची ऑफर गौतम यांनी आव्हान म्हणून स्वीकारली, तो चित्रपट कलावंतांच्या दैवतीकरणाचा काळ होता. या छायाचित्रकाराने फिल्मी सिता-यांच्या ग्लॅमरआड जाणता-अजाणता झाकले जाणारे माणूसपण टिपले आणि ग्लॅमर फोटोग्राफीला नेत्रसुखद आकर्षकतेच्या पलीकडे काही परिमाण असू शकते, याचा हिंदी चित्रपटसृष्टीला साक्षात्कार झाला. हे काम सोपे नव्हते. तत्कालीन चित्रपट कलावंतांना त्यांच्या खऱ्या-खोटय़ा सौंदर्याचे दर्शन घडविणा-या ठोकळेबाज छायाचित्रांची सवय झाली होती. असे ‘कँडिड’ क्षण टिपण्यातील गंमत त्यांना समजावून सांगणे, पडद्याबाहेरही सुरू असलेल्या ‘अभिनया’तून नेमका क्षण टिपणे, हे काम गौतम यांनी चिकाटीने केले आणि अनेक कलावंताच्या लखलखीत भावमुद्रांचा चिरंतन ठेवा उभा केला. त्याला गौतम यांच्या प्रवाही, मिश्कील लेखणीतून उतरलेल्या नेमक्या मजकुराची जोड असायची. चलतचित्रण करणा-या कॅमे-यासमोर अभिनयातून हवी ती व्यक्तिरेखा उभी करणा-या अमिताभ बच्चनसारख्या महानायकालाही स्थिरचित्रण करणा-या कॅमे-यासमोर बुजायला होते. अनेक नामवंत कलावंतांना स्थिरचित्रण ही आफत वाटते. अशा कलावंतांशी बोलून त्यांना मोकळे करण्याची विलक्षण हातोटी गौतम यांच्याकडे होती. कलावंतांबद्दलचा अकृत्रिम जिव्हाळा आणि चित्रपट कला, छायाचित्रण, चित्रकला, संगीत- विशेषत: पाश्चात्य संगीत आणि ऑपेरापासून स्वयंपाकापर्यंत अनेक विषयांमधील गौतम यांचा स्तिमित करणारा व्यासंग त्यासाठी उपयोगी पडायचा. त्यामुळेच काम झाले की पाठ फिरवणा-या चित्रपटसृष्टीत गौतम यांनी जिव्हाळय़ाची नाती जोडली. लता मंगेशकर, आशा भोसले, नूतन, तनुजा यांसारख्या ‘ताई’, शबाना आझमी, रेखा, डिंपल यांच्यासारख्या मैत्रिणी आणि काजोल, माधुरी दीक्षित, सलमान खान अशी ‘मुलेमुली’ यांचे एक भलेथोरले कुटुंब या एकटय़ा माणसाभोवती गोळा झाले होते. चित्रपट कलेच्या आस्वादनाचे प्राथमिक धडे देणा-या ‘चंदेरी’ या नियतकालिकाच्या संपादनातून त्यांनी रसिकांचेही असेच एक कुटुंब निर्माण केले होते. ‘चंदेरी’ बंद झाल्यानंतरही त्यांचा वारसा घेऊन चित्रपट अभ्यासकांची एक पिढी निर्माण झाली. गौतम यांच्या अकाली ‘एक्झिट’ने हे सारे कुटुंब पोरके झाले आहे.

(प्रहार, १४ सप्टेंबर २०११)

उत्सवमूर्ती (गौतम राजाध्यक्ष)

