Wednesday, March 9, 2011

दुर्गाबाई ते माधुरी

एक प्रश्न... हिंदीतल्या मठ्ठ नायिका आठवा...

... थांबा थांबा थांबा! हातापायाची सगळी बोटं संपून मोजमापासाठी आणखी काहीतरी शोधायला लागण्याच्या आत थांबा...

आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या...

हिंदीतल्या मठ्ठ मराठी नायिका आठवा...

...पडली ना विकेट? अगदी चटकन् आठवलीच तर कुणाला ममता कुलकर्णी आठवेल... फारच सिनेमातला किडा असाल, तर काजल किरणचं नाव ओठावर येईल... (पण ' हम किसी से कम नहीं ' मधल्या काजल किरणच्या मठ्ठपणापेक्षा तिचा गोडवाच जास्त लक्षात राहिला, हेही स्वत:ला बजावाल.) पण, कितीही प्रयत्न केलात, स्मरणशक्तीला कितीही ताण दिलात तरी ही यादी हाताच्या पाच बोटांची मर्यादा ओलांडून पुढे जायची नाही...

...हेच तर हिंदीतल्या आपल्या मराठी नायिकांचं वैशिष्ट्य आहे...

दुर्गाबाई खोट्यांपासून माधुरी-ऊर्मिलार्यंत किती मराठी नायिका हिंदीच्या 'सम्राज्ञी' वगैरे झाल्या, तो हिशोब बाजूला ठेवला, तरी एक पक्कं... मराठी नायिकांनी हिंदीत आपलं नाणं अगदी खणखणीत वाजवलेलं आहे... आपल्याला लाभलेल्या कारकीर्दीच्या आणि भूमिकांच्या मर्यादेतला आपापला परीघ त्यांनी उजळला आहे... सहसा पडद्यावर 'दिवे' लावले नाहीत...
सिनेमा म्हणजे वाया गेलेल्या पोट्ट्यांचा आणि कलावंतीणींचा, गणिकांचा बदनाम 'धंदा' होता, तेव्हा आपली खानदानी प्रतिष्ठा या व्यवसायातल्या पोरींच्या पाठिशी उभी केली ती सुविद्य दुर्गाबाई खोट्यानी. महाराणीचं रूप आणि अदब घेऊन त्या पडद्यावर आणि पडद्यामागे वावरल्या... या मोठ्या घरच्या, शिकल्या-सवरलेल्या बाईही सिनेमात काम करताहेत, तर सिनेमाधंदा दिसतो तेवढा वाईट नसावा, असा विचार करून कितीतरी पापभिरू बापांनी आपापल्या लेकींना रूपेरी पडद्यावर नशीब आजमावण्याची परवानगी दिली असेल... आजच्या अनेक नट्यांनी कॅमेऱ्यासमोर जाण्याआधी मनोमन दुर्गाबाईंना नमन केलं पाहिजे... त्या नसत्या, तर याही नसत्या.
तेव्हा हिंदीच कशाला, एकूणच भारतीय सिनेमावर मराठीचा पगडा होता. हिंदी सिनेमाचा सूर्य पुण्याच्या 'प्रभात' मधून उगवायचा... मग प्रांताप्रांतातल्या सिनेमासृष्टींची सूर्यफुलं त्या दिशेनं माना वळवायची. 'प्रभात' बोले आणि सिनेमा हाले, अशा सुवर्णकाळात शांता आपटेंचं (आणि प्रभातच्या सगळ्याच कलावंतांचं) मराठी उच्चारवळणाचं हिंदी कधी कुणाला खटकायचं नाही... (पुढे आपण पंजाबी वळणाचं हिंदी 'अधिकृत' म्हणून स्वीकारलंच ना?) लक्षात राहायची ती त्यांची तेजतर्रार नजर आणि चोख अभिनय.
एकीकडे वनमालाबाईंच्या राजस रूपानं एकाच वेळी पृथ्वीराज कपूर आणि शशी कपूर या बापलेकांवर गारूड केलं होतं. त्याचवेळी अंबूताई ऊर्फ ललिता पवारांच्या रूपानं हिंदीत बोल्ड ग्लॅमर गर्ल अवतरली होती. (त्यांच्या त्या काळातल्या पोझेस पाहिल्या, तर हिंदी सिनेमा पूर्वकाळातच किती उत्तराधुनिक होता, याचं भान येईल.) 
शोभना समर्थांची सीता तर साक्षात प्रभू रामचंद्राचीच सीता म्हणून अखिल भारतवर्षानं स्वीकारली होती.
खास मराठी बाण्यानं प्रभातोत्तर काळात मराठी माणसांनी हिंदीतला व्यवसाय गमावला. व्यवसायकुशल सिंधी-पंजाब्यांनी सिनेमाधंद्यावर अल्लाद पकड बसवली, 'प्रभात'ची तुतारी विरून गेली, तरी मराठी नायिकांची सद्दी संपुष्टात आली नाही. 
कसा कोण जाणे, पण मराठीतला नायक कधी हिंदीत गेलाच नाही... गेला तो टिकला नाही... टिकण्याची शक्यता होती, तो रमला नाही... पण मराठीचा झेंडा नायिकांनी मात्र हिंदीत फडकता ठेवला.
