‘ऑल इज वेल, दॅट एंड्स वेल’ या वाक्प्रचाराचा व्यत्यासही कसा तेवढाच सार्थ आहे, हे अनुभवायचं असेल, तर नवा ‘परिणीता’ पाहा.. या वाक्प्रचाराच्या मराठी रुपाचा वापर करायचा, तर व्यत्यासाचीही गरज नाही. ‘ज्याचा शेवट गोड ते सारेच गोऽऽडगिऽऽट्ट!’ असं मूळ रुपच वापरलं तरी पुरे. निर्मितीमूल्यांची श्रीमंती (पण, भन्साळीकृत ‘देवदास’छाप ओंगळ बटबटीत नव्हे), ‘फास्ट कटिंग’च्या जमान्यात संथ सहजगतीनं फुलणारे सीन, १९६० च्या कलकत्याचं तुलनेनं विश्रांत जीवन, प्रमुख कलावंतांचा उत्कृष्ट अभिनय (विशेष उल्लेखाची मानकरी शीर्षक भूमिकेतली विद्या बालन ) आणि प्रदीप सरकार या जाणत्या दिग्दर्शकाची माध्यमावरची पकड यामुळे या सिनेमावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय. त्याची जोरदार शिफारस करताना माणसं, ‘शेवट जरा सोडला तर सिनेमा बेस्ट आहे’ असं सांगताहेत..
..पण, असा सोडता येतो शेवट? तो सिनेमाचा भाग नाही की काय? .. तो त कथानकाचा चरमबिंदू आहे. आणि ही कथा ‘.. आणि ते सुखाने नांदू लागले’ अशी, साठा उत्तरी सुफळ संपूर्ण छाप नाही, अनेक प्रश्न निर्माण करणारी कथा आहे, तशीच हाताळणी आहे!
‘परिणीता’ ही शरतचंद्र चट्टोपाध्यायांच्या सुरुवातीच्या साहित्यरचनापैकी एक. त्यामुळे थोडी डावी. तिच्या ललिता या बाळबोध नायिकेचं अधिक विकसित, सघन, कंगोरेदार रुप शरतबाबूंच्याच ‘गृहदाह’मध्ये उमटले आहे. शरतबाबूंच्या अमाप लोकप्रिय ‘देवदास’मध्येही ‘परिणीता’चे पडसाद आहेतच. नव्या ‘परिणीता’चे पटकथाकार विधु विनोद चोप्रा आणि प्रदीप सरकार यांनी सिनेमासाठी रुपांतर करताना शरतबाबूंची ललिता अधिक गहिरी केली आहे. त्यासाठी त्यांनी कथानकाचा काळ बदलला आहे. कादंबरीत १९१२ च्या सुमाराला घडणारं कथानक सिनेमात १९६२ च्या सुमारास घडतं. त्याचा सिनेमाच्या बाह्यरुपाला मोठा फायदा झालेला आहे. पण, १९१२ ची मूल्यव्यवस्था १९६२ मध्ये आणताना, त्यात आपल्या पदरची भर घालताना त्यांची दमछाक झाली आहे. त्या दमछाकीचा चरमबिंदू म्हणजे सिनेमाचा ‘विधु विनोदी’ क्लायमॅक्स! पटकथाकारांनी अतिशय इन्टेन्स प्रेमाचा आविष्कार म्हणून कल्पिलेल्या क्लायमॅक्सला सगळे प्रेक्षक खदाखदा हसतात..
..मग सिनेमाचा कथात्मक परिणाम काय? मूळ कादंबरीत नायिका ललिता ही एका निर्धन गृहस्थाघरी वाढलेली त्याची अनाथ भाची. शेजारच्या नवीनचंद्र राय या धनिकाच्या मुलाची, शेखरची बालमैत्रीण.
हे दोघे तारुण्यात पदार्पण करतात, तसं मैत्रीचं रुपांतर प्रेमात होतं. या प्रेमाची खबर नसलेले ललिताचे मामा तिच्यासाठी वरसंशोधन सुरू करतात. गिरींद्र हा नवयुवक त्यांना आवडतो. तोही ललिताच्या प्रेमात पडतो. त्यापायी मामांचं कर्ज फेडतो. ललिताचे मामा गिरींद्रमुळे ब्राह्यो समाजाचे सदस्य होतात,
तेव्हा आता गिरींद्रशीच ललिताचं लग्न होणार, अशा समजुतीनं शेखर संतापतो, आईला घेऊन तीर्थयात्रेला जातो. दुस-या एका मुलीशी लग्न ठरवतो. पण, ऐनवेळी गौप्यस्फोट होतो की गिरींद्रचं लग्न ललिताशी नव्हे, तर तिच्या मामेबहिणीशी झालंय. मग सगळे गैरसमज संपून शेवट गोड होतो. सिनेमात गिरींद्रचा गिरीश झाला आहे. ललिताच्या मामाची हवेली हडपण्याचा प्रयत्नात ललिता आणि शेखर यांच्यात गैरसमजाची बीजं रोवणारं शेखरचे वडिल नवीनचंद्र राय यांच्या रुपाने एक खलनायक निर्माण करण्यात आला आहे.