गालिचावर अस्ताव्यस्त पसरलेले मोठ्या आकाराचे फोटो..
त्या फोटोंच्या नैसर्गिक कोलाजमधून भुरळ घालणारे चित्रपट कलावंतांचे चेहरे.. क्षणभरासाठी मुखवटा दूर झाल्यासारखे.. निर्मळ.. त्या फोटोंच्या मध्यभागी गालिचावरच विराजमान एक तरुण चित्रपट अभ्यासक, आस्वादक, लेखक.. ते फोटो पाहताना त्याच्या चेह-यावर काय भाव उमटतायत, हे सोफ्याकडेला उभं राहून अतिशय एकाग्रतेनं, मिष्कील उत्सुकतेनं पाहणारे उत्सवमूर्ती गौतम राजाध्यक्ष.. 
फोटो पाहणा-या युवकाच्या चेह-यावर आपल्याला अपेक्षित भाव उमटला की त्यांचं खूष होणं.. तो विचारात पडला, तर यांचं चिंताक्रांत होणं आणि त्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं निगुतीनं व्यवस्थित, सांगोपांग, सविस्तर उत्तर देणं, असा मार्मिक प्रश्न सुचल्याबद्दल अपरंपार ओसंडून वाहणारं कौतुक व्यक्त करणं.. 
‘फेसेस’ या बहुचर्चित कॉफीटेबल बुकच्या पूर्वप्रसिद्धीवजा लेखाच्या निमित्ताने घडून आलेला परस्परकौतुकाचा सोहळा.
 ..ही गौतम राजाध्यक्षांची पहिली भेट होती यावर विश्वास न बसावा, असं हे दृश्य होतं.. तेही जेव्हा आपण गौतम राजाध्यक्षांबरोबर त्यांच्या घरात त्यांच्यासमोर बसलो आहोत, यावरही विश्वास बसणं कठीण होतं, त्या काळात. 
गौतम राजाध्यक्ष ज्यांचे फोटो काढायचे त्यांना मोकळं कसं करायचे, याचा तो वस्तुपाठ होता. या माणसाला समोरच्या माणसाशी संवाद साधण्याची विलक्षण हातोटी होती.  
‘तू बोलतोयस ते फार महत्त्वाचं आहे, ते मला मन लावून ऐकायचं आहे,’ अशी भावना ते समोरच्याच्या मनात इतक्या सहजगत्या निर्माण करायचे
आणि त्याला वात्सल्यपूर्ण भावमुद्रांची अशी काही चपखल जोड द्यायचे की समोरचा, आपलं वय काय, यांचं वय काय, आपली पात्रता किती, यांची थोरवी किती मोठी,  
आपली यांची ओळख होऊन अवघी काही मिनिटं तरी झाली आहेत का, याचा विचार न करता भडाभडा बोलू लागायचा.. बिनधास्त. त्या सगळ्या गप्पाटप्पांमध्ये या काकांनी मनातल्या मनात (नटनट्यांच्या बाबतीत प्रत्यक्ष कॅमे-याने) किती फोटो टिपले असतील, याचा त्याला पत्ताही लागायचा नाही. 
समोरच्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची निगेटिव्ह गौतमच्या मनात काही क्षणांत उमटून जायची, पण आश्चर्य म्हणजे तिच्यात त्या माणसातलं निगेटिव्ह काही कधी उमटायचंच नाही.. ‘प्रसिद्धी’साठी फोटो काढण्याच्या सरावामुळे असेल कदाचित,
पण गौतमनी काढलेल्या सर्व प्रकारच्या फोटोंमध्ये माणसांच्या अनगार्डेड मोमेंट्स आहेत ख-या; पण, आतल्या गाठी दिसत नाहीत.. त्यांचं कोवळं, निरागस माणूसपणच झगझगीतपणे समोर येतं..
हेही सहज-‘स्वाभाविक’च होतं म्हणा! जगण्याच्या प्रत्येक क्षणाचा छानसा उत्सव करून तो मस्त मजेत समरसून साजरा करणारा 
गौतमसारखा स्नेहाळ, रसाळ, ममताळू माणूस इतरांमधला मरतुकडा ‘क्षुद्र जंतू’पणा कशाला टिपत बसेल कावळ्यासारखा?
 ..‘फेसेस’च्या निमित्तानं झालेली भेट उभयपक्षी आनंददायी ठरली
आणि मग फोनवर गप्पांचा सिलसिला सुरू झाला. त्यातून एवढी भीड चेपली की तत्कालीन कार्यालयातल्या एका होतकरू मॉडेल युवकाला थेट गौतम राजाध्यक्षांच्या चरणी नेऊन घालण्याचं डेअरिंग अंगात आलं..
 ..हा अगोचरपणाच होता.. 
तो मॉडेल बनू पाहणारा मुलगा आपण साक्षात गौतम राजाध्यक्षांना भेटतो आहोत, या कल्पनेनं गार पडला होता.. गौतमना पाहताना ‘विठुमाऊली तू दीनांची साऊली’ असा श्रीविठ्ठलदर्शनप्राप्त वारक-याला साजेसा भाव त्याच्या चेह-यावर होता.. गौतमनी त्याला शांतपणे न्याहाळून, चालायला-बिलायला लावून सांगितलं काय
की ‘बेटा, तू काही मॉडेल बनू शकणार नाहीस..’ पण हे सांगितलं कसं, तर उपरोल्लेखित वाक्य बिलकुल न उच्चारता.  ‘अरे, मला वाटलं होतं हा कुणाला घेऊन येतो? तू तर छान देखणा आहेस.. आइल टेल यू, यू हॅव गॉट द फेस (‘द’वर जोर)..  
फक्त उंचीचा थोडा प्रश्न आहे, हल्ली लीन अँड लँकी मॉडेल्सची चलती आहे.. देव जाणे लोक काय बघतात त्या हडकुळ्यांमध्ये.. अं.. वजन मात्र तुला कमी करावंच लागणार.. एक्सरसाइझ करायला सुरुवात कर.. डाएट स्ट्रिक्ट.. एका महिन्यात मला अमुक इतकं वजन घटवून भेटलं पाहिजेस.. 
मग आपण मस्त फोटोसेशन करू.. मराठी मुलांनी आलं पाहिजे पुढे..’’ पत्रकारितेच्या अनियमित जीवनशैलीत पिचलेला तो युवक ही सगळी पथ्यं पाळून गौतमनी सांगितलेल्या ‘स्पेसिफिकेशन्स’चा होणं अशक्य होतं.. त्यामुळे मॉडेलिंगचं जग एका उत्कृष्ट मॉडेलला मुकणार, हेही स्पष्ट होतं.. झालंही तसंच. 
पण, त्यापेक्षाही वेगळं आणि सुखदाआश्चर्यकारक असंही काही झालं.. त्या मुलाच्या डोक्यातलं मॉडेलिंगचं खूळ यथावकाश निघून गेलं, तरी गौतमशी त्याचा संवाद कायम राहिला, त्याच्यासाठी गौतम हे कायमच फादर फिगर, फ्रेण्ड फिलॉसॉफर गाइड होऊन राहिले.. पोर्टफोलिओ काढण्यासाठी आलेल्या कितीजणांना ‘कटवण्याचं’ काम गौतमना करावं लागलं असेल..
पण, इतक्या मार्दवानं, ऋजुतेनं आणि सुसंस्कृतपणे समोरच्याला उणिवा दाखवायच्या आणि त्याचा हिरमोड न करता त्याला अशा प्रकारे वेगळ्या वाटेला लावायचं, यासाठी केवढी सहृदयता हवी!  
..फोटोमध्ये कॅमे-याच्या समोरचा माणूस दिसतो.. म्हणजे बहुतेक वेळा त्याने ठरवलेली पोझ दिसते, मुखवटा दिसतो.. आनंदी, विचारात बुडालेला, गंभीर, नुसताच देखणा वगैरे वगैरे.. क्वचित कधी मुखवटा दूर होऊन आतला माणूस दिसतो.. हे मुरब्बी फोटोग्राफरांच्या फोटोंमध्ये दिसतं.. 
पण, याच फोटोतून कॅमे-यासमोरच्या माणसाप्रमाणेच कॅमे-याच्या मागचा माणूसही लख्खपणे दिसणं हा चमत्कार झाला..
 ..गौतमच्या फोटोंमध्ये हा चमत्कार फांदीवर पक्षी बसावा इतक्या सहजतेनं घडायचा, तो उगाच नव्हे.   