स्नेहप्रभा, लीला चिटणीस, उषाकिरण, नलिनी जयवंत, संध्या, जयश्री, राजश्री, या नायिका भले 'नंबर वन-टू' च्या शर्यतीत गणल्या गेल्या नसतील; पण, प्रत्येकीच्या नावावर त्या त्या काळातल्या काही उत्तम कलाकृतींमधल्या उत्तम भूमिका आहेत.
मराठीतल्या सगळ्याच नट्या सौदामिनी, त्यांनी हिंदीचं आकाश लखलखून टाकलं, असली 'बाणेदार' भाषा खोटी ठरेल... पण, दिवलीचाही स्निग्ध प्रकाश पडतोच आणि तो छोटा आसमंत उजळवतोच. ते काम मराठी नट्यांनी इमाने इतबारे केलं.
हिंदीतल्या टॉपच्या नायिकांमध्ये इज्जतीत जाऊन बसलेली नायिका म्हणजे नूतन. ब्लॅक अँड व्हाइट पडद्यावर चैतन्याचे रंग भरणारं सात्त्विक तरीही आवाहक रूप आणि अभिनय यांचा असा संगम पुन्हा पाहायला मिळाला नाही. वहिदा, मीनाकुमारी, मधुबाला, नर्गिस यांच्याबरोबरच नूतनही राज्य गाजवत असताना शशिकलाबाईंसारखी उन्मादक व्हँप या सगळ्यांच्या नायकांना आकर्षून घेण्याची जबाबदारी पार पाडत होती.
(काही नायिका तर इतक्या बोगस होत्या की एकदम फंडू आयटम दिसणाऱ्या शशिकलाबाईंना सोडून त्या काकूबाई नायिकेच्या पदरात लपणारा नायक 'पांडू'च वाटायचा.) अंबूताई पवारांनी ललिता पवार बनून चरित्र भूमिकांचं सोनं करायला सुरूवात केली होती. सुलोचनाबाईंच्या रूपानं हरएक भारतवासीयाच्या मनातली 'माँ'च पडद्यावर हाडामांसात वावरत होती.
तल्लख, नॅचरल तनुजा, खट्याळ लीना चंदावरकर, एकाच सिनेमापुरती चमकलेली काजल किरण, अधून मधून हिंदीत येऊन-जाऊन असलेल्या जयश्री गडकर, कानन कौशल... अशी मराठीची परंपरा तग धरून असताना दोन अस्सल स्टार्सचा उदय झाला... 
एकीला पारखली व्यावसायिक चित्रपटसृष्टीतला मेरूमणी असलेल्या राज कपूरनं... त्याच्या 'सत्यम शिवम सुंदरम' मधली छोटी झीनत साकारणाऱ्या पद्मिनी कोल्हापुरेमध्ये मोठी अभिनेत्री होण्याचे सगळे गुण आहेत , हे त्यानं ओळखलं आणि हिंदीला एक सशक्त अभिनेत्री मिळाली... 
त्याचवेळी हिंदी सिनेमाची भाषाच बदलू पहाणारया एका बुद्धिमान दिग्दर्शकाला फिल्म इन्स्टिट्यूटच्या डिप्लोमा फिल्ममधल्या काळ्यासावळ्या पोरीच्या डोळ्यातला स्पार्क 'दिसला' आणि स्मिता पाटील या 'लीजंड'चा रूपेरी पडद्यावर प्रवेश झाला. 
या दोघींनी हिंदी सिनेमाच्या दोन परस्परविरोधी शैलीचे सिनेमे गाजवले. मात्र, पद्मिनीनं बेनेगली छापाचा 'गहराई' ही गाजवला आणि त्याच वेळी स्मिता पाटील 'आज रपट जाए तो' म्हणत पांढरी साडी नेसून पावसात अमिताभबरोबरही उन्मुक्त भिजत नाचली.
गांधींची कस्तुरबा बनून एकदम इंटरनॅशनल स्केलवर आगमन केलेल्या रोहिणी हट्टंगडींनी काही काळ समांतर सिनेमाची वाट चालून पाहिली, पण नंतर त्यांना आपल्यापेक्षा मोठ्या अमिताभची आई होण्यातलं व्यावहारिक शहाणपण उमगलं असावं. हिंदी सिनेमातली 'माँ'ची, पांढरं कलप आणि बोहारणीही घेणार नाहीत असल्या कळकट्ट पांढऱ्या साड्यांमधून आणि घरात कुणीतरी मेलंच आहे, अशा रडक्या अभिनयातून मुक्तता केली ती आपल्या रीमानं. 
सलमान खानचीच नव्हे, तर सगळ्याच खानांची ग्लॅमरस मॉम म्हणून रीमानं नवी वहिवाट सुरू केली.
हिंदीतला मराठी नायिकेच्या यशाचा उच्चांक म्हणजे माधुरी दीक्षित... तिनं राज्य केलं, असं म्हणणंही चूक आहे... अजून तिचं राज्य खालसा झालेलं नाही, इतकी तिची क्रेझ आहे. 
माधुरीपाठोपाठ अश्विनी भावे, वर्षा उसगांवकर या मराठीतल्या नायिकांनी हिंदीत पाय रोवण्याचा प्रयत्न केला. पण, का कोण जाणे, दानं उलटी पडत गेली. ममता कुलकर्णीनं 'स्टार डस्ट'सारख्या मासिकांचा खप वाढवणारे बिनधास्त, बोल्ड फोटो दिले. त्या गडबडीत अभिनय शिकायचा राहूनच गेला तिचा. 

