Tuesday, March 8, 2011

कार क्लच परिवार

नमस्कार ,
ओळखलंत मला ? परवा ' कार क्लच परिवार ' पुरस्कार सोहळा पाहिलात की नाही ? ( म्हणजे आपली ' स्टार प्लस ' वाहिनी हो! तिथलं ' क ' चं चलन लक्षात घेऊन आम्ही प्रेमानं तिला ' कार क्लच ' च म्हणतो.) त्या सोहळ्यात पुरस्कार देण्यासाठी कलावंतांबरोबर काही मतदार प्रेक्षकांचीही वणीर् लागली होती ना! त्यातला जत्रेत हरवलेल्या मुलासारखे भाव असलेला चेहरा आठवतो ? तोच मी.
मीच नाही , तर आमचा सगळा परिवारच कार क्लच करिवार... सॉरी परिवार आहे. (आमच्या घरात 22 माणसं. बऱ्याचदा आईबापांना आपलंच पोर समोर उभं राहिलं तरी नाव आठवत नाही पटकन ; पण , कोमोलिका कोणती , कृष्णा कोणती , ' संजीवनी ' ची नायिका कोण , हे आम्हा सर्वांना एका फटक्यात ओळखता येतं... तेही या सगळ्या एकमेकींसारख्याच दिसत-बोलत- वागत असताना.)
या कार क्लचवरच्या मालिकांनी आमच्या आयुष्यात संपूर्ण क्रांती घडवून आणलीये. या मालिकांतल्यासारखंच आमचंही एकत्र कुटुंब आहे , हे (सदस्यसंख्येवरून) लक्षात आलंच असेल तुमच्या! 50 वर्षांपूवीर् आमचे वडील आणि तीन काका गिरगावातल्या चाळीत एका पंधरा बाय बाराच्या खोलीत राहायला आले. त्यांच्यात आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांत (त्या काळी टीव्ही नसतानाही) कोणीच कर्तबगार निपजलं नाही. त्यामुळे सर्वांच्या सर्व पिढ्या मिळून आजही त्याच घरात राहात आहोत आम्ही सगळे. काही वर्षांपूवीर्पर्यंत आमच्या घरात सतत भांडणं , कुरबुरी , मारामाऱ्या , तमाशे सुरू असायचे. पण , कार क्लचचे कार्यक्रम सुरू झाले , केकता... सॉरी एकता कपूर प्रसन्न झाली आणि आमचं आयुष्यच पालटलं हो!
एकमेकांशी भांडण्याऐवजी आम्ही कार क्लचच्या सिरियल्समधली भांडणं मन लावून पाहू लागलो. आमच्या आया , बायका आणि बहिणींना , कार क्लचमधल्या जावा-नणंदा- सास्वा-सुनांमधली शाब्दिक आणि खरोखरची झिंज्याउपटाउपटी पाहताना एकमेकींच्या झिंज्या उपटण्याचा विसर पडू लागला. आमच्या अंधाऱ्या , जळमटयुक्त (जळमटं काढायचं काम कुणाचं , यावर महिलावर्गात अजून- म्हणजे गेली 45 वर्षे एकमत झालेलं नाही) अशा त्या टिचभर खोलीतही जेव्हा आम्ही एकमेकांना पाहतो , तेव्हा आम्ही एकमेकांना कार क्लच परिवारांच्या आलिशान बंगल्यांतल्या सॉफ्ट लायटिंगमधल्यासारखेच देखणे , उमदे , रुबाबदार दिसतो. आमच्या बायकाही अंगावर भरजरी साड्या ल्यालेल्या दिसू लागतात. आणि पोरं तर आईबापांच्या खिशांना खार लावून , तरतऱ्हेच्या हेअरस्टायली करून , डिझायनर कपडे-बूट खरेदी करून खरोखरीच तशी दिसू लागली आहेत.
आमचं आयुष्य असं ' समृद्ध ' करणाऱ्या या वाहिनीवरचा आवडता परिवार निवडायची संधी मिळाली आणि त्यातून थेट त्या सोहळ्याला स्टेजवरच उपस्थित राहण्याची संधी मिळाली तेव्हा आमचे सगळे पितर स्वर्गात (मोठ्या , स्वतंत्र खोल्यांत) गेल्याचा भास झाला...
... त्या कार्यक्रमात सर्वात जास्त आवडले ते फेवरिट सौत (सवत) पुरस्कार आणि (हे पुढचं आपल्यातुपल्यातच हां) त्या उफाड्याच्या सवती.
संध्याकाळी ' सौं ' ना गांभीर्यपूर्वक म्हणालोही , ' आपल्या कार क्लच परिवारात एकच उणीव आहे... सवतींची. ' तर तीही गांभीर्यपूर्वक म्हणाली , ' एक नाही. दोन उणिवा आहेत. मला सवत नाही आणि तुम्हाला सवता नाही. आपण दोघांनीही आता या उणिवा दूर करण्यासाठी मन:पूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. तसा एकजण पाहिलाय मी... '

(महाराष्ट्र टाइम्स)

1 comment:

  1. aani jel madhye janyaache savay hi laavun ghyaayala havi te hi sadhyaa 'in' aahe nahi kaa.

    ReplyDelete