(प्रहार, १७ सप्टेंबर २०११)

Sunday, September 4, 2011

ऑस्करचा घोळ

सुधेंदु रॉय हे नाव ऐकलंयत तुम्ही?

करेक्ट! 'मधुमती'पासून 'इंग्लिश बाबू देसी मेम'पर्यंत असंख्य सिनेमांचे नामांकित कलादिग्दर्शक सुधेंदु रॉय... त्यांच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे... त्यांचे (म्हणजे त्यांनी दिग्दशिर्त केलेले) दोन सिनेमे भारतातफेर् ऑस्करसाठी पाठवले गेले आहेत... 'उपहार' आणि 'सौदागर'...

... सुधेंदु रॉय यांच्या मालिकेत आणखी दोन दिग्दर्शकांचा समावेश होतो. मणिरत्नम ('अंजली' आणि 'नायकन') आणि शंकर ('इंडियन' आणि 'जीन्स'). या पंक्तीत यंदाच आणखी एका नावाची भर पडलीये... विधू विनोद चोप्रा... त्याचा 'परिंदा' ऑस्करसाठी पाठवला गेला होता आणि यंदा त्याच्या 'एकलव्य'च्या गळ्यात ही वरमाला पडली आहे... अमिताभ, संजय दत्त, सैफ अशी बडी नावं असतानाही बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटी खाल्लेल्या आणि समीक्षकांनीही तुफान झोडलेल्या 'एकलव्य'मध्ये ज्युरी मंडळाला एकदम ऑस्करपात्र गुणवत्ता कशी काय सापडली, हा सार्वत्रिक कुतूहलाचा विषय आहे. फिल्म इंडस्ट्रीतल्या अनेकांनी या चॉइसबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय. 'एकलव्य'च्या स्पधेर्त असलेल्या 'धर्म' या सिनेमाच्या टीमने तर ज्युरींवर पक्षपाताचा आरोप करून 'एकलव्य'ला कोर्टात खेचलंय. पण, त्याआधीच 'एकलव्य'ची रिळं अमेरिकेत पोहोचली आहेत. विधू विनोद आता सुधेंदु, मणिरत्नम, शंकर यांच्या मांडीला मांडी लावून बसायला मोकळे झाले आहेत...

भारतातफेर् 'ऑस्कर'साठी पाठवला जाणारा सिनेमा हा बाय डिफॉल्ट त्या वर्षातला भारताचा सवोर्त्तम सिनेमा असायला हवा. तसं शेजारच्या चौकटीतल्या यादीवर नजर टाकल्यावर वाटतं का? ऑस्करवारीच्या दुहेरी मानकऱ्यांच्या पंगतीत सत्यजित राय, श्याम बेनेगल यांच्यातलं कुणीही नाही. अदूर गोपालकृष्णन, मृणाल सेन, गिरीश कासारवल्ली, मृणाल सेन, ऋत्विक घटक, जी. अरविंदन, शाजी करूण, गिरीश कर्नाड, एम. टी. वासुदेवन नायर, बी. व्ही. कारंथ, जानू बारुआ, गोविंद निहलानी, अपर्णा सेन, बुद्धदेव दासगुप्ता आणि आपले जब्बार पटेल यांना तर एकेका एन्ट्रीचाही मान कधी लाभलेला नाही. भारतीय सिनेमातले माइलस्टोन्स म्हणून गणले गेलेले कित्येक प्रादेशिक आणि हिंदी सिनेमे या यादीत नाहीत. 'पायल की झंकार', 'सागर', 'हीना', 'रूदाली', 'जीन्स', 'इंडियन', 'हे राम' हे आपले क्लासिक्स आहेत?