(खूप काळानंतर राजकुमार संतोषीच्या शाळेत शिकण्याचा विचार आला होता तिच्या मनात. पण, तो वेगळ्याच 'शाळे'चा विद्यार्थी.) 'डोन्ट माइण्ड' म्हणणाऱ्या गोड सोनाली बेन्द्रेने अभिनय 'माइण्ड' केला, तो 'अनाहत'च्या रूपानं कारकीर्दीला पूर्णविराम देताना. 
काश, ये लडकी थोडी और सिरीयस होती... रामगोपाल वर्माच्या फॅक्टरीत नको इतका काळ अडकून पडलेल्या ऊर्मिला मातोंडकरमध्ये माधुरीचा झेंडा पुढे चालवण्याचं सार्मथ्य होतं... पण...
आताही हिंदीत मराठी मुली इंटरेस्टिंग कामं करताहेत. 
नाटकाच्या सकस परंपरेतून आलेल्या अभिनयकुशल सोनाली कुलकर्णीनं कमशिर्यल सिनेमाच्या भानगडींत न पडता भूमिकेच्या मेरिटवर काम स्वीकारायचा धडाका लावलाय. तिच्या कारकीर्दीचे खरं वजन उमगायला कदाचित थोडा काळ जावा लागेल.
विद्या माळवदे, सागरिका घाटगे यांच्या रूपानं मराठी ग्लॅमर गर्ल्स ' चक दे ' म्हणताहेत... ' चीप चीप ' वाटणाऱ्या राखी सावंतने विपरीत परिस्थितीशी दोन हात करून इंडस्ट्रीत, आश्चर्य वाटावं असं भक्कम स्थान निर्माण केलंय...
ही मराठी नायिकांची फुल अँड फायनल यादी नव्हे... इसाक मुजावर किंवा दिलीप ठाकूरांसारखे चालते बोलते 'सिनेमाहितीकोश' आणखी पाच-पंचवीस नावं फटाफट काढून दाखवतील... 'अरे, हा हिला कसा विसरला रे' म्हणून कित्येक वाचकही हळहळतील...
...पण, काहीही झालं, तरी दोन नावांशिवाय ही यादी निर्विवाद अपूर्ण राहील... या दोघींनी अनेक नायिकांना 'नायिका' बनवलंय...

नावं ओळखल्याबद्दल शाबासकी घेण्याचं कारण नाही.

कोणीही मराठी माणूस या 'महानायिकां'ना विसरू शकत नाही...

... लता मंगेशकर आणि आशा भोसले. 






(महाराष्ट्र टाइम्स वार्षिक)

No comments:

Post a Comment