एका शुभमुहूर्तावर शेखर आणि ललिता हे ‘सर्वस्वाने एकमेकांचे’ होऊन जाण्याचा (कलात्मकतेने टिपलेला) प्रसंगही आहे. तीर्थयात्रेऐवजी शेखरला नाटय़निर्मितीसाठी कामकाजानिमित्त दार्जिलिंगला पाठवण्यात आलं आहे.. सिनेमातला शेखर हा ‘देवदास वजा दारू आणि संवेदनशीलता’ असा टिपिकल बंगाली नायक.. ‘नायक’ कसला? प्रोटॅगनिस्ट.. फक्त ‘प्रमुख व्यक्तिरेखा.’ त्याच्या वडिलांना पैशापलीकडे काही दिसत नाही, याला स्वत:पलीकडे काही दिसत नाही. तो ललिताच्या प्रेमात आहे, हे त्याला तिच्याविषयीच्या पझेसिव्हनेसमधूनच कळतं.
‘मालकी हक्क’ या प्रेमाच्या पहिल्या पायरीवरू तो कधीही वर चढत नाही. आणि ललिताशी भावबंध जुळलेले असताना वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी एक मुलगी पाहायला जाण्याइतका तो निबरही आहे. ललिताला मात्र ‘पर’पुरुषाकडे पाहण्याचीही चोरी.
‘शेखर एके शेखर’ हेच आयुष्य बनलेल्या ललिताच्या आयुष्यात गिरीशच्या रुपानं एक समर्थ पर्याय येतो. (‘देवदास’च्या परिभाषेत हा ‘पारो मीट्स चंद्रमुख’ असा प्रकार झाला.) तो एक परिपक्व पुरुष आहे. तिच्या आयुष्यात येऊ घातलेलं वादळ तिच्यावरच्या प्रेमापायी एकहाती परतवणारा. त्याच्याबद्दल तिच्या मनात ओढ नाही, आदर आहे. मात्र, शेखर तिच्यापासून तुटत जात असताना गिरीश जाणीवपूर्वक जवळ येत असतो, यातून ललिताची जी घालमेल होते, ती सिनेमात संदिग्ध ठेवण्यात आली आहे. तरीही तिच्या मनात गिरीशबद्दल काही ‘हालचाल’ आहे, हे दुर्गापूजेच्या प्रसंगातून दिसतंच. आणि मग अचानक येतो तो ‘सर्वस्वसमर्पणा’चा प्रसंग.
शेखरने कोणत्याही प्रकारे ‘पात्रता’ सिद्ध केलेली नसताना ललिता एके रात्री सु‘मुहूर्ता’वर शेखरला सर्वस्व अर्पण करते. गिरीश आपल्या मनात शेखरची जागा घेईल की काय या भयानेच केल्यासारखी ही कृती आहे. ‘हे म्हणजेच लग्न’ किंवा ‘यासाठीच लग्न’ किंवा ‘हे फक्त लग्नसंबंधातच’ अशापैकी संस्कारातून ती मनोमन त्याची ‘पत्नी’ बनून जाते. (हा ‘मनोमन’ भाग सिनेमाचे लेखक त्या क्षणी संदिग्ध ठेवतात, कारण त्यांना शेवटपर्यंत ‘सस्पेन्स सस्पेन्स’ खेळायचं असतं.) कादंबरीत एकमेकांना फक्त हार घालून दोघे ‘विवाहबद्ध’ होतात, इथे त्यांना विवाहोत्तर ‘कार्यवाही’चे शिक्कामोर्तब करावे लागते, हेही लक्षणीय.
..पुढे शेखरच्या लग्नाच्या वेळी गिरीश शेखरला भेटतो आणि ललितावर आपलं प्रेम असलं तरी तिच्याशी लग्न झालेलं नाही, तिच्या बहिणीशी झालंय, असा खुलासा करतो. त्याला नकार देताना ललितानं त्याला ‘मी विवाहिता आहे’ असं सांगितलेलं असतं. एकदम साक्षात्कार झालेला शेखर एकदम पिसाटल्यासारखा बाहेर येऊन मिळेल त्या साधनानं दोन घरांमध्ये वडिलांनी बांधलेली भिंत पाडायला निघतो.. त्याच तो सगळा आवेश बालिश आणि विनोदी. (एवढय़ा वेळात ललिता मोटारीत बसून लंडनच्या वाटेने निघूनही गेली असेल, एवढंही भान राहात नाही त्याला.)
सिनेमा संपल्यावर प्रश्न पडतो की, ललितासारख्या परिपक्व संवेदनशील मुलीचं या दगडूबरोबर पुढे कसं काय निभणार? ज्या प्रेमानं तिला संकटात कधीच साथ दिली नाही, ते भविष्यात तिची कसली संगत करणार? गिरीशनेही तडजोड म्हणूनच तिच्या बहिणीशी विवाह केला आहे. ललिता आणि तो एकमेकांच्या भावविश्वात रेंगाळत राहणार नाहीत का?.. आपल्या मनातला हा ‘परिणीता- पार्ट टू’ अधिक त्रासदायक आहे.
‘परिणीता’ची परिणती ही अशी अस्वस्थ करणारी आहे. सिनेमासाठी रुपांतर करताना पटकथाकारांनी नऊ दशांश काळ टाळलेला ‘फिल्मी’पणा शेवटच्या एक दशांश भागात मन:पूत ओतलेला आहे. त्यामुळेच ‘शेवटची दहा मिनिटं सोडली तर..’ अशी सोय करून घेणारे करून घेवोत बापडे; या परिणतीने सिनेमाचा परिणाम पुरता पंक्चरला आहे.
(महाराष्ट्र टाइम्स)
No comments:
Post a Comment