आजवर ऑस्करसाठी भारतातफेर् पाठवल्या गेलेल्या सिनेमांच्या यादीतून स्पष्टपणे दिसतो तो सिनेमा निवडणाऱ्यांचा गोंधळ. वर्षाला हजाराहून अधिक सिनेमे तयार करणाऱ्या या देशातून नेमका कोणता सिनेमा ऑस्करसाठी पाठवायचा, याची टोटल कुणालाच लागत नाही. आता हा सगळा सरकारी मामला. खरंतर खासगी निर्माताही स्वत:च्या बळावर ऑस्करच्या परदेशी चित्रपट विभागाच्या स्पधेर्त दाखल होऊ शकतो. पण आपल्याकडे फिल्म फेडरेशन आणि माहिती प्रसारण खात्यानं निवडलेला सिनेमा हीच अधिकृत एन्ट्री मानली जाते. आता हेच सरकार आणि त्यांचं हेच खातं दरसाल चित्रपटांसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करतं. त्यात देशभरातल्या सर्व भाषांमधल्या उत्तम कलाकृती गौरवल्या जातात. त्यांच्यातली सवोर्त्तम कलाकृती सुवर्णकमळाची मानकरी ठरते. म्हणजे सुवर्णकमळविजेता सिनेमा हा आपसूकच त्या वर्षातला देशातला सवोर्त्कृष्ट सिनेमा ठरतो. मग सरकार सरळ त्या सिनेमाची एन्ट्री का पाठवत नाही ऑस्करला, हे एक कोडंच आहे.

आजवर ऑस्करला पाठवल्या गेलेल्या सिनेमांमध्ये हिंदी सिनेमांची संख्या सर्वाधिक आहे. हिंदी ही मेनस्ट्रीम सिनेमाची भाषा आहे, तिचा प्रेक्षकवर्ग सर्वाधिक आहे, या भाषेतही आशय-विषय-मांडणीचे प्रयोग करणारे निर्माते-दिग्दर्शक पैदा होऊ लागले आहेत, हे सगळं खरं. पण, तरीही हिंदी ही मूलत: भारतीय सिनेमातल्या सरमिसळ गल्ल्याची, आटपाटनगरातल्या रसाळ पण काल्पनिक कहाण्यांचीच भाषा राहिली आहे. भारतीय मातीचा खरा गंध तिच्यात फार कमी वेळा दरवळलाय. भारतीय सिनेमाकलेच्या श्रेष्ठतेचे मानदंड ठरतील, अशा हिंदीतल्या कलाकृतींची संख्या किती? (आपल्याला मराठीव्यतिरिक्त फक्त हिंदी सिनेमाच ठाऊक असतो, त्यामुळे आपल्या 'ज्ञाना'वर विसंबू नका.)

आपल्या राष्ट्रीय पुरस्कारांचंच उदाहरण घेऊ. दरसाल या पुरस्कारांमध्ये सर्वाधिक पारितोषिकं पटकावण्यात आघाडीवर असतात ते मल्याळी आणि बंगाली सिनेमे. इंडियन पॅनोरमाच्या चित्ररत्नांच्या दरबारात हिंदी सिनेमाचा रुतबा जेमतेम पंचहजारी मनसबदाराचाच राहिला आहे वर्षानुवर्षं. अशा 'दरिदी' भाषेतले सिनेमे ऑस्करला का गेले वर्षानुवर्षं? हिंदीतले त्या त्या वषीर्चे सवोर्त्तम सिनेमे निवडले गेलेत, असंही नाही.

खरंतर ऑस्कर आपण अगदी अलीकडेपर्यंत कधी सिरियसली घेतलंच नाही. आपल्या पहिल्याच एन्ट्रीनं (मदर इंडिया) ऑस्करच्या अंतिम स्पधेर्त धडक मारल्यानंतरही आपण गाफील राहिलो. आपल्याला तशी गरजही भासली नाही. आपली इंडस्ट्री ही 'जगात सर्वाधिक सिनेमे बनवणारी फिल्म इंडस्ट्री'. आता ही ओळख म्हणजे 'टिंबक्टू हा जगात सर्वाधिक आंबे पिकवणारा देश आहे,' इतकी फुटकळ ओळख झाली- खरी ओळख असते 'हापूस'चा देश असण्यात. पण, मुळात भारतीय सिनेमाला जागतिक महत्त्वाकांक्षाच नव्हती. पुढे कर्तबगार भारतीयांनी परदेशांत धडक मारून जगभरात मिनी गुजरात, मिनी पंजाब, मिनी केरळ तयार केले ('मिनी भारत' म्हणणं फार धाडसी होईल). या सगळ्यांच्या मनोरंजनाच्यागरजांचा 'मसावि' म्हणजे हिंदी सिनेमा. तो परदेशांत व्यवस्थित रिलीज करून डॉलर-पौंडात पैसे कमावण्याची आयडिया (अर्थातच) चोप्रांच्या डोक्यात आली आणि मग ग्लोबल इंडियाची छनछनाटी ताकद गरीब बिच्चाऱ्या भारताला उमगू लागली. हॉलिवुडपटांचं प्राबल्य असलेल्या अखिल जगताच्या टेरिटरीत शिरकाव करायचा, तर ऑस्करसारखा जागतिक मान्यतेचा शिक्का उमटायला हवा, यासाठी आत्ता कुठे भारतीय सिनेमा सिरीयसली प्रयत्न करायला लागलाय. ऑस्करसाठी पाठवायला निवड झालेल्या सिनेमांचे निर्माते-दिग्दर्शक लगेच इमाने इतबारे आमिर खान, आशुतोष गोवारीकरांची शिकवणी लावतात लॉबिइंगसाठी. न जाणो आपला मटका लागला तर! (ऑस्करची निवडपद्धत आणि तिथल्या ज्युरींचं भारत आणि भारतीय सिनेमाबद्दलचं 'ज्ञान' लक्षात घेता, लागेल तेव्हा तो 'मटका' असण्याची शक्यता जास्त आहे.)

विदेशी सिनेमासाठीचं ऑस्कर भारतीय सिनेमाला मिळवण्याबद्दल आपण सजग झालो खरे; पण त्यामुळे गुंता वाढतच चाललाय.

कोणता सिनेमा पाठवायचा ऑस्करला?

भारताचा सिनेमा अशी काही एकसंध ओळख आहे का?

हिंदी सिनेमानं रूढ केलेला 'मसालापट' हीच एकमात्र 'भारतीय मनोरंजक' सिनेमाची ओळख आहे. प्रादेशिक भाषांमधला निव्वळ मनोरंजक सिनेमाही त्याच मसाल्यातून बनतो. कुठे थोडं आलं जास्त, कुठे थोडा मिरचीचा झणका अधिक. पण, सिनेमाकलेमधली भारताची प्रगती दाखवणारे, त्या कलेला खास भारतीय टच देणारे सिनेमे मात्र प्रांताप्रांतात वेगवेगळ्या शैली घेऊन अवतरतात. लेखात सुरुवातीला उल्लेखलेल्या मल्याळी, कन्नड, बंगाली आणि अन्य भाषिक दिग्दर्शकांच्या कलाकृती आठवून पाहा. त्यांच्यातली एखादी कलाकृती भारतासाठी 'ऑस्कर' नसती आणू शकली?

पण, 'हा सिनेमा युरोपियन, अमेरिकन सिनेमाकडून प्रेरणा घेणारा आहे', 'ही स्टाइल हॉलिवुडवाल्यांच्या परिचयाची आहे', 'या सिनेमात भारतातल्या दारिद्याचं दर्शन घडतं', असली कारणं देऊन आपण हा सिनेमा पाठवला नाही. त्यापेक्षा खऱ्या भारताशी संबंध नसलेला हवेतला हिंदी मसाला सिनेमा पाठवून आपल्या अकलेच्या दारिद्याचं दर्शन घडवणं श्रेयस्कर मानलं आपल्या निवडर्कत्यांनी.

मसाला सिनेमा हीच आपली 'ओळख' मानून 'हीना', 'जीन्स', 'इंडियन'सारखे सिनेमे पाठवले गेले. हिंदी व्यावसायिकपटाचा फॉरमॅट (गाणी, नाट्य, प्रेम, थरार वगैरे होलसम पॅकेज) वापरून उत्कृष्ट 'कथाकथन' करणारा 'लगान' एखादवषीर्च गवसला आपल्याला. कधी भारतीय सिनेमातला सगळा चकचकाट पाहून (तरी) ऑस्करच्या परीक्षकांचे डोळे दिपतील, या विचारानं आपण बंगाली सेन्सिबिलिटीची कथा गुजराती भडकपणानं मांडणारा 'देवदास' (अर्थातच नवा) ऑस्करवारी करून येतो. कधी भारतात अत्यंत नाविन्यपूर्ण असलेल्या शैलीत तरुण पिढीची कहाणी सांगू पाहणारा 'रंग दे बसंती' पाठवला जातो. कधी पाश्चात्यांच्या परिचयाचा 'साधू आणि रोप ट्रिक'वाला मिस्टिकल, एक्झॉटिक भारतच पाठवून पाहूयात ('पहेली', 'एकलव्य') असं गणित मांडलं जातं.

आणि मग गणित कसंही मांडा... उत्तर शून्य येतं.

कारण अस्सल सिनेमाची अशी गणितं मांडता येत नाहीत.

किंबहुना फिल्ममेकिंगची, जॉन्र, शैलीची गणितं डोक्यात ठेवून समोर बसलेल्या प्रेक्षकाला त्या सगळ्या गणितांचा कम्प्लीट विसर पाडून आपल्यामध्ये पार बुडवून टाकणाऱ्या सिनेमाचीच अशा स्पधेर्त सरशी होते...

... असा सिनेमा भारतात बनत नाही का?

बनतोच ना, निश्चितच बनतो. फक्त कोणतीही गणितं मांडत न बसता सिनेमाचा दर्जा हा एकच निकष ठेवून त्या आधारावर सिनेमा निवडण्याची धमक ज्युरींनी दाखवायला हवी.

साल चित्रपट दिग्दर्शक

१९५३ मदर इंडिया................ मेहबूब खान

१९६२ साहिब बिवी और गुलाम....अब्रार अल्वी

१९६९ दैवमागन............ ए. सी. त्रिलोकचंदर

१९७१ रेश्मा और शेरा..............सुनील दत्त

१९७२ उपहार...................... सुधेंदु रॉय

१९७३ सौदागर..................... सुधेंदु रॉय

१९७४ गर्म हवा..................एम. एस. सथ्यु

१९७७ मंथन श्याम बेनेगल

१९७८ शतरंज के खिलाडी सत्यजित राय

१९८० पायल की झंकार सत्येन बोस

१९८४ सारांश महेश भट

१९८५ सागर रमेश सिप्पी

१९८६ स्वाती मुथ्थयम के. विश्वनाथ

१९८७ नायकन मणिरत्नम

१९८८ सलाम बाँबे मीरा नायर

१९८९ परिंदा विधू विनोद चोप्रा

१९९० अंजली मणिरत्नम

१९९१ हीना रणधीर कपूर

१९९२ थेवर मगन भारतन

१९९३ रूदाली कल्पना लाझमी

१९९४ बँडिट क्वीन शेखर कपूर

१९९५ कुरुथी पुनाल पी. सी. श्रीराम

१९९६ इंडियन शंकर

१९९७ गुरू राजीव अंचल

१९९८ जीन्स शंकर

१९९९ दि अर्थ दीपा मेहता

२००० हे राम कमलहासन

२००१ लगान आशुतोष गोवारीकर

२००२ देवदास संजय लीला भन्साळी

२००४ श्वास संदीप सावंत

२००५ पहेली अमोल पालेकर

२००६ रंग दे बसंती राकेश ओमप्रकाश मेहरा

२००७ एकलव्य द रॉयल गार्ड विधू विनोद चोप्रा

बोले तो हिट... बापू... (लगे रहो मुन्नाभाई )

आयला , हे सगळीकडे काय अजब सुरू झालंय , मामू ?

बोले तो , होल इंडियाचा भेजा सटकलाय काय ?

लीडरलोकांनी नोटेत बंदिस्त करून टाकलेला , भिंतींवर टांगून ठेवलेला , चौकाचौकांत चौथऱ्यांना जखडून ठेवलेला ' बापू ' एकदम पब्लिकमध्ये कसा आला ? सत्य , अहिंसा वगैरे बुळबुळीत **गिरीची त्याची शिकवण एकदम ' गांधीगिरी ' म्हणून ' इन थिंग ' होऊ लागलीये ?... एका गालावर कुणी हाणलं , तर त्याचा हात उखडून टाकण्याची मर्दानी शिकवण देण्याऐवजी दुसरा गाल पुढे करा , म्हणून सांगणारा मॅड म्हातारा तो... त्याला ' बंदे मे था दम ' म्हणून नावाजायला लागलेत शहाणेसुतेर् लोक!.... आणि जिकडे बघावं तिकडे ' गांधीगिरी ' चे प्रयोग करायला लागलंय आम पब्लिक!...

... ये क्या हो रहा है ?....
 

... लीकेज , जरा साइड मे खिसक ले. अपुन का भाय , मुन्नाभाय आयेला है... साथ मे ' बापू ' कोभी वापस लायेला है! ' बापू ' बोले तो... अख्खी इंडिया का बापू! समझा क्या ? विनम्र से समझा रहेला है , समझ ले.

तुमच्या आसपास , रस्त्यावर , लोकलमध्ये , बसमध्ये पब्लिक एकमेकांशी ' बोले तो ' च्या भाषेत बोलत असेल , तर आश्चर्य वाटून घेऊ नका. सीझन ' मुन्नाभाई ' चा आहे... आणि चक्क महात्मा गांधींचा आहे...

 

 ... येस्स , ज्या गांधींचा उल्लेख झाला तर टिचभर अकलेचे लोक ' ह्या देशाचं वाट्टोळं करणारा म्हातारा ' असं (यापेक्षा बऱ्याच असभ्य भाषेत) बोलतात आणि तीच पुढच्या पिढीसाठीही गांधींची सोपी ' ओळख ' होते... तेच गांधी त्यांच्या सोप्या तत्त्वज्ञानासह चक्क तरुण पिढीपर्यंत पोहोचताहेत... तेही त्यांच्या भाषेत...

... साक्षात महात्म्याला पुन्हा एकदा रेलेव्हंट करणारा महापुरुष... ' मुन्नाभाय '!

 

 ... हे तर जामच अजब आहे... मुन्नाभाई एक सडकछाप टपोरी... औपचारिक शिक्षणाचा गंधही नसलेला गुंडा... याचा धंदा बड्या लोकांचे दोन नंबरचे बडे लोच्ये निस्तरणं , म्हणजे काही लोकांची हाडं मोडणं , काहींना धमक्या देणं , कधी कुणाला ' उचलणं ', बिल्डरांसाठी घरं रिकामी करून देणं... थोडक्यात टोटल भाईगिरी... त्यातून कमावलेल्या बक्कळ पैशातून तो सर्व फिल्मी अँटिहिरोंप्रमाणे बस्तीवाल्या लोकांना सढळहस्ते मदत करत असणार... त्याला त्याच्या एरियात असलेला फुल सपोर्ट याचीच ग्वाही देणारा. (सिनेमाच्या विनोदी स्वरूपामुळे आणि भल्याबुऱ्यात नायकाच्या कायम बरोबर राहण्याच्या प्रेक्षकाच्या सवयीमुळे प्रेक्षकही सिनेमाच्या पहिल्या फ्रेमपासून त्याचे ' बस्तीवाले ' होऊन जातात. त्याच्या कारवाया हास्योत्पादक ठरतात , हाणामाऱ्या कार्टून फिल्ममधल्या मारामाऱ्यांसारख्या वाटतात... खोट्याखोट्या आणि एन्जॉयेबल.) बऱ्यावाईटाचा कसलाही विधिनिषेध नसलेला हा भैताड इसम.  

असल्या माणसाच्या मुखातून गांधींचं तत्त्वज्ञान येणं म्हणजे सैतानानं बायबलवर प्रवचन देण्यासारखं... पण , ' लगे रहो मुन्नाभाई ' च्या र्कत्यांनी (दिग्दर्शक राजकुमार हिराणी , लेखक अभिजात जोशी) हा चमत्कार फार सफाईनं घडवून दाखवलाय... आधीच्या भागात राजकुमार हिराणीनं मुन्नाभाईच्या तोंडून आणि कृतीतून ' प्यार की झप्पी ' चं अनोखं , अतिशय इफेक्टिव्ह आणि सुरेख तत्त्वज्ञान प्रेक्षकांच्या गळी उतरवलंच होतं... त्यामुळे , या पुढच्या आणि स्वतंत्र भागातलं काम काहीसं सोपं झालेलं आहे.

अॅक्चुअली , यात चमत्कारापेक्षा अक्कलहुशारीचा भाग मोठा आहे...

 

 गणितातलं गृहीतक कसं सिद्ध करण्याची एक पद्धत आहे... ए प्लस बी इज इक्वल टू सी , हे गृहीतक सिद्ध करायचं असेल , तर ए प्लस बी इज नॉट इक्वल टू सी अशी सुरुवात केली जाते... मग , पुढच्या आकडेमोडीत हे गृहीतक चुकीचं सिद्ध होतं आणि ज्याअथीर् ते चुकीचं आहे , त्याअथीर् ' ए प्लस बी इज इक्वल टू सी ' हेच सिद्ध होतं , अशी ही ढोबळ पद्धती... ' मुन्नाभाई ' तेच करतो. काहीजणांसाठी गांधी हा विस्मरणात गेलेला महात्मा , कोणीतरी मोठा लीडर आहे , तर काहींसाठी फाळणी घडवून पाकिस्तान नावाचा हाडवैरी भारताच्या बोडक्यावर बसवून देशाची वाट लावणारा नतदष्ट म्हातारा... 
 या माणसाची सत्य , अहिंसा वगैरे शिकवण आजच्या काळात भाकड. या स्पधेर्च्या , यशासारखं यशस्वी काहीच नसण्याच्या , पैसा हाच परमेश्वर असण्याच्या युगात गांधीवाद अगदीच इम्प्रॅक्टिकल आणि मुळमुळीत शामळू... मुन्नाभाईला तर गांधींबद्दल एकच मौलिक माहिती... या माणसाच्या हॅपी बर्थडेला ' ड्राय डे ' असतो... तो सुरुवातीलाच गांधींचा एकेरीत , बराचसा अज्ञानजन्य अवमानकारक उल्लेख करतो... इथेच त्याची नाळ आम पब्लिकशी जोडली जाते.... कारण त्या पब्लिकच्या मनातले गांधीजी असेच आहेत...

 

 ... छावीला गटवण्याच्या भानगडीत मुन्नाला गांधीवाङ्मयाचा क्रॅश कोर्सच करावा लागतो. दिवसरात्र गांधींबद्दल वाचल्यानं ' बापू ' त्याच्यासमोर आणि त्याच्यापुरतेच सगुण साकार होऊन येतात. त्याच्या भाषेत त्याच्याशी बोलतात. संकटात त्याच्या मदतीला धावतात. आयुष्यातल्या समरप्रसंगांना सामोरं जाण्याचा बापूंचा काहीएक विशिष्ट आणि प्रचलित मार्गांपेक्षा भलताच भिन्न मार्ग आहे , असं त्याच्या लक्षात येतं... हा मार्गही तो लगेच अनुसरत नाही... इतर मार्गांनी फटके बसल्यानं तो नाईलाजानं हा मार्ग वापरून पाहतो आणि तो चक्क यशस्वी होतो... 

एफएम रेडिओच्या माध्यमाची व्याप्ती आणि पटकथेची खुबीदार रचना यांतून लेखक-दिग्दर्शकांनी हा मार्ग कल्पकतेनं विश्वसनीय केला आहे. उदाहरणार्थ , ' डाव्या गालावर कुणी मारलं , तर उजवा गाल पुढे करा ', यासारखं व्यवहारात निव्वळ मूर्खपणाचं , नेभळेपणाचं वाटणारं तत्त्वज्ञान त्यांनी किती हुशारीनं प्रमोट केलंय , ते पाहण्यासारखं आहे...

 

  ... मुन्नाभाई सर्वकाळ आपल्या रस्त्यावरच्या जगण्यातून आलेल्या टपोरी तत्त्वज्ञानाच्या माध्यमातूनच गांधीवाद (त्याच्या भाषेत ' गांधीगिरी ') आत्मसात करतो , हे सर्वात महत्त्वाचं आहे... प्रेक्षक सदासर्वकाळ त्याच्या बाजूने , त्याच्याबरोबर असतो... त्याच्याबरोबरच तोही गांधींची मस्करी करतो... गांधींच्या तत्त्वज्ञानाबद्दल शंका उपस्थित करतो... गांधींचे मुन्नावरचे प्रयोग साशंक मनाने पाहतो... आणि मग लेखक-दिग्दर्शकांनी आखून दिलेल्या चौकटीतलं त्यांचं हमखास यश अनुभवतो... त्या तत्त्वज्ञानानं थरारूनही जातो... त्यानं वास्तवातल्या अॅप्लिकेबिलिटीची शक्यताही गृहीत न धरलेला , बुळा वाटणारा मार्ग इतका प्रभावी असू शकतो , ही कल्पनाच थरारक ठरते...
 

' गांधीवाद ' या संकल्पनेभोवती जमलेली (तथाकथित गांधीवाद्यांनीच जमवलेली) कळकट जळमटं झटकून तो अपडेटेड ' गांधीगिरी ' च्या रूपात सादर करणारी ही तत्त्वज्ञानाची गुटिका दजेर्दार नर्मविनोदाच्या , मानवी भावनांच्या , हलक्याफुलक्या प्रणयरम्यतेच्या शर्करावगुंठनातून प्रेक्षकाच्या गळ्यात अगदी आपसूक उतरते. त्यात लोच्या फक्त एकच आहे... लेखक-दिग्दर्शकांनी विनोदी सिनेमाच्या ' कन्ट्रोल्ड एन्व्हायरनमेंट ' मध्ये हे तत्त्वज्ञान मांडलंय. इथला व्हिलन लक्की सिंगही वास्तवातल्या खलपुरुषांच्या तुलनेत ' बापू ' वाटावा , इतका सौम्य आहे... त्याचं हृदयपरिवर्तन पटण्याला काही वाव आहे... ' मुन्नाभाई ' च्या गांधीगिरीचं लॉजिक वास्तवातल्या कितीतरी पट अधिक निबर आणि संवेदनाहीन समाजात , स्वार्थानं , ताकदीनं आंधळ्या झालेल्या पुंडांच्या संदर्भात कितपत इफेक्टिव्ह होईल , हा मोठा प्रश्ान् आहे... इथे साक्षात बापू अवतरले असते , तरी त्यांना डोकं फोडून घेण्याची वेळ आली असती...

मग , ' मुन्नाभाई ' फक्त सिनेमाच्या तीन तासांपुरताच गृहीत धरायचा का ?...
  

 ... तसं तरी का करावं ? या समाजात संवेदना जागृत असलेली अनेक माणसं सुप्तपणे आपलं काम नीट करत असतात , इतरांना आपला त्रास होऊ नये , याची काळजी घेतात , मागच्यांना पुढे येण्यासाठी हात देत असतात , व्यापक समाजहितासाठी झटत असतात... किमान तशी प्रेरणा त्यांच्यात असते.  

अशांच्यावर चहूबाजूंनी ' हाऊ टु बिकम सक्सेसफुल ' छापाचा , गळेकापू स्पधेर्च्या जाहिरातींचा मारा सुरू असतो. जगात यशस्वी व्हायचं तर कुणाला तरी पाडूनच पुढे जावं लागतं इथपासून ते ' दुनिया गेली बोंबलत , तुमचं तुम्ही पाहा तुमच्यापुरतं ' अशा प्रकारचं तत्त्वज्ञान आजच्या युगाचं म्हणून मांडलं जातं. एकीकडे माणसाला आत्मकेंदित करत जाणारा हा मारा , दुसरीकडे समष्टीचं भानच नष्ट व्हावं इतका विखुरलेला समाज आणि तिसरीकडे या सगळ्यावर उतारा म्हणून ' ही इज द हू इन द आय ऑफ द ही ' असल्या भोंगळ बडबडीनं भरलेलं किंवा खिशावर बिल्ला लावून अणुस्फोटापासून संरक्षण देण्याच्या मूर्ख वल्गना करणारं तथाकथित आध्यात्म...  

यात रोजचं आयुष्य जगताना नेमकं काय करावं , व्यावहारिक जगात (स्वार्थांध न होता) कसं वागावं , याचा धडा काही मिळत नाही. माणसांचे माणसांशी संबंध हे या जगाच्या चलनवलनाच्या मुळाशी आहेत. त्यांचा रोज एकमेकांशी तरतऱ्हेच्या सिच्युएशन्समध्ये संपर्क येतो , तो संवादी व्हावा , संघर्ष टळावा , यासाठी काय करता येईल ? कोणती मूल्यं आपल्यात भिनवता येतील , हे सांगणारं कोणीच नाही आसपास...
  

 ...' मुन्नाभाई ' काही अंशी ही गरज भागवतो. सडकछाप असल्यामुळं तो थेट माणसांना भिडतो. कधी तो ' जादू की झप्पी ' चं सर्वत्र सहज अॅप्लिकेबल होऊ शकणारं सोपं तत्त्वज्ञान मांडतो , स्वत:च्या अनुभवांतून ते परिणामकारक बनवून दाखवतो. तर कधी बापूंनाही ' बोले तो लोच्या होगा ' या भाषेत बोलायला लावतो.
   

 म्हणून तर माथेफिरूंच्या गोळ्यांनी न संपलेले ' बापू ' आजही आपल्यासारख्यांच्या भेजात ' केमिकल लोच्या ' करू शकतात!